मित्र my friend - भाग ५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्र my friend - भाग ५

" तुम्ही दोन दिवसापूर्वी ही आल्या होता ना.. " तिथे राहण्याऱ्या एका बाईने प्रियाकडे बघत विचारलं.

" हो.. ",

" मग तुम्हाला सांगितलं तेव्हाच... केशव नाही राहत आता इथे... गेला तो... " बाई प्रियाकडे रागात बघत म्हणाल्या.

" सॉरी काकू... त्रास झाला म्हणून खरंच सॉरी.. पण केशव कुठे गेला हे माहीत आहे का... आणि कधी गेला तो... ", विवेक...

" तुम्ही कोण त्याचे... एवढी चौकशी करत आहात ते.. " खोटं तर बोलावंच लागेल..

" आम्ही मित्र आहोत त्याचे.. त्याची आई खूप आजारी आहे ना.. म्हणून आलो त्याला घेऊन जायला.. " ,

" असं आहे तर... केशव दोन महिन्यापूर्वीच गेला इथून... कामानिमित्त जातो असं म्हणाला.. ",

" अजून कुठे जातो असं म्हणाला का... कि परत येणार आहे... ",

" परत तर नाही येणार... तो भाड्याने राहायचा इथे... सगळं भाडं देऊन गेला... परत येणार नसावा.. तसं बोलला असता मग.. आणि कुठे जातो तेही नाही बोलला काही... गावाला जातो आहे.. घरी जातो.. असं एकदा फोनवर बोलताना ऐकलं होतं.. तुम्ही कुठून आलात... ? ",

" आम्ही मुंबईचेच आहोत.. फक्त त्याला सांगायला आलो होतो... चला निघतो आम्ही... " विवेकने बोलणं संपवलं... आणि प्रियाला घेऊन निघाला.

" केशव गावाला गेला... कशासाठी ? " प्रियाचा प्रश्न....

" ते मला काय माहित.. मी मुंबईत असतो ना.. " विवेक प्रियाकडे पाहत म्हणाला.

" मला भेटायला गेला असेल रे तो...आणि म्हणूनच तो फोन उचलत नव्हता. याचा अर्थ... त्याला दुसरी कोणी भेटलीच नसावी.. .. " प्रिया टाळ्या वाजवू लागली.

" ओ मॅडम... केशव जर २ महिन्यापूर्वी साताऱ्याला, त्याच्या घरी गेला आहे.. तर तो तुला भेटला नसता का... तू पण तर तिथेच जवळ राहतेस ना.. " विवेकने प्रियाच्या डोक्यावर टपली मारली.

" जवळ कुठे... त्याचे घर आणि माझ्या काकांचे घर... विरुद्ध दिशेला आहेत.. पण तू बोलतोस ते बरोबर.. दोन महिन्यात एकदातरी भेट झाली असती ना.. कुठे गेला माझा केशव... ? " प्रिया tension मध्ये.. झालं हीच परत सुरु..

"आता काय करायचं ते सांग.. " विवेक...

" साताऱ्याला जाऊन बघूया घरी त्याच्या... " प्रिया बोलली.

" excuse me !!! ... "बघूया " म्हणजे काय... मी येणार नाही हा... तुला गाडीचे तिकीट काढून देतो.. जा एकटीच गावाला... आणि शोध तुझ्या " केशव " ला ... " विवेकला माहित होता, एकदा का परत गावात गेलो कि काय काय मागे लागेल ते सांगू शकत नाही. विवेकचं घर सुद्धा तिथेच होतं ना...

" ऐ... हॅलो... तू येणार नाही म्हणजे काय... यावंच लागेल... तुझ्या भरवश्यावर निघायचे बोलते तर पळून चालला आहेस... वाचवायचं कशाला मग... जाऊ का परत उडी मारायला. " प्रियाची धमकी.. खूप वेळ विवेक विचार करत होता..

" ब्लॅकमेल चांगलं करता येते तुला... येतो मी.. पण साताऱ्याला त्याच्या घरी सोडलं कि मी परत येणार मुंबईला... प्रॉमिस ? " ,

" प्रॉमिस रे प्रॉमिस !! ... किती छान.... माझं कुकूलं बाळ ते... " प्रियाने आनंदात विवेकचा गालगुच्चा घेतला. दुसऱ्या दिवशी, साधारण १० दिवसांच्या सुट्टीचे पत्र ऑफिसला टाकले. पैसे वगैरे घेतले. प्रियाची थोडी शॉपिंग सुद्धा करून दिली. सामान पॅक केलं. आणि निघाले दोघे,.... "केशव कदम " ला शोधायला.

==================================================================================


"हालो... सँडी बोलून राहिलो !! " पलीकडच्या फोनवरून आवाज आला. विवेक बावचळला. तसाच फोन ठेवून दिला खाली. टेलिफोन बुथ मधून बाहेर आला.प्रिया बाहेर वाट बघत होती.

" लागला का रे फोन ?? " ,

"नक्की कोणाचा नंबर दिलास ? " विवेकने उलटा प्रश्न केला ... साताऱ्याला पोहोचल्यावर S.T. डेपो मधून केलेला फोन... नावं संदीप.. पलीकडून बोलतो कोणी सँडी... प्रियानेच नंबर दिला होता..

" अरे... संदीपचा नंबर आहे.. त्याच्या दुकानात आहे हा फोन... " प्रिया बोलली.

" चुकीचा नंबर लागला वाटते. ",

" नाही रे... बरोबर आहे.. तोंडपाठ आहे मला... " ,

" कोण आहे नक्की तो... इथे उतरल्या उतरल्या त्याला फोन करायला सांगितलं ते.. ",

"अरे.. संदीप... संदीप मोहिते.. " त्याचं नाव ऐकताच विवेकने कपाळावर हात मारला. हाच भेटला होता फोन करायला..

संदीप मोहिते... केशव , प्रिया आणि विवेक... या त्रिकोणातला मध्यबिंदू... मध्यबिंदू अश्याप्रकारे कि तिघांनाही ओळखणारा... , तिघांचा मित्र.. actually. केशव आणि संदीप हेच दोघे मित्र... त्यात प्रिया नी विवेक याची ओळख .. त्यामुळे या दोघांशी मैत्री... विवेक आणि संदीपचं एवढं "पटत " नसलं तरी तेही मित्रच.. संदीप हे एक वेगळंच रसायनं होतं. घरी श्रीमंती.. पैशाला तोटा नाही... गावात शेत-जमीन खूप... त्यातून उत्पन्न होते.. शिवाय वडिलांचा सुती कपड्यांचा "import export " चा व्यवसाय... तिथून पैसे... त्यामुळे घरी झालं तर कसलंच tension नव्हतं. या सगळ्यामुळे, संदीपचा स्वभाव देखील तसाच, tension free.. सतत भंकस... मस्करी.. वेगवेगळ्या भाषेत बोलायचा उगाच काहीतरी... तुटक-मुटक इंग्लिश बोलायचा. समोरच्याला सतत हसवत ठेवणारा .. आणि सर्वात महत्त्वाचं... बडबड्या .. हीच वायफळ बडबड विवेकला खटकायची. साधं अभ्यासात सुद्धा याला काहीच करावंसं वाटत नाही, यामुळे विवेक जरा त्याच्यापासून दूर राहायचा. पण काही ना काही होयाचे आणि संदीपची भेट रोज व्हायची... तसं सुद्धा संदीप केशवच्या सोबतच असायचा, प्रिया सोबत विवेक... मग काय ते दोघे भेटले कि सर्वांची भेट ठरलेली.

" संदीपला फोन कशाला आता... " विवेकने त्रासिक आवाजात प्रियाला विचारलं.

" अरे त्याला विचार ना... केशव आहे का तिथे.. ",

"अगं... पण आता आलो आहे ना ... केशवच्याच घरी जाऊया... " ,

" तुझ्या घरी जाणार नाही का तू ? एक काम करू... तू तुझ्या घरी जा... मी केशवच्या घरी जाते.. " प्रियाने युक्ती लढवली. विवेकच्या कपाळावर आट्या... " माझ्या घरचं नंतर बघू.. केशवला भेटायला जाऊ पहिलं... " प्रिया आनंदात होती. केशवचं घर तर माहितंच होतं प्रियाला. दोघे चालतच निघाले.तसं ते काही नवीन नव्हतं विवेकला.. प्रॉब्लेम होता तिथल्या लोकांचा.. विवेकला ओळखणाऱ्या लोकांची संख्या कमी नव्हती. यापैकी एकाने जरी घरी कळवले कि मी आलो आहे तर मग झालंच. म्हणून झपझप पावलं टाकत केशवच्या घरी पोहोचले.

पोहोचले तर घराला कुलूप... दोघे चक्रावले. केशव नक्की गावातच आला ना. मग घराला टाळे कसे... शेजारी विचारले असता दोन महिण्यापुर्वीच गेले सर्व कुठेतरी.. त्यात केशव सुद्धा होता, म्हणजे केशव त्याच्या पूर्ण कुटुंबासहित गेला... आता काय करावे.. विवेक विचारात , प्रिया गांगरलेली. त्यात विवेकला ओळखणारे दोघे-तिघे भेटले... कधी आलास मुंबईहून... किती दिवस आहेस... लग्नासाठी आलास वाटते .. असे आणि अशाप्रकारचे कितीतरी प्रश्न -उत्तर त्या तेवढ्या वेळात झाली. आणखी ५ मिनिटं तरी थांबलो ना तर काही खरं नाही.

" प्रिया बोल लवकर..... काय करूया...",

" केशव कुठे गेला पण... " प्रिया रडवेल्या आवाजात म्हणाली.

"आता मला काय माहित... तुझ्या बरोबरच आलो ना मी पण.. " प्रिया गप्प झाली. थोड्यावेळाने बोलली..

" संदीपकडे जाऊया... " ,

" अरे !! तो कशाला हवा आता.. ",

" केशव आणि संदीप ... लहानपणापासून मित्र आहेत.. केशव इथे आलेला ,पण मला काही कळू न देताच निघून गेला... पण संदीपला नक्की सांगून गेला असणार काही तरी.. इकडे जवळच राहतो तो... चल ना.. प्लिज... " विवेक नाईलाजाने निघाला.

=========== क्रमश : ================