बक्षिसाची किमया! Nagesh S Shewalkar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बक्षिसाची किमया!


* बक्षिसाची किमया! *
त्यादिवशी दुपारच्या सत्रात सातव्या वर्गावर शिकवत असताना एक पालक एका हाताने एका विद्यार्थ्याला ओढत आणत होता. सोबतच दुसऱ्या हातात असलेल्या छडीने त्याला मारत मारत आणत होता. मी त्या मुलाकडे पाहिले आणि मला आठवलं की, त्या मुलाला दररोज कुणी ना कुणी असेच रट्टे देत आणून सोडते. बरे,मुलगाही लहान नव्हता. सातव्या वर्गात शिकणारा म्हणजे चांगले बारा-तेरा वर्षाचे वय होते. शिवाय अंगापिंडाने मजबूत होता. शाळेत येण्याचा मात्र त्याला भरपूर कंटाळा होता. घरून कुणीतरी मारत आणायचे. शाळेत आला की, अगोदरच्या दिवशी आला नाही म्हणून शिक्षकही शिक्षा करत असत.
"अरेरे! काय झाले?" मी त्या दोघांकडे पाहून विचारले.
"काय व्हायचं? शाळेत येतच नाही." वैतागलेला पालक म्हणाला.
"हो. माझ्या लक्षात आलेय ते." मी म्हणालो.
"हेडमास्तरसाहेब, काही तरी करा. काय झाले सर, दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या. सुट्टी लागल्यापासून जाय पोहायला, खेळा क्रिकेट यामुळे अंग गंडारलय बघा. शाळा उघडली की, शाळेत जीवावर जातेय. शाळेची वेळ झाली की, समोरच्या गल्लीत त्याची आत्या राहते, तिच्या घरी दडी मारुन बसतो. नाही तर मग गावाशेजारच्या आमच्या शेतात जाऊन लपून बसतो. काय करावे समजत नाही......" तो पालक काकुळतीने बोलत असताना वर्गातला एक मुलगा म्हणाला,
"सर, नाही का, आमच्या सरांनी आम्हाला अमितला बोलावून आणायला पाठवले ना की, हा अमित की नाही, एवढाले दगड घेऊन आमच्या मागे लागतो. दोन-तीन दिवसांपूर्वी आम्हाला पाहताच अमितने ना, मोठ्ठा दगड माझ्या दिशेने भिरकावला. सर, मी जर पटकन वाकलो नसतो ना सर, तर तो दगड, माझ्या डोक्यातच लागला असता....
"सर, ह्याने दगड चुकवला कघ, अमित हसत म्हणाला की, अरे, वा! माझा बाउन्सर चांगलाच डक केलास की. आता आम्ही ठरवलय की, याला पुन्हा बोलवायला जायचं नाही." वर्गातील विद्यार्थी एकामागोमाग एक अमितबद्दल सांगत असताना मी अमितकडे पाहिले. पालकांनी खूप मारले असल्यामुळे त्याच्या गालावर माराचे वळ होते. अमितच्या आधीच्या गोबऱ्या आणि रडताना फुगलेल्या गालावर ते वळ अधिकच उठून दिसत होते. मी त्याच्याजवळ गेलो. तसा त्याच्या रडण्याचा आवाज वाढला. त्याच्या हाताला धरून मी त्याला वर्गात मागच्या बाजूला घेऊन गेलो. त्याची खाली बसण्याची तयारी नसतानाही त्याला बळेबळे खाली बसवून मीही त्याच्याजवळ बसलो ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. थोडा वेळ मी त्याचा हात धरून ठेवला. त्याचे रडणे थांबत असले तरीही हुंदके थांबत नव्हते. डोळे, नाक पुसणे चालूच होते. त्यामुळे नाकाचा शेंडा लालेलाल तर डोळे लालभडक झाले होते.
"अमित, तुला क्रिकेट खेळायला आवडते का?" मी विचारले. अमितने होकारार्थी मान हलवली. मी पुन्हा विचारले, "तुला कोणता खेळाडू आवडतो?"
"स...सचिन...त..तेंडूलकर..." अमित म्हणाला. त्याचे हुंदके बरेच कमी झाले होते.
"का? सचिधच का आवडतो? " मी विचारले.
"सर, सचिन ना, गोलंदाजांना झोडपून काढतो म्हणून." अमित उत्साहाने म्हणाला. त्याच्या आवडीचा विषय निघाला होता म्हणून तो सावरत होता.
"तुलाही गोलंदाजांची धुलाई करायला आवडते का?" मी अमितला विचारत असताना दुसरा एक मुलगा मध्येच म्हणाला,
"अहो, सर, आपला अमित बॅटींगला आला ना की, गोलंदाजांची खैर नसते. प्रत्येक चेंडू उचलून मारतो. त्याने मारलेला फटका तर पार बाउंड्रीच्या पार जातो."
"हो का. मग तर आपल्या अमितला रोज क्रिकेट खेळायलाच पाहिजे. तुला सचिन तेंडुलकर व्हायचे आहे का?" मी सहज विचारले.
"होय सर.मला की नाही मोठा झाल्यावर पाकिस्तानी बॉलर्सची धुलाई करून त्यांना हरवायचे आहे." अमित सहज म्हणाला. परंतु त्याच्या आवाजातला द्वेष आणि जोश पाहून मी आश्चर्यचकित झालो.
"व्वा! छान विचार आहेत तुझे. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. क्रिकेटचा खूप सराव करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेट संघातून खेळायचे असेल तर खूप शिकावे लागते."
"सर, खूप म्हणजे बारावी पर्यंतच ना?" अमितने अचानक विचारले.
"का? बारावीच का? पुढे का नको?" मी आश्चर्याने विचारले.
"आपला सचिनही बारावीच शिकला आहे ना?" अमित सहज म्हणाला पण त्याला असलेली सचिनची एवढी बारीकसारीक माहिती पाहून मी स्तिमित झालो.
"सर, मी खूप मेहनत करीन. सकाळ-संध्याकाळ भरपूर क्रिकेट खेळेल....." हे सांगत असताना तो शाळेचा विषय टाळत असल्याचे पाहून मी म्हणालो,
"अमित, तुला सचिनबद्दल खूप माहिती आहे. तो तुझा लाडका खेळाडू आहे. तुलाही सचिनप्रमाणे खूप क्रिकेट खेळायचे आहे. पण तुला हे माहिती आहे का, क्रिकेट खेळताना सचिनने शाळेकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. शाळेतर्फे क्रिकेट खेळताना बुडालेला अभ्यास तो जास्त वेळ देऊन पूर्ण करीत असे."
"हो. माहिती आहे. शाळेत जाता यावे आणि क्रिकेटही खेळता यावे म्हणून तो आईबाबांसोबत न राहता त्याच्या काकांकडे जाऊन राहिला होता." अमित सहजतेने म्हणाला.
"अरे, बाप रे! सचिनबद्दल किती माहिती आहे तुला! छान! मलाही तुझ्याएवढी माहिती नाही. ते जाऊ दे, पण सचिन जसा शाळा आणि क्रिकेट दोन्ही करत होता. तसेच तुलाही करावे लागेल."
"सर, मी रोज शाळेत येईन, अभ्यासही करेल पण...." बहुतेक माराच्या भीतीने डोके वर काढले होते. ते ओळखून मी विचारले,
"अमित, एक सांग, तुला तुझ्या घरची माणसे आणि शाळेत गुरूजी का मारतात?.." मला पूर्ण बोलू न देता अमित मध्येच म्हणाला,
"मी दररोज शाळेत यावे म्हणून."
"शाब्बास! तू जर रोज अगदी एक दिवसही शाळा न बुडवता शाळेत आलास तर तुला कुणीही मारणार नाही. हे मी तुला खात्रीने सांगतो......" त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता म्हणून मी पुढे म्हणालो,
"मी तुला प्रॉमिस करतो, तू दररोज शाळेत आला ना तर तुला कुणीही मारणार नाही. शिवाय मी तुला आवडेल असे छान बक्षीस देईन."
"बक्षीस देणार? कोणते?" त्याने उत्साहाने विचारले.
"तु सांगशील ते...." मी असे म्हणत असताना त्याचा चेहरा आनंदला तर होताच पण तो विचारात पडल्याचे पाहून मीच म्हणालो,
"खडू? पैसे? चॉकलेट की क्रिकेट खेळायला बॅट पाहिजे?"
"स...स..सर, मला तुम्ही बॅट देणार?" अमितने विचारले त्यावेळी त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता.
"होय. तू दररोज शाळेत आला तर मी तुला बक्षीस म्हणून बॅट देणार. पण ....."
"सर, मी दररोज शाळेत येणार म्हणजे येणार !" अमितचा आत्मविश्वासाने भरलेला, ठाम स्वर ऐकून मी निश्चिंत झालो. दोन-तीन दिवस तो नियमितपणे शाळेत येत असल्याचे पाहून मी एक छान, मजबूत बॅट आणली. एकेदिवशी परिपाठाच्या वेळी त्याला ती बॅट दिली. बॅट हातात आल्याबरोबर अमितने ती अशी जोरदार फिरवली की, जणू षटकार मारल्याप्रमाणे! त्याबरोबर विद्यार्थ्यांनी धरलेल्या टाळ्यांच्या ठेक्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला....
त्यानंतर अमितने एक दिवसही शाळा चुकवली नाही. अभ्यासही मन लावून करत असे. सातवी बोर्ड परीक्षेचे आवेदनपत्र भरत असताना अमितचे वर्गशिक्षक म्हणाले,
"सर, यावर्षी सातव्या वर्गातील सत्तर मुलांपैकी सर्वात जास्त उपस्थिती अमितची आहे. बॅट दिल्यापासून तो एक दिवसही अनुपस्थित नाही."
"अरे, वा! छानच की." मी म्हणालो.
यथावकाश सातवी बोर्डाची आणि शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. अमित अत्यंत चांगल्या गुणांनी सातव्या इयत्तेत उत्तीर्ण झाला. परंतु शाळेसाठी, शिक्षकांसाठी आणि त्याच्यासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट म्हणजे अमित शिष्यवृत्ती धारक झाला होता.....
अमितने पुढील शिक्षणासाठी गावातील एका माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. क्रिकेटशी त्याची चांगलीच नाळ जुळली होती. त्या शाळेत क्रिकेटचा संघ होता. अमितचा त्या संघात समावेश झाला. दरवर्षी जुलै महिन्यात होणाऱ्या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत त्याच्या फलंदाजांने त्याच्या शाळेला अजिंक्यपद तर मिळवून दिलेच परंतु अमित त्या स्पर्धेचा मालिकावीर ठरला. अमितच्या त्या यशामुळे आणि त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याची जिल्हा क्रिकेट संघामध्ये निवड झाली..........
नागेश सू. शेवाळकर
११० वर्धमान वाटिका फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
हॉटेल जय मल्हारच्या पुढे,
थेरगाव, पुणे ४११०३३