अंधारछाया
बारा
मंगला
संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात आले.
त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले.
पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले.
गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला.’
परवा म्हणाली, ‘मी माझ्या मैत्रिणीला पत्र पाठवणार आहे.’ पण मग बराच वेळ थांबून लिहिलेन ते आईला पत्र. मला वाचायला दिलेन. विचार आला काय लिहिलेय कोणास ठाऊक! काका-काकूला कळवलेलं नाही हे आम्ही तिला सांगितलेलं नव्हते! वाचले तर काहीच उल्लेख नव्हता, बाधेबिधेचा. मंत्र घेतलाय एक मनःशांतीसाठी असा मोघम उल्लेख होता. पत्र घडी करून पाकिटात घातले तशी म्हणाली, ‘दादांना दाखवून टाकीन म्हणते.’
हे आले तशी सायकल ठेवता ठेवता त्यांच्या हातात हिने पत्र ठेवले. वाचता वाचता हे म्हणाले, ‘काय ग? हे तू तिला लिहायला सांगून तिने लिहिलेलं दिसतेय?’
‘छे हो, मी कशाला? तिनेच लिहिलेय मनाने.’ तशी त्यांना हसायला आलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते!
शशी
आल्या आल्या चपला काढून फेकल्या. हातपाय धुतले. शाळेतली हाफपँट बदलली. इतक्यात सुभ्याची हाक आली क्रिकेट खेळायला. आम्ही जाणार होतो स्टेशनच्या पलिकडे. हरीष प्रतापच्या टीममधे प्रॅक्टीससाठी बोलावले होतेन त्याने. आज वर्गात त्याच्या शेजारी बसलो होतो. म्हणाला, ‘कुम्या हळिंगळेच्या टीमशी मॅच आहे या रविवारी.’
मी म्हटले, ‘मी सुभ्याला घेऊन येईन.’ तसे ठरले.
आईला ओझरते सांगितले, मी क्रिकेट खेळायला जातोय. पायात कॅन्हवासचे बूट घातले. इतक्यात आजींची हाक आली. ‘शशी’ म्हणून.
‘काय आहे आता?’ असे मी ओरडलो.
तो त्या आतून म्हणाल्या, ‘जरा काही तोंडात टाकून जा. आत ये पाहू आधी.’
चिडून आत गेलो. आजींनी हातात दाण्याच्या कुटाचा लाडू दिला. तो तोंडात टाकला. माठातले पाणी भांडे भरून प्यायलो. आणि निघालो जायला.
इतक्यात मावशीने हाक मारली, ‘शशी, जरा कंगवा देतोस का?’
कंगवा घेऊन मावशीला दिला. तर म्हणाली, ‘जरा खाजवतोय का पाठीला?’
‘पटकन सांग कुठे ते?’
‘सगळी पाठच!’
कंगव्याने मी पाठीवरून खसाखसा घासू लागलो. तर पाठ पुटकुळ्या पुटकुळ्यांनी भरलेली होती. पाठ घासेपर्यंत दंडाला-हाताला खाजवत होती. तेही लाल झालेले होते. एकंदरीत अवतार पाहिला मी तिचा अन सुभ्याला म्हणालो, ‘तू जा पुढे मी आलो मागून’
पुन्हा बसलो मावशीपाशी येऊन. आजींना ही हाक मारली. त्याही आल्या हळूहळू.
त्या गेल्या आत. मी आणि मावशी खाजवत होतो तिची पाठ बराच वेळ!
रात्रीची जेवणं झाली. मावशीला आमसुलाचे सार, एक कुठल्याशा मात्रेचा वळसा वगैरे देऊनही आराम पडेना. ती आता सगळच अंग खाजवत होती. मधे मधे हसत होती. आम्ही बघतोय तिच्याकडे म्हणून. तर कधी रडत होती, ‘अग आईगsss! आग आग होतीय’ म्हणून. अंगावर लाल लाल फोड उठले होते. तिला डॉक्टरना दाखवायला हवे असे आई म्हणाली. मग डॉक्टरना दादांनी बोलावले. त्यांनी एक इंजेक्शन दिले तशी झोप लागली तिला. खाज कमी झाली की नाही कोणास ठाऊक?
बेबी
आगा sss ई sss गं लई तरास होतोया. सगळ्या पायास्नी ठणका लागलाया. कसा पाई आलो हित कोणीस ठावं तिकड पुन्यात कसं आरामशीर चालल व्हतं. इतं आलो आन काहीना काही तास चालू झाला...
त्यो मांग गारूडू जाता जाईना! मग म्या त्याला घालिवला. तर जाता जाता ‘गर्मी आनतो’ म्हनून म्हनाला.
मग म्या घाबरलो. आता काय करतोय कुनाला ठावं? पर फुकटच्यानं पोरीला ताप! ती बसली आंग खाजवत दिसभर!
माजं हातपाय ठणकत्यात त्या मंत्तर म्हनन्यानं. रोजचा एकशेआठ माळंचा नेमच केलाय त्येंनी. जरा काय आही केलं मंतर म्हनत्यात. आता आमचं काय चालत न्हाई...!
त्या दिवशी लई भानगड केली भाड्यानं! म्हनला जानार, तर ही लै खुशीत होती. म्हनत होती समद्यांसनी. ‘आज मला लै बरं वाटतया.’ घरी आईला पतर बी धाडलेय. म्हनतिया, माझ्या अंगात कोन हाय, तेला भाईर काढल्या बिगर न्हाई जानार मी हितून...
मी बी बघतोच कसा घालिवतो ते...!
दादा
फार सहनशील आहे बेबी! इतके खाजवत होते तेंव्हा पण सहन केलंन मुकाट्यान!
जिथे जिथे खाजवले तिथे तिथे मोठ्या गांधी झाल्या. त्याचे फोड झाले. त्या फोडात पाणी झाले! ते फुटले! काही सुकले! धड तिला अंघोळ घालता येईना. बोरिक पावडरने घामोळ्याच्या पावडरने पाढरी पांढरी दिसे. कधी केसात खाजव खाजव खाजवे. तेंव्हा केस पिंजारून बसे भुतिणी सारखी!
तिलाच सगळे करायचे होते. केलन सहन बिचारीने!
मध्यंतरी मधू आला होता. तेव्हा म्हणाला, ‘काजळाची डबी पाहिलीत का काढून? काही होते का त्यात? मी म्हणालो, ‘काही पाहिलेच नाही तिकडे. आता फुल्याही आल्या नाहीत. तेंव्हा ती डबी तिथेच असणार! जातेय कुठे?
तो म्हणाला, ‘पाहू या का?’
मलाही उत्सुकता होतीच. मी आणि मधूने धरून कपाट हालवलं. थोडी फट झाल्यावर, मी आत हात घातला देवळीत. कागदाची एक बाजू लागली हाताला. तसे ओढले धरून. तर आले हातात पाकीट. फोडले तर त्यात काहीच नव्हते!
‘गेली कुठे डबी? मी आणि मधू एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहात राहिलो! डबी माझ्याशिवाय कुणालाच माहित नव्हती त्या देवळीत आहे म्हणून. फाडून टाकलेल्या कागदांची तपासणी केली तर त्याल कुठूनही फाडल्याचे दिसत नव्हते! म्हणजे ज्याने हे काम केले त्याने आधी हे पाकीट काढले. ते फाडून त्यातून डबी काढून घेतली आणि पाकीट पुन्हा त्याच ठिकाणाहून डिंकाने बंद करून ठाकठीक करून देवळीत ठेवले सरकवून! खरे तर कपाट सरकवल्या शिवाय कोणाचा हात ही तिथे जाणार नव्हता. मलाच स्वतःला ते पाकिट ठेवल्यावर पुस्तकांनी भरलेले सहा फुटी कपाट सरकवायला त्रास पडला, तर बेबी सारखीला ते शक्य नव्हते!
मी मंगलाला बोलावले. तसे शशी, लता, आजी सगळेच जमले बेबी सकट मग मी विचारले की, कुणी या कपाटल हात लावला का महिन्याभरात? कुणीच हो म्हटले नाही! तसे मी एक एक काय झाले ते सांगितले आणि डबी कशी काय गायब झाली आहे तेही सांगितले.
लता म्हणाली, ‘गेले कित्येक दिवसात मी काजळच घातले नाही. त्यामुळे घरातली डबी कुठे गेली आहे याचा आम्हाला पत्ताच नव्हता!
बेबीला डबी लपवल्याचे आत्ताच कळत होते. म्हणाली, ‘त्या दिवशी फुल्या पडल्या नंतर डबीचे काय झाले हे मला तर मुळीच माहिती नाहीये! सगळे आपापल्या उद्योगाला लागले. पण मला चैन पडेना. डबीचे गौड बंगाल काय असावे हे न कळल्याने.
दुसऱ्या दिवशी तातोबाला घरी पाठवले. हा पोरगा होता ऑफिसात. हुशार होता. एकदा सांगितले की पुन्हा पाहावे लागत नसे. सुट्टीच्या दिवशी बागेतील साफसफाई, खत घालणे, तण काढणे इतर अंगणाची झाडलोट तोच करी. म्हणालो, ‘तातोबा, घराच्या बाजूच्या अंगणाचे झाडलोट नीट कर आणि काही पेन, फुटपट्टी, कंगवे किंवा काजळाची डबी, सापडली तर मला आणून दे आठवणीने.’
दुपारी काम झाल्यावर मंगलाने त्याला जेवायला दिले. मागच्या बाजूला कचऱ्याची जागा म्हणून एक खड्डा केला होता. म्हणाला, ‘तोही उपसून साफ करू का?
मी बर म्हणालो. मग फावड्याने कचरा भरलान घमेल्यात, मोठा ढीग करून पेटवून दिलान. काजळाची डबी सापडली नाही म्हणून मी निराश होतो. मला खात्री होती कुठेतरी नक्की मिळणार म्हणून. ‘बरं जाऊ दे, मिळून तरी काय फरक पडणार होता?’
रात्री प्रवचनाला विठोबाच्या देवळात जायला म्हणून धोतर नेसले. रुमाल घेतला. हरिपाठाचे पुस्तक घेतले. चपला अडकवल्या. बाहेरून कुलूप लावून गेलो देवळात.
बेबी
मी म्हणाले, ‘मला माहित नाही डबी कुणी कुठे हरवली.’ पण सगळे माझ्याकडे असे पहात होते की मी ओळखले, या डबीच्या गायब होण्यात माझाच हात असला पाहिजे!
काय झालं असलं पाहिजे? मीच केलेले असणार! नव्हे आहेच! मग मलाच का आठवत नाही? मला आठवलेच पाहिजे. असे होऊन चालणार नाही. आणखी अशा किती अशा गोष्टी होणार आहेत माझ्या हातून माझ्या न कळत? आताशे असे विचार फार येतात. मग बेचैन होते मन. वाटते कुठे पडले या जंजाळात येऊन अक्काकडे. तिला ताप. आपल्याला ही भानगड चालू तो जप करता करता दिवसच्या दिवस जातो. त्यात आपल्या पदरात काय पडतं? ना अभ्यास ना काही काम! मी आपली सदा माळ घेऊन असते. काही नाही बंद कराव्या या माळाबिळा!
क्षणभर असा वैताग येतो या मंत्र म्हणण्याचा. खरे तर लहानपणापासून शिव, शंकर कोणी म्हटलं की मला आवडायचं नाही. राम, सीता, हनुमान, हे देव बरे वाटायचे. शंकर म्हणजे त्या सापाच्या माळा गळ्यात, तो तिसरा डोळा, ते त्रिशूळ, मनात तिटकरा त्या देवाचा. कसला हा देव भुता-खेतांचा! असे वाटे. त्यापेक्षा कृष्ण, विष्णू बरा. सिनेमात गोंडस वाटतो. हनुमान म्हटले की खूप छान वाटे...!
त्यावरून आठवले संध्याकाळची माझी भिकारदास मारुतीला फेरी पण किती दिवसात झाली नाही. साधारण पाच-सव्वापाचला निघायची मी. आई भजनाला गेलेली असे. शाळा सुटली की घरी येऊन वह्या-पुस्तक टाके आणि सऱळ घराबाहेर पडे. चौकातली ती माणकी कधी कधी म्हणे, ‘कुठे जातेस सरोज? म्हणून. मी थाप ठोके मैत्रिणीकडे म्हणून. वाटे कशाला हिला सांगा म्हणायची मी येते म्हणून? पुढे चांभारांच्या घरांची राग यायची. तो कमावलेल्या कातड्यांचा वास भरला होता माझ्या नाकात. आवडायचा नाही पण आला की आपण बरोबर चाललोय असे वाटे.
जरा पुढे गेलं की रस्ता फुटे बाजीराव रस्त्याला मिळायला. तिथेच एका घराच्या भिंतीवर लिहिले होते ‘डोंगरे बालामृत’ म्हणून मोठ्या अक्षरात. ते वाचायचीच मी. ठरून गेलं होतं ते. एकदा चुकून वाचायचं राहिलं तर परत फिरले. वाचलं अन् मगच निघाले देवळाकडे! तिथेच पुढे गेलं की चिंचेची झाडं होती. उंच उंच डेरेदार! खूप चिंचा असत लागलेल्या. दगड फेकून कोण पाडतोय चिंचा! मी बाई-माणूस कोणी ओरडलं म्हणजे? मी आपली खाली पडलेल्या गोळा करी, मग ओट्यात घेऊन जाई मारुतीला. आत जाई, मारुतीला नमस्कार करी, ‘बाबा रे मला शहाणं कर. यंदा एसएससी परिक्षेत पास कर. मग छान स्थळ पाहून दे! मला सुखाने संसार करू दे! मग तो डोंगरे बालामृतचा बाळ आठवे! मला हवं तसं बाळ! त्याला पाजीन ते बालामृत. गुटगुटीत करीन त्याला. काय नाव ठेवाव बाळाचं? मारुतीची नावे फार जुनाट वाटतात. जरा सुधीर, सुबोध सारखी असू देत...’
‘रोज रोज देवाला तेच तेच मागताना मी रंगून जायची. मग अकरा फेऱ्या मारेपर्यंत तेच विचार चालत माझे. मागच्या बाजूला देवाजवळ थांबे दोन पाच मिनिटं. परते घरी. कधी अंधार होई परतताना. कारण चिंचा काढायच्या नादात बरीच पुढे जाई मी...
आठवून आणखी बेचैन झाले. वाटलं इथेही असेच जावे एखाद्या देवाला लांबवर एकटेच! कोणाला न सांगता!.... पाहिलं पाहिजे जाऊन एकदा. चला जाऊ या का आत्ताच? नको कळेल सगळ्यांना. सगळे कामात असले की सटकावे. ...
नाही रे बाबा सटकताय कसले? ते घारे डोळे असतात ना? ते बरे बाहेर जाऊन देतील? दादांचा गंभीर चेहरा आठवला की असे एकटे जायचे, जप न करायचे विचार एकदम पळून जायचे कुठल्या कुठे! मग वाटे अरे आज आपण एवढे धीट झालोय, आपला आपण विचार करतोय तो त्यांच्यामुळेच. आधी काय यायचे आपल्या मनांत विचार? पुर्वी तर स्वप्न पडत इतकी की, जणू सिनेमेच्या सिनेमे चालत झोपेत! पुढे पुढे इतकी वाढली स्वप्नांची भेंडोळी! भीतीदायकच होते ते सगळे. मी एकटीच असे जंगलात! तर कधी धबधब्याजवळ आलेली असे टोकावर! आता पडणार, इतक्यात दुसरे काही सुरू होई. खूप चिखल, राड त्यातून मला निघता येणे मुष्किल ... मी आत जातेय...!
किती स्वप्ने आणि किती भित्या! त्या स्वप्नात मी कित्येकदा मेले ही असेन! पण मला वाचवणारे होते तरी कोण? आताशे पुन्हा आठवतात काही स्वप्नं आणि जीव धास्तावतो! मग कळते, आपण झोपलोच नव्हतो कित्येक महिनेन् महिने गाढ! या स्वप्नांनीच झोपेत मी जागी असे!. कधी काही करे तर कधी काही!
‘मग मी पुण्यात काय केले असेल? इथे माधवनगरात आल्यावर दादांना कसा सुगावा लागला पुण्यात त्या गजबजलेल्या वाड्यात मी तर लगेच पाहिली जाणार? का मी कदाचित बाहेर नसेलच गेली? घरातच काही केले असेल वावगे? काय ते कुणास ठाऊक! मग मी इथे विहिरी कडे गेले, संडासाच्या दारात कंदील लाऊन बसले, दत्ताला गेले पुढे रेल्वेच्या पुलाकडे ते सगळे स्वप्नात? हो असेच असेल! पण मग आता हे मला आठवले कसे? त्या दिवशी दादा म्हणाले तसे जपामुळे माझ्या मनाची तयारी चांगली व्हायला लागल्याचे हे तर प्रमाण नव्हे? मग मला डबी बद्दल आठवलेच पाहिजे! आज ना उद्या आठवेलच पाहिजे. पाहते कशी नाही आठवत ते....!
बसते अशी विचार करत. मग खाज सुटते सगळीकडे! कुठे कुठे, कशी कशी खाजवू? आधीचे फोड त्याचे पापुद्रे पार शिवशिवतात. डोक्यात हातापायावर कंगव्याने ओरबाडून काढता येते सालटी, पण पाठ मांड्या कंबर, मोरीत जाऊन काय काय करू? पाणी ओतू अंगावर, का मोरीचा ब्रश फिरवू कमरे खालून?
अंगावर थंडपाणी घेत सुटले. तांब्यातलं पाणी पुरेना म्हणून बादलीच ओतली अंगावर. अंगाची लाही लाही होतेय! कशी काय घालवू ही खाज? एकदम सुटली की सुटली! बस, काही चालत नाही कुणाचे. सहन करणे हेच हातात आहे!
भडाभडा ओतल्या चार बादल्या अंगावर. तशीच उभी राहिले थंडावा शोषत! दारावर थडथड वाजले. अक्काचा आवाज होता. ‘बेबी बाहेर ये ग, अंग पूस, पावडर मलम लावायला आणलय’ कडी काढली, कोठीच्या खोलीत गेले. अक्काने साडी-ब्लाऊझ दिलान तो घातला. पावडरीचा थर टाकला अंगावर. तसं जरा बरं वाटलं...!
एकदम वाटले आपण आताशे असा विचार करतो म्हणून ही शिक्षा म्हणून तर नाही ना अशी खाज सुटत?
******