Gori gori goripaan books and stories free download online pdf in Marathi

गोरी गोरी गोरीपान


■■ कविता कालची..शिकवण आजची! ■■
* गोरी गोरी पान... *
माधवी शाळेतून घरी आली. नेहमीप्रमाणे तिची आई दीपिका दारात उभी नसल्याचे पाहून माधवीला आश्चर्य वाटले. दार उघडे होते. आई काय करते हे पाहावे म्हणून माधवी आवाज न करता घरात आली. तेव्हा तिने बघितले की, तिची आई डोळे लावून शांतपणे बसली होती. दूरदर्शनवर असलेल्या आकाशवाणी केंद्रावर लागलेले गाणे ऐकण्यात तल्लीन झाली होती. ती गाणे ऐकण्यात एवढी रंगून गेली होती की, माधवी येऊन तिच्या शेजारी बसल्याचेही तिच्या लक्षात आले नाही. गाणे ऐकताना तिचे डोळे बंद झाले होते. ओठ ऐकू येणारे गाणे त्याच सूरात, त्या विशिष्ट लयीत गात होते. माधवी सहाव्या इयत्तेत शिकत होती. गाणे ऐकण्यात व्यत्यय येऊ नये म्हणून माधवी काहीही न बोलता आईच्या शेजारी शांतपणे बसली. तितक्यात ते गीत संपले. हलकेच डोळे उघडत आई पुटपुटली, ' व्वाह। किती छान गाणे आहे. कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेच वाटते....' तितक्यात तिचे लक्ष शेजारी बसलेल्या माधवीकडे गेले. स्वतःला सावरत ती म्हणाली,
"माधवी, तू केव्हा आलीस ग? आवाज तर द्यायचास..."
"आई, तू गाणे ऐकण्यात एवढी रंगून गेली होतीस ना की, तुला उठवावेसे वाटले नाही. आई, हे तुझे आवडते गाणे आहे ना ?"
"हो. अगदी तिसऱ्या वर्गात असताना आमच्या बाईंनी हे गाणे पहिल्यांदा ऐकवले तेव्हापासून जिथे कुठे हे गाणे लागेल ते मी ऐकते. तुला सांगू प्रख्यात साहित्यिक, गीतकार, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले हे गाणे आहे. सोप्या, अर्थपूर्ण आणि कुणालाही सहज समजावे, गाता यावे अशी या गीताची रचना आहे बघ. मला हेच नाही त्यांची अनेक गाणी आवडतात. फार ताकदीचा कवी होता ग.... अरे, बापरे! मी बोलत काय बसली ? तुला भूक लागली असेल ना? चल. हातपाय, तोंड धुऊन ये. जेवायला बसूया...."
"आई, जेवण झाल्यावर मला हे गीत ऐकवशील?"
"ऐकवेन आणि त्या गीताची एक गोष्टही सांगेन हं...."असे म्हणत आईने दोघींचे ताट वाढून।घेतली...
जेवण झाले आणि पुन्हा माधवीने आईला आठवण करून दिली आणि दीपिकाने तिला आवडणारे ते गीत ऐकवायला सुरुवात केली.....
' गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण....' दीपिका गात असताना तिला मध्येच थांबवून माधवीने विचारले, "आई, एक समजले की, गोरी गोरीपान म्हणजे अगदी तुझ्यासारखी पण हे फुलासारखी छान म्हणजे कशी ग ?"
"तीच तर मजा आहे ग. अगदी हाच प्रश्न मी तुझ्या आजीला म्हणजे माझ्या आईला विचारला होता....."
"मग काय म्हणाली आजी?" माधवीने आतुरतेने विचारले.
"सांगते.ऐक......" असे म्हणत दीपिका भूतकाळात शिरली.......
त्यादिवशी दीपिकाच्या वर्गात तिच्या गुरूजींनी तिसरीच्या वर्गासाठी असलेल्या संगीत या पुस्तकात असलेली एक कविता म्हणून दाखवली आणि म्हणाले,
"ही कविता सर्वांनी पाठ करायची आहे. तोंडी परीक्षेत गुण असतात. "
दीपिका घरी आली. तिने ती कविता पाठ करायला सुरुवात केली. पण तिला ती कविता वाचताना काही शब्दांचा नीट अर्थ समजत नव्हता. शेजारी भाजी निवडत बसलेल्या आईला ती म्हणाली,
"आई, मी तुला एक कविता वाचून दाखवते पण तू मला त्याचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे."
"अस्सा हेतू आहे का, कविता ऐकवण्या मागे? बरे..बरे..ऐकव. मला नाही आला अर्थ तर तुझे बाबा सांगतील तुला...." शेजारी बसलेल्या दीपिकाच्या बाबाकडे बघत आई म्हणाली . त्यानंतर दीपिकाने ती कविता ऐकवली.
"व्वा. छान कविता आहे ग. अर्थही तसा फार अवघड नाही."आई म्हणाली.
"खूप सोपी आहे ग. मला आधी तुला काय अवघड वाटले ते सांग." बाबा म्हणाले.
"गोरीपान म्हणजे समजले. म्हणजे आपल्या आईसारखी गोरी. सारेच आईला म्हणतात ना, खूप गोरी आहे ..."
"अगदी बरोबर. तुला समजतो की कवितेचा अर्थ." बाबा म्हणाले.
"पण बाबा, फुलासारखी छान म्हणजे कशी हो?"
"मला सांग, तुला कोणते फुल आवडते?" बाबांनी विचारले.
"मला की नाही, गुलाबाचे फुल आवडते."
"बरोबर. तसेच आहे. गुलाबाचे फुल सर्वांना खूप आवडते. कारण ते असते तसे टपोरे, नाजूक. हात लावला की,पाकळी गळून जाणारे. लहान मुलांना म्हणजे तुझ्याएवढ्या मुलांना त्यांची होणारी वहिनी हवहवीशी, सुंदर, नाजूक, बोलणारी अशीच फुलासारखी सुंदर ...फुलांकडे जसे सारखे बघतच बसावे वाटते ना तशीच वहिनी हवी असते. म्हणून प्रत्येक लहान बहीण त्याच्या मोठ्या भावाला जसे म्हणते तेच बोल, त्याच भावना या कवितेत व्यक्त झाल्या आहेत." आई म्हणाली.
"बरे. पण मग ही अंधाराची साडी म्हणजे काय ग? अंधार म्हणजे तर काळाकुट्ट असतो ना मग अंधाराची साडी म्हणजे.... आई, मला काय वाटते ते सांगू काय?"
"जरूर सांग. तुला जे वाटेल, समजेल ते महत्त्वाचे आहे. कवी, गीतकार लिहितात ना, त्यावेळी असणारी परिस्थिती, त्यांची भावना वेगळी असते. परंतु वाचणारांना जे समजते, विशेषतः तुम्ही लहान मुले ज्या पद्धतीने त्या कविता, कथेकडे पाहता ते महत्त्वाचे आहे. ते जाऊ दे . तू काही तरी सांगणार होती ते सांग बरे." दीपिकाचे बाबा म्हणाले.
"वहिनी, गोरी गोरी पान आहे म्हणजे ती कुठूनही, कुठेही ओळखू येऊ शकते. तिचा रंग एवढा गोरा आहे ना की, ती अंधारातही ओळखता येते. जणू तिने अंधाराचीच साडी नेसली आहे...ती एवढी गोरी असते ना की, तिने नेसलेली साडी काळ्या रंगाची असल्यामुळे तिला ती अधिकच शोभून दिसते..."
"अरे वा, हुशार आहेस की तू . पुढचे सांग बरे...."
"आभाळाने जशी अंधाराची साडी नेसलीय ना, त्याप्रमाणे त्या साडीवर जसे चांदण्याचे ठिपके आहेत ना तशीच चांदण्याची खडी आपल्या वहिनीच्या साडीवर असावी...त्यामुळे वहिनी जास्तच सुंदर दिसेल"
"कित्ती छान. माझी एवढुशी बाळ किती हुशार झालेय हो..."आई म्हणाली.
"म्हणजे तुला अशी वहिनी पाहिजे तर." बाबांनी विचारले. तितक्यात दीपालीचा भाऊ कंपनीतून आला. त्याला पाहताच दीपिका उठली. दादाकडे पळत जाऊन त्याच्या हाताला धरून त्याला सोफ्यावर आणून बसवत म्हणाली,
"दादा, मला सांग, तू मला वहिनी कधी आणणार आहेस?"
"हे काय भलतेच?" दादाने तिला विचारले.
"भलतेच असो की, सलतेच असो. बरे, तू वहिनी कशी आणणार आहेस ?"
"आई, हे काय हिचा भलताच हट्ट? " दादाने आईला विचारले तशी आई म्हणाली,
"अरे, ती विचारतेय एवढी तर मग सांग ना...." ते ऐकून दादा हसत म्हणाला,
"मला की नाही, दीपुडे, ...अं..अं.. तू सांग बरे, तुला कशी हवी आहे वहिनी?"
"मला की नाही, गोरी गोरीपान फुलासारखी छान अशीच वहिनी हवी आहे."
"अजून कशी?"
"तिच्या गोऱ्या रंगाला शोभणारी म्हणजे बघ अंधारातही ओळखू आली पाहिजे अशी साडी आणि ना त्या साडीवर की नाही चमचम चमकणाऱ्या चांदण्याप्रमाणे खडी पाहिजे..."
"बाप रे ! भारीच हं . बरे, अजून काय काय अपेक्षा आहेत?"
"तू म्हणजे आपण वहिनीला कशामध्ये बसवून आणायचे?" दीपिकाने विचारले. तसे दादाने हळूच विचारले,
"तू सांग बरे ? कार, ट्रावल्स, रेल्वे की विमान ?"
"छट्! माझ्या वहिनीला असे नाही आणायचे?"
"मग कसे बरे आणायचे?"
"तिला की नाही आपण चांदोबाच्या गाडीत आणूया." दीपिका उत्साहाने म्हणाली.
"चांदोबाची गाडी? ती कशी असते बुवा?" दादाने विचारले.
"तुला माहिती नाही? काय दादा, अरे ती नाही का, चंदामामाची गाडी असते. तिला हरणाची जोडी...म्हणजे दोन हरणे तिला ओढतात. आणि ही गाडी कशावरून पळते ते माहिती आहे का?" दीपिकाने विचारले.
"नाही बुवा. तुला माहिती असेल तर सांग ना..." दादा म्हणाला.
"ती की नाही गुलाबाच्या रानातून येते म्हणजे आपली वहिनी त्या चांदोबामामाच्या गाडीत बसली ना की, ती गाडी गुलाबाची फुले अंथरलेल्या रस्त्यावरून आणायची."
"व्वा!व्वा! छानच की. पण मला एक सांग, तुला वहिनी आणायची एवढी गडबड का होतेय?"
"कसे आहे, वहिनी आली ना की माझी तिच्याशी मैत्री होणार. एकदा का आमची गट्टी झाली झाली ना की मग तुला मस्तपैकी थापा मारताना वहिनीला मात्र मी गोडगोड पापा देत जाईन आणि तुझी कट्टी करीत जाईन....." दीपिका सांगत असताना दादा हात उगारून उठल्याचे पाहून दीपका घाबरल्याचे नाटक करीत आईच्या मागे लपली. दादानेही तिला आईपासून वेगळे केले. तिचा पापा घेत तो म्हणाला,"असा डाव आहे का एक मुलीचा. तर मग जा. मी लग्नच करीत नाही...." असे सांगून वास्तवात आलेली दीपिका माधवीला म्हणाली,
"त्यादिवशीपासून मी दादाला त्याचे लग्न होईपर्यंत दररोज एकदा तरी ही कविता ऐकवून चिडवत असे. जेव्हा दादा काही कारणाने रागावला की मी मुद्दाम हे गीत गुणगुणत असे. मग त्याचा राग एका क्षणात निघून जात असे. आणि तुला सांगू का माधो, दादाचे लग्न ठरले ना की, मी हट्टाने काय केले माहिती आहे ?"
"काय केलेस ?" माधवीने विचारले.
"दादाकडे हट्ट धरला आणि लग्न लागल्यानंतर वहिनीला ज्या कारमधून घरी आणले ना, त्या कारच्या समोर जाड पुठ्ठ्याची एक मोठी चंद्रकोर लावली. तिला छान रंग द्यायला लावला आणि कारच्या हेडलाइटजवळ दोन्ही बाजूला पुठ्ठ्याचे हरणं लावले म्हणजे ती झाली हरणाची जोडी ओढणारी चांदोबाची गाडी....."
"आई, कमाल आहे तुझी . त्या काळात हे सारे म्हणजे...."
"पुढे तर ऐक. त्या चांदोबाच्या गाडीतून मी पण दादा-वहिनीसोबत निघाले. गल्लीजवळ आले की, मी कारमधून खाली उतरले. बाबांनी माझ्या हट्टासाठी, इच्छेखातर आधीच गुलाबांची खूप सारी फुले आणून ठेवली होती. ती फुले आम्ही सर्वांनी मिळून कारसमोर अंथरली आणि त्यावरून ती कार घरापर्यंत आणली. म्हणजे झाले काय ....."
" वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान...." माधवी आनंदाने म्हणाली.
"बघ किती सोपी रचना आहे ना, या रचनेतील बहुतेक साऱ्या ओळी ह्या आधी संपलेल्या ओळीच्या शेवटच्या काही अक्षरांपासून सुरू होतात.... बघ हं... पहिली ओळ 'अंधाराची साडी' या दोन शब्दांनी संपली की पुढची ओळ 'अंधाराच्या साडीवर..' अशी सुरू होते..."
"आई, खरेच की.... त्याच्या पुढे 'चांदोबाची गाडी' येथे संपलेली ओळ दुसऱ्या ओळीत 'चांदोबाच्या गाडीला...' या शब्दांनी सुरु होते आणि म्हणूनच तुला हे गीत इतके आवडते तर"
"होय. प्रचंड आवडते. तुला सांगते, माधे, या गीतावर मी शाळेत आणि कॉलेजमध्येही अनेक वेळा नाचसुद्धा केला आहे....."
"खरे की काय ? आई एकदा मलाही करून दाखव ना ग तुझा डान्स...."
"ये वेडाबाई, भलतेच काही करणार नाही हं, सांगून ठेवते.चल उठ. खूप वेळ झाला. तुझे होमवर्क कर आणि मग जा खेळायला...."दीपिका म्हणाली.
"आई, करते ग अभ्यास. वाटल्यास खेळायला जाणार नाही. पण एक सांग ना ग, वहिनीला आणायला चांदोबाचीच गाडी का? कार का नको किंवा मग सूर्याचा रथ का नको?"
"कसे आहे, हे गीत लिहिले ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आज जशी वाहनांची संख्या खूप आहे ना तशी वाहने त्याकाळी नव्हती. शिवाय बहुतेक सारी लग्नं ही उन्हाळ्यात होत असत म्हणून या गीतातील जी छोटी मुलगी आहे ना तिला वाटते की, आपल्या वहिनीला आपल्या घरी येताना गर्मी होऊ नये. छान थंडगार वाटावे. मला सांग, तुला उन्हात त्यातही सूर्याच्या रथात छान वाटते की , चांदोबाच्या गार गार प्रकाशात....."
"अच्छा! म्हणजे वहिनीला गर्मीचा त्रास होऊ नये म्हणून चांदोबाची गाडी. पण मग हरणाचीच जोडी का ग?"
"त्याचं असं आहे, हरण जोरात पळणारा प्राणी आहे. बरोबर?" आईने विचारले.
"समजले. जी मुलगी हे गाणे म्हणतेय ना की, तिला असे वाटतंय की, आपली वहिनी लवकरात लवकर घरी यावी म्हणून धूम पळणाऱ्या हरणांची जोडी चांदोबाच्या गाडीला लावून वहिनीला लवकर घरी घेऊन यावे. " माधवी म्हणाली.
"व्वा! किती हुशार आहे ग माझी माधो. आता तू मला एक सांग, या गीताचे तात्पर्य काय? किंवा या गीतातून तू काय बोध घेशील?" आईने विचारले.
"बोध? अं...अं.. एक मिनिट हं.....हं...आई, मला काय वाटते आई, घरी येणारी वहिनी ही गोरीपान असावी. तिने चांदोबाच्या गाडीतून शितल प्रकाश, नात्यांमध्ये गोडवा घेऊन यावा. महत्त्वाचे म्हणजे तिच्याशी सर्वांनी मैत्रीचे संबंध ठेवावेत. तिला घरातल्या लहान मुलांनी सारखा त्रास देऊ नये. तिला फुलांप्रमाणे जपावे.....काम पडलेच तर दादा-वहिनीच्या लुटुपुटूच्या लढाईत तिच्यासाठी दादाचीही कट्टी करावी."
"अग बाई, माधोराणी, किती छान विचार आहेत ग तुझे. वाटत नाही की, सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका लहान मुलीचे हे विचार आहेत. खूप छान!" असे म्हणत दीपिका काम करायला तर माधवी अभ्यास करायला गेली.....
पंधरा दिवसांनी दीपिकाचा वाढदिवस होता. त्यादिवशी बाबांच्या मदतीने माधवीने आईला एक आश्चर्याचा धक्का दिला. आईच्या वाढदिवसानिमित्त एक छानसा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये आयोजित केला. माधवी तिच्या आई-वडिलांसह हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिथे माधवीचे मामा-मामी म्हणजे दीपिकाचा लाडका दादा आणि वहिनी हजर होते. त्यांना पाहून दीपिकाला आश्चर्याचा धक्का बसला. तिला खूप खूप आनंद झाला. ज्यावेळी दीपिकाने केक कापला त्यावेळी दीपिकाचे आवडते गीत वाजायला सुरुवात झाली....'दादा, मला एक वहिनी आण...' पाठोपाठ माधवीने डान्स करायला सरूवात केली. ते पाहून दीपिकाच्या वहिनीने ही माधवीला साथ देताना दीपिकाचा हात धरून तिला ओढले . पाठोपाठ माधवीचे बाबा आणि मामानेही नाचायला सुरुवात केली. केक खाऊन होताच सर्वांनी दीपिकाला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली.
"दीपू, हा सारा बेत , हे सारे नियोजन आपल्या माधवीचे आहे बरे. तिनेच फोनवर सारी कल्पना दिली आणि हे सारे घडून आले...." ते ऐकताना दीपिकाने माधवीला जवळ घेतले तिचा पापा घेत असताना दादा पुढे म्हणाला,
"दीपू, माधवीने सांगितलेली ही भेट मुद्दाम तुझ्यासाठी आणली आहे. ही एक कॅसेट आहे. यात गदिमांनी लिहिलेले तुझे आवडते गीत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकच गीत अनेक गायक-गायिकांनी गायिलेले आहे. घे..." असे म्हणत दादाने दिलेली ती भेट हातात घेत दीपिकाने माधवीचा एक छान पापा घेतला........
नागेश सू. शेवाळकर,इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED