Hech khare vastav books and stories free download online pdf in Marathi

हेच खरे वास्तव


★★ हेच खरे वास्तव! ★★
आमच्या वर्तुळात दिलीप गायतोंड तशी प्रसिद्ध वल्ली! त्याच्या माहितीनुसार तो आमच्या वर्तुळातच नव्हे तर तालुका, जिल्हा आणि काम पडलेच तर राज्यातही प्रसिद्ध अशी व्यक्ती! त्याचे कारण म्हणजे तो हाडाचा साहित्यिक होता. साहित्यिक म्हटलं की,त्यातही प्रकार आलेच. जसे जात म्हटली की, पोटजात येते त्याप्रमाणे! कुणी कवी असतो, कुणी कथाकार, कुणी कादंबरीकार तर कुणी सिनेमा क्षेत्रात काम करणारे. एखादा कुणी ललित लिहितो, कुणी निबंधकार तर कुणी चरित्रकार! यातही पुन्हा लेखनाच पोट जाती आल्याच. त्या म्हणजे विनोदी, गंभीर, सुटसुटीत, कुणालाही न समजणारे तरी पारितोषिक पटकावणारे लेखन. तसा आमचा दिलीप साहित्य क्षेत्रातील कोणत्याही जातीचा नव्हता. सरकार जसे निधर्मी, निःपक्षपाती असते असे म्हणतात त्याप्रमाणे दिलीपचे लेखन होते, त्याने सारेच साहित्य प्रकार हाताळले होते. एक अष्टपैलू साहित्यिक म्हणून तो स्वतःच स्वतःचाच परिचय द्यायचा. त्याचे तरी का खोटे होते? त्याच्या लिखित कथांचे शतक पूर्ण झाले होते. दीडशेहून अधिक कविता तयार होत्या.कादंबऱ्यांचे सात हस्तलिखिते तयार होती. पंचवीस ललितं लिहून हातावेगळी केली होती. त्याच्या साऱ्या साहित्याचा आमच्या वर्तुळात मलाच जास्त परिचय होता. त्याचे साहित्य नित्यनेमाने प्रकाशित होत असे. परंतु पुस्तकरुपाने मात्र तो वाचकांची भेट घेऊ शकत नव्हता. कारण म्हणजे प्रकाशित करण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याजवळ नव्हते. बिचारा पेन कागदावर घासत अनेक भाव व्यक्त करायचा.
गायतोंडला प्रवासाची भारी हौस होती. प्रवास केला म्हणजे अनुभव विश्व वाढते. साहित्यिक कल्पना सुचतात, वेगवेगळे अनुभव प्रकट करता येतात. त्याची दुसरी आवड म्हणजे परिचय वाढवणे! कुणी त्याच्या मिनिटभर ही संपर्कात आले की त्याचा परिचय दिलीपने करुन घेतलाच म्हणून समजा. स्वतःच्या या सवयीशीही तो तसाच प्रामाणिक होता. परिचयातून एकमेकांचे छंद, सुख-दुःख समजतात, आवडीनिवडींची जाण होते. अशा परिचयातून एखादी नवीन कलाकृती निपजते, साहित्याला पुरक पात्र गवसतात.
त्यादिवशी तो प्रवासाला निघाला. नांदेड ते पुणे हा प्रवास म्हणजे तसा दहा-बारा तासांचा. प्रवासातही त्याला दिवसाचा प्रवास आवडत असे. यामागचे कारण सांगताना दिलीप म्हणतो, रात्रीचा प्रवास सारा झोपेत जातो. दिवसाचा प्रवास केल्याप्रमाणे वाटतो. रस्त्याचे, निसर्गाचे सौंदर्य मनसोक्त अनुभवता येते, साठवता येते. हे तो आवर्जून सांगे. प्रवास कितीही दूरवर करायचा असला तरीही दिलीप कधीच आरक्षण करायचा नाही. याबाबतीतही त्याची भूमिका ठाम आणि स्पष्ट होती. आरक्षण केले म्हणजे प्रवासी अजगरासारखा सुस्त होतो. बसमध्ये सर्वात शेवटी चढतो. आरक्षण नसलेल्या प्रवाशाच्या शरीरात बस दिसली की, आगळेवेगळे चैतन्य, उत्साह भरभरून वाहतो. कैक दिवसांनी प्रियेचे दर्शन झालेला माणूस जसा सर्वांगाने फुलतो, प्रफुल्लित होऊन प्रियेला मिठीत घ्यायला व्याकूळ होतो, तसा आरक्षण न केलेला माणूस बसमध्ये चढायला नाना खटपटी करतो. त्यावेळी त्याच्या शरीरात एक वेगळीच ऊर्मी वाहते. त्यातच एखाद्या कोमलांगीचा स्पर्श होऊन तिचा भार अंगाखांद्यावर पडला तर मग आनंदाचे भरते येते. स्वर्गसुख म्हणतात ते दुसरे कोणते? चढताना होणाऱ्या त्रासाची जाणीवही त्यास होत नाही.
त्यादिवशी पुण्याला जाताना तो आरक्षण न करता बसची वाट बघत उभा होता. वेळ सकाळची. वातावरणात पसरलेला मंद मंद वारा त्याच्याशी गुजगोष्टी करत असतानाच बस आली. थोडीफार रेटारेटी झाली. दिलीपला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, विसरल्याप्रमाणे वाटत होते. मोठ्या मुश्कीलीने मिळविलेल्या आसनावर बसताच त्याला आठवले की, रेटारेटीत हवाहवासा स्पर्श झालाच नाही. त्याने शेजारी रुमाल टाकला, या आशेने की, कुणी स्त्री येऊन शेजारी बसेल! वाहकाने घंटी मारली. तसे शेजारी उभ्या असलेल्या एका प्रवाशाने विचारले,
"पाव्हणं, कुणी आहे का?" आवाजाच्या दिशेने गायतोंडने बघितले. भला मोठा पटका बांधलेला, बलदंड, जाडजूड शरीरयष्टीचा, भरघोस मिशा असलेला माणूस उभा होता. त्याला पाहताच का कोण जाणे दिलीपची बोबडी वळली.तो म्हणाला,"अं...अं...."
"असे काय वगारीवाणी करता राव? कोन्ही बी न्हाय आन उगाच जागा आडिवलीत? व्हा पल्याड.." म्हणत तो पाहुणा ऐसपैस बसला. शरीर आधीच गलेलठ्ठ आणि बसणे तसे रेटून.
"काय पाव्हणं?" कोठं जाणार?" परिचय करून घेताना पाहुण्याने बाजी मारली.
"प...प...पुण्याला..."
"पुण्याला? समद ठीक हाय न्हव?"
"म्हणजे?"
"आमच्या मेव्हण्याचं डोस्क बिघडलं व्हत तव्हा त्यास्नी पुण्यालाच नेल्त....सॉक माराय हो. काय नाव हाय तुमचं?"
"दिलीप गायतोंड."
"तरीच! चेहरा बी गायीवाणीच हाय. काय काम करता?" शेजाऱ्याने असा प्रश्न विचारताच दिलीपमधील बेडूक फुगला. तो म्हणाला,
"मी साहित्यिक आहे..." नोकरी कोणती करतो हे न सांगता दिलीप साहित्यिक म्हणून परिचय करून देत असे. त्याला असे वाटायचे की, साहित्यिक म्हणून सांगितले की,समोरचा अर्धा गार होतो.
"अच्छा! काय काय इकता?"
"म्हणजे?"
"अव्हो, तुम्हीच तर म्हणाला की, साहित्य इक."
साहित्यिक या शब्दाची तशी फोड झालेली पाहून दिलीपची फोडणी मात्र करपली.
"न्हाई म्हन्ल....दोनच्या बाद नको हे साहित्य तर इकत न्हाईत की....निरोध हो."
"नाही. मी लिहितो. वर्तमानपत्रात... मासिकात...."
"अच्छा! तर तुम्ही पत्रकार हायेसा. काय हो, आजकाल लैच पेव फुटलय की. जो तो पत्रकारच हाय अस सांगून..."
"नाही हो पत्रकार नाही."
"आर, तिच्या मायला. हे न्हाई, ते न्हाई ....मग?"
"तसे नाही हो मी गोष्टी लिहितो."
"कहाण्या लिहता व्हय. मंग तसं स्पष्ट सांगा की, उगाच धा वळणं कहापायी घेता? बाई नवऱ्याचं नाव घेयाला लाजल्यावाणी..."तितक्यात बस थांबली पाहुण्याचा थांबा आला. उठताना तो म्हणाला,
"बरं चलतो. उतरा च्याहा पेवू."
"नको. नको."
"उतरा हो. लै उम्दा च्याहा मिळतो. म्हशीनंबी पेला ना तर तीनं बी गाभण ऱ्हावावं. " म्हणत तो इसम उतरला.
'हा आपल्यालाच तर म्हणाला नाही ना? काही का असेना चहाची उपमा मात्र मस्तच देऊन गेला. अरे, पण आपण त्याचं नाव नाही विचारलं...' दिलीपच्या शेजारी नवीन माणूस बसला.दाढीचे खुंट वाढलेला, चेहरा आत्यंतिक त्रासलेला, गळ्यात शबनम, नाकावर येणारा चष्मा वारंवार वर ढकलणारा असा तो माणूस होता. नेहमीप्रमाणे दिलीपने त्याचे बारीक निरीक्षण केले. भावी कथानकासाठी त्याच्यातल्या खुबी, सौंदर्य टिपण्यासाठी.
"काय कुठे जायचे?"
"लातुरला...." जसा चेहरा तसेच त्रासदायक उत्तर.
"काय करता?" दिलीपने पुढचा प्रश्न विचारला.
"टिचर आहे...." एखाद्या आरोपीने फौजदाराला उत्तर द्यावे तशा आवाजात तो उत्तरला.
"काय शिकवता?"
"मराठी."
"व्वा! म्हणजे साहित्यातले कळत असणार..."
"हे काय विचारणे झाले? शिक्षकाशिवाय साहित्य कुणाला जास्त समजणार? अहो, लिहिणारे काहीतरी लिहितात आणि मग ते विद्यार्थ्यांच्या गळी उतरवताना आमच्या नाकीनऊ येतात. कशाचा संबंध कशाला नसतो. एक साधे पहा, चेहरा किती सुंदर आहे असे लिहिले तर रांगणाऱ्या बाळालाही कळेल पण हे तसे नाही लिहिणार. काय लिहितात तर 'तुझा चेहरा चंद्राप्रमाणे!' विज्ञानयुगातही चंद्राची उपमा देणार. आता काय डोके फोडायचे? विज्ञानातला वास्तव चंद्र आणि हा आमचा साहित्यातील चंद्र? आहे का काही संबंध? काही तारतम्य? सरळ सोप्या भाषेत लिहायला का यांना येतच नाही? कारण नसताना प्रतिकांचा सर्रास उपयोग करतात. तुम्हाला कळतं का साहित्य?" खुललेल्या प्रवाशाने षटकार ठोकला.
"अं...अं..कळते थोडेफार...." म्हणताना दिलीपने कदाचित प्रथमच मी साहित्यिक आहे ते लपवले.
"तुम्हाला सांगतो, प्रत्येक साहित्यिकाचा किमान एक नायक तरी त्याच्या प्रियेला चंद्र हमखास आणून देण्याचे वचन देतो. मला एक सांगा, हे वास्तववादी लिखाण आहे? चंद्र काय एखाद्या किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये मिळणारी वस्तू आहे का? उगाच माझे लेखन वास्तवादी म्हणून फुशारक्या ठोकतात.तो नायक का खरेच चंद्र आणून देणार आहे? दहा जन्म घेतले तरी त्या नायकाला किंवा त्या लेखकाला जमणार आहे का ते? आजकाल ग्रामीण भाषेत लिहायचे एक नवीनच फॅड निघाले आहे. दुनिया निघालीय ग्रहांवर आणि आम्ही पुन्हा गावाकडे...बॅक टू नेचर! कथेत काहीही रस नसतो परंतु साहित्यिकाची नायिका मात्र रसरसलेली हवी, तिचे ओठही रसरशीत असतात."
"अहो, वाचकांना...."
"हे आणखी एक खुळ. म्हणे वाचकांना सेक्स हवाय म्हणून का कागदावरच धुडगूस घालावा? स्वतःची पत्नी तिकडे रात्र रात्र तळमळत असते ते त्यांना दिसत नाही. हे महाशय मात्र इतरांची लफडी लिहिण्यात मशगुल. स्वतःचा संसार नीट चालवता येत नाही आणि हे अनेकांचे संसार मोडीत काढतात."
"अहो, पण..."
"कालच्याच रविवार पुरवणीत एक कथा प्रकाशित झाली आहे....शिक्षकाची. आजकाल जो उठतो तो शिक्षकांवर लिहितो. शिक्षकांवर लिहिले म्हणजे का जागतिक पारितोषिक मिळणार आहे की, जागतिक शिक्षण परिषदेवर निवड होणार आहे? हे तेच जाणोत."
"कुणाची होती कालची गोष्ट?" दिलीपने विचारले.
"होता, कुणीतरी फडतूस, बेअकली. काय नाव पहा, वरतोंड की बैलतोंड असेच काहीतरी होते. नावाचे काय? तसेच कथेतही काही नाही. तीन शिक्षकी शाळेची कथा. शिक्षकांचे शाळेविषयी प्रेम काय तर डुम्मे मारणे. मला सांगा, डुम्मे मारणारा का एकटा शिक्षकच आहे? दुसरा कुणी नाही का? बरे, शिक्षकांचे डुम्मे तरी किती? फार तर आठवड्यातून चार दिवस! दोन दिवस तर तो शाळेवर असतो ना? या लोकांना ते दोन दिवस दिसत नाहीत. खेड्यात काम करणारे इतर कर्मचारी महिना-महिना तोंड दाखवत नाहीत. हे कुणी पहाते का? काम पडताच खेड्यातील माणूस कर्मचाऱ्याचे घर हुडकत जाऊन, त्याच्या हाती पैसे कोंबून काम करवून घेतो. हे कुणी लिहावे? शिक्षकांची स्थिती म्हणजे 'मुकी बिचारी...' अशी झाली आहे...." ती व्यक्ती त्वेषाने बोलत असताना बसने लातुरात प्रवेश केला. निरोप घेताना दिलीपच्या ओठावर शब्द आले, 'कालची कथा माझीच. मीच दिलीप गायतोंड.' परंतु महत्प्रयासाने दिलीपने ते शब्द आतच ढकलले. बलात्कारीत स्त्रीने तोंडावर बांधलेली पट्टी पाहून आक्रोश आतच दाबावा त्याप्रमाणे...
पुन्हा कुणाची ओळख वाढवावी का नाही या विचारात गायतोंड असताना शेजारी बसलेल्या एका इसमाने विचारले,"कुठे चाललात?"
"पुण्याला. तुम्ही?" गायतोंडने विचारले.
"कोल्हापूरला जातोय. तुम्हाला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटतंय? मी नांदेडचाच आहे. हां आठवले. पेपरात तुमचा फोटो ....
"हो. हो. माझाच होता. मी दिलीप गायतोंड."अथांग सागरात एखादे मिठाचे ढेकुळ सापडल्याप्रमाणे
व्हावा तसा आनंद दिलीपला झाला. आणि त्याने मोठ्या उत्साहाने स्वतःची ओळख दिली.
"का हो, माझी पत्नी तुम्हाला कधी भेटली होती का? "
"न..न...नाही बुवा. काय झाले हो?" दिलीपने असमंजसपणे विचारले.
"मग मी 'असा' आहे हे तुम्हाला कुणी सांगितले?" त्या माणसाने दोन्ही हातांनी टाळी वाजवत विचारले.
"नाही हो. तुमची माझी ओळख नसताना मला कसे ठाऊक होणार हो?"
"म्हणून तर म्हणतो, ओळखपाळख नसताना तुम्ही तुमच्या कथेत माझे आणि माझ्या बायकोचे नाव कसे काय टाकले?"
"अहो, तो केवळ योगायोग..."
"योगायोग गेला खड्ड्यात. दाखवू का माझे पुरुषत्व? तुलाही गाभण करण्याचे सामर्थ्य आहे. दाखवू का मोटारीतच?"
बस कुठल्यातरी थांब्यावर थांबली होती. पोटात येणारे ओठावरच राहिले. शेजारच्या आसनाजवळ असलेली खिडकीजवळची जागा रिकामी झाली होती म्हणून त्याच्या पुरुषत्वाने तिकडे झेप घेतली आणि दिलीपने सुटकेचा श्वास घेतला.
दिलीपला एक प्रसंग आठवला....दिलीपने लिहिलेली वेश्यांच्या जीवनावरील एक कथा एका वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्याच्या कार्यालयातील एका कारकूनाने गाठले आणि तो म्हणाला,
"चला. गायतोंड."
त्याच्या निमंत्रणामुळे दिलीप मनातल्या मनात चरकला कारण 'स्त्रियांचा म्हणजे 'तसे' काम करणाऱ्या बायकांचा दलाल अशी त्याची ख्याती होती. कार्यालयातील अनेक सहकाऱ्यांना त्याने त्या मार्गावर नेले होते. आज आपली पाळी आली की काय या विचारात दिलीप असताना तो कारकून म्हणाला,"काल प्रकाशित झालेली तुमची कथा वाचली. फार छान वाटली."
"व्वा! व्वा! धन्यवाद!"
"परंतु एवढे अस्सल, जिवंत अनुभव कसे काय रेखाटले हो?"
"म्हणजे?"
"नाही मला असे वाटले की, तुमच्या घरची म्हणजे परिचित एखादी स्त्री तर तशी नाही ना? अनुभवाशिवाय असे चित्रण शक्यच नाही हो. फारच बारकावे टिपलेत ....." तो बोलत असताना शिपायाने गायतोंडला'साहेबांनी बोलावले' असा निरोप दिला आणि ती चर्चा थांबली....
शेजारी कुणाचा तरी कोमल स्पर्श झाला आणि गायतोंडने भानावर येत शेजारी बघितले. एक सुंदर, कमलनयनी स्त्री बसली होती. क्षणभर तिचे निरीक्षण करून काहीतरी आठवल्यासारखे करून दिलीपने तिला विचारले, "तुम्ही मिसेस सागर?"
"ह...ह...होय. पण तुम्ही कसे ओळखले?"
"आप की सागर जैसी आँखों को देखकर!"
"वा! वा! क्या बात है, लेकिन फिर भी...."
"तुमच्यासारख्या प्रसिद्ध साहित्यिकाला कोण ओळखणार नाही, मिसेस सागर? मीसुध्दा तुमच्याच जातीचा आहे."
गळ्यातील मंगळसुत्राशी खेळत सागर म्हणाल्या," तुम्ही फार उशीर केलात हो. माझे लग्न....."
"वेगळा अर्थ घेऊ नका,सागर! मीसुध्दा साहित्यिक आहे. या अर्थाने आपण एकाच जातीचे. मी दिलीप गायतोंड."
"व्वा! काय योगायोग आहे. तुम्हीच का ते दिलीप गायतोंड? सातत्याने लिहिणारे?"
"म्हणजे तुम्ही माझे साहित्य...."
"वाचते. तुमचे प्रकाशित झालेले खूपसे साहित्य मी वाचले आहे. मात्र एक गोष्ट खटकते...तुम्ही फारच श्रुंगारीत लिहिता. स्त्रीला नको तिथे, नको तेवढे उघडे करता. का हो, तुम्हाला बाईचे भुकेले पोट दिसत नाही?"
"त्याचे काय आहे, मिसेस सागर, स्त्रीचे पोट नेहमी उघडे असते आणि नेहमी उघड्या राहणाऱ्या अवयवांपेक्षा कधीतरी दर्शन देणाऱ्या ...."
"तरीही तुम्ही स्त्रीच्या बाबतीत भलतेच हळूवार आहात. तिच्या शारीरिक सौंदर्याचं...."
"जे आहे ते लिहायला काय हरकत आहे? समजा ...सपोज हं.... कल्पना करा, उद्या मी एखादी कलाकृती लिहिली आणि त्या साहित्याच्या नायिकेचे वर्णन तुम्हाला समोर ठेवून केले तर?"
"माझे वर्णन? मी नायिका? भलतेच काही तरी..." असे म्हणताना लाजलेल्या सागरला पाहून गायतोंड म्हणाला,
"पहा. तुमच्या गालावरचे सफरचंद कसे लाललाल आणि गोड दिसताहेत. अहो, ही स्त्री सुलभता आहे आणि तेच मी लिहितो."
"एकंदरीत तुम्ही लिहिता मात्र फार छान! तुमचेही खोटे नाही म्हणा. वाचकांनाही तेच हवय..."
"स्त्रीचे वास्तव दर्शन." दिलीप तसे म्हणाला आणि दोघांचे हसणे एकमेकात मिसळले.....
मिसेस सागर उतरल्या आणि दिलीपचा प्रवासातला सारा आनंद लोप पावला. तितक्यात दिलीपला त्याच्या पत्नीची आठवण झाली. त्याच्या प्रत्येक कृतीची पहिली वाचक, समीक्षक त्याची पत्नीच होती. ती वेळोवेळी त्याला श्रुंगारीक लेखनापासून परावृत्त करायची परंतु दिलीप तिचे म्हणणे फारसे मनावर घ्यायचा नाही. सुरुवातीला दिलीप काही धम्माल प्रवासवर्णने लिहायचा. ते वाचून त्याच्या पत्नीचा असा समज झाला की, ते सारे अनुभव दिलीपचे स्वतःचे, अस्सल आहेत.
"हे....हे....तुम्ही लिहिले?" एक लेख वाचून पत्नीने विचारले.
"का बरे?"
"कोणत्या सटवीला जवळ घेऊन बसला होता?"
"म्हणजे?"
"हे असले चाळे करता तुम्ही प्रवास करताना?"
"अग, काल्पनिक आहे सारे...."
"वा ! व्वा! काय तर म्हणे काल्पनिक! स्वतःवर बेतले की, काल्पनिक म्हणायचे नाही तर अस्सल, वास्तव ही लेबलं तयार, पुढाऱ्याच्या खिशात प्रत्येक पक्षाची टोपी असल्याप्रमाणे!"
"किती छान साहित्यिक बोललीस ग तू!"
"पुरे झाले लोणी लावणे. आजकाल महाग झाले, मिळत नाही लोणी."
तितक्यात कुणीतरी दिलीपशेजारी बसले. कितीही प्रयत्न केला, निश्चय केला तरी सवय जाते का? दिलीपने त्या व्यक्तीचे निरीक्षण केले. हिरवेगार पातळ, कोपरापर्यंत ब्लाउज, त्याखाली काळाभोर हात, कपाळावर लालभडक कुंकू. परंतु त्या व्यक्तीने चक्क घोटून दाढी केलेली दिसत होती. तशी ती व्यक्ती टाळी वाजवून म्हणाली,
"असे काय निरखून पाहता? बाई माणूस कधी पाहिले नाही का?"
"बाई पाहिली, माणूसही पाहिला. परंतु वेगवेगळे! असे एकाच ठिकाणी...टू-इन-वन पाहतो."
"व्वा! म्हणूनच तुम्ही हे आहात हो..." म्हणत विशिष्ट टाळी वाजवून ती व्यक्ती पुढे म्हणाली,
"लेखक हो..."
"तुम्ही मला ओळखता?"
"सकाळपासूनच! मी पण नांदेडहून बसले आहे. तेव्हापासून लोकांनी तुमच्यावर केलेली बळजबरी पाहिली व ऐकलीही. हे यंत्र खूप पावरबाज आहे...." म्हणत तिने डोईवरचा पदर बाजूला करून कानातले यंत्र दाखवले.
"तुम्ही एक करा राव...." दिलीपजवळ सरकत ती व्यक्ती म्हणाली.
"काय?" दिलीपने साशंकतेने विचारले.
"आमच्या जीवनावर लिहा. एक-एक अस्सल अनुभव आहेत. बुरखा पांघरून समाजात तोंड वर करून फिरणारे अनेक नमुने आहेत. आख्खी कादंबरी होईल....." तितक्यात बसने पुणे शहरात प्रवेश केला. त्या शहराचे दर्शन दिलीपला परमेश्वराच्या दर्शनाप्रमाणे वाटले. तो एवढा आनंदी झाला की, आपण बसमध्ये आहोत हेही विसरला. आनंदाच्या भरात सारे विसरून चक्क जोरजोरात हसू लागला. काय झाले म्हणून सारे प्रवासी जागेवर उठून त्याच्याकडे पाहात असताना कुणीतरी म्हणाले,
"ड्रायव्हर साहेब, गाडी थांबवा. समोरच्या हॉस्पिटलजवळ.. वेड्याच्या.."
अचानक गाडीला ब्रेक लागला तसे दिलीप गायतोंडचे हसणे थांबले आणि तो कावऱ्याबावऱ्या नजरेने सर्वांना न्याहाळू लागला......
नागेश सू. शेवाळकर


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED