chandani ratra - 14 books and stories free download online pdf in Marathi

चांदणी रात्र - १४

सकाळी उठताच राजेशने पटापट आवरलं. आज त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर, एक वेगळाच उत्साह संचारला होता. खरंतर कालची निम्मी रात्र तो जागा होता पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. संध्याकाळी काय काय करायचं याची त्याने मनात उजळणी केली व वृषालीला फोन लावला. आज संध्याकाळी सहा वाजता टेकडीवर ये, तुला काहीतरी सांगायचंय असं राजेशने वृषालीला सांगितलं व फोन ठेवला.

राजेश संध्याकाळी साडेपाच वाजताच टेकडीवर पोहोचला. अजून सूर्यास्त व्हायला बराच वेळ होता. उन्हाळ्याच्या दिवसात उगवणाऱ्या रान फुलांनी सारी टेकडी बहरली होती. पांढऱ्या पाकळ्या व पिवळ्या रंगाचे परागकण असलेली ती फुले अतिशय मोहक दिसत होती. राजेशने बरीच फुलं पटापटा खुडली व एका पिशवीत भरली व तो जवळच्या गुहेत गेला. राजेश एकेक फुल एकाखाली एक मांडत होता. पाहता पाहता एकेक अक्षर तयार होऊ लागलं. शेवटचं अक्षर होताच राजेश थोडा मागे सरकला व ती अक्षरे पाहू लागला. त्याच्या मनातील कल्पना सत्यात उतरत होती. राजेश जवळच्याच खडकावर वृषालीची वाट पाहत बसला.

सहा वाजून गेले होते. सूर्य बिंब खाली सरकत होतं. थोड्यावेळाने काही अंतरावरून वृषाली येताना राजेशला दिसली. जांभळ्या रंगाच्या फुलांची नक्षी तिच्या ड्रेसवर होती. त्या ड्रेसमध्ये वृषाली फारच मोहक दिसत होती. ती जशी जवळ येईल तशी राजेशच्या हृदयाची धडधड वाढत होती. वातावरण फार आल्हाददायक होतं. राजेश गुहेतून बाहेर आला व पायवाटेवर थांबला. वृषाली धापा टाकतच तिथे पोहोचली. “सॉरी, मला थोडा उशीर झाला.” वृषाली कसंबसं बोलली. अजूनही तिचा श्वास स्थिर झाला नव्हता. “अगं, थोडा आराम कर मग बोल. चल आपण त्या बाकावर बसूयात.” असे म्हणून राजेश आणि वृषाली टेकडीच्या टोकावरच्या बाकावर बसले. समोरचं दृश्य अतिशय विलोभनीय होतं. सूर्याचा लालभडक गोळा पलीकडच्या डोंगराआड अर्धा बुडाला होता. क्षितिजावर जांभळट केशरी रंगाची झालेली उधळण अवर्णनीय होती. थोडा वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत. मग वृषालीनेच विचारलं, “आज अचानक इथे का बोलावलस मला?” राजेशने एक दीर्घ श्वास घेतला व तो म्हणाला, “खरंतर काहीतरी सांगायचंय तुला.” “मग बोल ना.” वृषाली म्हणाली. ‘याला नक्की काय सांगायचं असेल?’ वृषालीच्या मनात विचार आला. राजेश बोलू लागला, “वृषाली, मी जेव्हा गावी गेलो होतो, तेव्हा मी शेतात खूप काम केलं. पहिल्यांदा मला फार कंटाळा यायचा पण नंतर ते काम मला आवडायला लागलं.” “हे सांगायला मला एवढ्या लांब बोलावलस!” वृषाली वैतागून म्हणाली. “नाही अजूनपण काही सांगायचंय.” राजेश म्हणाला. “बोल ना.” वृषाली लाडात येऊन म्हणाली. राजेश बोलू लागला, “खरंतर मी ठरवलं होतं की गावी गेल्यावर तिथल्या मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जायचं पण कोणालाच वेळ नव्हता. सगळे शेतीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कुठे जाणं झालंच नाही.” “हे सारं तू फोनवर सुद्धा सांगू शकत होतास.” वृषाली पुन्हा वैतागून म्हणाली. “अगं अजूनपण काही सांगायचंय, ऐकून तर घे.” राजेश म्हणाला व पुढे बोलू लागला, “रिसल्टच्या दिवशी घरचे सगळे एवढे खुश होते, बाबांनी तर मला नवीन बाईक घेण्याची घोषणाच केली.” “वा छान. पण मला असं वाटतंय तुला अजुनही काही सांगायचंय.” वृषाली मिश्कीलपणे म्हणाली. तिला राजेशला नक्की काय सांगायचंय याची कल्पना आली होती. “जे तुझ्या मनात आहे ते बोलून टाक.” ती राजेशला म्हणाली. “खरंतर मला एवढंच बोलायचं होतं. आता थोड्याच वेळात अंधार पडेल आपल्याला निघायला हवं. निघुयात आपण आता.” राजेश अगदी निरागसपणाचा आव आणून बोलला. आता मात्र वृषाली राजेशकडे मारक्या म्हशीसारखी पाहत होती. ती काहीतरी बोलणार इतक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला व वृषाली आडोशासाठी गुहेच्या दिशेने चालू लागली. राजेशही तिच्या मागे जाऊ लागला. पावसात भिजू नये म्हणून वृषाली झपाझप पावले टाकत होती. राजेशमात्र अगदी निवांतपणे चालत होता.

वृषाली गुहेत पोहोचली. तिने मागे पाहिले. राजेश अजूनही निम्म्यापर्यन्त पोहोचला होता. “अरे, येना पटापट. पूर्ण भिजून जाशील.” वृषाली काळजीच्या सुरात म्हणाली. “पाऊस हा भिजायसाठीच असतो. पावसापासून पळायचं नसतं तर मनसोक्त भिजायचं असतं.” राजेश एखाद्या फिल्मचा डॉयलॉग बोलावा तसा म्हणाला.

राजेश गुहेत पोहोचला तेव्हा सर्वत्र अंधार होता. त्याच्या प्लॅनचा शेवटचा भाग बाकी होता. तो एका खडकावर बसला. समोरच्या खडकावर वृषाली बसली होती. राजेशने खिशातून मोबाईल काढला व मोबाईलचा टॉर्च ऑन केला व वृषालीच्या दिशेने वळवला. वृषाली थंडीने कुडकूडत होती. पावसाचे थेंब तिच्या केसांवरून ओघळत तिच्या गालावर स्थिरावले होते. तीचं हे मोहक रुपतर हृदयात साठवण्यासारखंच होतं. राजेश तर तिच्याकडे पाहतच राहिला. “हे सगळं तुझ्यामुळेच झालं. का बोलावलस मला इथे.” वृषाली चिडून म्हणाली. “अगं, आता मलातरी काय माहीत पाऊस येईल म्हणून.” यावर वृषाली काहीच बोलली नाही. तिच्या मनातला राग अजून उतरला नव्हता. “थोडं सांभाळून बस वृषाली. मी असं ऐकलंय की गुहेमध्ये रात्री सापांचं राज्य असतं.” तिला घाबरवण्यासाठी राजेश म्हणाला. “असं अभद्र का बोलतोयस राजेश! ही काय चेष्टा करायची वेळ आहे का!” वृषाली अजूनच चिडून म्हणाली. “अगं घाबरू नकोस. मी आहे ना आणि मी खरच चेष्टा केली. पाहिजे तर टॉर्च मारून दाखवतो. साप वगैरे काही नाहीयेत इथे.” एवढे बोलून राजेशने टॉर्च वळवला व फुलांची अक्षरे नजरेसमोर आली. वृषालीचं लक्ष तिकडे गेलं. तिने अक्षरे वाचताच तिचा राग कुठल्याकुठे पळाला. आता तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं. ‘I ❤️ U VRUSHALI' ही अक्षरं तिच्या मनात नाचत होती.

राजेशला जसं हवं होतं तसच सगळं घडलं होतं. राजेशने टॉर्च परत वृषालीच्या दिशेने रोखला. ती जणू एखाद्या वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखी दिसत होती. चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नजर राजेशवर खिळली होती. राजेश उठला व वृषालीजवळ गेला. अजूनही तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद थोडादेखील ओसरला नव्हता. पाऊस अजूनही अव्याहतपणे कोसळत होता. “वृषाली” राजेशने हाक दिली. पण त्याचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते. त्या फुलांच्या जादुई अक्षरांनीच तिचं मन भारलं होतं. अचानक दूरवर मोठा प्रकाश दिसल्यामुळे राजेशचे डोळे चमकले व त्यापाठोपाठ वीज कोसळून झालेल्या आवाजामुळे वृषाली भानावर आली व घाबरून नकळतच तिने राजेशला मिठी मारली. वृषालीची नजर राजेशच्या नजरेला भिडली होती. राजेश काहीतरी बोलणार होता इतक्यात अगदी सहजपणे वृषाली बोलली – आय लव यु टू. आता खुश होण्याची वेळ राजेशची होती. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आता त्याला वृषाली सोडून इतर काहीच दिसत नव्हतं. ना पावसाच्या धारा, ना कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश, फक्त आणि फक्त वृषाली! त्याचं भान हरपलं होतं.

दोघांचीही नजर एकमेकांच्या नजरेला भिडली होती. दोघांच्याही मुखातून शब्दच बाहेर निघत नव्हते. त्यांचे डोळेच आता संवाद साधत होते. एखाद्या अलौकिक शक्तीने भारल्यासारखे राजेशचे ओठ वृषालीच्या ओठांजवळ जात होते. अंतर हळूहळू कमी होत होतं आणि अखेरीस राजेशच्या ओठांचा ओलसर स्पर्श वृषालीच्या ओठांना झाला व राजेश भानावर आला. दोघांच्याही गालावर लाली फुलली होती. हळूहळू मिठी सैल झाली. नजाणे कितीवेळ ते एकमेकांच्या मिठीत कैद होते. आता पाऊस पूर्णपणे थांबला होता. रातकिड्यांची किरकिर आणि बेडकांचं ओरडणं सोडलं तर सगळीकडे शांतता होती. दोघेही आता भानावर आले असले तरी हा अनुभव ते जन्मभर विसरणार नव्हते. राजेश आणि वृषाली गुहेतून बाहेर आले. टॉर्चच्या प्रकाशात ते दोघे टेकडी उतरू लागले. पण पूर्णवेळ कोणच काही बोललं नाही. बोलायचं काही बाकी राहीलच नव्हतं.

X X X X X X

कॉलेज पुन्हा सुरू झालं. राजेशचं मात्र कशात लक्षच लागत नव्हतं. तो एका वेगळ्याच विश्वात वावरत होता. वृषालीच्या बाबतीतही तसच काहीसं झालं होतं. टेकडीवरच्या प्रसंगानंतर राजेश आणि वृषाली एकमेकांशी एक शब्ददेखिल बोलले नव्हते. दोघांनाही एकमेकांना पाहताच शरमल्यासारखं व्हायचं व काही न बोलताच ते निघून जायचे. मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. जे घडलं होतं ते फारच सुखद होतं. कॉलेजमधल्या इतर मुलामुलींना देखील त्यांच्यातला हा बदल जाणवला होता. शेवटी संदीपने राजेशला विचारलं, “तुझ्यात आणि वृषालीत काही बिनसलंय का? एकमेकांकडे पाहायला पण तयार नाही तुम्ही.” राजेश काहीच बोलला नाही पण त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. संदीपने त्याचा मुद्दा सोडला नाही व शेवटी राजेशने सर्वकाही सांगितलं. “अरे, मग तर आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. मी मनालीला सांगतो. तू पण लगेच वृषालीला सांग. आपण रात्री पार्टी करूयात.” संदीप उत्साहात म्हणाला. “हे सगळं आत्ताच करायला हवं का?” राजेश म्हणाला. “अरे लाजतोस काय मुलींसारखा. ते बघ तिथे वृषाली उभी आहे. तिच्यापाशी जा आणि बिंदास्त बोल! का मी बोलू?” “नको मी बोलतो.” राजेश नाईलाजाने म्हणाला. राजेश वृषाली जिथे उभी होती तिथे गेला. तिने राजेशकडे पाहिलं. “वृषाली संदीप म्हणत होता की आज रात्री पार्टी करूयात. तुला जमेल का यायला?” “हो पण कुठे जायचं आपण?” वृषालीने विचारलं. “मी तुला संध्याकाळी कॉल करतो मग आपण ठरवूयात.” राजेश म्हणाला.
कॉलेजमधून घरी पोहोचताच राजेशने वृषालीला फोन लावला. “वृषाली, मनालीने एक हॉटेल सुचवलय डेक्कनजवळ. तिथे फारशी गर्दीही नसते. तुला चालेल का?” राजेशने विचारलं. “हो मला चालेल पण किती वाजता भेटायचं?” “रात्री आठ वाजता भेटुयात. मी तुला पत्ता पाठवतो” “बर” असे म्हणून वृषाली फोन ठेवणार होती तेवढयात राजेश म्हणाला, “थांब वृषाली, मला जरा बोलायचंय” एवढं बोलून राजेश पुढे बोलू लागला, “परवा टेकडीवर जे काही घडलं ते फार छान होतं. त्याबद्दल थँक्स.” “हो मलाही फार छान वाटलं आणि तुला पण थँक्स.” वृषाली म्हणाली व दोघेही हसू लागले.


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED