आघात - एक प्रेम कथा - 13 parashuram mali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आघात - एक प्रेम कथा - 13

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(13)

या वर्षी हा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडणार होता. त्यासाठी मोठी आणि जोरदार तयारी चालू होती. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून जानीमानी बडी हस्ती येणार होती.कॉलेज प्रशासन त्या नियोजनात व्यस्त होते. मात्र यावर्षी प्रत्येक वर्षापेक्षा थोडा बदल करण्यात आला होता. प्रत्येक वर्षी ध्वजारोहण व बक्षिस वितरण कार्यक्रम सकाळीच पार पडत असे. पण बक्षिस वितरणाचा कार्यक्रम दुपारी २ वाजता ठेवण्यात आला होता.

ठरलेल्या दिवशी एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. गुणवंत विद्यार्थ्यांत माझंही नाव होतंच. प्रमुख पाहुणे मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल तासभर उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रम २ वाजता सुरू होणारा तीन सव्वातीन वाजता सुरू झाला. सिनिअर, ज्युनिअर विद्यार्थ्यांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम त्यानंतर पाहुण्यांचं भाषण यामुळे कार्यक्रमाला रंगत आली होती. पण ठरलेल्या पेक्षा कार्यक्रम संपायला खूपच वेळ झाला होता. अंधार गडद झाला होता. पाहुण्याचं भाषण शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि अचानक लाईट गेली. संध्याकाळचे ७.३०वाजले होते. सगळीकडे गोंधळ उडाला. शिक्षकांनी सूचना केल्या पण कुणाचंकुणीही ऐकून घेईना. ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हतं.कुणाचं बोलणं कुणालाच समजत नव्हतं. चारी बाजूंन गोंधळ माजला होता. पाठीमागे असलेल्या एका गटात (सिनिअर विद्यार्थी) मोठी मारामारी चालू होती. मी, सुरेश आणि अनिल जवळच होतो. पण सुरुवातीपासून आमच्या जवळ असलेला संदिप अचानक नाहीसा झाल्याचं पाहून आम्हाला थोडी भीती वाटून गेली. संदिपला शोधण्यासाठी अंधारात आणि गोंधळात तिघेही इकडेतिकडे फिरून शोध घेऊ लागलो. त्याला शोधण्याचं कारण होतं की, सिनिअरच्या आमच्या क्लासमधल्या तीन-चार विद्यार्थ्यांचा एक गट आमच्या विरोधात कार्यरत होता. एखादेवेळी अंधाराचा फायदा घेऊन त्याला एकट्याला पाहून मारहाण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

दुसरीकडे अंधाराचा फायदा घेऊन काही मुलींच्या बाबतीत गैरप्रकार घडले होते. लाईट आली पण तब्बत अर्ध्या तासाने. तोपर्यंत गोंधळ सुरूच होता. कॉलेज प्रशासन हतबल झालं होतं. पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस फौजफाटा बोलावून घेण्यात आला आणि तेव्हा कुठे गोंधळ निवळला. मुलींना घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी संस्थेने प्राचार्यांना धारेवर धरले. पेपरातून छापून आलेल्या बातम्यांनी कॉलेज चर्चेत आलं होतं. कॉलेजची होणारी बदनामी टाळण्यासाठी मंत्र्यांकडून वृत्तपत्रांवर दबाव आणला गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जे व्हायचं तेच झालं. कित्येक वर्षांचे नावाजलेलं कॉलेज काही क्षणातच बदनाम झालं होतं. या कॉलेजमध्ये मुलींना पाठवायला पालक तयार नव्हते.

दंगा घडवून आणणाऱ्यांची तसेच मुलींची छेड काढणाऱ्यांचा तपास आणि शोध घेण्याचे सुरू झाले. तपास अंती २५ ते ३० विद्यार्थ्यांची नावे पुढे आली. त्यात माझं नाव आलेलं पाहून मला धक्काच बसला. मी पूर्णपणे हादरून गेलो. मला वाटलं की ही जाणीवपूर्वक रचलेली माझ्याविरुद्धची खेळी होती. ताबडतोब आम्हांला बोलवून घेऊन आमची सगळयांची चौकशी करण्यात आली. बरेच जण दोषी निघाले. संशयी म्हणून मला ताब्यात घेण्यात आलं होतं. सखोल चौकशी न करता ज्यांची नावे पुढे आली होती त्यांना ताबडतोब कॉलेजमधून काढण्यात आले. मीही त्यामध्ये असल्यामुळे सगळया प्राध्यापकांनी आणि मित्रांनी आश्चर्य व्यक्त केलं. प्राचार्य आणि प्राध्यापकांना खूप विनवण्या करून मी निर्दोष असल्याचं सांगितलं, पण याबाबतीत कुणीही मनावर घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतं, कारण मुळातच कॉलेजच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता. मला काहीच समजेना. झालं. काय करावं आता. कुणाजवळ जावं! या घटनेमुळे माझ्याकडे बघण्याचा सगळयांचा दृष्टिकोन बदलणे साहजिकच होते. पण माझ्या जिवलग मित्रांचा आणि प्राध्यापकांचा नक्कीच माझ्यावर विश्वास होता की मी असा करणार नाही. हॉस्टेलच्या सरांनासुद्धा आश्चर्य वाटणं साहजिकच होतं. त्यांनीही माझी समजून काढली. थोडे दिवस शांत राहण्याची सूचना दिली. या सगळया प्रकरणातून कॉलेज बाहेर पडल्यानंतर तुझ्याबाबत आपण प्राचार्यांकडे विनवणी करू, तोपर्यंत तू शांत रहा. कोणतीही गडबड करण्याचा प्रयत्न करून नको. तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

सरांनी जे सांगितलं होतं ते माझ्या मनाला पटलं. मी कोणतीही घाईगडबड केली नाही. घडलेल्या प्रकरणानंतर कॉलेज आठ दिवस बंद ठेवण्यात आले. माझ्या मित्रांना मला कॉलेजमधून काढून टाकल्याची बातमी समजली होती. सगळे जण मला भेटायला आले होते. त्यामध्ये आकाश, रोहन, सुरज, स्वप्नील तसेच मैत्रिणींमध्ये शबाना, स्नेहल, सुमैया होती. त्यांनी माझी समजूत काढण्याचा तसेच धीर देण्याचा खूप प्रयत्न केला. ही गोष्टी मी खूप मनाला लावून घेतली होती. सुरज, अनिल आणि संदिप तर माझ्याजवळ बसूनच होते. त्यांना तर माझ्याबाबतीत घडलेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटलं होतं. जे काही घडलं होतं ते घरी न कळविण्याचं आम्ही ठरविलं होतं. आजीआजोबांपासून ही गोष्ट लपवणं खूप महत्त्वाचं होतं. त्यांना जर ही गोष्ट समजली तर त्यांना मोठा धक्का बसेल. हे मी जाणून होतो.

कॉलेज सुरू झालं. दोन दिवसांतच मी आणि हॉस्टेलचे सर प्राचार्यांना विनंती करण्यासाठी गेलो. पण त्यांनी मनावर घेतलं नाही. मी अक्षरश: रडकुंडीला आलो होतो. प्राचार्यांच्या पायावर डोकं टेकून रडू लागलो.

‘‘सर माझी काही चुकी नाही. माझी परिस्थिती गरीबीची आहे. मला कॉलेजमधून काढू नका सर! माझ्या आजीआजोबांना मोठा धक्का बसेल सर!’’

‘‘हे बघा कांबळे सर त्याला इथून घेऊन जावा. झालेल्या चुकीबद्दल आम्ही कुणालाही माफ करू शकत नाही.”

‘‘पण सर माझा विश्वास आहे याच्यावर, याचा या प्रकरणामध्ये हात नसेल!’’

‘‘अहो! कांबळे सर असं अधांतर याचा हात नसेल म्हणून काय सांगताय.’’

‘‘पूर्ण विश्वासाअंती ठामपणे तुम्ही सांगू शकता काय? याने काहीच केललं नाही म्हणून.”

‘‘पण सर.’’

‘‘पण वगैरे काहीच सांगू नाका. याला घेऊन जाऊ शकता.’’

कांबळे सर आणि मी नाइलाजाने परत फिरलो होतो. आता काय करायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. मला राहवलं नाही. मी आजोबांना बोलवून घेण्याचं ठरविलं. ही गोष्ट मी हॉस्टेलच्या सरांना सांगण्यास गेलो.

‘‘सर, आजोबांना बोलवून घ्यावं म्हणत होतो.’’

‘‘ठीक आहे! घे बोलवून. त्यांना मीच सांगेन पटवून. बघू तुझ्या आजोबांच्या तब्येतीकडे बघून, त्यांचा आग्रह ऐकून माफ तरी करतील का.’’

‘‘त्या कठोर काळजांच्या लोकांना थोडी तरी दया येते की नाही बघूया.’’

आता या दु:खाच्या क्षणी मला आधार होता तो फक्त हॉस्टेलच्या कांबळेसरांचा आणि माझ्या मित्रांचा. सरांच्या सांगण्यानूसार मी आजोबांनाबोलवून घेतलं. आजोबा निरोप पाठवताच गडबडीने आले. अचानक बोलवून घेण्याचं कारण त्यांना माहीत नव्हतं. आजोबा दाखल होतात न होतात तोच उत्सुकतेने मला त्यांनी प्रश्न केला.

‘‘का निरोप पाठवला होतास बाळा? काय पाहिजे व्हतं?’’

‘‘मला बोलावून घेण्यापेक्षा रविवारचं गावाकडे येऊन जायाचं. ह्या तब्येतीनं आता पूर्वीसारखं यायला नाही जमत.’’

माझं आणि आजोबांचं बोलणं चालू होतं. इतक्यात सुरेशनं कांबळे सरांना बोलवून घेतलं. कांबळे सरांना पाहताच आजोबांनी -

‘‘नमस्कार सर.’’

‘‘नमस्कार आजोबा, कधी आलात?’’

‘‘आतायचं आलूया. पोरानं निरोप पाठविला होता. म्हटलं बघावं काय म्हणतुया?’’

‘‘बरं बरं काय म्हणतोय नातू आणि तुमची तब्येत बरी हाय काय?’’

‘‘कुठली बरी साहेब. बरीच हाय म्हणायचं. नातवामधी जीव आडीकतोया म्हणून राहवत नाही. लक्ष आसू दे साहेब पोराकडं आमच्या.’’

‘‘आहे, आहे काही काळजी करू नका.’’ असे म्हणून सर आपल्या घराकडे गेले. जाताना मला पाच-दहा मिनिटाने आजोबांना घरी घेऊन यायला सांगून गेले. मी आजोबांना घेऊन घरी गेलो.

‘‘या आजोबा बसा.’’ सरांनी खुर्ची पुढे केली.

‘‘प्रशांत, तू तुझ्या खोलीत जा.’’

‘‘ठीक आहे! सर.’’

म्हणून मी बाहेर आलो. मला बाहेर पाठवून देण्याचं कारण माझ्या लक्षात आलं. थोड्याच वेळात सर आणि आजोबा बाहेर आले. आजोबांचा चेहरा थोडा गंभीर दिसत होता. माझ्या खोलीमध्ये आम्ही चौघेही होतो.

‘‘पोरा इकडे ये.’’

मी आजोबांजवळ गेलो.

‘‘पोरा तू त्या घडलेल्या प्रकरणामध्ये नक्की नव्हतास नव्हं?’’

‘‘नाही आज्जा, या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही.’’

‘‘माझ्या पोरावर माझा शंभर टक्के विश्वास हाय! चला आताच जाऊ आपण प्राचार्य साहेबांकड.’’

कांबळे सर, मी आणि आजोबा पुन्हा प्राचार्यांना विनवण्या करण्यासाठी कॉलेजवर गेलो. प्राचार्य ऑफिसमध्येच होते. आम्ही ऑफिसमध्ये गेलो.

*****