श्रावणबाळ Nagesh S Shewalkar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रावणबाळ



**** श्रावणबाळ !****
रामपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात दहावीपर्यंत शाळा होती. दोन-तीन दवाखाने होते. एक बँकही होती. रामपूर या गावात लक्ष्मण नावाचा एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. रोजमजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. त्याच्या पत्नीचे नाव ऊर्मिला असे होते. त्यांना विजय नावाचा एक मुलगा होता. नाव विजय असले तरी सारेजण त्याला 'श्रावणबाळ' याच नावाने बोलावत असत.त्याला कारणही तसेच होते. विजयला घरातील कामे करायला आवडत असे. लहानपणापासून तो कोणते ना कोणते काम करीत असे.किराणा दुकानातून साखरपत्ती, तेल, दूध अशा छोट्या छोट्या वस्तू तो आणत असे. सहा वर्षांचा असताना त्याने एकदा चहा करून सर्वांंना आश्चर्याचा धक्का दिला. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आला. त्याचे आईबाबा सकाळीच कामाला गेले होते. त्यांची कामावरुन यायची वेळ झाली होती. अचानक त्याला एक गोष्ट सुचली. त्याने लगेच चुल पेटवली. आईबाबा घरी येईपर्यंत त्याने चहा केला. आईबाबा आल्याबरोबर तो म्हणाला,
"आई, बाबा चला. पटकन हातपाय धुऊन या."
"का रे, काय झाले? " आईने विचारले.
"या तर खरे. सांगतो सारे." विजय म्हणाला आणि त्याच्या आवाजातील आग्रह ऐकून ते दोघे हातपाय धुऊन आले. विजय दोन्ही हातात चहाचे कप घेऊन उभा असल्याचे पाहून आईने विचारले,
"चहा? कुणी तू केलास? "
"हो. मीच केला..." विजय आनंदाने सांगत असताना त्याच्या बाबांनी चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाले,
"व्वा! काय मस्त चहा केलास रे..." बाबा कौतुकाने म्हणाले आणि त्या दिवसापासून विजय रोजच आनंदाने चहा करु लागला. अगदी कुणी घरी भेटायला आले तरी विजयच चहा करीत असे. हळूहळू तो भाजी चिरणे, खरकटी भांडी बाहेर टाकणे,आईने घासलेली भांडी घरात आणू जिथल्या तिथे ठेवणे अशी कामेही आनंदाने करू लागला. त्याची कामे करण्याची आवड पाहून कुणीतरी गमतीने त्याला 'श्रावणबाळ' अशी हाक मारायला सुरुवात केली. काही दिवसात सारेजण त्याला विजय याऐवजी श्रावणबाळ अशीच हाक मारू लागले. त्याच नावाने तो ओळखला जाऊ लागला परंतु कधी त्याला कुणाचा राग आला नाही की तो कुणाला चिडून बोलला नाही.
श्रावण दहाव्या वर्गात गेला. तोपर्यत तो घरातील सारी कामे करू लागला. अगदी अधूनमधून स्वयंपाक ही करू लागला. त्याचा स्वभाव जसा शांत, समाधानी आणि कष्टाळू होता तसाच तो अभ्यासातही हुशार होता. शिक्षक त्याला एकपाठी म्हणत असत. एकदा ऐकलेले, वाचलेले त्याच्या पक्के आठवणीत राहात असे. घरातील कामे, शाळा, शाळेतील अभ्यास हे सारे सांभाळून तो गावातील वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रं आणि पुस्तकं वाचत असे. वाचनाची त्याला एवढी आवड निर्माण झाली की, एखादे दिवशी वाचनालयाला सुट्टी असली किंंवा श्रावणला वाचनालयात जायला जमले नाही तर त्याला करमायचे नाही. तो अस्वस्थ होई. अनेकदा त्याचे मित्र त्याला म्हणत,
"अरे, श्रावण, खेळायला ये ना."
"अरे, तो कसला खेळायला येतोय? घरी कामे असतील की..." दुसराच कुणीतरी गमतीने म्हणे परंतु श्रावणला कधीच कुणाचा राग येत नसे. तोही हसत असे. मधूनच कधीतरी तो मित्रांसोबत खेळत असे परंतु तिथे तो जास्त रमायचा नाही. काही वेळ खेळून होताच खेळणे अर्धे सोडून तो निघत असताना त्याचे मित्र त्याला चिडवत असत परंतु मागे न पाहता श्रावण तिथून निघून जात असे. या सोबत श्रावणला भजन-कीर्तनची आवड निर्माण झाली. गावातील हनुमान मंदिरात दररोज सायंकाळी हरिपाठ होत असे. श्रावण न चुकता दररोज मंदिरात जाऊन हरिपाठात भाग घेत असे. मंदिरात अधूनमधून कीर्तन होत असे. श्रावण रात्री उशिरापर्यंत जागून कीर्तन ऐकत असे. त्याची ती आवड पाहून गावातील लोक त्याचे कौतुक करायचे. ते ऐकून त्याच्या आईबाबांना खूप आनंद होत असे. दुसरीकडे अभ्यासाकडे तो कधी दुर्लक्ष करीत नसे. अभ्यास, परीक्षा या गोष्टींंची त्याला कधीच भीती वाटली नाही. त्याच्या शिक्षकांना ही त्याच्या या गुणांचे कौतुक वाटत असे. अधूनमधून त्याचे मित्र त्याला चिडवायचे. एखादेवेळी तो शांतपणे म्हणायचा,
"अरे, तुम्हाला काय माहिती आहे, आईबाबांना मदत केली की,किती आनंद मिळतो ते. जसा आपल्याला आनंद मिळतो त्यापेक्षा आपले आईबाबा आनंदी होतात. त्यांच्या कौतुकाची थाप आणि त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद हाच खरा आशीर्वाद असतो. आईबाबा म्हणजे आपल्यासाठी देवच असतात..."
त्याचे ते बोल ऐकून त्याचे मित्र विचारत, " का रे श्रावण, आम्ही तुला नेहमी चिडवतो त्याचा तुला राग येत नाही का रे?"
"मुळीच नाही. कीर्तन करताना महाराज नेहमी सांगतात, प्रत्येका सोबत नेहमी प्रेमाने वागावे. आपल्याला कुणी वाईट बोलले, चांगले वागले नाही तरीही आपण त्याच्याशी प्रेमानेच वागावे. जर आपणही त्याच्याशी जशास तसे वागलो तर मग त्याच्यामध्ये आणि आपल्यात फरक काय असणार? प्रेम, संयम, धैर्य अशा गोष्टींंमुळे जग जिंकता येते."
"आम्हाला नाही बुवा जमणार तुझ्यासारखे."
"प्रयत्न केला की, सारे जमते. इच्छा झाली की, मार्ग आपोआप सापडतो. काल मंदिरात एका बुवांंचे खूप छान कीर्तन झाले. ते म्हणाले, या जगात सरळमार्गी जर कुणी असेल तर ते म्हणजे पाणी! कितीही संकटे येवोत, रस्त्यात काटेकुटे येवोत की, मोठमोठे दगडधोंडे येऊ देत पाणी अशा साऱ्या संकटातून मार्ग काढत पुढेच जात राहते....."श्रावण मोठ्या आत्मविश्वासाने सांगत असताना मित्रही तल्लीन होऊन ऐकत होते..... श्रावण दहाव्या वर्गात गेला आणि एक दुर्दैवी घटना घडली. त्यादिवशी नेहमीप्रमाणे त्याचे आईबाबा एका शेतकऱ्याकडे कामासाठी गेले होते. दुपारची जेवणाची वेळ झाली. दोघेही जेवायला बसले होते. त्यांच्यापासून काही अंतरावर शेतकऱ्याचे बैल बांधलेले होते. त्यातला एक बैल आडदांड होता. तो बैल त्याला बांधलेली दोरी तोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या ओढण्यामुळे दोरी बरीच ढिली झाली होती. ते पाहून ती दोरी पक्की बांधावी हा विचार करून लक्ष्मण जेवण सोडून बैलाची दोरी आवळून बांधायला गेला.तो खाली बसून दोरी गच्च बांधत असताना त्या बैलाने त्याला पाठीवर जोरात धक्का मारला आणि लक्ष्मण त्या धक्क्यामुळे जागेवरच पडला. त्याला फार जोराचा मार लागल्यामुळे उठताही येत नसल्याचे पाहून ऊर्मिला त्याला सावरायला गेली. लक्ष्मण मार लागल्यामुळे तळमळत होता. ऊर्मिलाने पतीला उठविण्याचा प्रयत्न सुरू करताच संतापलेल्या बैलाने पाठीमागून तिच्या ही पाठीवर जोरदार धक्का दिला. दुसऱ्याच क्षणी ऊर्मिलाही दूर जाऊन पडली. दोघेही वेदनांनी तळमळत असल्याचे पाहून दूरवर काम करणारे लोक धावत आले. सर्वांंनी मिळून दोघांना उठवले. त्यांना उभेही राहता येत नव्हते. बैलगाडी आणून लक्ष्मण आणि ऊर्मिला यांना हळूच गाडीत झोपवले आणि गावातील डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर औषधोपचार केले परंतु दोघांनाही जबरदस्त मुका मार लागला होता. त्यामुळे त्यांना काही महिने झोपून राहावे लागणार होते. अंथरुणावर उठून बसायचे म्हटले तरी कुणाची तरी मदत घ्यावी लागत होती. श्रावणची दहावीची बोर्ड परीक्षा जवळ आली होती. श्रावणने धीर सोडला नाही. मोठ्या संयमाने त्याने अचानक आलेल्या संकटाचा सामना केला. शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना भेटून काही महिने घरी राहून अभ्यास करण्याची परवानगी मिळवली. सकाळी घरातील केरकचरा काढणे, अंगण झाडून सडा टाकणे, आईबाबांचे कपडे बदलण्यासाठी मदत करणे, स्वयंपाक करून त्यांना जेवू घालणे, त्यांना वेळच्यावेळी औषधी देणे, भांडी घासणे, कपडे धुणे इत्यादी अनेक कामे श्रावण न थकता, कंटाळा न करता, न चिडता अत्यंत शांतपणे, समाधानाने करू लागला. आईबाबांची, घरातील सर्व कामे झाली की मग मन लावून अभ्यासही करु लागला. वाचनालयात, मंदिरात जाता येत नसले तरी फावल्या वेळात ईश्वराचे नामस्मरण करू लागला. भजन, पोवाडे, भक्तीगीते ऐकवत आईवडिलांची सेवा करू लागला.
दहावीची परीक्षा झाली. अभ्यास चांगला केला असल्याने त्याला परीक्षा अवघड गेली नाही. निकाल यायला बराच अवधी होता. एकेदिवशी ऊर्मिला म्हणाली,
"बाळा, मला काय वाटते, निकाल लागला की, तू शेजारच्या गावातील कॉलेजात जा. पुढे शिक.आमच्यासाठी तू तुझे आयुष्य वाया घालवू नको. आमच्या तब्येती सुधारत आहेत. तू करून ठेवलेली भाजीभाकर खाऊन दिवस काढता येतील...."
"आई, डॉक्टर म्हणाले की, अजून सात-आठ महिने तुम्हाला हिंडता-फिरता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कॉलेज नाही तर मला काम करावे लागेल. रोजमजुरी करून पैसे मिळवावे लागतील. तुम्हाला कामावर जाता येणार नाही. मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो तर मग खायला कोण देणार?"
"तू त्याची काळजी करू नकोस बाळा. अरे, आजपर्यंत आम्ही दोघांनी मिळून काम करताना, शानशोक न करता पै-पै जमवून फार जास्त नाही परंतु अजून आठ-दहा महिने काही काम न करता घरखर्च होईल एवढा पैसा जमवला आहे...."
"पण बाबा, शिदोरी किती दिवस पुरेल?...."
"तू त्याची काळजी करू नकोस. जमवलेला पैसा संपला ना तरीही माझे दागिने आहेतच की. काहीही झाले तरी तू शिक्षण थांबवायचे नाही. ते मला आवडणार नाही." आई म्हणाली.
त्यानंतर श्रावणला आईबाबांसोबत शेजारी, गावातील अनेक लोक, मित्रांनी त्याला पुढे शिकण्यासाठी खूप समजावून सांगितले पण श्रावण स्वतःच्या म्हणण्यावर ठाम होता.....
दरम्यान दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. श्रावण चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. सर्वांंना खूप आनंद झाला. निकाल लागल्यानंतरची गोष्ट. त्यादिवशी सकाळी श्रावणने आईबाबांना चहा करून दिला. त्यांच्या आंघोळीची तयारी करू लागला. मुखी रामनाम सुरू होते. आईला आंघोळीला बसवून त्याने गरम पाण्याची बादली आईला नेऊन दिली. तितक्यात घराच्या दारावर कुणीतरी थाप मारली.
"कोण आहे?" श्रावणने विचारले.
"मी राम! दार उघड..." बाहेरून कुणीतरी म्हणाले.
"राम? कोण? काय काम आहे?" श्रावणने आतून विचारले.
"मला ओळखले नाही? तुझी भक्ती, तू करीत असलेली आईबाबांची सेवा पाहून मी प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे."
"प्रसन्न? आशीर्वाद .... क.. क..कोण आहात आपण?" श्रावणने असमंजसपणे विचारले.
"अरे, मी ... मी...प्रत्यक्ष राम आहे. ईश्वर आहे. ज्याला तू सतत आळवतोस तोच...."
"माफ करा, रामराया, आईबाबांनाआंघोळ घालतोय. ते काम अर्धवट सोडून मला दार नाही उघडता येणार...." श्रावण आश्चर्याने आणि विनयाने म्हणाला.
"अरे, किती वेळ लागेल?"
"ते नाही सांगू शकणार...."
"अरे, बापरे! हे तर लहानपणी ऐकवल्या जाणाऱ्या 'चिऊ-काऊच्या' गोष्टीप्रमाणे झाले. श्रावणा तू प्रत्यक्ष मला थांबायला सांगतोस? ..."
"माफ करा. पण संत..कीर्तनकार म्हणतात ना, आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा असते. मी माझ्या आई वडिलांची सेवा म्हणजे ईश्वराचीच सेवा करतो..."
"बरे बाबा, होऊ दे तुझे. मी थांबतो..."बाहेरून आवाज आला.
थोड्या वेळाने पुन्हा दरवाजा वाजला. परंतु श्रावणने पुन्हा 'थांबा' असेच नम्रपणे परंतु ठामपणे सांगितले. आंघोळ झाल्यानंतर त्याने त्यांना फराळाचे दिले. दोघांनाही औषधी देऊन झाल्यानंतर त्याने दार उघडले. अत्यंत भक्तीभावाने त्याने समोर बघितले. दारात त्याचे तीन चार मित्र आणि शाळेतील एक शिक्षक यांना बघून तो आश्चर्यचकित झाला. त्याला दारात बघताच गुरुजी म्हणाले,
"शाब्बास विजय! तू खरेच या युगातील श्रावणबाळ आहेस. प्रत्यक्ष ईश्वर आला असे मी गमतीने सांगितले तरी तू तुझ्या सेवेत खंड पडू दिला नाहीस. धन्य आहेस तू."
"सर, तुम्ही? या. या. आत या. पण, अचानक कसे आलात?" श्रावणने विचारले.
"तुझे अभिनंदन करायला आलोय. अरे, अशा परिस्थितीत तू अभ्यास करून खूप छान यश मिळवलेस. म्हणून म्हटले, अभिनंदन करावे. बरे, पुढे काय ठरवले आहेस? अकरावी...."
"नाही सर, मी आईबाबांना असे सोडून नाही जाऊ शकणार."
"तुला कुठेही जावे लागणार नाही. त्या शाळेत फक्त प्रवेश घ्यायचा आहे. मी त्या शाळेत कालच जाऊन आलो. तिथल्या मुख्याध्यापकांना आणि सर्व शिक्षकांना बोलून तुझी सारी परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आहे. अकरावीचा अभ्यास तू घरीच राहून करायचा आहे. फक्त अधूनमधून एखादी चक्कर टाकावी लागेल. परीक्षा द्यायला जावे लागेल. तोपर्यंत तुझ्या आईबाबांची तब्येतही चांगली होईल. बारावीला प्रवेश घेईपर्यंत आईबाबा काम करू लागतील त्यामुळे तुझ्या बारावीच्या अभ्यासाला आणि परीक्षेला काहीही अडचण येणार नाही..." गुरुजी समजावून सांगत असताना श्रावण म्हणाला,
"पण सर, अकरावीचा अभ्यास कसा करता येईल?"
"श्रावण, तुला अकरावीचा अभ्यास तो काय जड जाणार? तू हुशार आहेस. आम्ही सर्व रोज येऊन तुला रोजचा अभ्यास सांगत जाऊ.तुला अडचण येणार नाही." एक मित्र म्हणाला.
"हो. आम्हाला खात्री आहे.बरे, जी गोष्ट तुला समजणार नाही ती तू आपल्या सरांकडून समजावून घेत जा. नाही तर कॉलेजमध्ये जाऊन तुझ्या शंकांचे निरसन करून घेत जा. त्या दिवशी आम्ही इथे थांबून काका काकूंची काळजी घेऊ." श्रावणचा दुसरा मित्र म्हणाला.
ते सारे अंथरुणावर पडून ऐकणारी त्याची आई म्हणाली,
"श्रावणबाळा, अरे, गुरुजींंच्या रुपाने देवच घरी आलाय. त्यांच्या तोंडून जणू रामराया बोलतोय. आता हट्ट सोड. त्यांचे ऐक. नाही म्हणू नकोस. कर ते म्हणतात तसे."
"सर, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. घेतो मी प्रवेश...." श्रावण म्हणाला आणि गुरुजींसह सर्वांंनी टाळ्या वाजवून त्याला साथ दिली. त्याचे कौतुक केले.............

नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन ०२, संचेती शाळेजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)