अघटीत भाग ४
हल्ली त्या तिघी मैत्रिणी शिवानीच्या गाडीतून कॉलेजमध्ये जात व इतर वेळी पण गाडीतुन एकत्र भटकत असत .पण तिची मैत्रीण गाडी घेऊन घेई न्यायला आली आहे हे क्षिप्राच्या घरी पटले नसते .
शिवाय बाबाने जर असे काही पाहीले असते तर नक्कीच अनेक प्रश्न विचारल असते .
म्हणून मग ती नेहेमी प्रमाणे घरून रीक्षाने निघत असे व कोपर्या पर्यंत जाऊन रीक्षा सोडुन देत असे .
तिथे शिवानी आणि नायरा तिची वाट पाहत असत ..मग तिघी एकत्र निघत .
तिच्या उशिरा कॉलेजला जाण्यावरून आईने पण एकदोन वेळेस तिला टोकले होते .
पण तिने अशीच उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली होती .
रोज बाहेरचे का खातेस ?डबा का नेत नाहीस? असे आईने विचारले तेव्हा ..
तिने रागाने ‘काय ग आई मी काय आता शाळेत आहे का ?..सगळे जण आम्ही बाहेर हॉटेलला खातो ,आणि आल्यावर जेवत असते मी ..”मग आई गप्पच बसली होती .
त्यांच्या या ग्रुप मध्ये अजिंक्य ,अखिल ,गौतम ,योगेश, निखील अशी मुले सुद्धा होती .
ही सुद्धा अशीच मोठ्या मोठ्या घरची मुले होती .
भरपूर पैसा बाळगणारी आणि ब्रान्डेड कपडे ,शूज आणि सेदान कार वापरणारी .
सतत ओठात सिगारेट ठेवणारी आणि उद्दाम उन्मत्त वागणारी .
सर्वजण एकत्र हॉटेलिंग ,फिरणे करीत असत .
ते सर्व तिला ख्रर्चाबद्दल कोणतीच जबरद्स्ती करीत नसत पण
खुप वेळेस इतर सर्वांनी खर्च केल्यावर कधी शिवानी पण स्वताहून खर्च करीत असे .
तसाही सात आठ जणांचा खाण्यापिण्याचा खर्च भरपूर असे.
त्यामुळे आजकाल तिला पैसे पुरत नसत ,मग असेच बाबा गडबडीत असताना त्याच्याकडून पैसे माग ,आईकडे काहीतरी थापा मारून पैसे माग ,आजीला लाडीगोडी लाव असे करायला लागत असे .
हळूहळू आता शनिवार रविवार सुट्टी दिवशी पण त्यांच्या बाहेर सहली सुरु झाल्या .
खरेतर शनिवारी कॉलेज असे पण ते चुकवून जायचे असे त्यांचे प्लान्स असत .
शनिवारी कॉलेजच्या नावावर क्षिप्रा बाहेर पडत असे पण रविवारी थोडी थापा थापी करावी लागे .
सध्यातरी घरचे सगळे अकरावीचे वर्ष एन्जोय करते आहे न मग असु दे अशा मूड मध्ये होते
असेच एका शनिवारी ती कॉलेजला म्हणून बाहेर पडली .
आज एक गावाबाहेरचे हॉटेल ठरले होते .
धमाल मस्ती करीत सगळी तिथे पोचली.
जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती ..हॉटेल तसे रिकामेच होते यांचाच धिंगाणा चालू होता .
आणि मग सर्वांनी सिगारेटी काढल्या ,शिवानी आणि नायरा पण सिगारेट ओढण्यात पारंगत होत्याच
आज सगळ्यांचा आग्रह झाला क्षीप्राने पण सिगारेट ओढायला हवी .
आधी तिने खुप आढेवेढे घेतले पण मनातून तिला हे ट्राय करायचे होतेच .
त्या बाबतीत ती अगदी क्रेझी होती ..
मग शिवानीने तिच्या तोंडात सिगारेट ठेवली आणि लायटरने पेटवली
सर्वांनी जणु केक कापावा तशा टाळ्या वाजवल्या ..
आणि पहील्या झुरक्यात क्षिप्राला जोरदार ठसका लागला ..
सगळी जोरात हसायला लागली ..
अग पहील्या वेळी असेच होते ..एन्जोय
खोकल्या मुळे क्षिप्राच्या डोळ्यात पाणी आले ..लगेच गौतम जवळ आला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला ,”टेक इट इझी बेबी ..आवडत नसेल तर नको ओढूस “
त्याचे बोलणे ऐकुन सगळी आणखीन जोरात हसु लागली आणि ..
ओह she is really a baby ..असे तिला चिडवू लागली .
आता क्षिप्राच्या तोंडातून गौतम ने काढुन घेतलेली सिगारेट पुन्हा तिने ओठात घेतली आणि
गौतमच्या हातून स्वताच लायटर घेऊन ती पेटवली आणि एक मोठा झुरका मारला .
सगळे स्तब्ध पाहत होते ..तिने आणखीन दोन झुरके मारून ऐटीत सिगारेट ओठातून काढली आणि मग सगळा ग्रुप ..हिप हिप हुर्रे चीअर्स फोर क्षिप्रा ...असे म्हणून टेबले वाजवू लागला .
क्षिप्राला एकदम भारी वाटले ...एक थ्रील म्हणून ओढलेली सिगारेट तिला चक्क आवडली .
आणखी एक सिगारेट तिने पुन्हा गौतम कडून मागून घेतली आणि ती पण संपवली .
सगळा ग्रुप तिचा हा आवेश पाहून चकित झाला .
नंतर नेहेमी प्रमाणे जेवण खाण आवरून ग्रुप परत निघाला .
जाताना गौतमने तिला विचारले त्याच्या गाडीतुन येण्याविषयी
क्षिप्राने होकार दिला .गौतम तिला खरेतर खुप आवडायचा पण ग्रुपमध्ये असताना त्याच्या सोबत फार बोलणे नाही व्हायचे .
आज त्याच्याबरोबर गप्पा करू असे ठरवून क्षिप्रा त्याच्या सोबत निघाली पण ...
क्रमशः