१९
पहिले पत्र
एके दिवशी सकाळी उठलो तर फॅक्स आलेला.. चांद्रभारत सरकारचा. बाॅम्बच म्हणाना. तो ही माझ्या नावाने. इकडची सरकारी व्यवस्था थोडी वेगळी. त्यामुळे पत्र आलेले ते अगदी डिटेलमध्ये. पृथ्वीवरच्या सरकारांची पत्रे सरकारी भाषेत नि अगदी मोजक्या शब्दांत येतात. हे पत्र आपल्याकडे असते तर..
प्रति,
श्री. अंबर श्रीराम राजपूत,
विषय:
पृथ्वीवर परत पाठवणे बाबत
चांद्रभारत सरकारच्या आदेशानुसार आपणांस सरकार विरोधी कारवायांना अनुलक्षून आपणांस पृथ्वीवर परत का पाठवणेत येऊ नये या संबंधात सक्षम अधिकारी यांचेसमोर वरील पत्राचे दिनांकापासून दहा दिवसांत उत्तर देणेचे निर्देश वरील सरकार देत आहे. याची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास आपणास पृथ्वीवर परत पाठवणेचे आदेश सक्षम अधिकारी यांचेकडून तातडीने देणेत येतील.
असे काही असते ते. पण इकडे सगळे मोकळे ढाकळे. त्यात आदेश वरचाच होता पण त्यामागची कारणे होती.. इतरही काही विवेचन होते. एकूण सरकारी पत्र कसे नसावे याचा नमुना होता तो.
त्याचा मूळ मजकूर इंग्रजीत होता..
आमच्या सरकारी गुप्तचत विभागातून आलेल्या अहवाला नुसार :
१. श्री. अंबर श्रीराम राजपूत, मूळ पृथ्वी निवासी, येथील चांद्रभारत देशात सध्या स्थायिक, यांच्या दैनंदिन हालचाली संशयास्पद आढळून आल्या आहेत. वरील व्यक्ती व परग्रहावरून चांद्रभारत देशात स्थानिक एका तरूणी वरचेवर दिसत असतात व भेटत असतात असे आम्हाला आढळून आलेले आहे.
२. सदर तरूणी श्रीम. ब्रुनी बर्नेटो ह्या मूळ टायटन वासिनी असून इंडो टायटन राजनैतिक वाटाघाटींनुसार चांद्रभारत देशात अस्थायी स्वरूपात वास्तव्य करून आहेत. त्यांचे श्री. अंबर श्रीराम राजपूत यांच्याशी मधुर संबंध असल्याचे आढळून आले आहे.
३. सदर संबंधांचे वैवाहिक संबंधात रूपांतर होणार असल्याची खात्रीलायक माहिती सदर कार्यालयाकडे आहे. परग्रहवासियांनी इकडील कुणाशी असे संबंध जोडणे हा इंडोटायटन राजनैतिक संबंधातील अलिखित आचारसंहितेचा भंग आहे. सदर संहिता अलिखित असून अशी कुठलीही घटना घडण्याची पूर्व कल्पना चांद्रभारत सरकारने केली नसल्याने त्या बाबीची नोंद नाही. परंतु पूर्वलक्षी आदेश व निर्देशांनुसार ही नोंद करण्यात येत आहे. तेव्हा श्री. अंबर श्रीराम राजपूत यांनी या आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळून आले आहे.
४. टायटन आणि इतरही काही परग्रहवासी संस्कृती पृथ्वीवर येण्यास उत्सुक असल्याचे पृथ्वीवरील विविध देशांच्या ध्यानात आले आहे. त्यांच्या पृथ्वी प्रवेशास सगळ्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी समुदायाने सदोदित विरोध केलेला आहे. चांद्रभारत व इतर चांद्रदेशियांनी याबाबत उदार धोरण ठेवत त्या संस्कृतींशी संबंध ठेवला आहे. असे असले तरी चंद्रावरील विविध सरकारे व देश यांची धोरणे पृथ्वीवरील देशांच्या धोरणाधीन असतात. आपल्या ह्या प्रकरणाचा सविस्तर उहापोह पृथ्वीवरील सरकारशी करण्यात आलेला आहे.
५. परग्रहवासी संस्कृती पृथ्वीवर येऊन येथील भूभाग व संस्कृती यांच्यावर कबजा करण्याची शक्यता आहे. हे मत पृथ्वीवरील बहुतांश देशांच्या सरकारांचे आहे. त्यामुळे आपला टायटनवासीशी संबंध हा आंतरग्रहीय कटाचा एक भाग असल्याचा निष्कर्ष आमच्या सरकारांनी काढला असून इतर पृथ्वीवरील देशांचे त्यास अनुमोदन आहे. त्या अनुषंगाने चांद्रभारत सरकारचे मत असे झाले आहे की टायटनवासी श्रीम.ब्रुनी बर्नेटो यांच्यासोबत पुढे संबंध वाढवणे हे पृथ्वी संस्कृतीस घातक पाऊल ठरेल. श्री. अंबर श्रीराम राजपूत यांचा वापर करून पुढेमागे पृथ्वीवर पाऊल टाकण्याचा टायटनवासियांचा डाव मुळापासूनच मोडून काढण्याचे निर्देश या सरकारने दिलेले आहेत.
६. त्या अनुषंगाने तत्संबंधीची माहिती टायटनवरील दूतावासास देण्यात आली आहे. श्रीम.ब्रुनी बर्नेटो यांच्याबद्दल कारवाईचे निर्देश सदर दूतावासाने द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे.
७. वरील कारवाईस अनुलक्षून श्री.अंबर श्रीराम राजपूत यांस तातडीने पृथ्वीवर रवाना का करू नये अशी कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येत आहे.
८. या करिता त्यांस दहा दिवसांची मुदत देण्यात येत असून सदर वेळात त्यांच्यावर चांद्रभारत गुप्तचर विभाग सक्त लक्ष ठेवून असेल. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांची रवानगी तातडीने पृथ्वीवर करण्यात येईल. सदर वेळेत त्यांनी चांद्रभारत सरकार समोर उपस्थित रहाणे गरजेचे आहे.
९. या पत्राची प्रत टायटन दूतावासात पाठवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
पत्र हाती पडले नि माझ्या तोंडचे पाणी पळाले. बाबांना वाटणारी भीती खरीच होती. राॅबिनलाही अंदाज आलेला त्याचा. त्या चांद्रभारत सरकारच्या नोटिशीला काय उत्तर देणार होतो मी? पृथ्वीवर साध्या आंतरराष्ट्रीय लग्नांनाही असे युद्धाचे स्वरूप येऊ शकते.. तर हे अांतरग्रहीय विवाह कसे व्हावेत?
मी पत्र वाचेतोवर बाबा बाहेर आलेले. माझ्या चेहऱ्याकडे पाहात म्हणाले, "काय झाले रे?"
त्यांच्या हाती पत्र दिले मी.. वाचून म्हणाले, "याचीच भीती होती मला. यातून मार्ग निघणे कठीण. कारण मुद्दा फक्त आपल्याच सरकारचा नसून संपूर्ण पृथ्वीवरील देशांचा आहे. काय होईल कुणास ठाऊक.."
"पण मी चंद्रावरच राहिलो तर?"
"तरी पण हा इंडियन मून आपल्या देशाचाच एक भाग आहे.. त्यांना मूळ सरकारी आदेश बंधनकारकच राहिल.."
ब्रुनीला फोन लावला मी.
ती नेहमीसारखीच बोलत होती. म्हटले, "अर्जंट भेटायचेय तुला."
थोड्याच वेळात ती आली माझ्या आॅफिसात. माझ्या रंग उडालेल्या चेहऱ्याकडे पाहात ती म्हणाली,
"काय झाले रे?"
तिच्या हाती ते पत्र देत मी गप्प बसून राहिलो..
तिने वाचले ते नि म्हणाली, "यात टेन्शन घेण्यासारखे काय आहे?"
"म्हणजे यात काहीच नाही?"
"तसे नाही रे, माझ्या मनात असले काहीच नाही. नि आमच्या टायटनवरच्या लोकांच्याही. आणि आपले प्रेम खरे असेल तर आम्ही टायटनवासी हेच मानतो.. खऱ्या गोष्टींना कधीच मागे वळून पाहावे लागत नाही.."
"म्हणजे सत्यमेव जयते?"
"होय. आमचा ठाम विश्वास आहे त्यावर. त्यामुळे आपल्याला भिण्याचे कारण नाही .."
"पण दहा दिवसांत त्यांनी मला पाठवून दिले तर?"
"तर ना? असे काहीच होणार नाही. आणि झालेच तर मी असेन तुझ्याबरोबरच.."
"म्हणजे आपण आताच लग्न करून टाकायचे?"
"नाही, अंबर चोरून लपून करतात तो गुन्हा. आपण काहीच चुकीचे केले नसताना भ्यायचे कशाला?"
"तू म्हणतेस ते ठीक आहे गं.. पण आमच्या पृथ्वीवर असेच होते असे नाही. सत्यमेव जयते आमचे पण बोधवाक्य आहे पण त्यातून हवा तोच बोध घेतला जाईल नेहमीच असे नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांबद्दल काळजी वाटते मला.."
"नो टेन्शन अंबर. फक्त एक सांग.. यू अार शुअरली विथ मी नो?"
"आॅफकोर्स डियर. एनी टाईम.. एनी पार्ट अाॅफ द वर्ल्ड .. आय कान्ट इमॅजिन लाइफ विदाऊट यू.."
"ओके देन..काहीना काही होणारच.. आणि चांगलेच होणार .. आय हॅव डीप फेथ इन वन्स बिइंग राईट आॅर राँग. आपले बरोबर असेल तर शेवटी आपलीच जीत होणार .."
"हो ब्रुनी .. पण तू पृथ्वी पाहिली नाहीस ना म्हणून म्हणतेस असे.. वुई ह्युमन्स आर नाॅट नेसेसरीली आॅलवेज विथ ट्रूथ.. आम्हाला सोयीचे ठरेल ते नि तसे सत्य असते आमच्यासाठी.. तुला सांगू आता पृथ्वीवर काय सुरू असेल?"
"काय?"
"वेगवेगळ्या जगातील चॅनेल्सवर टायटनकडून पृथ्वीवर ताबा मिळवण्याची योजना कशी आखली जात आहे याच्या बातम्या असणार. त्यात तू नि मी व्हिलन. मी तर जास्तच कारण मी पृथ्वीवासी. कोणत्या मोहाला भुललो मी आणि टायटनशी संबंध जोडतोय याच्याबद्दल छातीठोक माहिती देत असणार ते."
"तू म्हणतोस ते खरे असेलही. पण हॅव फेथ इन ट्रूथ.. इन लव्ह.. अँड मी अॅज वेल. यू अार टू प्रेशस फाॅर मी टू लूज.. अँड टेक इट फ्राॅम मी, वुई विल आॅलवेज बी टुगेदर. मॅरेज इज जस्ट अ रिच्युअल अँड इट इजन्ट नीडेड टू एन्डाॅर्स धिस डियर.."
"तू म्हणतेस म्हणून धीर आला मला. पण सांगू तू घरी येऊन गेलीस ना तेव्हापासूनच बाबा टेन्शन मध्ये आहेत. ते म्हणाले होते, दिसते तितके हे सहज सोपे नाही. आणि हे घडू देणे पृथ्वीवर कितीजणांच्या पचनी पडेल सांगणे कठीण आहे.. पण आय थिंक तुला डिप्लोमॅटिक अनुभव जास्त अाहे तर.."
"तसे नाही रे. आम्ही टायटनवासी असेच आहोत. जे सत्य ते सत्यच असते.. सो डोन्ट वरी.. आणि चल डियर. मी निघते."
"ओके.. बघूयात.."
ती निघाली तसे माझ्या लक्षात आले, बाहेर एक कोणी पाळत ठेवून होता आमच्यावर. तो तिच्या मागोमाग बाहेर पडला. जणू काही आम्ही मोठी चोरीच करणार होतो की दहशतवादी होतो!