Chandamama aani aamras books and stories free download online pdf in Marathi

चंदामामा आणि आमरस! 

चंदामामा आणि आमरस!
सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची आई स्वयंपाक।घरात स्वयंपाक करत होती. रामचे बाबा खाली बसून आंब्याचा रस करत होते. रामची आत्या कोकणात होती. तिने खास कोकणचा राजा म्हणून ख्याती असलेला रसाळ, मधाळ, चविष्ट असा आंबा खास रामसाठी पाठवला होता. राम आजीसोबत गप्पा मारत बाबा कसे रस करत आहेत याचे बारकाईने निरीक्षण करत होता. राम अत्यंत हुशार आणि चौकस मुलगा होता. प्रत्येक गोष्ट शांततेने समजावून घेण्याकडे त्याचा कल असे. त्यांच्या गॅलरीतून चंदामामाचा प्रकाश घरात येत होता. ते पाहून रामने आईला विचारले,
"आई, चंदामामाच्या घरात लाईट कोण लावते ग?"
"अरे, त्याच्या घरात कोण लाईट लावणार? तोच साऱ्या जगाला प्रकाश देतो."
"आजी, मागे तू मला एक गोष्ट सांगितली होती श्रीरामाची. त्या गोष्टीत छोट्या रामाला आकाशातला चंद्र हवा होता. बरोबर ना?"
"अगदी बरोबर. लक्षात आहे तुझ्या. मग पुढे काय झाले तेही लक्षात असेल तुझ्या?"
"आहे की. रामची आई त्याला खूप समजावून सांगत होती पण राम आपला हट्ट सोडत नव्हता. मग रामच्या आईने एक आयडिया केली. तिने आरसा घेतला. तो आरसा तिने चंद्रासमोर धरला. तो आरश्यातला चंद्र पाहून श्रीरामाला खूप आनंद झाला."
"अरे वा! आमच्या रामाला प्रभू रामचंद्रांनी लहानपणी केलेल्या हट्टाची गोष्ट जशाला तशी माहिती आहे तर. वा भाई वा!" रस करता करता थांबून बाबा म्हणाले.
"आजी, चंदामामाला आंब्याचा रस आवडतो का ग?"
"हो तर. आंब्याचा रस प्रत्येकाला अगदी देवालाही आवडतो म्हणून आपण देवाला रसाचा नैवेद्य दाखवतो....."
"मग आपण चंदामामाला घरी बोलावून आंब्याचा रस देऊया का?" रामने विचारले.
"घरी कसे बोलावता येईल? तो तर खूप खूप दूर राहतो...."
"असू देत. तू बोलावले की, चंदामामा नक्कीच येईल."
"कसे शक्य आहे? तो नाही येणार बेटा...."
"नाही. तो आला तरच मी जेवतो. नाही तर मुळीच जेवणार नाही. उपाशी झोपतो...." असे म्हणत राम तणतणत खोलीत निघून गेला.
"बाई ग बाई, कोणती गोष्ट सांगावी हेही आता विचार करुनच ठरवावे लागणार की काय? कधी काळी सांगितलेली गोष्ट पक्की लक्षात तर ठेवलीच पण योग्य वेळी ती आठवून त्याप्रमाणे हट्ट करणे म्हणजे भारीच बाई! ह्याला म्हणतात वेळ साधणे." आजी म्हणाली.
" कशाचे आलेय वेळ साधणे. मनासारखे झाले नाही की आला राग. आजकाल राग तर नाकावर झालाय..." स्वयंपाक घरातून आलेली रामची आई म्हणाली.
"अग, हेच वय असते हट्ट करायचे. त्याचे बाबा काय लहानपणी कमी हट्टी होते?"
"आले का माझ्यावर? पण राम जास्तच हट्टी होतोय हे खरे."
"सगळे काही साहेबांच्या मनासारखे झाले तर ठीक नाहीतर मग काही खरे नाही. आता जेवायला येणारच नाही...." रामची आई म्हणत असताना बाबा म्हणाले,
"थांबा. मी बघतो."
खोलीत राम पलंगावर पडला होता. कुणी तरी येत आहे ही चाहूल लागताच राम भिंतीकडे तोंड करून झोपला. आत आलेले बाबा पलंगावर रामजवळ बसले. हलकेच आपला हात रामच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,
"राम बेटा, बाळा, चल बरे जेवायला. आत्याने तुझ्यासाठी मुद्दाम तितक्या दुरून आंबे पाठवलेत की नाही? मग तू रस न खाता झोपी गेलास तर आत्याला वाईट वाटेल की नाही?"
"वाटले तर वाटले. पण मी चंदामामा आल्याशिवाय जेवणार नाही म्हणजे जेवणार नाही."
"राम, असा हट्ट करायचा नाही. गुड बॉय ना तू?"
"तरीही मला चंदामामाला घरी बोलावून रस द्यायचा आहे."
"उद्या शाळेत जायचे आहे ना?"
"मी जात नाही म्हणालो तरी मला कुणी घरी राहू देणार आहे का?"
"तसे नाही रे. आम्ही जाऊ नको म्हटलं तरी तू राहणार आहेस का? शाळेत गेला नाहीस तर तुझी गैरहजेरी पडेल आणि मग तुला हजेरीसाठी असणारे बक्षीस मिळणार नाही."
"म्हणून तर जावे लागते ना शाळेत? पण ते काही नाही. मी जेवणार नाही म्हणजे नाही."
"बरे, आपण चंदामामाला फोन करुन त्याला जेवायला बोलावू..."
"काही नको. चंदामामाजवळ फोनच नाही. असला तरीही लागणार नाही. फारच झाले तर तुम्ही दुसऱ्याच कुणाला तरी फोन लावणार आणि तो चंदामामाच्या थाटात सांगेल की, मला वेळ नाही. मी नंतर येतो. तुमचे नेहमीचेच आहे हे."
"मग काय करावे बाप्पा? आपण की नाही रविवारी दुपारी चंदामामाला रस खायला बोलावू या."
"नाही. आपली दुपार म्हणजे चंदामामाची रात्र असते. तो झोपलेला असतो. रात्री उशिरा जेवला आणि त्याला पुरेशी झोप नाही मिळाली तर त्याचे पित्त वाढेल आणि त्याला पुन्हा दिवसभर म्हणजे आपल्याकडे रात्र असते तेव्हा जागावे लागते.." राम बोलत असताना तिथे आलेल्या आईने विचारले
" काय म्हणतात रामराजे?"
"आई, मला काहीही लाडीगोडी लावू नको. चंदामामा आल्याशिवाय मी जेवणार नाही."
"अरे, तेच तर सांगायला आलेय की, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे...."
"मला माहिती आहे, उद्या आपण सगळे आइस्क्रीम खायला जाऊया. पण जमणार नाही."
"तसे काही नाही. तुला ऐकायचे नसेल तर ऐकू नको...."
"सांग काय आहे ते?" भिंतीवरचा चेहरा न व वळवता राम म्हणाला.
" अरे, आजीने आत्ता चंदामामाला प्रार्थना केली की, आंब्याचा रस खायला ये म्हणून..." आईचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच राम ताडकन उठून बसला आणि त्याने घाईघाईने विचारले,
"मग काय म्हणाला चंदामामा? येणार आहे का जेवायला?"
"येतो म्हणाला. पण त्याची एक अट आहे...."
"अट? ती कोणती? चंदामामाही तुमच्याप्रमाणे अटी घालतो की काय?"
"चंदामामा म्हणाला की, मलाही रामसोबत जेवायला आवडेल पण मी तुमच्या घरी जेवायला आलो तर सगळीकडे अंधार पडेल...."
"तो कसा?"
"मला सांग, चंदामामाच्या समोर ढग आले की काय होते?"
"अंधार होतो. अच्छा! आले लक्षात! अंधार पडेल ... बरोबर आहे पण मग रस कसा खाणार?"
"चंदामामा म्हणाला की, एका मोठ्या परातीत सारा रस टाका. ती परात बाल्कनीत आणून ठेवा.मी मला हवा तेवढा रस खाईन...." रामची आई सांगत असताना त्याच्या बाबांनी विचारले,
"आणि मग चंदामामाने सगळा रस पिऊन टाकला तर?"
"टाकला तर टाकला. आपण पुन्हा आपल्यासाठी आत्याकडून आंबे मागवूया. पण आता चंदामामा येतो म्हणाला तर तुम्ही कुणी काही आठकाठी टाकू नका. पण आई, चंदामामाने रस खाल्ला हे आपल्याला कसे कळावे? "
"आपण मोजू या का?" बाबांनी विचारले.
"नाही. काही नको. चंदामामा म्हणाला की, तो स्वतःचे छोटे रुप त्या परातीत पाठवतो. मग तो परातीत ठेवलेला थोडा रस खाईल....."
"थोडा का? पूर्ण का नाही? त्याला आवडत नाही का रस?"
"खूप आवडतो पण कसे आहे, रस खाल्ला की खूप झोप येते. तुझ्यासोबत खूप रस खाल्ला आणि त्याला खूप झोप आली आणि तो झोपी गेला तर सगळीकडे अंधार होईल ना?"
"असे आहे का? पण तो छोटा होऊन तर येईल ना?"
"येईल? अरे, कदाचित आलाही असेल......." आई तसे म्हणत असताना रामने पलंगावरुन उडी मारली आणि तो धावतच बाल्कनीत गेला. त्याला पाहताच आजी म्हणाली,
"अरे, राम आलास का? बघ.चंदामामा आलाय. रस खायला. बघ. बघ...."
रामने घाईघाईने परातीत बघितले. परातीत भरपूर रस होता. पण तिथे चंदामामाचे छोटेसे रुप पाहून त्याला खूप आनंद झाला. तो चंदामामाला आनंदाने बघत असताना काही क्षणात चंदामामा दिसेनासा झाला. तसा राम हिरमुसला. ते पाहून आजी म्हणाली,
"वर बघ. चंदामामा सारखा फिरतोय ना.त्याला एका जागेवर जास्त वेळ थांबता येत नाही. म्हणून तो निघून गेला. त्याला रस खूप आवडला. त्याने तुला भलेमोठे थँक्यू सांगितले आहे...."
"खरे?" असे म्हणत राम मागे वळला. दारात उभ्या असलेल्या आईबाबांना पाहून आनंदाने ओरडला,"बघा. बघा. चंदामामाने आपला रस खाल्ला. हैश्या रे हैश्या.... आई ग आई, चल ना ग. खूप भूक लागली आहे ग. लवकर जेवायला वाढ ग....." असे म्हणत राम जेवायच्या टेबलवर जाऊन बसला ते पाहून आजी म्हणाली,
"पावलास रे बाप्पा, श्रीरामा, पावलास...."
** नागेश सू. शेवाळकर
११० वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
संचेती शाळेजवळ, थेरगाव,
पुणे ४११०३३
९४२३१३९०७१

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED