आत्तापर्यंत पाच वेळा मी हे पुस्तक खरेदी केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक माझ्याकडून घेऊन गेले, पुन्हा पुस्तकाचं नावही काढलं नाही! असो! खरं सांगू, जवळ जवळ तीन वेळा मी हे पुस्तक वाचलंय. तरीही, लेखकाने सांगितलेलं सगळंच कळलं, असं नाही म्हणू शकत. जेवढं कळलं, ते अमलात आणायचा आणि तसं वागायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला खूप दिवस हे पुस्तक कपाटात असंच पडून होतं. ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचनाऱ्याला कसली आलीय गुंतवणूक आणि पैशांच्या पुस्तकांची आवड! तरीही कपाटात, समोर ठेवलेलं हे पुस्तक नेहमी दिसायचं आणि कधीतरी एकदा वाचून काढावं असं वाटायचं. निमित्त झालं पैशांवरून बायकोशी भांडण. संध्याकाळचे सात वाजले होते. रागातच कपाटातलं ते पुस्तक घेतलं. गाडीला किक मारली आणि तडक मारुतीचं मंदिर गाठलं. सुरुवातीची दहा पंधरा पानं भरभर वाचून काढली. थोडंस समजलं बाकी डोक्यावरून गेलं. काहीतरी पैशांच्या बाबतीत महत्वाचं नक्कीच लेखक महाशय सांगतायत एवढं कळलं. पुन्हा पुस्तक पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता जवळ लिहायला एखादा पेपर असावा असं खूपदा वाटलं. मग काय, महत्वाची वाक्यं पुस्तकातच अधोरेखित करायला सुरुवात केली. सलग तीन साडे तासांत पुस्तक वाचून काढलं.
मुखपृष्ठावरील एक वाक्य नेहमी लक्षात राहतं.
"पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गीय शिकवत नाहीत !"
आता आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले. शाळा शिकून, चांगली नोकरी करावी अशी साधी सरळ आमच्या आईवडिलांची अपेक्षा. यापेक्षा वेगळं ते काय? शेतकरी कुटुंबात असल्यामुळे शेतातील फळभाज्या विकणे, शेतातली, घरातली कामं करणे एवढेच आम्हाला शिकवलं आणि आम्ही करत राहिलो. आता या पुस्तकात अशा काय गोष्टी आहेत कि, ज्या आम्हाला आमच्या आईबापाने नाही शिकवल्या! चला, यासाठी तरी निदान पुस्तक वाचलेच पाहिजे!
सुरुवातीलाच काही मोठं मोठ्या लोकांचे अभिप्राय दिलेले आहेत. त्यात एकजण म्हणाला आहे कि,
'हे पुस्तक मी २० वर्षांपूर्वीच वाचायला पाहिजे होतं.'
जस जसे वाचन पुढे जायला लागलं, मला प्रकर्षानं जाणवायला लागलं कि, 'यार... खरंच..! हे पुस्तक मी कॉलेजला असतानाच का नाही वाचलं? अंदाजे जवळ जवळ १० वर्षांपूर्वी. म्हणजे, नक्कीच आज मी ज्या आर्थिक संकटांमधून जात आहे. ती कधीच उद्भवली नसती. आणि शंभर टक्के माझी आर्थिक बाजू बळकट झाली असती. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असती. सद्य परिस्थिती सुधारणं अजिबात अवघड नाही. किंबहुना ते कधीच अशक्य नसतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. वजन वाढलंय, तर काय केलं पाहिजे? उत्तर एकदम सोपं आहे. रोज सकाळी किंवा पहाटे उठून एखादं दुसरा तास चाललं पाहिजे आणि खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. साधं काम आहे. साधा उपाय आहे आणि खूप सोप्पं सुद्धा आहे. पण, अवघड आहे. कारण जी कामं, जे उपाय किंवा जी उत्तरं साधी आणि सोपी वाटतात, ती तितकीच अवघड असतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आणि काय टाळलं पाहिजे? हे जो पर्यंत तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहणार आणि तुम्ही गोलगोल फिरत राहणार. ज्याला लेखक महाशयांनी रॅट रेस म्हटले आहे. आणि नेमकं हेच 'रिच डॅड पुअर डॅड' आपल्याला शिकवते.
अजूनपर्यंत असंच वाटायचं कि, या श्रीमंत लोकांकडेच पैशांची गंगा का वाहते? ते कसे काय आणखी श्रीमंत होतात? आम्ही लोकं एवढी काटकसर करतो. बचत करतो. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो. च्यायला! मग, आमचा पैसा जातो कुठं? आम्ही गरीबच का राहतोय? आपण आपल्या बेसिक गरजा भागवून, एखादं घर, एखाद दुसरी गाडी, मुलांची शिक्षणं, जमलं तर थोडीफार हौसमौज करतो आणि थोडंफार शिल्लक ठेवतो. यापेक्षा जास्त काहीही करू शकत नाही. तरीही आम्ही श्रीमंत का होत नाही? खरंच, या आणि आणखी कितीतरी प्रश्नांची उत्तरं या पुस्तकाने दिली.
आपल्या लायेबलिटीज काय आहेत आणि ऍसेट्स काय आहेत. हे उदाहरणं देऊन नेमकं स्पष्ट केलं आहे. आपण सर्वसामान्य लोकं नेमकं हेच समजून घेण्यात मार खातो. घरात लाखोंचं फर्निचर, लाखोंची इलेक्ट्रॉनिक ग्याजेट्स, वस्तू असणं म्हणजे श्रीमंती! असं आपल्याला वाटतं. बहुत करून स्त्रियांची मानसिकता तर अशी असते कि, दुसऱ्यांच्या घरात हे आहे ना! मग माझ्याकडे तिच्यापेक्षा महाग आणि भारी वस्तू पाहिजे. अहो, पण लक्षात घ्या कि, खरंच ती वस्तु तुमच्या गरजेची आहे का? तिची किती आवश्यकता आहे? उगाच इतरांशी तुलना आणि स्पर्धा करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका! आजकाल ऑनलाईन खरेदी खूप वाढली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियनर डे, ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल, अशा प्रकारचे सेल लागले रे लागले कि, खरेदीसाठी लोकं त्यावर तुटून पडतात. भरगोस सूट, शिवाय नो कॉस्ट ईएमआय, कॅशबॅकच्या नावाखाली भरगोस खरेदी. पण खरंच त्या गोष्टी गरजेच्या असतात का हो? ईएमआयच्या सायकलमध्ये मग हफ्ते भरा आणि महिना संपला कि, उधारी उसनवारी करा. पुढच्या महिन्यात, सहा महिन्यात पुन्हा ऑनलाईन सेल आहेतच लागलेले!
एक लक्षात ठेवा! जर तुम्हाला एखादं महागडं घड्याळ घ्यायचं असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल! तर, ते खरेदी करण्यासाठी मला किती पैसे जास्त कमवावे लागतील? ना कि वाचवावे? आणि ते पैसे कमवण्यासाठी मला आणखी काय काय करता येईल? याचा विचार तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्हाला पैशांचं खरं गणित काय असतं? ते कळेल. आजच्या युगात नुसतंच साक्षर असून उपयोगाचे नाही. तर अर्थ साक्षर असणं, हे अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि सगळ्यांनी काळाची पावलं ओळखून अर्थसाक्षर झालंच पाहिजे. नेमकं हेच आपल्याला हे पुस्तक शिकवतं. म्हणून तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
अनेक मोठमोठे उद्योगपती कर्जबाजारी होतात. रसातळाला जातात. कोण आत्महत्या करतं तर कोण परागंदा होतं. खूप उदाहरणं आपल्या समोर आहेत. हे असे का झाले? किंवा त्या लोकांवर अशी वेळ का आली? हेही या पुस्तकातून आपल्याला कळते.
पैशाची ताकत काय आहे?
त्याची किंमत काय आहे?
आणि त्याचं गणित काय आहे?
हे पुस्तक आपल्याला शिकवतं.
मला वाटतं, ज्यांना ज्यांना वाचता येतं. त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं. शाळेत, कॉलेजात शिकणाऱ्या प्रत्येकाने, नुकत्याच कमवायल्या लागलेल्याने, आपली परिस्थिती सुधारू पाहणाऱ्याने हे पुस्तक वाचलंच वाचलं पाहिजे. प्रत्येक आई बापाने हे पुस्तक वाचावं आणि आपल्या मुलांना आवर्जून वाचायला सांगितलं पाहिजे. रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यापेक्षाही पुस्तकातून घेण्यासारखं, विचार करण्यासारखं आणि आपण ते आपल्या जीवनात उपयोगात आणण्यासारखं खूप आहे. आणि हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळतं कि, लेखकाने खूप छोट्या, साध्या आणि सरळ गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण नक्कीच करू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणू शकतो. शेवटी लेखकाने एक स्पीच दिलं आहे. नकळत आपल्याशी संवाद साधला आहे आणि मार्गदर्शनही केलं आहे. ते आवर्जून वाचण्यासारखं!
खाली लेखकाने मांडलेले आणि मला कळलेले काही मुद्दे घेण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत. आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील यात शंकाच नाही.
१ . कमवायला लागल्या पासूनच थोडीफार गुंतवणूक करायला शिका.
२ . अनावश्यक खर्च टाळा. गरज असेल तरच वस्तू खरेदी करा.
३ . जास्तीचे पैसे उगाच उधळपट्टी करण्यापेक्षा चांगल्या योजनेमध्ये गुंतवा.
4. खूपच गरज असेल तरच क्रेडिट कार्ड वापरा. शक्यतो वापरूच नका.
५ . शक्यतो व्यवहार रोखीनेच करा. रोख पैसे जेव्हा हातातून जातात तेव्हा कळते की खर्च होतो आहे. ऑनलाइन किंवा कार्ड स्वॅप करताना पैसे कसे गेले कळतही नाही. मग महिन्याच्या शेवटी उधारी उसनवारी करावी लागते.
६ . क्रेडिट कार्ड कंपाउंड इंटरेस्ट वर काम करते. म्हणून त्याचे धोके वेळीच ओळखून वापर टाळावा.
७ . जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा गुंतवणुकीचे पर्याय शोधा.
८ . आपले असेट्स वाढवा, ना कि लायेबलिटीज.
९ . होम लोन, कार लोन, फर्निचर, या सगळ्या लायेबलिटीज आहेत ना कि असेट्स.
१०. नवीन नोकरी लागला असाल. पैसे हातात यायला लागले, कि लगेच होम लोन घेऊन घर घ्यायच्या मागे लागू नका. दहा पंधरा वर्षे रेंट वर राहिलात तरी चालेल. रेंट भरून शिल्लक राहिलेले पैसे जर 15 वर्षे गुंतवले तर 15 वर्षांनी तुम्ही त्या पैशात स्वतःच घर ऑन कॅश घेऊ शकता, ना कि बँकेचं लोन भरून.
११. होम लोन घेतले असेल तर महिन्याचा हप्ता कमी ठेवा, जेणे करून जास्तीचे पैसे शिल्लक राहतील. काही पैसे एसआयपी मध्यें गुंतवा तर काही पैसे लोनच्या अगेन्स्ट जसे पैसे जमतील तसे भरा. त्यामुळे काय होईल की, गुंतलेल्या पैशानं पैसा वाढेल. आणि लोन अगेन्स्ट जेवढे जास्त पैसे भराल, तेवढे प्रिन्सिपल अमाऊंट कमी होईल. लवकरात लवकर लोन निल करता येईल. व्याजही कमी द्यावे लागेल. विनाकारण बँकेला जास्तीचे व्याज जाणार नाही.
लेखकाला फक्त एवढंच सांगायचं आहे की,
"तुम्ही तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा"
"Your Money should work for you to make money."
~ धन्यवाद
आपला मित्र,
ईश्वर त्रिंबकराव आगम
वडगांव निंबाळकर, बारामती, पुणे.
९१ ९७६६९६४३९८
(लेख आवडल्यास शेयर करा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.)