(सदर कथा काल्पनिक असून त्याचा संबंध कोणत्याही सिनेमाशी... कथेशी नाही... संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... हि कथा आपल्याला खूप मागे घेऊन जाते.... ज्या काळात social media, FB , मोबाईल असं काही अस्तित्वात नव्हतं ... निदान भारतात तरी... )
" हो सर.. करतो मी... रात्री पर्यंत देतो करून... " विवेक त्याच्या बॉसला म्हणाला. मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. एकतर तिघांचे काम एकटा करून दमला होता. दोघेजण ऐनवेळी आले नव्हते. त्यांचे काम करून निघत होता ,तर निघताना पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितलं. काय करणार मग... करत बसला काम रात्रीपर्यंत. दुसऱ्या दिवशीही तेच... एक संपत नाही तर दुसरं तयार... पुन्हा पुन्हा... तेच तेच काम ...वैतागला विवेक अगदी.
विवेक मूळचा साताऱ्याचा... तिथेच शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये जॉब साठी आलेला. अपेक्षा पेक्षा जास्तच चांगली नोकरी मिळाली. पगारसुद्धा खूपच छान होता. मुंबईत राहण्यासाठी एका इमारती मध्ये " भाड्याने " एक रूम घेतली. त्या रूमचे भाडे भरून... काही पैसे गावाला पाठवून देयाचा.. त्यांचा घरी सध्या तरी एकटाच कमावणारा... वडील होते कामावर, तोपर्यंत चिंता नव्हती.. वडील अडाणी... सामान उचलायचे काम करायचे... त्यांना मिळणाऱ्या पगारात कुटूंब चालायचे.. कुटुंबात आई, विवेकसह २ बहिणी... विवेक दुसरा... एक बहीण २ वर्षांनी मोठी तर दुसरी २ वर्षांनी लहान... एक दिवस अवजड सामान उचलताना विवेकच्या वडिलांच्या पायावर पडले.. तेव्हापासून एक पाय निकामी झाला... खूप उपचार करून सुद्धा , वाटयाला लंगडणे आले. काम सुटलं... पैसे कमी पडू लागले. म्हणूनच विवेकला सातारा सोडून मुंबईत यावे लागले. ४ वर्ष झाली त्याला मुंबईत जॉब लागून.. त्याच्यामुळेच मोठ्या बहिणीचे लग्न झाले. लहान बहिणीचे यावर्षी लग्न करून आपलं उरकून टाकू या विचारात विवेक असायचा.
पण आता विवेक कंटाळा होता या सर्वाला... रोज तेच तेच काम, तीच ती life style... सकाळी उठून स्वतःचा नास्ता स्वतः करायचा... सोबत दुपारचा डब्बा... कधी सकाळी उशिरा जाग आली तर दुपारचे जेवण हॉटेलमध्ये... सकाळी ९ पासून संध्याकाळी ७ पर्यंत.... कधी कधी तर रात्री १० वाजेपर्यंत काम असायचं. पगार मोठ्ठा होता परंतु कामही वाढलं होतं. रात्री उशिरा घरी आला कि कसल जेवण आणि काय... घरात काय असेल ते खायचा नाहीतर तसाच उपाशी झोपायचा. रविवारीही आराम मिळेल असं काही नव्हतं... बॉस बोलावून घेयाचा. Bank account मध्ये खूप पैसे जमा होत होते.. त्याच्या मेहनतीमुळे गावच्या घरची परिस्तिथी पुन्हा एकदा छान झाली होती... सुधारली होती. पण विवेकचं आयुष्य यात जवळपास गुरफटून गेलं होतं.
म्हणतात ना... पेला भरत आला कि थांबावे लागते.. नाहीतर पाणी उतून जाते. तसंच झालं, पेला भरत चालला होता विवेकचा... तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच झालं. विवेक काम संपवून निघत होता.. बॅग खांद्याला लावली आणि बॉसने थांबवलं. " एवढं करून जा.. urgent आहे.. उद्या सकाळी क्लायंटला देयाचे आहे... " असं बोलून बॉस स्वतः निघून गेला. विवेक एकटाच रात्रीपर्यंत काम करत होता.. रात्रीचे १० वाजले तरी ऑफिस मधेच... काम जवळपास संपत आलेलं.. आणि तितक्यात शेजारचा फोन वाजला..... बॉस चा फोन...
" अरे विवेक काम झालं का..? " ,
" नाही सर... होतं आला आहे.. ",
" एक काम कर.. राहिलेलं काम उद्या कर... क्लायंटला दोन दिवसानी ते काम पाहिजे आहे... आताच त्यांचा फोन आलेला... तू निघ घरी.. and sorry.. " म्हणत बॉसने फोन कट्ट केला..
डोक्यात गेलं ते अगदी विवेकच्या... बस्स झालं... बॅग उचलली.. कंप्युटर बंद न करताच बाहेर पडला. पोटात काही नाही, डोक्यात राग... काय करायचं असं जगणं.. सकाळी लवकर उठून मर-मर काम करायचं.. आणि रात्री साधं जेवायला सुद्धा मिळत नाही. गावाच्या घरी सगळे बरे जेवून झोपले असतील... आणि मी इकडे... कशाला पाहिजे असं जगणं... आधीच तो त्या routine life ला कंटाळला होता... त्यात आजची घटना... आयुष्यच संपवून टाकू... बँकेत खूप पैसे जमा आहेत... शिवाय मी मेलो कि माझ्या पॉलिसीचे पैसे मिळतील आईला.... यावर घर चालेल अजून काही वर्ष... असा विचार करून विवेक त्याच्या रूमवर न जाता समुदकिनारी गेला... तिथे थोडीच वर्दळ होती.
रात्रीचे १०.३० वाजत होते.. विवेक समुदकिनारी चालत पुढे जात होता.. संपूर्ण किनाऱ्याला छानशा कठडा बांधला होता. तिथे बसून गप्पा-गोष्टी करत लोकं.समुद्राच्या पायथ्यापासून साधारण ५ ते ६ फुटावर तो कठडा बांधलेला होता. इथून उडी मारू खाली पाण्यात... पोहता तर येत नव्हतंच... शिवाय रात्रीची भरती होतीच.. त्यामुळे इथून उडी मारली कि जीव जाईलच , असं विचित्र calculation करून त्याने एक जागा निवडली. आणखी पुढे जाऊन उडी मारू... म्हणत तो आणखी पुढे आला. तर त्याला थोडं पुढे कोणीतरी त्या कठडयावर उभं दिसलं. जरा पुढे गेल्यावर, कपड्यावरून मुलगी आहे हे त्याला कळलं. तीही बहुदा उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. परंतु जमत नव्हतं तिला.. नेहमीप्रमाणे, विवेकचं कुतूहल जागं झालं. तिला वाचवायला हवे, म्हणत तो तिच्या जवळ गेला.
"excuse me !! " विवेकने मागून आवाज केला. तसं तिने मागे वळून पाहिलं. अरेच्या !! हि तर प्रिया... विवेकच्या ओळखीची... त्याच्याच कॉलेजची... ५ वर्ष एकाच वर्गात होते दोघे. दोस्ती होती तेव्हा यांची.. पण हि तर साताऱ्याला असते, इकडे काय करते हि... किती विचार पटकन येऊन गेले विवेकच्या मनात... परंतु सध्या तरी ती आत्महत्या करते आहे, आधी तिला वाचवायला हवे... असं विवेकने ठरवलं.
" तू प्रिया ना... ",
" तू विवेक ना... " प्रियाने उलट विचारलं..
" हो.. पण तू हे काय करते आहेस.. ? " ,
" उडी मारते आहे.. जीव देते आहे... हिंमत होतं नाही... " पुन्हा उडी मारायचा प्रयन्त..
" थांब.. थांब... " विवेक तिला थांबवत म्हणाला. " कशाला... काय झालं... आणि तू साताऱ्याला असतेस ना... इकडे काय आत्महत्या करायला आलीस का ? " विवेक म्हणाला तसं तिने रागात बघितलं त्याच्याकडे.
"हो... साताऱ्यावरून मुंबईला आले आत्महत्या करण्यासाठी.. तुला काय त्याचं... " पुन्हा प्रयत्न.
" थांब... थांब.... काय झालं एवढं.. ते तरी सांग. " ,
" तुला का सांगू.. ",
" ५ वर्ष एकत्र शिकत होतो.. मित्र होतो तुझा... आठवत नाही का... ?" ते ऐकून प्रिया क्षणभर थांबली...
" फसवलं रे त्याने मला.. इकडे त्याला भेटायला आले तर भेटलाच नाही... त्यात एका ठिकाणी पाणी पिण्यास थांबले तर सगळं सामान चोरीला गेलं.... अंगावरचे कपडे तेव्हढे राहिले... कशी जाऊ गावात परत... तिकडंच सगळं सोडून इकडे आले..तर हे .... काय करू सांग जगून... कोणी नाही माझं... परत जाण्यापेक्षा जीवच देते ना... " प्रिया सांगत होती विवेकला...
=========== क्रमश : ================