तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १० Vrushali द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १०

" परंतु तीच का... असे अजूनही लोक असतीलच ना ह्या जगात.. मी ही कधी ना कधी विरंगुळा म्हणून अशीच कल्पनाचित्र रंगवत बसतोच..." ओमने कधीपासून मनात ठसठसनारा प्रश्न विचारला.

त्याच्या प्रश्नावर गुरुजी फिकटसे हसले. कदाचित हा प्रश्न त्यांना अपेक्षित असावा. व तितक्याच शांतपणे उत्तरले. " ती म्हणजे.. शशिकलाचा पुनर्जन्म आहे.. "

" काहीही..." ओम इतक्या सगळ्या कथांवर विश्वास ठेवणारा नव्हता.

" हे खरंय ओम... माहितेय तुझा विश्वास बसणार नाही... मरण आपल्या शरीराला असतं.. आत्म्याला नाही.... " गुरुजींना माहित होत ओम सहजासहजी विश्वास ठेवणाऱ्यातील नाही आहे.

" माफ करा गुरुजी पण मी ही थिअरी मानत नाही." अत्यंत नम्र शब्दात तो उत्तरला. त्याला मनात मात्र आपल्या उत्तराने अनेक प्रश्न उठले. गुरुजींना वाईट वाटले तर... त्याची मान वर करून गुरुजींना पाहण्याची हिम्मत होत नव्हती. गुरुजींच्या बोलण्याची वाट पाहत तो तसाच मान खाली घालून बसला.

" तुमच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर काही गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित होतात ना. ह्या सगळ्या साखळीत कुठल्या ना कुठल्या नव्या जीवाची गुणसूत्र त्याच्या कोण्या पूर्वजाशी मिळतात व त्याची ठेवण व वागणूक बरीचशी त्या पुर्वजाशी मिळतीजुळती असते. आणि आपण म्हणतो आपला एखादा पूर्वज जन्माला आला.... बरोबर ना..." गुरुजींकडे विज्ञानी भाषेतही उत्तर होते.

" हो..." ओमने थोड्या संभ्रमित स्वरात उत्तर दिले.

" मी ही चांगला शिकलेला आहे म्हटलं.." ओमचा चेहरा पाहून गुरुजी पोट धरून हसू लागले. त्यांच्या हसण्याने त्यांची लांब दाढी मजेशीर उडत होती. " घर संसार आणि नोकरी सांभाळत ही जबाबदारी पार पाडत आलो आहे. कथेतल्या ऋषीमुनींसारख आयुष्यभर रानात राहून तपश्चर्या करणं नाही जमलं...."

" माफ करा..मी.." ओम पूर्णतः ओशाळून गेला. आता यापुढे काय बोलायचे हे त्याला काही सुचेना.

" बघ ओम... तुमची पिढी म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अश्या विचारसरणीची.. सगळ्याचे पुरावे हवे असतात. पण पुरावे नसतील तर ती गोष्ट नाहीच अस नसत ना... मन,भावना ह्या गोष्टींना दृष्य स्वरूप नाहीये पण आपण मानतोच ना की ते आहे...मग.... शास्त्रज्ञाना शोध लागायच्या आधीही बऱ्याच गोष्टी अस्तित्वात होत्या की... त्यांनी त्या फक्त शोधून काढल्या बनवल्या नाहीत.. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर आपण मानव केवळ एक टक्का जाणतो ह्या विश्र्वाबद्दल. उरलेलं नव्व्यांनव टक्के काय ते माहीतच नाही आपल्याला... एक ना एक दिवस कदाचित ह्या सगळ्याचे पुरावे सापडतील पण आपण तेव्हा कदाचित असू नसू... असो.."

" गुरुजी... शशिकलाचा पुनर्जन्म झाला म्हणून करालच्या शक्तींना काही ना काही कनेक्शन मिळालं पुन्हा परतायचं... ओके... पण करालने तर तिचा बदला घेतला पाहिजे ना..." ओमने अप्रत्यक्षरीत्या मान्य करून टाकलं.

" करालचा तिच्याशी सामना शेवटी झाला होता.. त्याने त्याच जन्मात तिचा जीव घेतला होता. त्यामुळे तो तिच्या मनाशी काहीच धागा जुळवू शकत नाही. जे कोणी येऊन तिच्याशी संबंध प्रस्थपित करतंय तो चांद्रहास आहे..." गुरुजींनी खुलासा केला.

" चांद्रहास... हा त्याच काय झालं... त्याचा कुठे उल्लेखच नाही आला..." ओमने आश्चर्याने विचारल.

" सगळ्या प्रकारात मुख्य भूमिका त्याचीच होती. सगळ काही त्यानेच घडवून आणलं. मात्र शेवटच्या प्रसंगी त्याच्याकडे कोणत्याच शक्ती नसल्याने त्याने बघ्याची भूमिका घेतली. अघोरी शक्तींकडून जसा कराल मारला गेला तसाच चांद्रहासदेखील मारला गेला..."

" आणि आता दोघे मिळून पुन्हा येतायत तेच सगळ करायला... ती फक्त माध्यम आहे. एकदा ते परत आले तर ह्या जन्मातही तिचा बदला घेतला जाईल का..?" ओमने शंका विचारली.

" कदाचित हो.. मागच्या वेळी त्यांच्या ऱ्हासाला तीच कारणीभूत ठरली होती. त्यांना पुन्हा कुठलाही धोका पत्करायचा नसेलच. म्हणूनच ती हे त्यांचं पहिलं लक्ष्य असेल..." गुरुजींच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली.

" तिला आधी वाचवलं पाहिजे गुरुजी..." ओम काळजीच्या स्वरूपात उद्गारला.

" हो आणि ते फक्त तूच करू शकतोस..." गुरुजींनी जणू मोठा रहस्यस्फोट केला.