अघटीत भाग ३
अशा रीतीने एकदा सगळ्या गोष्टी मार्गी लागू लागल्या .
प्रतिमा आणि तिचे कुटुंब पुण्यात आले आणि मग थोडे दिवस तिच्या नवर्याला ट्रेनिंग असल्याने तिची दोन मुले
आणि ती पद्मनाभ कडेच राहिली होती .
तिची मुले शाळेत जाणारी होती .त्यांचे पण शाळेतले दाखले व्हायचे होते .
मग काय ती दोघे आणि क्षिप्रा नुसता घरभर दंगा चालू होता .
पद्मनाभची आई लेकी सोबत अगदी खुष होती .
स्वयंपाकपाणी काहीच नसल्याने प्रतिमा पण खुष होती .
फक्त आई वहिनी सोबत गप्पा आणि अधून मधून गाडीतुन पुण्यात फिरणे ..
मस्त एन्जॉयमेंट चालली होती तिची .
नव्या कॉलेज मध्ये प्रवेश झाल्यापासून क्षिप्रा एकदम खुष होती
तशात या वर्षी अभ्यासाचे काहीच टेन्शन नव्हते .
मीनल आणि ती एकत्रच जात कॉलेजमध्ये पण नंतर मात्र क्षिप्रा खुप लवकर फ्री होत असे
आणि मग ती आपल्या इतर मैत्रिणी सोबत रमत गमत घरी येई .
मीनलची बारावी असल्याने ते तिचे महत्वाचे वर्ष होते त्यामुळे तिची लेक्चर्स जास्त वेळ चालत .
पद्मनाभ ने तिला सांगितले होते की कॉलेज सुटताच ड्रायवरला फोन करून गाडी बोलावून घे असे .
पण सध्या तरी ती रिक्षाने येणे पसंत करीत असे .
हळूहळू क्षिप्राच्या कॉलेज मध्ये ओळखी वाढू लागल्या .
त्या कॉलेज मध्ये बरीच अति श्रीमंत मुले मुली पण शिकत होती .
क्षिप्राच्या ओळखी मध्ये त्यातील काही सामील झाली आणि मग त्यांच्या एका मोठ्या ग्रुप मध्ये क्षिप्रा पण ओढली गेली .
क्षिप्राला नेहेमीच श्रीमंती मोठेपणा याचे आकर्षण असायचे .
शिवाय एकंदर अभ्यास करण्यापेक्षा मजा करणे उनाडक्या करणे इकडे तिचा कल जास्त होता .
आता या तिच्या नवीन ग्रुप मध्ये मुले जास्त आणि मुली कमी असे प्रमाण होते .
सर्वच बड्या बड्या घरची होती त्यातील काही तर आकरावी च्या वर्षात एक दोन वर्षे रेंगाळणारे होते
तसेच काही कॉलेज मध्ये नसताना सुद्धा बाहेरून त्यांच्या ग्रुप मध्ये सामील होती .
क्षिप्राचे नवीन शेड्युल आता सुरु झाले ,निवांत उठणे ,आवरणे आणि मग आणखी निवांत मित्र मैत्रिणीसोबत कोलेजला जाणे ..पहिले दोन तीन पिरीयड बंक करणे .
मग कशीतरी उपस्थिती लागली की तो सर्व ग्रुप बाहेर पडून रोज एखाद्या हॉटेलमध्ये गप्पा गोष्टी करीत असे मग कधीतरी दुपारनंतर ती घरी पोचत असे .
आता तिने सकाळी मीनल सोबत जाणे बंद केले होते .
एकदा सकाळी अचानक तिला पद्मनाभ ने विचारले सुद्धा ..
“अग कॉलेज नाही का तुला अजुन घरी कशी ?मीनल नाही का आली बोलवायला ..”
गडबडीने क्षिप्रा म्हाणाली ,”अरे बाबा मीनलचे माझे एकत्र जाणे आता जमत नाही .
आमचे वर्ग वेगळे आहेत आणि आता माझ्या मैत्रिणी पण वेगळ्या आहेत न “
गडबडीत असल्याने त्यावर पद्मनाभ काहीच न बोलता निघून गेला होता .
शिवानी आणि नायरा आता तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणी झाल्या होत्या .
दोघी श्रीमंत घरच्या होत्या ,मोठे मोठे बंगले घरी नोकर चाकर शिवाय त्यांना घरी विचारणारे कोणीच नव्हते कारण त्यांचे पालक खुप मोठे व्यावसायिक असल्याने त्यांना मुलींची चौकशी करायला वेळच नसे .
मुलीना योग्य तो पैसा पुरवला यायला जायला वाहने दिली त्यांचे कपडेलत्ते व इतर गोष्टीचे लाड पुरवले की झाले अशी त्यांची धारणा होती .
शिवानीकडे तर आताच चारचाकी गाडी सुद्धा होती .
तिच्या वडिलांचे राजकीय वजन जास्त असल्याने तिला कधीच कोणी पोलीस लायसन वगैरे विषयी विचारत नसे
नायराचे वडील बिझिनेसमन होते शिवाय आई पण एक यशस्वी मॉडेल होती .
तीची पण एक महागडी दुचाकी होतीच .
दोघींचे कपडे अतिशय आधुनिक व तोकडे असत .शिवाय त्या महागडी कोस्मेटिक पण वापरत .
आधी तर क्षिप्रा त्यांच्या मानाने अगदी बावळट होती .
पण हळू हळू क्षिप्रा पण त्यांच्या सारखी वागू लागली .
तिचेही कपडे आता आधुनिक होऊ लागले ,पण तोकडे कपडे घालताना तिला घरच्या लोकांची अजुन भीती वाटत असे .घरी आजकाल फक्त आजीच असे कारण आई आता मोठ्या सोसायटी मध्ये रमल्याने सतत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काहीनाकाही कार्यक्र्मात व्यस्त असे .
बाबाची कामे वाढल्याने तो घरी फारसा नसे .
कधी मधी आजी तिला तिच्या कपड्यावरून अथवा येण्या जाण्याच्या वेळेवरून बोलत असे .
पण “अग आजी तुला काही समजत नाही हल्ली असेच कपडे घालायला लागतात आणि कॉलेजमध्ये पिरीयड असतात ग उशीर पर्यंत त्यामुळे थांबायला लागते ..”असे उत्तर देत असे .
क्रमशः