भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २१) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २१)

थोडेच चालले असतील. सुप्रीचं लक्ष सहज वर आभाळात गेलं. वादळ येते आहे. सुप्रीच्या मनात आलं लगेच. त्यात नदीला पूर येण्याची शक्यता तिने मघाशीच सांगितली होती. " कोमल !! आता आपल्याला पटापट चालावे लागेल. पाऊस येतो आहे मोठा.. आणि जमलं तर एखाद्या उंच ठिकाणी जावे लागेल.. " सुप्रीने आता पर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणूनच कोमलने सुप्री बोलल्याप्रमाणे करायचं ठरवलं.


आकाशचा अंदाज बरोबर होता. तिथून पुढे एका डोंगरवजा ठिकाणी चढाई केली त्यांनी. विजेचा अस्पष्ट आवाज आला. आकाशचे लक्ष वेधलं त्याने. " बोललो होतो ना.. या गावातल्या लोकांचं कधीच चुकत नाही. " सर्व जण वरती पाहू लागले. ढग वर आभाळात , एकमेकांभोवती गोल गोल फिरत होते. आणि आता वाराही वाहू लागला होता. त्यामुळे दाट धुकं आता विरळ होतं चालले होते. " पण tent कुठे लावायचे... वाराही आहे ना... " सई आकाशला थांबवत म्हणाली. " तंबू नको... राहणार नाहीत ते जोराच्या वाऱ्यात.. जास्त असते तर काही प्रयत्न केला असता. आपल्याकडे मोजून ६ तंबू आहेत... त्यापेक्षा एखादी गुहा... वगैरे असेल तर बघा सगळ्यांनी... तिथेच थांबू " सईने बाकी ग्रुपला समजावलं आणि सगळे लागले कामाला.


============================================================


" कधी कधी ' पहाट ' आळसावलेली असते. तिला झोपेतून बाहेर यायचे नसते, धुक्याची चादर अंगावर लपेटून घेते मग..... पुन्हा पुन्हा .....समोरचं काही दाखवत नाही आणि तिच्या सोबतीला आपल्याला हि ओढून घेते धुक्यात... नदीचे काठ , मग आवाज देऊ लागतात.... दूर व्हा !! दूर व्हा !! ... वाटा हरवून जातात आणि वारासुद्धा वैरी वाटू लागतो... तेव्हा समजून जायचे.. काळ्या ढगांची सेना येतं आहे... वादळाला घेऊन... "


आकाश बोलायचं असं... .. सुप्रीला आठवलं. वादळ येते आहे, याच्या खुणा त्याने अश्या सांगितल्या होत्या सुप्रीला. हे सर्व सुखरूप होते... पण नाही... आकाशने सांगितलं होते, असं वातावरण तयार झाले ना कि नदी पासून दूर राहायचं. वरच्या बाजूला, उंच ठिकाणी जायचे. सुप्री अशीच एक जागा बघत होती.


" या बाजूला उगाच आलो... त्या बाजूला उंच जागा तरी होती. " सुप्री बोलत होती.
" मग आता जाऊया का पुन्हा मागे.. " एकीने विचारलं.
" नको... आता तेवढा वेळही नाही आहे... पुढे गावात पोहोचायला ही वेळ लागेल... " बोलता बोलता सुप्रीच लक्ष एका ठिकाणी गेलं. " तिथे .... वर जाऊया... " सुप्रीने बोट दाखवलं.
" आता वर कशाला.. " अमोल वैतागला.
" नदीला पूर येतो.... वादळात, आणि आताही नदीचं पाणी वाढले आहे... पाण्यापासून दूर रहावे अश्यावेळी... आकाशने सांगितलं आहे असं.. " सुप्री पुन्हा अजाणतेपणी बोलून गेली. आणि झपझप पावलं टाकतं पुढे गेली. " आकाश ? " हे नावं आताच २ वेळेला ऐकलं मी... आपल्या ऑफिस मध्ये तर कोणी नाही आकाश नावाचा... मग कोण... विचार करतच अमोल चालू लागला.


सुप्रीने बरोबर जागा निवडली. नदीपासून दूर आणि बऱ्यापैकी वर होती. सपाट जागा..... आजूबाजूला झाडे नाहीत ... होती ती खूप दूर होती. एका बाजूला मोठा कातळ ( खडक ) त्यामुळे जोराची हवा अडली जाणार होती. राहिला प्रश्न तंबूचा.. तर सुप्रीच्या लक्षात होते, एकदा असाच प्रसंग होता. जोराचा वारा वाहत होता. पाऊसहि येणार होता. संशक्षण हवेच म्हणून आकाशने सांगितलं " सर्वच तंबूंची गोलाकार रचना करावी, एकमेकांना चिटकून... आणि त्यांची तोंडे (दरवाजे ) आतल्या बाजूला करावीत , म्हणजेच सर्वच तंबू जोराच्या वाऱ्यापासून सुरक्षित राहतील. " सुप्रीने तसंच सांगितलं आणि सगळे कामाला लागले.


========================================================


" उधर एक जगा है.. हम सब रह सकते है उधर ... " सईच्या मित्राने एक जागा शोधली होती. एक लहानशा भोगदा म्हणावा अशीच जागा होती ती. छान वाटली आकाशला.. " थांबू इथेच.. " आकाशने त्याची सॅक खाली ठेवली.
" तुम्ही सर्व आतमध्येच थांबा.. मी बाहेरचा आढावा घेतो... " आकाश निघाला.
" नको... तू पण थांब ना इथे... वादळ आहे ना बाहेर.. " सई घाबरत म्हणाली. आकाश हसला त्यावर...
" मी आहे इथेच .. " आकाश आला बाहेर.


========================================================


सर्व तंबू बांधून झालेले, सुप्रीने एक नजर टाकली त्यावर. सर्व ठीक आहे, असं मनात म्हणत ती त्यांच्यापासून जरा दूर आली. राहून राहून तिला वाटतं होते.... मघाशी जो ग्रुप शेजारून गेला... त्यात नक्की आकाश होता..... का माहीत नाही, पण तिला वाटतंच होतं. तो ग्रुप सुद्धा जास्त दूर गेला नसेल. उभ्या असलेल्या जागूनच ती दूरवर बघायचा प्रयन्त करत होती. काही अंतरावर मोठी होतं चाललेली नदी.. त्यापासून थोड्या अंतरावर, एक लहानसा तरी बऱ्यापैकी उंच असा डोंगर... त्यावरच ते गेले आहेत... असा अंदाज सुप्रीने लावला.


अमोलने आधीच तिला जाताना बघितले होते जाताना. तरी त्याचं लक्ष वर आभाळाकडे होते. पाऊस खूप वेळा बघितला होता त्याने. वादळाची पहिलीच वेळ त्याची. आभाळ फक्त काळं - काळं दिसतं होतं. घड्याळात बघितलं त्याने.. सकाळचे १० वाजत आलेले, तरी सूर्यदेव काही दिसतं नव्हते. वारा सुरु होताच. सगळीकडे अगदी निराशेचे वातावरण वाटतं होते. अमोलच्या मनात चलबिचल सुरु झाली. तरी सुप्री एकटीच गेलेली आहे... पाऊस कधीही सुरु होईल... म्हणून अमोल मागोमाग गेला.


===========================================================


आकाशला कळून चुकलं होतं. आजचा दिवस काही बरोबर नाही. दुपारचं जेवण सुद्धा कठीण आहे मिळणे, असंच वाटते. तो असाच चालत चालत आणखी बाहेर आला.खाली नजर टाकली तर पलीकडे त्याला गोलाकार तंबूंची रचना दिसली.. कुठे बघितलं आहे का हे मी.... पट्कन विचार आला त्याच्या मनात... नाहीच आठवलं... कोण आहेत हि माणसं... कोणी दिसते का बघू लागला... आणि जोरात वीज कडाडली.


============================================================

अमोल चालता चालता जागीच थांबला. actually, घाबरला. सुप्रीने अमोलला येताना बघितलं.
" तुम्ही का आलात... पाऊस येईल कधीही... " ,
"अरे !! तू एकटी आलीस... तुझी काळजी मी घेणार नाही तर कोण घेणार.. " अमोल सुप्रीच्या समोर येऊन उभा राहिला.
" तुम्ही जा आधी... इथे नका थांबू... " सुप्री जरा त्रासिक आवाजात बोलली.
" तू पण चल ना.. तुझ्याशिवाय नाही जाणार... " सुप्रीच्या मनात आधीच घालमेल सुरु होती.त्यात अमोल. चिडचिड झाली तिची.
" अमोल सर.... का करताय असं.. नाही आवडत मला... " अमोलला हे नवीन होतं.
" तुझी काळजी... " ...
" नका करू काळजी... प्लिज !!! " सुप्रीने त्याच वाक्य मधेच तोडलं. अमोल तिच्याकडे बघतच राहिला..... थोड्यावेळाने बोलला.
" मी आधीच सांगणार होतो... तू मला खूप आधीपासून आवडतेस... तू येणार म्हणून मी या पिकनिक साठी तयार झालो. वाटलं हीच वेळ आहे तुला जाणून घेण्याची... म्हणून सतत तुझ्या सोबत आहे. चांगली वेळ बघून तुला propose..... " ,
" थांबा अमोल सर... " सुप्रीने पुन्हा त्याचं वाक्य तोडलं. त्याचबरोबर आभाळात आणखी एक वीज चमकून गेली.
" पुढे काय बोलणार होता ते माहित आहे मला... मला नाही बोलायचं या विषयावर... " सुप्री आणखी त्रासिक झाली.
" पण उत्तर दे ना.. मी आवडत नाही का तुला... सांग ? " ,
" तसं नाही... पण... " ,
" पण काय... " ,
" कारण माझं प्रेम आहे कोणावर तरी... खूप प्रेम... " सुप्री बोलत होती. सोसाट्याचा वारा सुरु झालेला, आभाळात विजा नाचत होत्या नुसत्या...


========================================================


आकाशचं लक्ष... त्या तंबूपासुन थोडं दूर गेलं. दोन व्यक्ती तिथे उभ्या दिसल्या. एक मुलगा आणि एक मुलगी... एकमेकासमोर उभे... चेहरे काय दिसणार एवढ्या दुरून... वादळात काय करतात हे दोघे... वारा इतका जोरात वाहत होता ना वरती.. पहिल्यांदा त्याला त्याच्या मोठ्या , वाढलेल्या केसांचा त्रास होतं होता... सारखे त्याच्या डोळ्यासमोर येतं होते. तरी आकाश त्यांना बघत होता. संध्याकाळ व्हावी इतका काळोख... त्यांना आधीच त्या तंबूंमध्ये जायला हवे. आकाश अजूनही त्या दोघांकडे बघत होता.



---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: