जात Milind Joshi द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जात

सध्याचा गाजणारा मुद्दा कोणता? जात... मला वाटते हा मुद्दा आधीही होताच आणि यापुढेही असाच चालू राहील. अर्थात आपण जर याचे गांभीर्य वेळीच ओळखले तर मात्र तो बराचसा सुसह्य बनेल. सकारात्मक राहायला काय हरकत आहे? असो...

ही गोष्ट आहे १९८६ सालातली. त्यावेळी मी सहावीत शिकत होतो. आणि हे तेच वय असतं, ज्यात मुलांवर कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त परिणाम होतो. नुकतेच त्यांना थोडेफार समजू लागलेले असते. जे विचार त्यांच्या समोर मांडले जातील त्यावर लगेचच मुले विश्वास ठेवतात. अनेक गोष्टींचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मुले याच वयापासून चालू करतात. त्यामुळेच या वयात अनुभवलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. अशा अनेक घटना माझ्या स्वभावाचा भाग त्यामुळेच बनल्या आहेत.

त्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी खेळून घरात आलो त्यावेळी शेजारच्या मावशी बसलेल्याच होत्या.

“काय रे??? कुठे गेला होतास खेळायला???” त्यांनी काहीसे दरडावून विचारले.

“मैदानावर...” मी एकदा आईकडे आणि एकदा त्यांच्याकडे पहात काहीसे घाबरत उत्तर दिले.

“तेच पोरं का?” त्यांचा पुढील प्रश्न.

“अं... हो...”

“कितीदा सांगितले तुला... त्यांच्यात खेळत जाऊ नकोस म्हणून... तुझी जात काय? त्यांची जात काय??” त्यांचा आवाज काहीसा चढला.

“मिलिंद, आधी हातपाय धू आणि देवापुढे तेलवात लाव..!” आईने माझ्याकडे पाहत म्हटले आणि मी हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये घुसलो.

“काय गं... तू देखील त्याला काही म्हणत नाहीस?” त्यांनी आईकडे मोर्चा वळवला.

“आल्यावर सांगते त्याला...” म्हणत आईने वेळ मारून नेली.

देवापुढे तेलवात लावून होईस्तोवर मावशी त्यांच्या घरी गेल्या होत्या.

“आई... जात काय असते?” मी आईला प्रश्न विचारला.

“तुला का हा प्रश्न पडला???” आईने मलाच प्रतिप्रश्न केला.

“अगं आताच मावशी म्हणत होत्या की माझी जात आणि माझ्या मित्रांची जात वेगळी आहे म्हणून. पण मला तर आमच्यात काहीच फरक वाटत नाही.”

“तुला जर काही फरक वाटत नाही मग तू कशाला अशा गोष्टी माहित करून घेण्याचा प्रयत्न करतोस?”

“अगं काल शाळेतही माझा एक मित्र मला म्हणाला... तू आमच्या जातीचा नाहीस म्हणून. मग मला माझ्या जातीचा कोण हे कसे समजणार?” माझे प्रश्न काही संपत नव्हते, आणि ‘जात म्हणजे काय?’ हे मला समजेल अशा भाषेत कसे सांगावे हे कदाचित तिला समजत नसावे.

“आधी मला दुकानातून भगर आणून दे... मग सांगते.” असे म्हणत तिने मला दुकानात पिटाळले. बहुतेक मी या दरम्यान माझा प्रश्न विसरेन असे तिला वाटले असावे.

“ही घे भगर... आणि आता दे माझ्या प्रश्नांचे उत्तर...” मी भगरीची पुडी तिच्या हाती देत म्हटले आणि पलंगावर जाऊन बसलो. एकीकडे तिचे काम चालू झाले.

“सांग ना...” मी म्हटले.

“अरे पूर्वी माणसे जी कामे करत त्यावरून त्यांना ओळखले जायचे. नंतर त्यालाच जात असे म्हटले गेले.” तिने एका वाक्यात उत्तर दिले.

“म्हणजे?”

“म्हणजे... जो पूजाअर्चा करतो तो ब्राम्हण, जो लाकडाच्या वस्तू बनवतो तो सुतार, जो मातीच्या वस्तू बनवतो तो कुंभार... असे...”

“हं... पण मग माझे मित्र तर हे काहीच करत नाहीत, मीही काही करत नाही मग आमची जात कोणती?” माझा पुढचा प्रश्न.

“जी वडिलांची जात असते तीच आता मुलांचीही जात मानली जाते.” आईने उत्तर दिले.

“मग माझी जात कोणती?”

“ब्राम्हण...”

“आणि माझ्या मित्रांची?”

“ते मला कसे माहित असणार?”

“मग आता मी त्यांच्यात खेळायला जायचे नाही का?” माझा पुढचा प्रश्न.

“जा की खेळायला... तुला कुणी नाही म्हटले?”

“अगं पण आताच मावशी म्हणत होत्या ना...”

“त्यांना म्हणू दे... तू त्यांचे नको ऐकू...” आई काहीशी वैतागली.

“अगं पण त्या तर मोठ्या आहेत आणि तूच म्हणतेस ना... मोठ्यांचे ऐकायचे असते म्हणून?” मी म्हटले मात्र आणि आई काहीशी गंभीर झाली.

“हे बघ मिलिंद... मोठ्यांचे जरूर ऐकायचे पण जर कुणी तुला एखाद्याच्या जातीवरून त्याच्याशी खेळू नको, किंवा बोलू नको असे सांगितले तर मात्र ते ऐकण्याची काहीच गरज नाही.” तिने स्पष्ट शब्दात सांगितले.

“हं...” मी प्रतिसाद दिला पण माझ्या मनातील प्रश्न काही संपले नव्हते. आईचे माझ्या चेहऱ्याकडे बारीक लक्ष होते.

“काय रे? अजूनही काही विचारायचे आहे का?” तिने विचारले...

“अं.... त्या मावशी मला इतर मुलांमध्ये का खेळू देत नाहीत?” मी पुढचा प्रश्न विचारला.

“ज्या जुन्या विचारांच्या आहेत म्हणून...” आईने उत्तर दिले.

“मग त्यांना तू का समजून सांगत नाहीस... जसे मला सांगते तसे?” मी विचारले.

“कारण... मी सांगितलेली गोष्ट त्यांना पटणार नाही म्हणून...”

“का???”

“कारण माणसाला कोणतीही गोष्ट पटण्यासाठी तसा अनुभव यावा लागतो. अनुभवानेच कोणतीही गोष्ट पटू शकते. अनुभव नसेल तर बरोबर गोष्टही चुकीची वाटू शकते.” तिने उत्तर दिले.

“म्हणजे?”

“म्हणजे माणसाला एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल तर त्या जोडीला एखादी त्याच्याशी मिळतीजुळती घटना सांगावी लागते. तरच तो विश्वास ठेवतो. आणि मावशींच्या मनात जातीभेदाचे विचार अनेक वर्षांपासून घट्ट पाय रोवून आहेत.”

“हं... म्हणजे जुने विचार बदलता येत नाहीत तर?” आपल्याला खूप समजले आहे अशा अविर्भावात मी म्हटले आणि माझ्या त्या चेहऱ्याकडे पाहून तिला हसू आले.

“असे काही नाही. जुने विचार बदलणे अवघड असले तरीही अशक्य नसते.” तिने म्हटले.

“कसे काय?”

“थांब... तुला आपल्याच घरातली गोष्ट सांगते.” तिने म्हटले आणि मी कान टवकारले.

“जशा शेजारच्या मावशी जुन्या विचारांच्या आहेत तसेच आप्पा ( माझे आजोबा ) देखील जुन्या वळणाचे होते. जरी ते शिवाशिव पाळत नसले तरीही आपल्या मुलांनी जातीतल्या मुलीशीच लग्न करावे असे त्यांना वाटायचे. पण वसंता मात्र जातपात न मानणारा. त्यामुळे त्याने ज्यावेळी लग्न करायचे ठरवले त्यावेळी आप्पांनी माझ्याजवळ विषय काढला.”

--------------------------------------

“बेबी... तू ऐकलेस का? वसंता लग्न करतोय...” आप्पांनी सुरुवात केली.

“हो... नुसते ऐकले नाही तर मी अलकाला भेटलेही आहे.” मी म्हटले.

“पण... ती म्हणे इतर जातीची आहे.”

“हो... मला माहित आहे.” मी उत्तर दिले.

“पण... आपल्या चालीरीती काय आहेत... ती सगळ्यांना सांभाळून घेईल की नाही हे नको त्याने पहायला?” त्यांनी त्यांचे म्हणने मांडले.

“आप्पा... ते सगळे वसंताने व्यवस्थित पाहिले आहे. आणि मी तिला भेटले तर ती स्वभावाने मलाही आवडली.”

“अगं पण... ती माणसे कशी असतील? एकतर आपल्या जातीचीही नाहीत ती...” आप्पांचे टुमणे चालूच होते.

“आप्पा... माझे लग्न तुम्ही जातीतच लावून दिले ना? सगळा तपास तुम्हीच केला होता ना? आणि नंतर मला काय त्रास झाला हे काय तुमच्यापासून लपून थोडेच राहिले आहे?” मी म्हटले मात्र आणि आप्पांना पुढे काहीच बोलता आले नाही.

“अहो... माणूस चांगला किंवा वाईट, त्याच्या वर्तनाने ठरतो, जातीने नाही. आपल्याच लोकांनी मला तडकाफडकी शाळेतून काढले, त्यावेळी जात पाहिली होती का त्यांनी? किंवा मला सासुरवास करताना माझ्या सासरच्या लोकांनी तरी कुठे जात पाहिली? मंडळाच्या दृष्टीने मी फक्त कर्मचारी होते आणि सासरच्या लोकांसाठी सून. जातपात या गोष्टी फक्त इतरांना सांगण्यासाठी ठीक असतात.” मी हे बोलून गेले त्यावेळी आप्पांचा चेहरा काहीसा पडला होता. शेवटी मलाच वाटले की मी जरा जास्तच बोलून गेले. त्यानंतर बराच वेळ आम्ही दोघेही गप्पं होतो. पण त्यानंतर आप्पांनीही परवानगी दिली.

------------------------------------------

आईने सांगितलेली ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती.

“म्हणजे अलका मामी आपल्या जातीची नाहीये?” मी पुढचा प्रश्न विचारला.

“इतक्या वेळा तू तिथे राहतोस... तुला कधी ही गोष्ट समजली?” आईने प्रतिप्रश्न केला.

“नाही... कधीच नाही... आणि आप्पाही तिथेच राहतात...” मी म्हटले.

“तेच तुला सांगते आहे. जात ही गोष्ट एकतर शाळेच्या दाखल्यावर असते किंवा लोकांच्या मनात. जुन्या विचारांचे असूनही शेवटी आप्पांनाही ही गोष्ट समजली आणि आता तीच तुही समजून घे. माणूस मोठा त्याच्या कर्तुत्वाने बनतो... जातीने नाही. आणि तसेच वाईट त्याची वर्तणूक असते... जात नाही.” आईने सांगितले आणि हे वाक्य माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले.

तीच अलका मामी आज माझी गुरु आहे. आई तर आता नाहीये, पण आईची जागा अलका मामीने पूर्णपणे घेतली आहे.

--- मिलिंद जोशी, नाशिक...