Mitra my friend - 2 books and stories free download online pdf in Marathi

मित्र my friend - भाग २

विवेकला प्रियाचा स्वभाव माहित होता.. हट्टी होती ती... उडी मारणारच... त्यासाठी,त्याने ती बोलत असतानाच, खांद्यावरून त्याची बॅग हळूच बाजूला ठेवली. आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिला. विवेक आपल्या मागे येऊन उभा राहिला हे जसं प्रियाच्या लक्षात आलं तसं तिने उडी मारली. विवेकने चपळाई करत प्रियाचा हात पकडला. खाली पडता पडता वाचली, पण एका झटक्याने खालच्या भिंतीला आपटली. डोक्याला लागल्याने बेशुद्ध झाली... आली का पंचाईत... विवेकने घट्ट पकडून ठेवलं होतं. पण तिला वर कसं खेचणार.. आजूबाजूला कोणी नाही.. मग काय करणार... हळू हळू तिला वर आणलं. कठड्यावर झोपवलं... तिला बसवण्याचा प्रयन्त करत होता तर पुन्हा तोल गेला.आणि ती उलट दिशेला, विवेकच्या बॅग जवळ पडली. सोबत विवेक त्याच्या अंगावर खेचला गेला.

अगदी. त्याच वेळेस... रात्रीची गस्त (फेऱ्या ) मारणारा एक हवालदार तिथे पोहोचला. पलीकडे असला तरी त्याला हे दोघे दिसत होते. " हे !! ... काय चाललंय तिथे... " त्याने मोठया आवाजात विवेकला हाक दिली आणि धावतच पोहोचला विवेक जवळ. प्रिया खाली बेशुद्ध... विवेक तिच्यावरून बाजूला जाण्याच्या तयारीत... अश्या " वेगळ्याच आसनात " दोघांना त्याने पाहिलं. विवेकची कॉलर पकडत त्याला बाजूला उभं केलं.

" काय रे... एकटी पोरगी दिसली नाही तर तोल सुटला वाटते... लाज नाही वाटत का... " एक सणसणीत थोबाडीत बसली विवेकच्या...

" नाही नाही... काका.. तुमचा गैरसमज होतो आहे.. " विवेक गाल चोळत म्हणाला.

" जिवंत तरी आहे का ती... कि मारून टाकलंस... " ,

" नाही... नाही.. काय पण काय बोलता... बेशुद्ध आहे ती... ती आत्महत्या करत होती... मी वाचवलं तिला.. " विवेक काकुळतीने म्हणाला.

" बरं.. बरं.. वाचवताना बॅग काढून ठेवण्या एवढा वेळ होता का..... आणि तुला कसं माहिती, हि इथेच येणार आहे जीव देयाला... " काय बोलू आता... मी स्वतः जीव देयाला आलेलो होतो... विवेक गप्प.. त्या हवालदाराने जवळच्या एका घरातून पोलीस स्टेशनला फोन लावला. १५ मिनिटांनी पोलीस व्हॅन आली सोबत ऍम्ब्युलन्स... प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणि विवेकला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

" अहो... मी खरं सांगतो आहे ओ... मी खरंच तिला वाचवलं आत्महत्या करण्यापासून... त्यात ती बेशुद्ध झाली. त्यात माझी काय चूक... infact, मी तिला ओळखतो सुद्धा ..." विवेक सांगत होता.

"हम्म .. म्हणजे मैत्रिणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयन्त करत होतास.. " इन्स्पेक्टर ने आपलं मत मांडून टाकलं.

" नाही सर... तसं काही नाही... ",

" मग तुम्ही दोघे एवढ्या रात्रीचे काय करत होता तिथे... " ,

" असंच फिरत फिरत आलो होतो... प्रिया आधीच होती उभी तिथे... ",

" एवढ्या रात्री फिरायला.. ? राहतोस तर दुसरीकडे... तुझं ऑफिस भलतीकडे.... आणि फिरायला तिसरीकडे.... काही जुळत नाही राव... टाका याला आत... " त्यांनी फर्मान सोडलं.

" साहेब.. प्लिज... मी खरं सांगतो आहे.. मी मोठया कंपनीत जॉबला आहे... पोस्ट पण मोठी आहे... मी असं काही करिन का.. " ,

" का करणार नाही ते सांग.. " त्यांनी उलट विवेकला विचारलं. " पण वाटतोस चांगल्या घरचा... " ते ऐकून विवेकला हुरूप आला. " जास्त हुरळून जाऊ नकोस... ती मुलगी जो पर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुला तुरुंगात राहावं लागेल.. तिच्या जबानीवर आम्हाला कळेल कि तू खरं बोलतोस कि खोटं.. "

पर्याय नव्हता.. रात्रभर विवेक तुरुंगात.. काय नशीब माझं ... काय करायला गेलो होतो आणि काय झालं..... त्यापेक्षा घरी जाऊन झोपलो तरी असतो ...पहाटे पहाटे म्हणजे ४.३० - ५ ला त्याला बसल्याजागी झोप लागली.. साधारण सकाळचे ८ वाजले असतील... " ओ !! उठा... साहेबांनी बोलावलं आहे... " विवेकला त्या आवाजाने जाग आली.. एका हवालदाराने त्याला बाहेर येण्यास सांगितले. विवेक बाहेर आला तर प्रिया आलेली.

" या या साहेब... या... तुमचीच वाट बघत होतो.. झोप झाली ना चांगली... " इन्स्पेक्टर विवेककडे बघत म्हणाले.

" या मॅडम आल्या म्हणून तुला सोडतो आहे, आता गप-गुमान घरी नाहीतर ऑफिसला जायचे.. " ,

" हो साहेब.. " म्हणत विवेक गुपचूप मान खाली घालून निघाला.

" ओ हिरो !! ... " मागून इन्स्पेक्टरने आवाज दिला. विवेक मागे वळला. " हा तूच... हिला वाचवलंस ना म्हणून "हिरो " हाक मारली... ",

"काय झालं ? " ,

" हिला पण घेऊन जा सोबत... " विवेक प्रियाकडे बघू लागला.. " तुझीच मैत्रीण आहे ना.. घेऊन जा तिला... ",

" कुठे नेऊ ? " , विवेकचा प्रश्न..

" ते तुम्ही दोघांनी बघा काय ते .. निघा.. " विवेक प्रियाला घेऊन बाहेर आला.

" कशाला वाचवलं मला ? " प्रियाचा पहिला पण रागीट प्रश्न... अरेच्या !!! एकतर हिला वाचवलं,... उपकार मानायचे सोडून मलाच ओरडते आहे.. " कोणी सांगितलं होतं तुला हिरोगिरी करायला... ?" विवेक इतका वेळ ऐकत होता... काय बोलू आता हिला... एकतर झोप झाली नाही... गप्पच राहू.. कर किती बडबड करायची तेव्हढी.. विवेक तसाच चालत होता.. थोड्यावेळाने प्रियाचा आवाज बंद झाला तसं त्याने मागे पाहिलं. प्रिया मागे उभी राहून कुठेतरी एकटक पाहत होती. विवेक जवळ आला तिच्या.. समोर वडापावची गाडी... गरमागरम वडे तळत होता.. मंद सुवास पसरला होता... हिला नक्की भूक लागली असणार.. .. त्या सुवासाने विवेकची भूक देखील चाळवली.. मी तरी कुठे काही खाल्लं आहे .. काल संध्याकाळ पासून... मीपण खातो.. " खाणार का वडापाव ? " प्रियाने होकारार्थी मान हलवली. दोन -दोन वडापाव पोटात गेल्यावर दोघांनाही बरं वाटलं.

पोटात अन्न गेल्यावर विवेकच्या डोक्यात आलं.. प्रियाला कुठे घेऊन जाऊ आता.. त्यात ऑफिसला तर जावेच लागेल... नाहीतर त्या बॉसला जेवण जाणार नाही..... काय करू ? विवेक विचार करू लागला. काही ठरवून बोलला तो... " एक काम करूया... तू आता माझ्या रूमवर राहा.. मी ऑफिसला जाऊन येतो पटकन.. मग आलो कि तुझे प्रोम्ब्लेम सोडवू... ठीक आहे ना ? " एव्हाना पोट भरल्यावर प्रियाचे डोकं ठिकाणावर आलेलं. सध्यातरी, विवेकचं ओळखीचा होता तिचा या शहरात... विवेकचे म्हणणे मान्य करून प्रिया, विवेक सोबत त्याच्या "भाड्याच्या " रूमवर आली. विवेकने पट्कन कपडे बदलले... धावतच तो ऑफिस मध्ये पोहोचला.

ऑफिसच्या दारातच बॉसची गाठभेट..

" काय विवेक... आज लेट... आणि झोप झाली नाही वाटते... " विवेकच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे बघत बॉस बोलला.

" हं.. हो.. नाही झाली झोप सर ...जरा .... " विवेकचं बोलणं मधेच तोडत बॉस बोलला...

" जा.. जास्त वेळ घालवू नकोस... ते एक नवीन काम आहे... सुरु कर लवकर... ",

" सर... सर... थांबा जरा.... करतो काम... पण आज लवकर जायचे होते... infact, आज सुट्टी घेतो.. हे सांगायला आलो आहे मी... " बॉसने एकदा विवेककडे नजर टाकली..

" काम संपलं कि जा घरी... " म्हणत केबिनमध्ये गेला..

काय फालतुगिरी आहे... एक सुट्टी मागून जसा काय मोठ्ठा गुन्हा केला मी.. चडफडत विवेक त्याच्या जागेवर येऊन बसला. पट्कन काम संपवतो आणि पळतो...प्रिया एकटी असेल ना.... मनात विचार चालूच... साधारण, दुपारी १२ चा सुमार.. विवेक जलदगतीने काम करत होता... त्याचवेळेस... त्याच्या शेजारचा फोन वाजला... ऑफिस च्या reception वरून फोन होता.. विवेक गेला बाहेर...

" फोन आहे तुझा.. " ,

" कोणाचा ? " ,

" पोलीस स्टेशन मधून... " विवेक टेन्शन मध्ये... त्याने फोन कानाला लावला.

" हॅलो... विवेक बोलतो आहे... ",

" विवेक ... तोच ना तू... सकाळचा हिरो... या साहेब .. परत आम्हाला भेटायला... " ,

" का काय झालं.. ? ".

" लवकर ये.. नाहीतर आम्ही येऊ का तुला नेयाला... " ,

" नको नको... मी येतो... " विवेकने फोन ठेवला.. बॅग उचलली आणि तसाच धावत निघाला... यांना ऑफिस चा नंबर कसा मिळाला... अरे हो !! .. आपणच नाही का दिला ऑफिसचा फोन आणि पत्ता.. पण यांना परत कशाला पाहिजे मी.. बॉस आता शिव्याच घालणार.. तिथे प्रिया एकटी... विवेक धावतच पोहोचला पोलीस स्टेशन मध्ये.

=========== क्रमश : ================

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED