जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात करा Pradip gajanan joshi द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात करा

जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात करा
प्रा. वि. वि. चिपळूणकर यांनी काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद साधताना जीवन विकासाची तेरा सूत्रे विषद केली आहेत. आपल्या आयुष्यात आपण या तेरा सूत्रांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. असह्य जीवन सुसह्य बनण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. मला आज जेव्हा ही तेरा सूत्रे आठवली त्यावेळी माझ्या कल्पनेतून माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. खरच या तेरा सूत्रांच्या आधारे जीवन व्यतीत करता येईल का? असा प्रश्न मला पडला. त्या मार्गाने जाणे अवघड आहे मात्र प्रयत्न केल्यास ते सहज शक्य आहे असेच मला जाणवले. केवळ शिक्षकच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी या तेरा सूत्राकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे या मताप्रत मी पोहचलो.
1) शरीर सुदृढता : मला माझे शरीर सुदृढ राखवयास हवे. Sound mind in sound body असे नेहमीच म्हटले जाते. शरीर निरोगी असेल तर मन निरोगी असते. शरीर सुदृढ राखण्यासाठी आपणास जीवनात काही पथ्ये पाळावी लागतील. नियमित व्यायाम, खाण्यावर नियंत्रण या दोन बाबी महत्वाच्या आहेत. आजच्या फास्टफूडच्या जमान्यात निरोगी माणूस सापडणे मुळात कठीण आहे. माणसे खाण्यावर नियंत्रण ठेवता नाहीत. त्यामुळे शरीर ओबडधोबड होते. ते मूळ पदावर आणण्यासाठी हजारो रुपये खर्चून जिम लावतात. अति व्यायाम केल्याने भूक लागली की पुन्हा खाण्यावरचे बंधन सुटते. हे चक्र सातत्याने सुरू राहते. पूर्वी माणसे कशी स्लिम होती. आज ती शोधावी लागतात.
2) निरोगी मन – सुदृढ शरीराबरोबर मन देखील सुदृढ असावे लागते. मला माझे मन निरोगी ठेवावयास हवे. Empty mind is devil’s workshop असे म्हटले जाते. रिकामे मन हा सैतानाचा कारखाना असतो. अति विचार करणाऱ्या माणसाचे मन कधीच निरोगी नसते. नकारात्मक विचारसरणीची माणस जीवनात काहीही करू शकत नाहीत. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागणे गरजेचे असते. द्वेष, हेवा, मत्सर हे प्रगतीच्या मार्गातील अडथळे आहेत.
3) भक्तीपूर्वक स्वीकृत व्यवसायातून अर्थार्जन- मला माझा स्वीकृत व्यवसाय भक्तीपूर्वक करून व साधन सुचिता सांभाळून आवश्यक ते अर्थार्जन करावयास हवे. आपण नोकरी किंवा व्यवसाय करतो. हे काम आपण स्वतःहून निवडलेले असते. कोणी ते आपल्यावर लादलेले नसते. त्यामुळे व्यवसाय किंवा नोकरी ही भक्तीपूर्वक केली पाहिजे. जशी परमेश्वरावर आपली नितांत श्रद्धा असते तशीच नोकरी किंवा व्यवसायावर हवी. जगण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढेच अर्थार्जन करण्याकडे आपला कल असला पाहिजे. माणसे भौतिक सुखाच्या मागे धावत असतात. जगणे व मरणे या प्रवासात आपल्याला बरोबर काहीच नेता येत नाही. मग ही धावाधाव कशासाठी?
4) अर्थप्राप्ती व काटकसर – कितीही अर्थप्राप्ती सामान्यपणे अपुरीच वाटते. हे लक्षात घेऊन कणाकणाने मला काटकसर करावयास हवी. जीवन व्यतीत करत असताना आपल्या सुखाच्या कल्पना अमर्याद असतात. आपण तुलनात्मक आयुष्य जगत असतो. त्यामुळे कितीही अर्थप्राप्ती केली तरी ती आपल्या दृष्टीने अपुरीच असते. त्यावर एकमेव उपाय म्हणजे आपण काटकसर करायला शिकले पाहिजे. कपाट भरुन कपडे, अंगभर सोन्याचे दागिने, सातत्याने शॉपिंग, दररोज फास्टफूड काय कामाचे?
5) प्रत्येक क्षणाचा सदुपयोग- मला उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावयास हवा. सध्याच्या काळात मानवी जीवन सरासरी 50 वर्षे गृहीत धरले तर त्यापुढील आपले आयुष्य बोनस असते याची सतत आपणास जाणीव असली पाहिजे. काळ कोणासाठी थांबत नसतो. त्यामुळे आपल्या दृष्टीने प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. टी व्ही पुढे तासनतास बसणे, निरर्थक व रटाळ मालिका पाहणे, मोबाईल वर सतत खेळणे काय कामाचे? एकदा गेलेला क्षण परत येत नाही याची जाणीव आपणास हवी.
6) लोकसंग्रह हवा – स्वावलंबनाइतकेच परस्परावलंबनाचे महत्व लक्षात घेऊन मला लोकसंग्रह करावयास हवा. जीवनात स्वावलंबी असणे गरजेचे आहे. आपले काम आपणच करण्याकडे आपला कल हवा. म्हणतात ना जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. काही काही माणसे पाणी पिण्यासाठी देखील स्वतः उठत नाहीत. दुसऱ्याला हुकूम करतात. काही बाबतीत मात्र आपणास परस्परांवर अवलंबून रहावे लागते. त्यातून लोकसंग्रह वाढतो. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहूच शकत नाही. विभक्त व एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे तोटे आपण पाहतोच ना! कोण कोणत्या वेळी कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही त्यामुळे लोकसंग्रह हवाच.
7) वृक्षमैत्री – पर्यावरणाचे महत्व विचारात घेऊन मला वृक्ष मैत्री करावयास हवी. पर्यावरण समतोलाच्या केवळ घोषणा देऊन भागणार नाही. त्याचे महत्व मला विचारात घ्यावे लागेल. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन याची प्रत्येकास जाणीव असावयास हवी. Nature is our best friend असे म्हटले जाते. एखाद्या लहान बालकाप्रमाणे आपण रोपांची काळजी घेतली पाहिजे.
दारिद्र्य रेषेखालील बांधवांचे स्मरण – देशातील दारिद्र्य रेषेखालील असंख्य बांधवांचे स्मरण ठेवून मला माझ्या पोशाखात साधेपणा ठेवायला हवा. आपल्या देशात गरीब व श्रीमंत ही मोठी दरी आहे. काहीजण रोज पंचपक्वान्ने खातात तर काहीजण दिवसरात्र उपासमारीची दुःखे झेलत आयुष्य जगत असतात. काहीजण दिवसातून चार पाच वेळा कपडे बदलतात तर काहीजण अर्धनग्न आवस्थेत दिवस कंठीत असतात. जीवन जगताना आपण नेहमी आपल्यापेक्षा श्रीमंत असलेल्या व्यक्तीकडे न पाहता आपल्यापेक्षा गरीब असलेल्या व्यक्तीकडे पहावे.
9) शब्दात मार्दव हवे- माणसाच्या बोलण्यावरून त्याची संस्कृती कळते. माझ्या शब्दात मार्दव हवे. माणसाने जीवन जगत असताना डोक्यावर बर्फ व तोंडात नेहमी खडीसाखर ठेवावी. वादापेक्षा संवादाला अधिक महत्व दिले गेले पाहिजे. लहान थोरांना मान सन्मान देण्याची वृत्ती आपल्यात हवी. गोड बोलण्याने जेवढी कामे होतात तेवढी त्रागा करून होत नाहीत. थोर महापुरुष पहा. त्यांनी हीच शिकवण त्यांच्या कृतीतून आपणास दिली आहे.
10) नेहमी प्रसन्न चेहरा- मला माझा चेहरा नेहमी प्रसन्न राखवयास हवा. आपला चेहरा सतत चिंताग्रस्त असेल तर लोक आपल्यापासून दुरावतात. चेहरा जर प्रसन्न असेल तर आपल्या भोवती लोकांचे मोहोळ जमा होते. आनंद नेहमी दुसऱ्याला सांगावा. दुःख आपल्याजवळ ठेवावे. निसर्गाचा नियम आहे सुखाचे सर्वजण सोबती असतात. दुःखात मात्र आपणच आपले सोबती असतो.
11) सभोवतालच्या घटनांचे ज्ञान – माझ्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे मला थोडे तरी ज्ञान असावयास हवे. आपण ज्या समाजात वावरतो तेथे अनेक घटना घडत असतात. त्याचे थोडेफार ज्ञान आपणास का असू नये? मी जर संगणकीय युगात वावरत असेन तर मला संगणकाची थोडीफार माहिती हवीच. कॅशलेस व्यवहारात माझा सहभाग असेल तर पेटीएम, क्रेडिट डेबिट कार्ड, ए.टी. एम याची माहिती मी जाणून घ्यायला नको का? बदलत्या परिस्थितीत मला देखील बदलायला हवे.
12) आवडीच्या क्षेत्राचे ज्ञान- मला माझ्या आवडीच्या क्षेत्राचे पुरेपूर ज्ञान हवे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कुणाला खेळाची, कुणाला संगीताची, कुणाला गायनाची, कुणाला लेखनाची आवड असते. आपले जे आवडते क्षेत्र आहे त्याचे पुरेपूर ज्ञान असले की आपण त्या क्षेत्रात हवी तशी प्रगती करू शकतो.
13) मी कोण? ची जाणीव हवी – मी कोण या प्रश्नाचा मागोवा घेत मला माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित करावयास हवा. एकूणच माझे जीवन अर्थपूर्ण करावयास हवे. या जगात आपले अस्तित्व काय याचा विचार आपण कधी केला आहे का? आपले जीवन अर्थपूर्ण असावयास हवे. जीवन जगताना योग्य मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे.
थोडक्यात काय तर तन, मन, धन, कण, क्षण, जण, वन, वसन, वचन, वंदन, ज्ञान, विज्ञान, आत्मज्ञान ही आपल्या जीवनाची शक्तिकेंद्रे आहेत.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल 9881157709