Aaghat - Ek Pramkatha - 12 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 12

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(12)

‘‘असं रडायला काय झालं? कारण तरी समजले का मला?’’

‘‘प्रशांत, सुमैयानं माझ्याशी भांडण काढलं.’’

‘‘का? कशासाठी?’’

‘‘तसं दुसरं तिसरं काहीच कारण नाही.’’

‘‘मग कारण आहे तरी काय?’’

‘‘तुझं आणि माझं बोलणं.”

“म्हणजे?”

‘‘तिचं मत आहे, मी तुझ्याशी बोलू नये अथवा मैत्री करू नये.’’

‘‘का पण?’’

‘‘देव जाणे! तिच्या मनात काय पाप आहे ते?’’

‘‘तुला आणखी काही म्हणत होती काय?’’

‘‘हो. पुन्हा त्याच्या नादी लागशील तर परिणाम वाईट होतील,अशी धमकी देऊन गेली.”

“सुमैया आणि धमकी देणं शक्य नाही.”

“शक्य आहे हे प्रशांत! तिनं चारचौघात मला तसं बोललीयं.”

सुमैयाचा मला खूप राग आला होता. मी तिला भेटण्यासाठी म्हणून घरी गेलो होतो. ती मला भेटली नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर तिला विचारावं असं ठरविलं पण दोन दिवस ती कॉलेजला आलीच नाही. शबानाकडून तिनं मला एक पत्र पाठविलं होतं. त्या पत्रात तिनं लिहिलं होतं,

‘‘प्रशांत, तू माझा सर्वात जवळचा आणि प्रिय मित्र आहेस. मी तुला सावध करण्यासाठी हे पत्र लिहिते आहे, की तू सरिताच्या नादी लागू नकोस. ती मुलगी वाईट आहे. तिचं आणि एका मुलाचं प्रेम प्रकरण आहे. कॉलेजच्या सरांनाही गोष्ट समजली आहे. त्यामुळे त्या मुलावर आणि सरितावर सर चिडून आहेस. तू तिच्या संपर्कात राहिल्यास कदाचित तुझ्यावर त्यांचा संशय येईल. हे संकट कारण नसताना तुझ्यावर ओढवू नये म्हणून मला पत्र लिहावं लागलं.माझी शपथ आहे तुला. तू तिच्याशी बोलू नकोस. माझं हे सारं खोटं वाटत असेल तर तू चौकशी करून पहा.’’ सुमैयावर माझा पूर्ण विश्वास होता. चौकशी करायची काही एक गरजच नव्हती. मी सरिताशी बोलणं सोडून दिलं. मी सरिताला न बोलण्याची सूचना केली तसं ती म्हणाली,

‘‘अरे, पण माझी चुकी तरी काय आहे?’’

‘‘अरे दुसऱ्याला बदनाम करायला ती मागे पुढे बघणार नाही.’’

‘‘ती माझ्याबद्दल तुझ्या मनात गैरसमज निर्माण करीत आहे. कारण मी तुझ्याशी बोललेलं तिच्या मनाला टोचतं, कारण तिच्या मनात असलेलं पाप.’’

‘‘मी तिच्याबाबत एक वाईट शब्दही खपवून घेणार नाही.”

‘इतका तिच्यावर विश्वास आहे तर ठीक आहे! माझ्याशी असलेलं मैत्रीचे संबंध तोडून टाक पण एक लक्षात ठेव, एक दिवस तू नक्कीच पस्तावणार आहेस.’’

सरिता रागारागाने जे बोलायचं ते बोलली आणि निघून गेली. पण सुमैयावर माझा पूर्ण विश्वास होता. तिनं जे सांगितलं होतं ते चांगल्यासाठीच असणार या विश्वासावर. कधी कधी मनाला वाटून जायचं कशाला हवी मुलींशी मैत्री? कशाला हव्या गप्पाटप्पा, निष्कारण वायफळ बडबड आणि मग गैरसमजातून वाईटपण, आपल्यासारख्यानं या सर्वांपासून अलिप्त राहिलं पाहिजे. आपलं नातं पुस्तकाऐवजी कोणाशीही नाही असं समजून. काय अधिकार आहे आपल्याला फिरण्याचा?मस्त मजेत जगण्याचा? त्यांचे आई व वडील आहेत. शेती, घर, पैसा, संपत्ती सारं काही आहे. तसं आपलं काय आहे? आपण अजून शून्य आहोता. शून्यातून आपल्याला एक नवं विश्व निर्माण करायचं आहे.

आजपर्यंत मी माझ्या मनाला ज्या गोष्टी योग्य वाटतील त्या करीत आलोय. अयोग्य गोष्टी नेहमीच टाळण्याचा प्रयत्न मी केलाय. मित्रमैत्रिणींपासून दूर राहण्याचा कित्येक वेळा मी प्रयत्न केला पण आजपर्यंत ते मला कधीच जमलं नाही.

थोडे दिवस अलिप्त राहीन. नेहमी अलिप्त राहणं मला कधीच जमलं नाही.

आईवडिलांपासून दुरावलो. लहानपणी त्यांचा सहवास मिळाला नाही, सुख मिळालं नाही. त्यानंतर आजीआजोबांचं प्रेम मिळालं, पण त्यांच्याजवळ राहण्याचं भाग्य लाभलं नाही. शिक्षणासाठी परगावी यावं लागलं त्यामुळे वाट्याला आलेला एकांत, आता एकटं जगणं, या विचारानं अंगावर काटे येतात. नको वाटतं असलं जगणं. असह्य होऊन जातं.

मित्रांच्यात असलं की खूप मोकळं मोकळं वाटतं. मनाची तगमग दूर होते. एकमेकांचं सुख-दु:खं सांगण्यानं मने मोकळी होतात. घुसमटलेला श्वास बाहेर पडतो. गप्पा मारणं, इकडेतिकडे फिरणं, जोक्स सांगणे, गाण्यांच्या भेंड्या तसेच एखादे वेळी सिनेमाला जाणे हे सारं असायचं पण एक पथ्य पाळलं होतं ते म्हणजे हे सारं प्रमाणात असायचे, मर्यादीत असायचे. मर्यादेच्या चाकोरीत राहून जे काही करायचे ते केलं जायचं. डोळयासमोर परिस्थिती सतत तरंगत राहायची.

एखादेवेळी एखादी वस्तू घेण्यासाठी पैशाची टंचाई खूप जाणवायची. पण कुणापुढे कधीच हात पसरायचो नाही. माझ्या स्वाभिमानी मनाला ते पटायचं नाही. एखादेवेळी अत्यावश्यक गरज असली पैशाची तर कांबळे सरांकडून पैसे घ्यायचो. पण वेळच्यावेळी परत करायचो. इतर मुलं कॉलेज जीवनात खुप एन्जॉय करायची. चहा-नाष्टा, जेवण, दररोजच्या पाटर्या, पान, तंबाखू, सिगरेट धुरात बेभान व्हायची. हे सारं बघितल्यावर मला माझ्या परिस्थितीची आठवण यायची. साधा चहा प्यायचा झाला तरी हजारवेळा विचार करावा लागला. हात आखडला जायचा एक रुपयासाठी.

महिना दीड महिन्याने आजोबा यायचे. पाचपन्नास रुपये देऊन जायचे. थोडे पैसे खर्च व्हायचे. बाकीचे जसेच्या तसेच शिल्लक असायचे.

कारण तो एक परिस्थितीच्या जाणीवेचा भाग होता.

शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी अवांतर वाचन करणे मी पसंत करायचो. कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे वाचायचो. तो सर्वात मोठा विरंगुळा होता. वाचता-वाचता त्या पुस्तकातल्या प्रसंगानुरूप भावविवश होऊन रडायचो. कधी इर्षेने पेटून उठायचो तर कधी खळखळून हसायचो. माझ्या तिघा मित्रांना माझं खूप आश्चर्य वाटायचं. मीच माझ्याशी वेड्यासारखं बोलतोय असं वाटायचं. आणि ते माझं ते वेड्यासारखं हावभाव पाहून मला हसायचे. या साऱ्या वाचनामुळे माझे विचार थोडे प्रगल्भ झाले होते. मलाही काहीतरी लिहावं, चार लोकांनी ते वाचाचं आणि कौतुक करावं असं वाटायचं. एक दिवस मी लिहिलेली कविता घेऊन आमच्या मराठीचे प्रा. आलासे सरांकडे गेलो.

‘‘काय काम काढलंस, प्रशांत?’’सरांनी मला प्रश्न केला.

‘‘काही नाही सर कविता दाखवायची होती.’’

मी जरा दचकत-दचकत बोललो. सर स्टाफरुममध्ये होते.

‘‘अरे व्वा! प्रशांत कविता कधीपासून लिहायला लागलास?’’ हे ऐकल्यानंतर माझा चेहरा थोडा पडला.

‘‘अरे! असा चेहरा का पडला तुझा? मी तुला कविता लिहिलंस म्हणजे वाईट नाही म्हटलं. उलट तू कविता लिहितोस ही चांगली गोष्ट आहे. जो समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करतो, ज्याला माणसं कळतात, ज्यानं जीवनात कटू प्रसंग अनुभवले आहेत. त्याचं प्रतिबिंब कवितेतून उमटत असतं. तुझी प्रतिभा इतकी चांगली आहे, म्हणून तू हे करू शकतोस. लिही-लिहीत रहा. खूप खूप लिही. माझा आशीर्वाद आहे. मी हे सारं तुला कवितेसंदर्भात बोलतोय. पण तू अजून मला कविता नाही दाखविली. बघू जरा वाचून.’’

‘‘हे घ्या सर!’’

मी चटकन वही पुढे केली. सरांनी ती कविता स्टाफरूममध्ये मोठ्यानेच वाचायला सुरूवात केली. मला वाटलं कविता वाचून संपल्यानंतर मी लगेच निघणार. पण तसं काही झालं नाही.

कविता वाचून झाली आणि आलासे सरांच्या बरोबर सगळयांनीच माझं भरभरून कौतुक केलं. खरंच इतकी चांगली कविता मी लिहिलीय का? याचा माझा मलाच विश्वास बसेना, पण मी खरंच चांगली कविता लिहिली होती. आलासे सरांनी त्याची एक प्रत मागवून घेतली होती. आश्चर्य म्हणजे चारच दिवसात ती ‘दै. पुढारी’मधील ‘बहार’ च्या अंकात छापून आल्यावर त्या दिवशी अक्षरश: हवेतच होतो. जो भेटेल त्याला मी माझी कविता वाचायला द्यायचो. हे सारं झालं होतं आलासे सरांच्या कृपेने. त्यांनीच माझी कविता पेपरला दिली होती. तेव्हापासून मला वाटायला लागलं की आपण लिहितोय ते लोकांना पटतंय, आपण जे लिहितोय ते योग्य आहे, तेव्हापासून मला लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. माझ्या लिखाणाला प्रोत्साहन मिळत गेलं. माझ्या त्याच कवितेचं हॉस्टेलच्या कांबळे सरांनी भरभरून कौतुक केलं. आणि माझं उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचं महत्त्व पटवून सांगितलं. तिथून पुढे माझा वाचनाचा आणि लिहिण्याचा छंद वाढत गेला.

प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टच्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्धार्थ्याचा सत्कार समारंभ कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येत असे.

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED