कथा मोबाईलच्या रेंजची
आप्पासाहेब तशी गावातली मोठी आसामी. बरीच वर्षे धुरकट वाडीचे सरपंच पद सांभाळत होते. माणूस साधा भोळा पण मोठा कामाचा त्यामुळे गावाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास. आप्पासाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा. त्यांचा शब्द म्हणजे एक प्रकारची देववाणीच होती. धुरकट वाडीचा जो काही विकास झाला त्याचे समध श्रेय आप्पासाहेबांना दिल जायचं. गावात रस्त्याचा व खड्ड्याचा मेळ कधीच लागला नव्हता. गावातली माणसं एका सरळ रेषेत कधी चालताना दिसतच न्हवती. जो तो एकदा हिकडं एकदा तिकडं हेलकावे खातच चालत होता. बाया, बापय, म्हातारी, कोतारी, तरणी समध्यांची आवस्था एक सारखीच होती. त्यामुळे सारा गाव वैतागला होता. आप्पासाहेबांनी मनावर घेतलं अन गावातील रस्ते अगदी तालुक्यापर्यंत गुळगुळीत करून टाकले. एखादा गावातन स्केटींग करत गेला तरी कपड्यांची इस्त्री न मोडता तालुक्याला पोहचला पाहिजे. असा सारा मामला झाला होता. गावात शुद्धीकरण योजनेतून पाणी आलं. गावात मर्क्युरी दिवे बसवले गेल्याने गावचा चेहरा एखाद्या सुंदर बाईगत उजळून निघाला होता. गावाच्या मध्यभागीच पंचायतीचे कार्यालय झाले. त्याला जोडूनच एका टपरित चहा, वडा पाव आला. जवळच एक भल मोठं वडाच झाड होत. त्याच्या भोवती पार होता. आप्पासाहेबांनी पाराच बांधकाम करून घेतलं होतं. झाडाच्या चहूबाजुनी कट्टा झाल्यानं गावातल्या रिकामटेकड्या मंडळींची गप्पांची मैफल रंगण्यासाठी चांगलीच सोय झाली होती.
सकाळ संध्याकाळ वडापाव खात खात गप्पा रंगत होत्या. आप्पासाहेब गावासाठी एवढं झटत्यात म्हटल्यावर त्यांना कोण विरोध करणार. गावचा उंबरा तसा काही मोठा न्हवता. जेमतेम पन्नास साठ घरे होती. गावाचं रुपडं मात्र पालटून गेलं होतं. एक दिवस गावात चमत्कारच झाला. समद्या मोबाईल कंपन्यांनी गावात मोबाइलची क्रांतीच करण्याचा विडा उचलला होता. गावात पाटलाच एक पुढारलेल घर होत. पाटलाच पोरग बी नुसतं चकाट्या पिटत होत. त्याच्या बान त्याला मोबाइलच दुकान टाकून दिल. आप्पासाहेबांच्या हस्ते उदघाटन झालं. समद्या घरानी आपापल्या ऐपतीप्रमाणे मोबाईल विकत घेतले. सार गाव मोबाईलमय झालं. साऱ्यांच्या हातात मोबाईल संच दिसू लागले. प्रत्येकानं आपापल्या आवडीचा रिंगटोन निवडला. सरपंच जरा भोळ्या स्वभावच व धार्मिक होत. त्यांन आपला “ सुखकर्ता दुखहर्ता” हा रिंगटोन घेतला. 90 वर्षाच्या रखमान आयुष्यभर संसार केला. संसारात कधी कुणाचे ओझे मानले नाही. तीन आपला “ कुणाच्या खांद्यावर कुणाचे हे ओझे” हा रिंगटोन घेतला. गावात एक इरसाल म्हातार होत. त्यांन,” कुण्या गावाचं आलं पाखरू” हे गाणे रिंगटोन म्हणून स्वीकारलं. गावात प्रेम प्रकरणातून लग्न झालेली मास्तर मास्तरीन होती. त्यांनी आपलं,” तू मेरा जानू है, अपने प्रेम कहानिका तू हिरो है” हा रिंग टोन निवडला. तरुण पोरा पोरींनी त्यांच्या त्यांच्या आवडीचे रिंगटोन घेतलं. रिंगटोन वरून कोणाचा फोन वाजतोय हे कळण्याइतपत वातावरण तयार झालं होतं.
गावातलं समध मोबाईलधारक आता मोबाईलवर बोलण्यास सज्ज झाल होत. सकाळीच वडाच्या झाडाच्या पारावर ग्रामपंचायती जवळ झाडून सारेजण जमा झाले. बहुतेकांच्या हातात मोबाईल होता. पण त्यांच दुर्दैव अस की एका बी मोबाईलला रेंज न्हवती. समद्या गावाचा विरस झाला. जो तो एकमेकांच्या मोबाईलवर डोकावून रेंज आहे का नाही ते पहात होता. साऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.
पंचायतीचे शिपाई नामदेव लईच हुशार होत. त्यांन समध्याना सांगितलं की उंचावर गेल्याबिगार रेंज काय येणार नाही. जो तो विचार करू लागला आता काय करायचं? तेवढ्यात नामदेवला एक युक्ती सुचली. त्यांन गावातल्या समद्या तरण्या पोरांना गोळा केलं अन दहीहंडी फोडण्यासाठी जसे मानवी मजले रचतात तसे करण्यास सांगितले. पोर तयार झाली मात्र एक पण बहाद्दूराने आपल्या हातातला मोबाईल सोडला नाही. एक, दोन, तीन, तब्बल चार मजले तयार झाले. नामदेव एकेक मजला पार करत वर चढू लागला. तो शेवटच्या मजल्यावर पोहचला अन त्याच्या हातातील मोबाईलवर दोन काड्या दिसल्या. आपण चौथ्या मजल्यावर आहोत याच त्याला भानच राहिलं नाही. ते आनंदाने नाचायला लागलं. त्याच्या ओझ्याने समदी खाली पडली. कुणाला लागलं तर कुणाचं मोबाईल फुटलं. ज्याचे मोबाईल बंद पडले ती आता नामदेवला धुवून काढायला पुढे सरसावली. सरपंच आप्पासाहेबांन मध्यस्थी केली. मोबाईल हँडसेटला दोन वर्षांची गॅरंटी होती त्यामुळे ते बदलून देण्याचे पाटलाच्या पोरांनं मान्य केले.
गाव जरी खोलात असलं तरी उंचावर गेल्यावर रेंज येते यावर आता सर्वांचा विश्वास बसला. दुपारी ऊन जरा खाली झाल्यावर पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरले. समदी मंडळी घरला गेली. जेवण करून डुलकी काढून चारच्या ठोक्याला पुन्हा हजर झाली. नामदेवाने सरपंचाला आता आणखी एक नामी युक्ती सांगितली. वडाच्या झाडावर रेंज येते का हे पहाण्याचे ठरले. सरपंचाने एकट्या नामदेवला झाडावर चढण्याची परवानगी दिली. बाकी सारी मंडळी झाडाभोवती गोलाकार उभी राहिली. एका हातात मोबाईल घेऊन एका हाताने फांदीचा आधार घेत नामदेव वर चढू लागला. तो एकेक फांदी वर चढत जाईल तस खालन “ आली का रे? “ अस समदे विचारू लागली. नामदेव दुसऱ्या फांदीवर गेला अन म्हणाला,” आली रे आली एक रेघ आली “. तिसऱ्या फांदीवर दोन रेघा आल्या. चौथ्या फांदीवर तीन रेघा आल्या. पाचव्या फांदीवर फुल्ल रेंज आली तस त्यांन सरपंचाला झाडाच्या चौथ्या फांदीवर बोलवलं.
लोकांनी आनंद साजरा केला. शिट्ट्या वाजवल्या. सरपंच आप्पासाहेब अंगाने चांगला जाडजूड गडी होता. धोतरा तला गडी होता. त्यांन सुरवातीला झाडावर चढायला नकारच दिला पण गावच्या लोकांनी लईच आग्रह केल्याने तो तयार झाला. कसा तरी गडी दुसऱ्या फांदीपर्यंत गेला. नामदेव चौथ्या फांदीवर हा गडी दुसऱ्या फांदीवर, आता आली का पंचाईत? नामदेव खाली येईना सरपंच वर जाईना. बाकीचे समदे नुसतेच आ वासून बघत राहिले. अखेर नामदेवच खाली आला तवर चार कड्यातल्या दोनच काड्या शिल्लक राहिल्या. कसबस आप्पासाहेब मोबाईलवर बोलले अन समद्या गावानं टाळ्यांचा कडकडाट केला.
दोन चार दिवस निघून गेल. वडाच झाड आता मोबाईलचा टॉवर बनले होते. सकाळची दहा वाजण्याची वेळ होती. जो तो आपल्या कामाला निघून गेला होता. नामदेव पंचायतीत आला. झाडलोट केली पाणी भरून ठेवलं. पारावर तंबाखू चुना मळत एकटाच बसला होता. तेवढ्यात रखमा कमरेला हेलकावे देत आली. गावात हे एक इरसाल पाखरू होत. ही बया मूळची तमाशातील. गावातल्या एका पैलवनाच्या नादी लागलेली. त्याचा पण तिच्यावर चांगलाच जीव होता. काल पासून पैलवान कुस्ती खेळायला म्हणून गेला त्याचा अद्याप पत्ता न्हवता. ती मोबाईल घेऊन त्याच्याशी बोलायला आली होती. नामदेवला बघताच म्हणाली, “ बर झालं बाबा तू भेटलास. जरा आमचं हे ध्यान कोठ आहे बघ जरा?. कालपासन घराकडं आलं नाही”.
नामदेवाने तिच्याकडन मोबाईल घेतला झाडावर चढला. मोबाईलवर नंबर लावला तशी “ प्रथम तुला पाहता” ही रिंगटोन वाजली. त्यांन विचारले,” काय ग माझी गुलछडी”
नामदेव म्हणाला,” पैलवान भाऊ मी नामदेव” पैलवान म्हणाला,” काय रे नाम्या, मी घरात नसताना माझ्या बायकोबरोबर तू काय रे करतोस? थांब आलो की तुला दुमताच करतो. चल ठेव फोन” नामदेव कसा तरी झाडावरुन खाली उतरला मोबाईल तिच्या हातात दिला व त्याने तेथून पळ काढला.
पंचायतीच्या कार्यालयात येऊन सरपंचाची वाट पहात बसला. आज पंचायतीची बैठक होती. सरपंच, ग्रामसेवक, पंच मंडळी सारी जमायला सुरवात झाली. सरपंचाने एक नवा प्रस्ताव मांडला. मोबाईल रेंजमुळे आपल्या गावातील वडाच्या झाडाला लई किंमत आलीय. मला वाटते आता आपण मोबाईल रेंजसाठी झाडावर चढणाऱ्यावर नाममात्र कराची आकारणी करू या. तेवढेच ग्रामपंचायतीच उत्पन्न वाढलं. समद्या पंचांनी त्यास मान्यता दिली.
दुसऱ्या दिवशी वडाच्या झाडाच्या पारा जवळ ग्रामपंचायतीचा फलक लागला. सकाळी सात ते सायंकाळी सात या दरम्यान जो कोणी वडाच्या झाडावर चढेल त्याला दिवसाला दहा रुपये प्रवेशासाठी द्यावे लागतील. त्याची रीतसर पावती दिली जाईल. पावती असल्याशिवाय झाडावर कोणालाबी चढता येणार नाही. फलक वाचून जो तो सरपंचाच्या बुद्धीचे कौतुक करू लागला. त्या दिवसापासून नामदेवच्या कामात आणखी एका कामाची भर पडली. ते बिचार दोन्ही काम प्रामाणिकपणे करू लागलं. पंचायतीच्या गल्ल्यात दिवसेंदिवस भर पडू लागली. आठवडाभर चांगली मिळकत झाली. त्यानंतर मात्र गळती सुरू झाली. कुणालाबी कायबी कळना झालं. मात्र सरपंच डोकेबाज होत.
त्या दिवशी ते नामदेव बरोबर रात्री नऊ वाजता वडाच्या झाडाजवळ आलं. बघतो तो काय झाडाच्या समद्या फांद्या फुल्ल. पाय ठेवायला बी जागा न्हाय. ते नामदेवला म्हणाल,” कळलं का गल्ला कमी का झाला ते?” नामदेवाने मान हलवली. दिवसापेक्षा रातच्यालाच झाडावर चढण्यासाठी गर्दी होऊ लागली. सरपंचांन विचार केला आयला रातच्याला एखाद झाडावरुन पडून मेल बिल तर फुकटची झंझाट माग लागायची त्यापेक्षा उद्या तालुक्याला जाऊन मोबाईल टॉवर साठी काय करता येत का ते बघावं.
आप्पासाहेब सकाळी लवकर उठलं. नामदेवासह दोन तीन पंचाना बरोबर घेतलं. तालुक्याला जाऊन मोबाईल टॉवर ची परवानगी आणली. दोन दिवसात त्याची उभारणी केली. घराघरात रस्त्यावर मोबाईलला रेंज येऊ लागली. गावानं पुन्हा एकदा आप्पासाहेब यांच्यावर विश्वास व्यक्त केला. वडाच्या झाडानं मोकळा श्वास घेतला. मोबाईलला रेंज आली. आता रातच्याला झाडावर कोण बी चढना. सारी लफडी बी थांबली. जो तो आता ऐटीत मोबाईलवर बोलू लागला.
प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार, मोबाईल क्रमांक 9881157709