मित्र my friend - भाग ३ Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्र my friend - भाग ३

" या .... " विवेकला बघून इन्स्पेक्टर बोलले.

" काय झालं साहेब ? " विवेकने खुर्चीवर बसत विचारले.

" चल चल बसू नकोस.... " इन्स्पेक्टर उभे राहत म्हणाले. विवेकला मागोमाग यायला सांगून एका खोलीत शिरले. जखमींवर उपचार करायची खोली ती... विवेकने डोकावून पाहिलं आत. च्यायला !! हि तर प्रिया....

" हि इकडे कशी.. ? " विवेक ओरडलाच..

" तुझ्या मैत्रिणीला जीव देयाची एवढी घाई आहे का..." इन्स्पेक्टरने विचारलं.

" म्हणजे ? " विवेक...

" म्हणजे... समुद्रकिनारी... जिथे तुम्ही दोघे सापडला होतात , तिथे... या बाईसाहेब... उभ्या होत्या कठड्यावर... नशीब, आमचा एक हवालदार होता तिथे.. त्याला बघून उडी मारली पाण्यात... बरं त्याला पोहता येत होता म्हणून.. वाचली... " ,

"आता कशी आहे.. ? " ,

" बेशुद्ध आहे... जरा नाका-तोंडात पाणी गेलं आहे.. येईल शुद्धीवर.. " विवेक प्रियाकडे बघत होता... विवेक काही बोलत नाही म्हणून इन्स्पेक्टर च बोलले. " काय करतोस मग... इथे जागा नाही आहे तिला आणखी वेळ ठेवायला... तुम्ही दोघे चांगल्या घरातले वाटता... तुझ्या मैत्रिणीला काही मानसिक आजार आहे का.. तुही बोलला होतास कि ती आत्महत्या करत होती... आता हि तेच.. मी तुमची तक्कार नोंदवत नाही... पण आता हिला जास्त वेळ पोलीस स्टेशन मध्ये ठेवू शकत नाही... दुसरा कोणी आला तर मला प्रॉब्लेम होईल... सांग कुठे जायचे ते.. घरी कि हॉस्पिटल... तशी व्यवस्था करतो मी.." ,

" हॉस्पिटल मधेच नेतो मी.. काही औषध वगैरे लागली तर तेच बघतील ना... " विवेकच उत्तर... त्यांनी लगेच गाडीची व्यवस्था करून प्रियाला हॉस्पिटल मध्ये दाखल केलं.. सोबत विवेक होताच.

दुपारी प्रियाला जाग आली. डॉक्टरने प्रियाला चेक केलं.. " आज संध्याकाळी discharge देऊ.. तोपर्यंत हि दिलेली औषध आणि बिल भरून टाका. " डॉक्टर निघून गेले. विवेकने प्रियाकडे रागात बघितलं. " आता एक पाऊल जरी टाकलंस ना बाहेर या रूमच्या.... तर बघ काय करिन ते... " प्रिया विवेकच्या रागाला घाबरली. संध्याकाळ पर्यंत चिडीचुप होती ती.. विवेकला कळलं ते. संध्याकाळ होताच विवेक प्रियाला घेऊन त्याच्या रूमवर आला. प्रिया गप्पच.. विवेक तिच्या समोर जाऊन बसला.

" बोल आता काहीतरी... काय झालं आहे नक्की ?... एवढा जीव वरती आला आहे का... बोल ना... " एवढा वेळ शांत असलेला विवेक प्रियावर ओरडला. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं.

" तुला सांगून निघालो सकाळी, कि पट्कन येतो ऑफिस मधून.. तेव्हा तर बरी होतीस.. मग अचानक काय परत आत्महत्याच मनात आलं... ",

"सॉरी !! " खूप वेळाने प्रियाचा आवाज आला.

" सॉरी ?? .... सॉरी बोलून काय होते... तुझ्यामुळे काल रात्रीपासून पोटात काही नाही... कि झोप नाही... त्यात ते हॉस्पिटलचे बिल... पोलीस स्टेशनच्या फेऱ्या.. " ,

" मग काय करणार... ? ... त्याला काय मिळालं मला फसवून... जगून काय करू मी... ",

" व्वा !! शाब्बास .. मग मला का एवढा त्रास तुमच्या दोघांचा... " ,

" मग कशाला वाचवलंस पहिलं... " विवेकने हात जोडले.

" तुझ्या सोबत होतो मी शिकायला... आठवते का काही... ५ वर्ष एकाच वर्गात , शेजारी शेजारी बसायचो.. एकत्र अभ्यास करायचो... डब्बा एकत्र .. कधी कधी जेवायला घरी यायचीस.. आठवते का काही... " केशव कदम " साठी आलीस ना मुंबईत.... आठवतो का मी तुला ... कि फक्त केशवचं आठवतो... " केशवचं नावं ऐकताच प्रियाचे डोळे पुन्हा पाणावले..

" तुला पण माहित होत ना... किती प्रेम करते मी त्याच्यावर... त्याच्या मुळेच झालं सगळं... त्यालाच किंमत नाही माझी तर काय उपयोग या जीवनाचा.... " प्रिया रडत म्हणाली.

" हो ना... मग आत किचन मध्ये सूरी आहे... उचल आणि हाताची नस कापून टाक... नाहीतर गळ्यावर फिरव स्वतःच्या... ते जमत नसेल तर या इमारतीच्या गच्चीवरून उडी मार... जीव नकोस झालं आहे ना तुला.. काम होऊन जाईल तुझं... पण मरताना मनात असं मनात आणायचे नाही कि माझ्या साठी कोणी काही केलंच नाही .. specially, तुझे मित्र... नातेवाईक... तो अधिकार तुला नसेल मरताना.... ज्यांनी आता पर्यंत तुझ्यासाठी काही केलं ते विसरून जा.. समजलं ना... जा... संपवं स्वतःला.. मी अजिबात अडवणार नाही आता ..." विवेक बाजूला जाऊन बसला.

प्रिया भानावर आली जरा.. विवेकचं लक्ष दारावर गेलं... शेजारचे काका , मघापासून कानोसा घेत होते.

" काका काही हवे आहे का... ? " विवेकच्या आवाजाने काका दचकले.

" ना.. नाही.. असाच जात होतो.. तर तुझा रागीट आवाज आला.. म्हणून थांबलो.. हि कोण... आणि रडते का ती... ? " विवेक दाराजवळ आला..

" काही नाही काका... माझी मैत्रीण आहे... तिला आईची आठवण येते म्हणून रडते आहे.. " ,

" पहिली कधी बघितली नाही इथे ... " काका आत वाकून म्हणाले. किती त्या चौकश्या... आम्ही जातो का कधी यांच्या घरी वाकून बघायला...

" कधी बघितली नाही ना... मग येताय का आत बघायला तिला ..." विवेकने प्रतिप्रश्न केला.. जरा गोंधळून गेले काका...

" राहूदे... राहूदे... चालू दे तुमचं... " म्हणत लगबगीने निघून गेले.

"कोण ? " प्रियाने विचारलं....

" कोण नाही... ते शेजारी राहतात.. त्यांना अशीच सवय आहे, दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची... तुझं सांग... काय करते आहेस... ",

" माफ कर रे... पण एकदम हताश झाली आहे.. काय करू तेच कळत नाही... " विवेक आता प्रियाच्या बाजूला येऊन बसला.

" नक्की काय झालं ते सांग." प्रियाने डोळे पुसले.

" पण तुला कसं कळलं ,केशव साठी आले ते ",

" तुझा वेडेपणा मला माहित आहे... आणि एवढ्या लांब तर एका माणसासाठीच येणार हे माहित होतं मला .. केशवसाठी ",

" तुला तर केशव माहीतच आहे... आमचं कॉलेज पासूनच प्रेम... हे सुद्धा तुला माहित आहे..तुलाच पहिलं सांगितल होता त्याच्याबद्दल.. आठवलं ना.. ",

" हो " विवेक...

" तुझ्या सोबत सगळं share केलं होतं.. तुही सपोर्ट केला होतास... त्यानंतर कॉलेज संपल्यावर तू मुंबईला निघून आलास जॉबसाठी.. केशवला तिथेच , साताऱ्याला भेटली नोकरी.. आणि चांगली भेटली... तेव्हा सुद्धा आम्ही एकत्र होतो.. ",

" हम्म... पुढे.. " ,

" पुढे २ वर्षांपूर्वी ... त्या कंपनीने त्याला इथे, मुंबईत जॉबला बदली म्हणून पाठवलं. ",

" म्हणजे केशव मुंबईत होता.. भेट झाली असती तर किती बरं झालं असत.. " विवेक मधेच बोलला.

" मी पण जॉब करत होते... शिवाय काकांकडे राहत होते... म्हणून मी त्याच्या बरोबर इथे मुंबईला येऊ शकले नाही. पण दर महिन्यात पत्र लिहायचो.. कधी कधी त्याने एक फोन नंबर देऊन ठेवला होता. त्यावर फोन करायचे. " ,

" मग आता काय झालं ? " ,

" अरे गेल्या सहा महिन्यात एकही पत्र नाही.. कॉल केला तर उचलत नाही.. उचलला तर सांगायचं , दमलो आहे... आराम करायचा आहे.. बोलून स्वतःच फोन ठेवून देयाचा. आणि गेल्या २ महिन्यात, जेव्हा जेव्हा कॉल लावला, तर एकदाही उचलला नाही. " प्रिया म्हणाली.

" त्याने तुला बोलावलं का इथे... ? " विवेकचा प्रश्न..

" नाही पण.. त्याने खूप आधी एक पत्ता देऊन ठेवला होता... तेव्हा बोलला होता कि कधी आलीस तर ये, या पत्त्यावर.. त्याची काळजी वाटली म्हणून मी मुंबईत आले. काका सांगत होते नको जाऊस म्हणून.. तर त्याच्याशी भांडण करून , सगळं सामान घेऊन, घर सोडून निघाले. वाटलं होतं, शहरात एकत्र राहू... लग्न करू... त्या पत्त्यावर गेले तर तो तिथे आता राहत नाही असं कळलं... " ,

" अगं... मग त्याच्या ऑफिसमध्ये जायचे होते ना... ",

=========== क्रमश : ================