प्रेम असे ही (भाग 4) निलेश गोगरकर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम असे ही (भाग 4)

मागील भागावरून पुढे...

त्याच्या घरून आरती तिच्या घरी आली..

" काय ग खूप उशीर केलास ? जेवायला वाढू ?" आईने विचारले.

" नको मी जेऊन आलीय ... अग तो खुप आजारी होता. आता बरा आहे पण अशक्तपणा आहे. त्यात चार दिवस धड जेवण नाही.. म्हणून मग मी जेवण बनवले. मग त्याच्या बरोबरच थोडे खाल्ले...."

" आरती तुझ्या बाबतीत काय घडलेय हे लक्षात ठेव.. जास्त कोणावर विश्वास ठेवू नकोस..." आई तिला सूचक इशारा देत म्हणाली...

" हो ग... आई... मला माहित आहे... पण तो तसा मुलगा नाही... खूप चांगला आहे....खूप दिवसांनी आरतीने कोणत्या तरी मुलाची चांगला आहे. " म्हणून स्तुती केली होती. आई ते बघून जरा सुखावली... नाहीतर तिच्या बाबतीत जे घडले तेव्हा पासून ती फारशी कोणात मिसळत नव्हती.. पण तिला मुंबईला घेऊन येण्याचा त्यांचा इरादा सार्थक झाला होता. इथे कोणाला तिच्या बद्दल माहित नव्हते. आणी त्यामुळे तिचे जगणे काहीसे सुसह्य झाले होते. हळूहळू ती त्या धक्क्यातून बाहेर येत होती. आणी आता तर करण बरोबर तिचे चांगले जमत आहे बघून आईने सुटकेचा श्वास सोडला होता..तिने झाले ते विसरून पुढे जाणे भाग होते आणी त्याच प्रयत्नात आई बाबा तिला मुंबई ला घेऊन आले होते. आता त्यांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळायला सुरवात झाली होती...

दोन दिवसा नंतर करण कामाला यायला लागला.. नेहमी प्रमाणे त्यांच्या कँटीन मधील भेटी चालू होत्या... त्याच्याशी तिथेच मनसोक्त बोलता येत असे कारण एकदा का ते ऑफिस ला गेले की तो त्याच्या केबिन ला आणी ती तिच्या टेबल कडे... त्यामुळे मग बोलणे तर सोडा साधे बघणे ही होत नसे...
आता ती त्याच्या बरोबर बरीचशी मोकळी झाली होती.. पण तरीही मनात थोडीशी भीती अजून पण होतीच.. असेच अजून एखादा महिना गेला... आणी मग ऑफिस मध्ये पिकनिकला जायची त्याची गडबड चालू झाली.. म्हणजे दरवर्षीच सगळा ऑफिस पिकनिक ला जायचा आरती नवीन असल्यामुळे तिला माहित नव्हते इतकेच..
आपल्या सगळ्या एम्प्लॉईज साठी पटवर्धन सर दोन दिवसाची पिकनिक अरेंज करायचे... कामात ते जरी खूप स्ट्रिक्ट असले तरी.. असे पिकनिक सारखे उपक्रम पण त्यांनीच चालू केले होते... दोन दिवस होणारा सगळं खर्च कंपनी देत असे... शनिवार आणी रविवार असे दोन दिवस पिकनिक जायची होती..

सगळे एकदम उत्साहात होते.. कुठे जायचे ? काय घ्यायचे ? कशाने जायचे ? ह्याची चर्चा आता लंच टाइम मध्ये हिरीरीने रंगू लागली... आरती ते सगळे ऐकत होती.. त्यात आधीच्या काही पिकनिक चे किस्से , कोणाची , कशी झालेली फजिती.. सगळे एकदम रंगून रंगून सांगत होते..

तिला मनातून खूप इच्छा होती की आपण पण जावे. पण आईबाबा परवानगी देणार नाहीत ह्याची तिला खात्री होती... म्हणून ती फक्त ऐकण्याचे काम करत होती..
आणी जेव्हा सगळ्यांची नावे लिहण्यात आली तेव्हा त्यात दोघांच्या नावाची कमी होती... आरती आणी करण... त्याचे नाव नसल्याने तीचा पण उत्साह मावळला.. तोच एकतर होता ज्याच्यावर ती विश्वास ठेऊ शकत होती.. बाकी इतर कोणत्याही मुलाशी ती फारशे कधी बोललीच नव्हती... आणी आता जर तोच येत नाही तर आपण तरी जाऊन काय करणार ? आणी कोणाच्या भरवश्यावर जाणार ?

फायनल लिस्ट अप्रूव्हल साठी करण समोर आली... त्याने त्यावरून एक नजर फिरवली.. त्यात तिचे नाव नव्हते.. त्याने तिला केबिन ला बोलावले.

" आरती , तु पिकनिक ला जातं नाहीस...? मी कारण विचारू शकतो का ? " त्याने तिला हळुवार आवाजात विचारले...

" आईबाबा पाठवणार नाहीत... "

" का ? " पण ती काहीच बोलली नाही...

" मी बोलू का आईबाबाशी ? "

" नको... कदाचित तु असतास तर त्यांनी पाठवले ही असते.. पण.. "

" ठीक आहे... मी पण येतो.. मला डॉक्टरांनी पाण्यात खेळण्यापासून दूर राहायला सांगितले आहे.. ताप होता नां दोन-तीन दिवस... दोन तीन महिने काळजी घ्यायला सांगितले होती . म्हणून मी येत नव्हतो... पण जर फक्त मी जातं नाही म्हणून जर तु येणार नशील तर मग मी येतो.. "
" आईबाबानां फोन करावा लागेल का ? "

" ह्म्म्म... "

" बरं मी आज संध्याकाळी फोन करतो.. तु जा.."
त्याच संध्याकाळी त्याने तिच्या बाबानां फोन केला.. तिची सगळी काळजी घेईन. आणी सगळे ऑफिस पिकनिक ला जात असल्याने प्लिज तिला पण पाठवा म्हणून गळ घातली... शेवटी त्याच्या विनवणीला त्यांना टाळता आले नाही.. आणी आरतीला पिकनिक ला जायला परवानगी मिळाली...
शेवटी पिकनिकला जायचा दिवस उजाडला.. पहाटे सगळे लवकर ऑफिस ला पोचले.. नेहमी घड्याळाच्या काट्यावर ऑफिसला येणारे आज सगळ्यात आधी ऑफिस ला हजर होते.... खेळण्यासाठी बॅट , बॉल.. हौजी... फुटबॉल अशी सगळी जय्यत तयारीनिशी अति उत्साहांत ऑफिस मधील काही आले होते... बाकीचे आपल्या कपड्याच्या बॅगा खांद्यावर लावून सगळे येण्याची वाट पाहत होते..
दोन मोठ्या पस्तीस सीटर लक्जरी बस त्यांना रिसॉर्ट ला नेण्यासाठी गेट वर सज्ज होत्या... कोण कोणत्या बस मध्ये बसणार हे आधीच सगळ्यांनी ठरवले होते.. त्या प्रमाणे सगळे आपापल्या बस मध्ये बसले... करण , आरती , जुई आणी रीमा चौघे एकाच बस मध्ये बसले..
सगळे स्थानापन्न झाल्यावर " गणपती बाप्पा मोरया " चा गजर झाला आणी बस नी त्यांच्या इच्छित स्थळाकडे धावायला सुरवात केली..
लोणावळा येथील ग्रीन हिल रिसॉर्ट आणी वॉटरपार्क इथे त्यांना जायचे होते. साधारण अडीच एक तासाचा प्रवास होता.. आणी असाच प्रवास थोडीच होतो...
कोणी गाणे म्हणतं होते आणी सगळे त्याला कोरस मध्ये साथ देणार होते.. गाणे संपले की , टाळ्या आणी शिट्या चा पाऊस पडत होता... आरती पण खूप खुश होती. बरं झालं ती पिकनिक ला आली नाहीतर एक छान अनुभव तिने मिस केला असता..

" ए आता अंताक्षरी खेळू या..." रीमा ने थोड्या वेळानी थोडा मूड चेंज करण्यासाठी म्हंटले...

" हां... चला.. चला.... पण अशी मज्जा नाही येणार... लेडीज v/s जेन्टस ... " मागून कोणाचा तरी आवाज आला... आणी बहुमताने तो स्वीकारला गेला..

" चला... " आणी मग त्यांच्यात एक चढाओढ लागली.. काही झाले तरी कोणी हार जातं नव्हते... आरती हसून फक्त त्यांच्यात टाळ्या वाजवून साथ देत होती... तीचा सहभाग अजून पर्यंत इतकाच होता.. अशी लोकात इतक्या मोकळ्यापाणी मिसळण्याची आता आता तिला सवयच राहिली नव्हती.... करण मात्र हिरिरीनं गाणी गात होता... त्याला अगोदर पासून गाण्याचे वेड होते.. आराध्या सोबत असताना कार मध्ये गाणी लावून दूर दूर फिरायला जाणे ही त्यांची आवड होती... त्या गाण्यातील नायक , नायिका ह्यांच्या जागी स्वतःला कल्पून त्यात बुडून जाणे हे एकदम जबरदस्त अनुभव असायचा...

" ह्म्म्म.... त.. आला...." गाणे संपल्यावर

" तेरे चेहेरे से... नजर नही हटती..." रीमा ने गाणे गायला सुरवातच केली होती की , " हे झालाय... हे झालंय...." एकदम मुलांकडून कल्ला झाला...

" बरं... तेरे मेरे बीच मै..." हे पण झालंय... पुन्हा कल्ला...

आता सगळ्या मुली विचारत पडल्या.. बराच वेळ त्यांच्यात चढाओढ चालू असल्यामुळे बहुतेक ओठावर असलेली गाणी गाऊन झाली होती... सगळ्या एकमेकींच्या चेहऱ्याकडे टकामका बघत होत्या....

" ह्म्म्म... लवकर... सगळा दिवस नाही हां तुमच्या कडे..." करण मुद्दाम त्यांना खिजवत म्हणाला.. त्यामुळे त्या आणखीन भडकल्या... एकमेकींना विचारू लागल्या... आणी अचानक...

" तुमको देखा... तो ये... खयाल आया... जिंदगी धूप , तुम घना छाया.... " अचानक आरतीने आपल्या गोड आवाजात ती गजल गायला सुरवात केली...
आह... काय गझल? आणी काय मधाळ आवाज? वाह... अचानक तिथे सगळे टाळ्या वाजवून तिला साथ देऊ लागले.. क्षणात तेथील मूड बदली झाला... आता सगळे तिच्याबरोबर गात होते... करण ते बघून एकदम सर्द झाला.. अचानक तिने त्याच्या आवडत्या गाण्यावर मोर्चा वळवला होता... आधीच ती गझल त्याला एकदम प्रिय त्यात तिचा तो मखमली , मधाळ आवाज... गझल मधील हरकती आणी श्वास घेण्याच्या जागेची असलेली जाण त्याने ते एकदम सुश्रवणीय झाले होते...क्षणभरा साठी तिने मान वळवून त्याच्या डोळ्यात डोळे टाकले.. आणी खल्लास....

" य -- आला...." मुली ओरडू लागल्या.. आणी तो भानावर आला...

" यु तो हमने लाख हसी देखे है... तुमसा नही देखा..." अचानक त्याच्या तोंडून गाणे निघाले... त्यांनी सुरवात केली आणी मग पुढे मुलांनी ते गाणे बोलायला सुरवात केली.. आता त्यांची नजरानजर झाली की ती लाजून आपली नजर वळवून घेई...
खूप वेळ हां खेळ चालू होता.. आणी करण च्या हृदयात धडधड वाढली होती...

शेवटी एकदाचे ते दहा वाजता रिसॉर्ट वर पोहोचले... सगळ्यांना त्यांच्या रूम्स देऊन.. मग चेंज वैगरे करून परत अर्ध्या तासांनी सगळ्यांनी स्विमिंग पूल वर भेटायचे ठरले.. चार जण एक रूम शेअर करत होते...

स्विमिंग पूल मध्ये पण सगळे धमाल करत होते... आरती पूल च्या जवळ अगदी कमी पाण्यात जेमतेम भिजून मज्जा घेत होती.. करण मात्र पाण्यात उतरला नसला तरी त्याचे लक्ष तिच्यावर होते... तिच्या बाबानां त्याने तसा शब्द दिला होता नां...

ती गोरीपान... अंगानी भरलेली... आणी आता तर पाण्यात भिजली असताना तर एकदम हॉट दिसत होती.. तिच्या बरोबर रीमा आणी जुई होत्या म्हणजे जास्त काळजी करण्या सारखे काही नव्हते.. म्हणून आपल्या उपस्थितीत त्यांना अवघडल्या सारखे होऊ नये म्हणून तो काहीसा बाजूला जाऊन बसला.. त्यांच्या मित्रानी आपला स्टॉक सोबत आणला होता... तो पण नेहमी पीत असे म्हणून ते त्याला खूप आग्रह करत होते.. पण आज तिची जबाबदारी आपल्यावर असताना अजिबात प्यायचे नाही हे त्याने पक्के ठरवून टाकले होते.. त्यामुळे त्यांनी त्यांना नकार देत त्यांना चालू राहु देत म्हणून इशारा केला...

बराच वेळ सगळे मज्जा करत होते... आरती पण आता जरा खुलली होती.. ती पण जुई आणी रीमा बरोबर पाण्यात मस्ती करत होती..
पण सगळ्याच ठिकाणी नालायक लोक भरलेले असतात.. तसेच आताही काही दुसरे लोक पण रिसॉर्ट मध्ये आले होते... मुली आणी त्या पण स्विमिंग पूल मध्ये बघितल्यावर त्यांना पण मस्ती करायची लहर आली.. त्यातील चार जणांनी ह्या तिघींची मुद्दाम कळ काढायला सुरवात केली... मुद्दाम त्यांच्यात बॉल फेकणे , मुद्दाम त्यांच्या बाजूला उड्या मारणे.. असे प्रकार चालू होते.. त्या तिघी घाबरल्या... त्यांनी आजूबाजूला पाहिले तर करण तिथे नव्हता..
त्यांचे ते भेदरलेले चेहरे बघून त्यांना आणखीन चेव आला.. आता त्यांची हिम्मत आणखीन वाढली... आता त्यांना स्पर्श करण्यापर्यंत त्यांची हिम्मत गेली आणी शेवटी तिघी पाण्यातून बाहेर आल्या आणी त्यांच्या पाठोपाठ ते चौघे पण बाहेर आले.. आणी त्यांच्या पाटोपाठ ते पण पूल मधून बाहेर आले... आरती अचानक झालेल्या ह्या प्रकाराने खूप घाबरली होती..
त्या चौघांनी आज त्यांना अजिबात सोडायचे नाही असेच बहुतेक ठरवले असावे.. आणी लांबून करण ने ते पाहिले.. त्या तिघींचे चेहरे बघूनच काय घडले असावे हे त्याच्या लक्षात आले.. आणी तो ताडकन त्या चौघांना भिडला... सुरवातीला वाद झाले आणी प्रकरण हातघाईवर आले.. आणी अचानक त्यातल्या एकाने करण ला जोरात ढकलले आणी झालेल्या प्रकाराने बेसावध असलेला करण तोल जाऊन पडला आणी त्याच्या पायाला मुरगळले तरीही तो उठला आणी पुन्हा त्यांना जाब विचारू लागला... तेव्हड्यात त्याच्या ऑफिसचे सगळे मित्र जमा झाले..
ह्यांनी करण ला मारले.. रीमा ने सांगितले.. मग आणखीन काय हवे होते..

सगळ्यांनी मिळून त्या चोघांना असा काही धुतला की विचारत सोय नव्हती... शेवटी रिसॉर्ट च्या मालकांनी पोलीस बोलावले.. आणी प्रकरण शांत झाले.. झालेला प्रकार तिघींनी पोलिसांना कथन केला आणी रिसॉर्टच्या cctv मध्ये सगळा प्रकार कैद झाला असल्यानी त्या बद्दल चा पुरावा ही होता... मग काय पोलिसांनी पण त्यांना जाम झोडले...त्या चौघांना चांगले रात्रभर फोडून काढा.. असा आदेशच त्यांना वरून आला.. आता ह्यात करणच्या ओळखी कुठे कुठे आहेत हे कळण्यासाठी एव्हडे पुष्कळ होते... प्रकरण शांत झाल्यावर सगळे जेवायला निघाले... आधीच खुप उशीर झाला होता.. करण चा पाय मुरगळल्या कारणाने त्याला एक दोघांनी आधार दिला आणी त्याला जेवायला नेले...

कसाबसा तो जेवला.. काही वेळ आराम करून सगळे पुन्हा पाण्यात गेले... तो मात्र पूलच्या एका बाजूला एकटाच बसला.

" खूप दुखतोय का रे पाय..? " त्याने मान वळवून पाहिले...
आरती होती.. ती त्याच्या बाजूला येऊन बसली...

" नाही फार नाही... दोन-चार दिवसात बरा होईल.. "

" थँक्स करण... मी खुपच घाबरली होती... "

" त्यात घाबरायचे काय ? एक चांगली लावून द्यायची नां.. अश्या लोकांना वठणीवर आणायला असेच वागावे लागते..." तो संतापाने बोलला...

" अरे तुमच्यासाठी हे सोपे आहे पण... आम्हा मुलींना नाहीना अशी हिम्मत होत.. "

" मग अशी हिम्मत करायला शिका... त्याशिवाय अश्या प्रकाराला आळा बसणार नाही.... आता पुढे कोणत्या मुलीकडे बघायची त्यांची हिम्मत होणार नाही अशी सोयच करून आलोय... आज रात्री त्यांचा असा काही पाहुणचार होणार आहे की , पुढे कधी कोणत्या मुली कडे डोळा वर करून बघणार नाहीत.. "

तिला माहित होते तो बोलला म्हणजे तसेच होणार.. आता पण रूम मध्ये रीमा आणी जुई सांगत होत्या त्याच्या ओळखी खूप मोठ्या मोठया लोकांशी आहेत.. पटवर्धन ग्रुप ऑफ कंपनीज चा होणारा उत्तराधिकारी होता तो .. त्याला दुखावून कोणाला चालणार होते....

" तु नाही गेलीस पाण्यात.... जा आता कोणी तुझ्या वाटेला जाणार नाही... "

" नको.. "

" का ग..? अजून भीती वाटतेय का ? "

" कसली भीती ? तु असताना मला कसली आलीय भीती..." तिने विचारले.. त्यावर तो मंद हसला...

" आमच्या मुळे तु पाय मुरगाळून बसला आहेस . मी सोबत आहे म्हणून आज दारू च्या एका थेंबाला पण तु स्पर्श केला नाहीस... मग मी तुझ्या जवळ बसून गप्पा नाही का मारू शकत...? पिकनिक ला काय पुढच्या वर्षी परत पण येऊ.. " ती पुढे म्हणाली...

त्या नंतर दोघेच गप्पा मारत बसले... सगळ्याच्या समोर होते पण तरीही सगळ्याहुन लांब दोघे आपल्याच विश्वात गप्पा मारत बसले होते...
त्यात ती कुठून आली , गाव कोणते वैगरे विचारून बोलायला सुरवात झाली होती.. आपल्या बरोबर घडलेला प्रकार सोडून तिने सगळे खरे खरे सांगितले.. तिला कोणाची दया , सांत्वन नकॊ होते . आणी त्याच बरोबर झालेला प्रकार कोणाला सांगून आपल्यावर कोणी बोट उचलावे हे ही तिला मान्य नव्हते. म्हणून आपल्या बरोबर घडलेला प्रकार तिने त्याच्या पासून लपवून ठेवला..

संध्याकाळ चे पाच वाजले पण पूल मधून कोणी बाहेर यायला तयार नव्हते म्हणून मग ते दोघेच चहा घ्यायला उठले.. त्याला एका पायानी चालणे काहीशे जड जातं होते म्हणून ती त्याला आधार देत होती.. आणी तिचा आधार घेण्यासाठी त्याला तिच्या खांद्यावर हात टाकावा लागला... त्याला अगदी व्यवस्थित आधार देत दोघे हळूहळू चालत होते. त्याच्या सगळ्या शरीराचा भार तिच्यावर होता.. पण आज तिला त्याबद्दल काहीच वाटले नाही....

दुसऱ्या दिवशी पण ती त्याच्या बरोबरच होती...तिचा असा जवळचा सहवास सोबत कोणी नाही.. त्याच्या मनात आता मात्र ती घर करायला लागली.. ती दिसायला आराध्या इतकी सुंदर नसली तरी छान होती... लहान बाळा सारखी त्याची काळजी घेत होती...न कंटाळता त्याच्या बरोबर तासनतास गप्पा मारत होती...पण
" दुधाने पोळलेला नंतर ताक पण फुकून पितो "... ह्या उक्ती प्रमाणे त्याने जरा सबुरीने घेण्याचे ठरवले... तिच्या वागण्या बोलण्यातून ती त्याच्यावर प्रेम करत असेल किंव्हा त्याला लाईक करतेय असे काही त्याला दिसून येत नव्हतं.. आणी काहीही खातरजमा न करता विचारणे म्हणजे एक चांगली मैत्रीण गमावणे... हे न कळण्या एव्हडा तो काही दुधखुळा नव्हता...

पिकनिक झाली... त्यानंतर सगळे परत आले....असेच अजून काही दिवस गेले.. पण मागच्या दोन दिवसातील त्याच्या सहवासात आरती हळूहळू तिचा भूतकाळ विसरायला लागली होती... ती आता आनंदी राहू लागली होती.. कामाला जाताना आता तिचे आपले कपडे , मेकअप ह्या सारख्या गोष्टीवर लक्ष असायचे. घरी असताना त्याच्या बरोबर फोन वर बोलताना तिच्या चेहऱ्यावर चमक यायची.. आणी ही गोष्ट लवकरच आई आणी बाबाच्या लक्षात आली...

पुढील भाग लवकरच....

© सर्वाधिकार लेखकाकडे...