Trushna ajunahi atrupt - 12 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १२

भुयार गुहेप्रमाणे बरच काळोखात व्यापल होत. हातात मशाल होती म्हणून ठीक.. परंतु ती छोटी मिणमिणती मशाल फक्त पावलाखालचा चिंचोळा रस्ता दाखवत होती. पायाखालचे खाचखळगे चाचपडत व एका हाताने दगडी भिंतीना पकडत, धडपडत तो बाहेर निघाला. भुयार काही फारस मोठं नसावं... कारण भुयाराच्या तोंडाशी थोडीफार झुळुझुळू करणारी हवा सहज आत शिरत होती. त्या थंडगार स्पर्शाने त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली. दोन पावलात भुयार संपूनही गेले. त्याने भुयाराच्या बाहेर पाऊल टाकले व जागीच स्तब्ध झाला. इतका सुंदर नजारा शहरात कधी कधीच नजरेस पडतो. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी अख्खा आसमंत व्यापून निघाला होतं. कोवळ्या पिवळट केशरी किरणांच्या प्रकाशात निळसर ढगानाही रंगीत झालर मिळाली होती. चारीबाजूने हिरवीगार झाडी मोठ्या डौलात उभी होती. त्यातील फुलझाडानी खाली आपल्या रंगीत फुलांची रांगोळी घातली होती. गवताची तलम चादर मधूनच खट्याळ मुलासारखी पायाला गुदगुल्या करत होती. बाजूनेच एक छोटासा ओढा दिमाखात वाहत होता. किरणांच्या प्रकाशात ओढ्याच चमकदार पाणी मात्र बऱ्याच गडबडीत असल्यासारखं वाहत होत. हळून एखादा पक्षी त्यावरून सुर मारून उडत होता. त्याच्या खळखळणाऱ्या आवाजाची पक्षांच्या किलबिलसोबत जणू स्पर्धाच चालू होती. ओम त्या प्रसन्न वातावरणात भान हरपून हरवला. आपण नेमक कशासाठी आलोय हे तो विसरून गेला.

कधीतरी भानावर आल्यावर पटापट आटपून तसच धडपडत पुन्हा भुयारात पूजेच्या ठिकाणी परतला. नदीच्या थंडगार पाण्यात अंघोळ करून त्याला बरीच तरतरी वाटत होती. इतक्या प्रवासाने थकून कुरकुरणार त्याच शरीर निसर्गाच्या अलगद स्पर्शाने ताजतवान झाल. कालपर्यंत मनावर साचलेल ओझ झटक्यात जादूची कांडी फिरवावी तस उतरून गेलं. त्यांच्यातील एकाने एक पांढरशुभ्र तलम वस्त्र त्याच्या हातात दिलं. इतकं मऊशार कापड तो आज प्रथमच पाहत होता. आपले हात हलवले तरी ते नाजूक मऊ वस्त्र कुस्करून जाईल की काय म्हणून तो तसाच उभा राहिला.

" ओम... नेसायचय ते.." गुरुजी त्याच्याकडे पाहत हसून उद्गारले.

" कसं..?" त्याच्यासारख्या शहरात वाढलेल्या मुलाला काय माहीत असणार अशी वस्त्र कशी परिधान करता ते. चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन तो पुन्हा सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत राहिला. त्याची अडचण एकाच्या लक्षात आली. त्याने पटकन पुढे होत ओमच्या कानात कुजबुजत बाजूला नेल. बरचसं उलटसुलट फिरवत शेवटी त्याने ते कसतरी ओमला नेसवल. त्या शुभ्र वस्त्रात तो एखाद्या बौद्ध भिक्षूसारखा धीरगंभीर भासत होता. त्या वस्त्राची तलम झुळझुळीत चमक त्याच्या चेहऱ्यावरही चढली होती. आपल्या सहकाऱ्याला हळूच थँक्स म्हणून तो गुरुजींच्या समोर आला.

गुरुजी पूजेच्या तयारीत मग्न होते. संपूर्ण सभागृह पहाटेच ताज्या शेणाने सारवल होत. त्यावर पांढऱ्या दगडाला पाण्यात भिजवून सुंदर नक्षी काढली होती. सभागृहात चहूबाजूला बऱ्याच प्रकारची फुल, पान, फळ, सुपाऱ्या, तांदूळ, हळद कुंकू आणि बरच काय काय पसरलं होत. सभागृहातील चौथऱ्यावर लाल विटांची चवड रचून तात्पुरतं यज्ञकुंड बनवलं होत. त्या भोवती सफेद रांगोळीने वेलबुट्ट्या रेखाटल्या होत्या. त्याच्यावर चार बाजूला कणकेच्या गोळ्याच्या पणत्या ठेवल्या होत्या. त्यात निळसर रंगाचा तेलकट द्रव होता. त्याच्याच बाजूला लांबलचक जाडसर अगरबत्त्या होत्या. एका धुपारतीत सुपारीच्या आकाराचे धुपाचे खडे ठेवले होते. एका कोपऱ्यात नक्षीदार मोठाले तांब्याचे कलश एकवार एक रचले होते. अजूनही बरेचश्या माहित नसलेल्या वस्तू नीटपणे मांडून ठेवलेल्या होत्या. यजकुंडाभोवती नवीन मृगजिन अंथरले होते. त्याला लावलेली कस्तुरी हवेत दरवळत होती. चौथऱ्याखाली पुन्हा रांगोळीची नक्षी काढली होती. त्यावर मातीच्या पणत्यांत तसाच निळसर द्रव तरंगत होता. गुरुजींचे चार सोबती धावपळ करत सगळ व्यवस्थित मांडत होते.

गुरुजींनी इशारा करताच ओम त्यांच्याजवळ गेला. तोंडात पुटपुटत त्यांनी एका लाकडाच्या तबकातील चंदन त्याच्या कपाळाला लावले. त्या चंदनाचा थंडावा क्षणभरात त्याच्या शरीरभर पसरला. लगोलग त्याच्या उघड्या दंडांवर त्यांनी मंतरलेल्या भस्माची बोट उमटली. थंडीने शहरणार त्याच अंग अगदी ऊब मिळावं तस शांत झालं. हे असे घटकेत घडलेले बदल त्याच्यासाठी नवे होते. त्याने प्रश्नार्थक नजरेने गुरुजींकडे पाहिलं. गुरुजी त्याचे प्रश्न समजून गेले.

" ह्या मिश्रणाचे गुण आहेत ते..." त्याची उत्सुकता न ताणता त्यांनी लगेच शंकानिरसन केले. " आज तुला असे अनेक अनुभव येतील... मनाने तयार रहा ते स्वीकारायला..."

त्यावर ओमने केवळ मान डोलावली. हे सर्वच त्याच्या कल्पनेपलीकडे होत. ह्या जगात केवळ विज्ञानच सत्य आहे असं म्हणणाऱ्या त्याला कालपासून इतके काही अनुभव आले होते की त्यांना स्वप्न म्हणून पण तो विसरू शकला नसता. आजवर ज्या बुध्दीने भासमय जग नाकारला त्याच जगातील सर्वशक्तिमान अशा कोणाशीतरी त्याला बुद्धीचातुर्याने सामना करायचा होता. त्याच्या आयुष्यातील बदलांसोबत त्याचे विचारही अंतर्बाह्य बदलून जात होते.

त्यांच्यातील कोणीतरी ते निळसर तेलाचे सारे दिवे पेटवले. ते तेलापेक्षाही काहीतरी बरच वेगळं असाव. एवढ्याशा पणत्यांनी सगळ्या अंधाराला गिळंकृत केल होत. त्यांचा तेजोमय प्रकाश संपूर्ण गुहेत व्यापला होता. गुरुजींनी सर्वानाच आसनग्रहण करायची सूचना केली. सर्वजण आपापल्या नेमून दिलेल्या मृगाजिनावर आसनस्थ झाले. " इथून पुढे तुम्हा सर्वांच्या मनाच्या एकाग्रतेची कसोटी असेल... भलेही आपण दैवी शक्तीला आवाहन करत असलो तरी त्या शक्तीची उपस्थिती स्वीकारायला आपल मन तयार असायला हवं. आपल्या मनातील विचार, बुद्धीच्या तळाशी गाडून शुद्ध अंतःकरणाने त्या शक्तीला साद द्यायला हवी. त्या शक्तीतून पाझरणाऱ स्वत्व आपल्या अंतःकरणात सामावून घेण्यासाठी आपल मन व शरीर दोन्ही पूर्णपणे तयार झालं तर... आणि तरच ह्या यज्ञाच पुण्य आपल्या पदरात पडेल. अन्यथा आपल्या मनाची चंचलता आपल्याला दैवी शक्तीची अनुभूती घेण्यापासून नक्कीच परावृत्त करेल... शुभं भवतु.."

तुपाची एक धार सोडून गुरुजींनी यज्ञकुंड प्रज्वलित केले. बाजूला लावलेल्या उदबत्त्या लावल्या. त्याचा मिश्रित सुगंध पसरला. काहीतरी होत त्या सुगंधात. नुसत्या वासानेच सर्वांना अगदी हलकं वाटू लागलं. मनातील उचंबळणारे विचार आपोआप मनातच विरून गेले. डोळ्यांसमोर फक्त एकच लक्ष्य उभ राहील. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून गुरुजी समाधानाने हसले. गुरुजींनी इशारा करताच चारी बाजूला बसलेल्या सहकाऱ्यांनी उच्च स्वरात मंत्रघोषाला सुरुवात केली. नुसत्या मंत्रांच्या उच्चाराने गुहेतील वातावरण पालटू लागलं. ते चालू असतानाच गुरुजींनी सोबतच्या एका काचेच्या बाटलीतील काही पाणी हातात घेऊन यज्ञाच्या बाजूच्या सारवण केलेल्या जमिनीवर शिंपडले. त्या ओलसर झालेल्या जमिनीवर फिकट पिवळट दिसणाऱ्या पिठाच्या साहाय्याने मोठं वर्तुळ रेखाटलं. वर्तुळाचा बरोबर मध्य पकडुन एक मोठी चांदणी रेखाटली. त्याच्या भोवती काहीसा अंदाज बांधत काही ठिपके काढले. चांदणीचा आतला भाग हळदी कुंकवाने भरला. बाहेरच्या भागात गुलाल आणि अबीर सजवला. वर्तुळाच्या काठाला नाना प्रकारचे अष्टगंधानी सुशोभित केले. त्याच्याभोवती आपल्या झोळीतील मंतरलेल्या भस्माचा सडा घातला. इतक्या सुबक साकारलेल्या रांगोळीवर ठराविक अंतरावर अगदी नीट मोजून काही सुपाऱ्या स्थापन केल्या. त्यांची यथासांग पूजा केली. मधल्या चांदणीच्या पाच कोनांवर पाच स्फटिकाचे खडे ठेवले. ते खडे पाहून ओमच लक्ष सहजच गळ्यातील खड्यावर गेलं. समोरचा खडा अगदी गळ्यातील खड्याइतका टपोरा आणि तेजस्वी वाटत होता. पूजेची मांडणी मनासारखी झाली होती. आता मुख्य कार्याला सुरुवात करायची होती. अगरबत्तीच्या सुवासाने एव्हाना सर्वांच्या मनाची चलबिचलता शोषून घेतली होती. सर्वजण एका वेगळ्याच आत्मविश्वासाने तयार होते एका नव्या लढ्यासाठी. गुरुजींनी पूर्ण ताकदीने त्यांचा शंख फुंकत आपल्या पूजेला आरंभ केला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED