भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १६) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १६)

आकाश अजूनही त्या शेकोटीजवळ बसला होता. " कोण आहोत आपण... कधीच काढून टाकला होता मनातून हा प्रश्न... या सर्वामुळे पुन्हा आला समोर... कोण असतील माझी माणसं, कुठे असतील.. काय नातं असेल पावसाचं आणि माझं... " माझा गणू ", ... माझाच आहे कि कोणा दुसऱ्याचा... आणि तो चेहरा, सतत आठवण्याचा प्रयन्त करतो मी.. कोण असेल ती, काय अस्तित्व असेल माझं.. " स्वतःशीच विचार करत होता आकाश. दूरवर नजर गेली त्याची. या डोंगरावरच्या मिट्ट काळोखात आग दूरवर दिसत होती. कुठेतरी दूर डोंगरावर अशीच कोणीतरी आग पेटवली असावी. हे दोन डोंगर एकमेकांपासून खूप दूर होते. या दोघामध्ये पसरलं होतं विस्तीर्ण जंगल... गावे आणि एक मोठी नदी... दोन्ही बाजूला , दोन वेगळ्या दिशांना दोन डोंगर...फक्त काळोखामुळे आकाशला ती शेकोटी, धूसर तरी दिसत होती. काय माहित , कोणीतरी असेल माझ्यासारखाचं... भटक्या... त्यालाही झोप येतं नसेल.. कोणाला तरी शोधतं असेल... त्याचीही जवळची माणसं हरवली असतील का.. कि कोणी आपल्या माणसाला शोधायला आली असतील... आकाश स्वतःशीच हसला...... गणू... त्याला तरी भेटू दे त्याची माणसं... आकाशने आभाळाकडे पाहत हात जोडले. शेकोटी विझवली. पाऊस तर नव्हता , आजची रात्र कोरडीच असेल... अंदाज.... बसल्या जागीच जमिनीवर अंग टेकलं त्याने... थोड्याश्या धूसर आठवणी, तो चेहरा आणि ताऱ्यांनी भरलेलं आभाळ, बघत तसाच पडून राहिला.

===========================================================================================

आकाशच्या आवाजाने सईची झोपमोड झाली. " ओ मॅडम, उठा लवकर.. जायचे आहे ना फोटोग्राफी साठी.. " सई तंबूमध्ये झोपलेली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे ६:३० वाजले होते. काल मुद्दाम , आकाश बोलला म्हणून तिने मोबाईलमध्ये ७ चा अलार्म लावला होता. तर हा आला ६:३० लाच... तरी तो हाका मारतो आहे म्हणून बाहेर आली सई. " इतक्या लवकर... ७ वाजता निघू ना... बाकीचेही झोपेत असतील." सई डोळे चोळत म्हणाली.
" उद्या पुन्हा येणार आहात का इथे... " ,
" का ? " ,
" कारण आता जे दिसेल ना... ते पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळीच पुन्हा यावे लागेल. तुम्हाला फोटो पाहिजे होते म्हणून जागे केलं. झोपा तुम्ही... " आकाशने पाठीवरली सॅक खाली ठेवली.
" नको नको.... थांब... मी बाकीच्यांना जागं करते. " सईने पटापट बाकी ग्रुपला जागं केलं. काय वैताग आहे, असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर. एकंदरीत , हा माणूस वेडा आहे.. आणि तो आपल्याला हि तसंच समजतो , असं वाटू लागलं होते या ५-६ जणांना.


" माझ्या मागोमाग चला फक्त, ते tent वगैरे राहूदे इथेच. फोटो काढून झाले कि परत येऊच... " आकाश.
" किसीने सामान ले लिया तो ? " एकीने प्रश्न केला.
" इथे कोण येणार आहे.. तोही यावेळेस.... चला.. "
आकाशवर एव्हाना सर्वांचा विश्वास बसला होता. तो निघाला तसे बाकी निमूटपणे त्याच्या मागोमाग निघाले.
" जास्त दूर नाही आहे. इथे जवळच एक पडका किल्ला आहे.. तिथेच जातो आहोत आपण . " आकाश पुन्हा एकटाच बडबड करत होता.


समोरचं काही दिसतं नव्हतं. पाऊस नसल्याने सर्वत्र धुकं पसरलं होतं. त्यात धुकं कोणतं आणि ढग कोणते, काहीच कळत नव्हतं. आकाश चालत होता म्हणून आपण चालायचं , हेच माहित सर्वांना. १५-२० मिनिटांनी अशीच एक " चढाई " करून झाल्यावर , आकाश एका ठिकाणी थांबला. त्याच्यामागे हे सर्व. " what happens... ? " मागून एकाचा प्रश्न आला. आकाशने वळून पाहिलं सर्वांकडे. " पायाखाली बघितलं का.. ? " आतापर्यंत सर्वच आकाशच्या पाठीकडे बघत वर आलेले. त्याने सांगितल्याबरोबर सगळ्यांनी खाली बघितलं.


सूर्योदय होतं होता. त्याचा काही प्रकाश त्याच्या आधीच पुढे आला होता. त्यामुळे थोडं अंधुक दिसतं होते. पायाखाली.... ढग होते त्यांच्या. विसाव्याला आले असावेत.सर्वच ठिकाणी पांढरा धूर असावा , असच काहीसं. कोणालाही कळेना काय होते नक्की... " what is this... " आणखी एक प्रश्न. " माहित नाही... कदाचित ढग असतील... असंच असते इथे पहाटेला ... याच वेळेस... रोज.. पण या साठी नाही आणलं तुम्हाला... " आकाशने सर्वाना पुढे येण्यास सांगितलं.

त्या धुक्यात हरवलेल्या जमिनीवर , दबकत दबकत चालत सर्व पुढे गेले. अंधुक दिसतं होते. तुटलेले बुरुज दिसत होते. तिथेही न जाता , आकाशने एका जागी उभं राहायला सांगितलं. " सूर्य येईल थोड्यावेळाने ... तोपर्यंत कॅमेरे बंद करून ठेवले तरी चालतील हा... हे आजूबाजूचं अनुभवा... बघा किती छान वाटते ते.. " आकाशने बोलणं संपवलं आणि सर्व शांत झालं. आजूबाजूची सृष्टी, काय ते बोलत होती आता. समोर एक मोठी दरी दिसत होती. अस्पष्ट अशीच... त्यात एक मोठ्ठा धबधबा होता... नाही नाही... ते तर ढग होते. खाली प्रवास करत होते ते... अगदी डोंगरमाथ्यावरून पांढरा शुभ्र धबधबा कोसळावा , असंच वाटतं होते. यांच्या पायाखालून सुद्धा ते ढग खाली कोसळत होते. स्वर्गीय आनंद. त्यातून, खाली असलेल्या गावात पहाटेची भजनं, आरत्या... यांचा अस्पष्ठ आवाज कानास पडत होता. ते झालं कि वाऱ्याचा आवाज... मुद्धाम कानात घुसुन गुदगुल्या करत होता. वाराही आता छान वाहू लागला होता. पूर्वेला सूर्यदेवाचे आगमन कधीच झालं होतं. तरी या ढग- धुक्याच्या खेळाने ते जरा लांबवला होते. मग आले सूर्यदेव दर्शन देण्यासाठी. उजळू लागली डोंगराची शिखरे. जणू दोन्ही हात जोडून ते सूर्यदेवाला नमस्कार करत आहेत असं वाटतं होते. वाऱ्याने जोर पकडला तसं धुक्याचे लोट... कुठून कुठून येऊन त्यात मिसळू लागले. त्या तुटक्या बुरुजांना... त्या गडमाथ्याला कवेत घेऊ लागले. आता धुक्याचं सैन्य , सईच्या ग्रुपकडे झेपावलं. काही सेकंदांत त्या सर्वाना लपेटून टाकलं. गार गार सगळं. थंडी वाजत होती. त्या सोबतीला पाण्याचे थेंब... भिजून जायला होतं होते. शहारून गेले हे सर्व. तरी तो थंड वाऱ्याचा स्पर्श हवाहवासा वाटतं होता. हळूहळू सूर्याचा प्रभाव आणि वाऱ्याची सोबत , यापुढे धुक्याचं काही चाललं नाही. आवरतं घेतलं त्याने. धुकं आवरलं तशी पायथ्याखालील गावे दिसू लागली. झाडाझाडातून डोकावणारी कौलारू घरे. .. लालसर वाटा... आणि अशातच पक्षांचा एक मोठ्ठा थवा त्याच्या अगदी समोरून उडत गेला. काय तो अनुभव वर्णावा !! झोपून राहण्यापेक्षा .... असं काहीसं स्वर्गीय अनुभव मनात भरून ते त्यांच्या सामान असलेल्या ठिकाणी आले पुन्हा. अद्भुत आहे हा प्राणी.. हाच विचार सईच्या डोक्यात.


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: