Olakhpatra books and stories free download online pdf in Marathi

ओळखपत्र

°° ओळखपत्र °°
सायंकाळचे सात वाजत होते. विजया आणि अनिल हे दोघे पतीपत्नी कार्यालयातून घरी परतले होते. शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दोघेही आनंदी होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा अजितही खूप खुशीत होता. अजित त्याच्या आजोबांसोबत शनिवारी सकाळी आत्याकडे जाणार होता. आत्याकडे राहणाऱ्या आजीला भेटायला मिळणार म्हणून अजितचा आनंद गगनात मावत नव्हता.
"अजित, माझी बॅग भरून तयार आहे. तू तुझी बॅग कधी भरणार आहेस?" आजोबांनी विचारले.
"माझी बॅग आई भरून देणार आहे. आई, कधी देणार आहेस?"
"देते. जेवण झाले की, आपण तुझी बॅग भरुया. बाबा, तुमचे कार्ड घेतले काय?" विजयाने विचारले.
"घेतले. त्याशिवाय का कंडक्टर अर्धे तिकीट देणार आहे?" आजोबा म्हणाले.
"आजोबा, माझेही अर्धेच तिकीट काढणार ना? मग माझे कार्ड कुठे आहे?"अजितने विचारले.
"अरे, आजोबांसारख्या मोठ्या माणसांजवळ कार्ड असते." विजयाने समजावून सांगितले.
"मग मलाही आजोबांसारखे कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे."
"अजित, झाला का तुझा हट्ट सुरु? आजोबा, आपल्या सर्वांपेक्षा मोठे आहेत म्हणून त्यांना कार्ड मिळाले आहे. अजून आम्हालाही कार्ड मिळाले नाही."
"तुम्हाला पूर्ण तिकीट लागते म्हणून तुमच्याकडे कार्ड नाही. मला अर्धे तिकीट लागते. ओळखपत्र नव्हते म्हणून मागच्या वेळी कंडक्टरने आजोबांना पूर्ण तिकीट दिले होते ना?"
"अगदी बरोबर आहे. पण लहान मुलांना पूर्ण तिकीट देत नाहीत."
"ते मला माहिती नाही. मला कार्ड पाहिजेतच..." अजित हट्टाला पेटला होता.
"काय सांगावे तुला? अनिल, तुम्ही तरी सांगा ना ह्याला. मला स्वयंपाक करायचा आहे हो." विजया अनिलकडे बघत म्हणाली.
"हे बघ. असा हट्ट करायचा नाही. बरे, पुढल्या वेळी आपण जेव्हा गावाला जाऊ ना तेंव्हा..." अनिल बोलत असताना त्यांना मध्येच थांबवून अजित म्हणाला,
"नाही बाबा, तुम्ही असेच काही तरी सांगून वेळ मारून नेता आणि मग पहिले पाढे पंचावन्न!"
"अजू बाळा, इकडे येः मी की नाही तुला एक गोष्ट सांगतो." आजोबा म्हणाले.
"काही नको. आजोबा, तुम्ही मला नेहमी त्याच- त्याच गोष्टी सांगता. चंदामामाची गोष्ट ऐकून ऐकून पाठ झाली आहे. मी जर म्हणालो की, मला चंद्रावर जायचे आहे तर नेणार का मला?" अजितने विचारले.
"ते तर तू मोठा झाल्यावर जाणारच आहेस. तुझ्यासोबत मला नेशील का रे?" आजोबांनी विचारले.
"नशीब माझे. नाही तर कुठे तरी चंद्राच्या आकाराची रांगोळी काढली असती आणि मला म्हणाले असते, बघ तो चंद्र. जा चंद्रावर!" अजित म्हणाला.
"अरे, बाप रे! तुला आमच्या साऱ्या युक्त्या माहिती झाल्या आहेत की. अवघड आहे बुवा आमचे. मला एक सांग, तू उद्या तुझ्या आईला खायला काय करायला लावणार आहेस?"
"कांद्याचे थालीपीठ आणि सोबत आंबट दही!" अजित म्हणाला.
"काही नाही. दही खाल्ले की, तुला सर्दी होते. " विजया म्हणाली.
"हे असे आहे. दही म्हणताक्षणी आईलाच सर्दी होते. काही आवडीचे खावे म्हटले की, वाजली नकार घंटा!"
"आजी-आत्याची भेट होणार म्हणून तुझी जीभ फार चुरुचुरु बोलायला लागलीय की." विजया कौतुकाने म्हणाली.
"हे बघा, तुम्ही मला गप्पांमध्ये अडकवू नका. मी विसरलो नाही, विसरणार नाही. मला अर्ध्या तिकिटाचे कार्ड पाहिजेत."
"तुझे दप्तर झाले का आवरून? सोमवारचे दप्तर तयार ठेव. रविवारी उशिरा येशील आणि मग गडबड होईल."
"ते करतो गं. पण मला ओळखपत्र पाहिजेतच." असे म्हणत अजितने दप्तर उचलले. भिंतीवर लावलेल्या वेळापत्रकानुसार तो दप्तर आवरत असताना आजोबांना त्याच्या शाळेचे ओळखपत्र दिसले.दप्तर आवरून अजितने हातपाय धुतले. विजयाचा स्वयंपाक होताच सारे जेवायला बसले असतानाही अजितची ओळखपत्राची भुणभुण चालूच होती. जेवणे झाली. सारे जण दूरदर्शन बघत असताना अनिलने विचारले,
"बाबा, सकाळी किती वाजता जायचे आहे?"
"सकाळी सातच्या बसने जावे म्हणतो. म्हणजे दहा वाजेपर्यंत घरी पोहोचता येईल." आजोबा म्हणाले.
"चला. अजित, झोपायला जाऊया. दोन दिवस एका माणसाची मज्जा आहे बुवा! आत्या, आजी, मामा असणार. आत्याचे छोटे छोटे बाळ असणार खेळायला." अनिल हसत म्हणाले.
"बाबा, ते जाऊ द्या. पण माझ्या ओळखपत्राचे काय? कधी आणणार?उद्या सकाळी म्हणू नका की, रात्री उशीर झाला होता म्हणून जमले नाही. माझे अर्धे तिकीटवाले कार्ड असल्याशिवाय मी निघणारच नाही." अजित हट्टाने म्हणाला.
"अज्या, पुरे हं. वेडा कुठला? काही तरी हट्ट धरून बसतो आपला...." विजया रागाने बोलत असताना अजित किंचाळून म्हणाला,
"हो! हो! मी वेडाच आहे. मला ओळखपत्र पाहिजेतच...." अजय बोलत असताना विजया काही बोलण्यापूर्वीच तिला हाताने थांबण्याचा इशारा करून आजोबा म्हणाले,
"विजया, थांब. अजित हुशार आहे. ऐकेल तो."
"आजोबा, नाही हं. मी मुळीच ऐकणार नाही. प्रत्येक वेळी मीच सर्वांचे ऐकतो. आज तुम्हाला माझे ऐकावेच लागणार. चालणार नाही. जमणार नाही. ओळखपत्र नसेल तर मी येणारच नाही."
"अरे, व्वा! तू तर कविताच केलीस की. ठीक आहे. उद्या तुझे तिकीट काही काढताना कंडक्टरला तुझेही कार्ड दाखवीन."
"पण कसे? कुठून आणणार?" अजितने विचारले.
"ते माझे सिक्रेट आहे. ओ.के.?" आजोबा म्हणाले.
"चालेल. ते ओळखपत्र पाहून कंडक्टरने अर्धे तिकीट दिले पाहिजे." अजितने अट घातली.
"तसेच होईल." आजोबा म्हणाले.
"प्रॉमिस?" अजयने विचारले.
"येस! पण उद्या तिकीट घेईपर्यंत तू ओळखपत्राविषयी काहीही विचारणार नाहीस. कबूल?"
"ओ.के. डन! " अजय आनंदाने म्हणाला. आणि आईबाबासोबत झोपायला गेला.....
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकरच उठले. अजितने स्वतःची सारी कामे पटापट आटोपली. अनिलने त्या दोघांना कारने बसस्थानकावर सोडले. काही वेळातच बस आली. अजित आजोबांसह बसमध्ये बसला आणि अनिल त्यांचा निरोप घेऊन घरी निघाले. अजितची चुळबूळ आजोबांच्या लक्षात येत होती. परंतु ते शांत बसून होते. मधूनच अजितकडे पाहून मंद-मंद हसत होते. बरोबर सात वाजता त्यांची बस निघाली. कंडक्टर तिकिटे देत देत त्यांच्या आसनाजवळ येताच आजोबा म्हणाले,
"माझे अर्धे तिकीट, हे माझे ओळखपत्र. हा आमचा अजित. याचेही अर्धे तिकीट द्या. हे अजितचे ओळखपत्र...." आजोबा बोलत असताना कंडक्टर त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होता. आजोबा पुढे म्हणाले, "ज्याच्याजवळ कार्ड आहे त्यालाच तुम्ही अर्धे तिकीट देता ना म्हणूनच अजितचे कार्ड आणले आहे. या कार्डवर अर्धे तिकीट मिळेल ना?"
"नक्कीच मिळेल. शाळेकडून मिळालेले ओळखपत्रच आम्हाला हवे असते. इतर मुले ओळखपत्र आणतच नाहीत. व्वा! अजित, तू खूप हुशार मुलगा आहेस...." असे म्हणत वाहकाने तिकीट आणि ओळखपत्र परत दिल्याचे पाहून अजय म्हणाला,
"हे काय आजोबा? हे तर माझ्या शाळेचे ओळखपत्र आहे."
"कंडक्टरला हेच हवे असते. आम्ही शाळेत जात नाहीत ना म्हणून आम्हाला वेगळे ओळखपत्र काढावे लागते. जी मुलं शाळेत जातात आणि ज्यांना अर्धे तिकीट काढायचे असते अशा मुलांनी शाळेचे ओळखपत्र जवळ ठेवावे म्हणजे कंडक्टरमामा अर्धे तिकीट देतात."
"आजोबा, बरोबर आहे तुमचे. मी सोमवारी शाळेत गेलो ना की, आमच्या बाईंना आणि साऱ्या मुलांना सांगेन की, गावाला जातांना आपल्या शाळेचे ओळखपत्र जवळ ठेवा म्हणजे कंडक्टरमामा अर्धे तिकीट देतो......." अजित आनंदाने म्हणाला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला.
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
हॉटेल जय मल्हारच्या पुढे,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED