Aaghat - Ek Pramkatha - 23 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 23

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(23)

इंग्रजीचे प्राध्यापक शहापुरे सरांनी मला बोलवून घेतलं.

‘‘प्रशांत, एक काम कर. शिक्षण सोड आणि गावाकडं जा जनावर राखायला. तुझी पात्रता नाही शिकायची. तुला ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ देऊन डोक्यावर चढवून घेतलं. पुन्हा एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाला मदत करायला आमची हिंमत होणार नाही तुझ्यासारखं समोर उदाहरण असल्यामुळे. जा, पुन्हा येवू नको माझ्यासमोर.’’

प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेणं सुरू होतं. दररोजचं कुणाचं तरी बोलणं ठरलेलंच होतं. हे सगळे बोलून घ्यायला, सगळं सोसायला मन तयार होतं. पण सुमैयापासून दूर राहणं जमत नव्हतं. मन मानत नव्हतं.

पूर्वपरीक्षा अखेर संपली होती. पहिल्यांदाच तीन-चार विषयात फेल झालो होतो पण सुमैया मात्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मला आश्चर्य वाटलं. थोडा वेळ मनाला विश्वासच बसेना. कसं काय शक्य आहे. मी प्रथमक्रमांकाचा विद्यार्थी, तिचा दुसरा, तिसरा यायचा पण माझं तिचं प्रेम प्रकरण चालू झालं आणि माझा अभ्यास पूर्णपणे बंद झाला. माझ्या अभ्यासावर परिणाम झाला होता, पण सुमैयाचंही माझ्याबरोबर फिरणं, सिनेमाला जाणं, दिवसदिवसभर गप्पा मारणं सुरूच होतं. तिचाही वेळ गेला होताच वाया. तिचा कसा काय अभ्यासावर परिणाम झाला नाही. उलट प्रेमात पडल्यावर तिची प्रगती आणि माझी अधोगती व्हायला लागली की काय अशी थोडी शंका मनाला वाटूल गेलीआणि ती खरीच होती.

यावेळी मला सुरेशचं उन्हाळयाच्या सुट्टीत लिहिलेलं पत्र आठवले. त्यानं म्हटलं होतं, प्रशांत, सुमैया तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे, तुझे अभ्यासापासून लक्ष विचलित करण्याचा, तसेच तुला नादी लावण्याचा, प्रेमपाशात ओढून तुला फसविण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्यापासून सावध रहा असं लिहिलं होतं. त्यावेळी मला ही गोष्ट पटली नव्हती. मात्र आता ती १००% पटली होती पण वेळ गेली होती. आता मी काय करू शकणार होतो. छुपी रुस्तुम निघाली होती. ‘दिल को देखो चेहरा ना देखो चेहरे ने लाखो को लुटा, दिल सच्चा आणि चेहरा झूठा है’ या किशोर कुमारांच्या गाण्याची प्रचिती आली होती. दिवस दिवसभर माझ्याबरोबर वेळ घालविणारी हिने अभ्यास केलाच कधी? हे माझं मलाच समजत नव्हतं, पण जे सत्य होतं ते नाकारता येत नव्हतं.

इकडे मी चार विषयात नापास झाल्यामुळे मला वर्गात तोंड वर करून बसायला लाज वाटत होती. प्रत्येकजण विचारायचे, काय अभ्यास पूर्णच सोडून दिलास की काय मुलीच्या नादी लागून. निर्लज्ज झालं होतं मन माझं. आता हे दररोजच अपमान, दररोजचे ऐकून घ्यावं लागणारे बोलणं याची सवय झाली होती. यामुळे मी निष्क्रिय झालो होतो. स्वाभिमान जपणारे आता मात्र मला स्वाभिमानाची काळजी नव्हती. तिची काळजी होती. तिचा विचार मनात होताफक्त.

एक दिवस खोलीत निवांतपणे झोपलो होतो. इतक्यात दारावर टक् टक् झाली मी पटकन उठून दार उघडलं. पाहतो तर समोर सुमैयाचे वडील, चेहरा लाल झाला होता. डोळे वटारून माझ्याकडे रागाने पाहात होते. त्यांच्याबरोबर तीन-चार लोकही होते. मी सुमैयाच्या वडिलांचा हा अवतार पाहून पुरता घाबरून गेलो होतो.

‘‘काय, रे साल्या कुणाच्या घरात राहतोस रे? घर काय तुझ्या बापाचं आहे काय?’’

‘‘पण सुमैयाने तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्हीच तर राहायला परवागनी दिली?’’

‘‘ती काय सांगते तुला, तुझा आणि तिचा काय संबंध आहे? अंगावर घालायला कपडा मिळताय काय रे हरामखोरा, प्रेमाच्या गोष्टी करतोस. भिकारड्या, तूच काय तो हुशार विद्यार्थी? तुझी हुशारी कुठं बाजारात विकलास काय? घर ना दार बेवारस माझ्या पोरीला नादी लावतोस व्ह्य रे. माझी साधी भोळी पोरगी बघून किती दिवस चालू आहे हे तुमचं प्रेमप्रकरण? स्वत:चं पोट भरायला शिक पहिला. दुसऱ्याच्या दारात हात पसरून प्रेमाचं नाटक मिरवू नकोस. रस्त्यावर पडल्यात व्हयं रे पोरी?’’

‘‘आहो, साहेब सुमैयानंच मला नादी लावलाय. तिच्यामुळंच मला सगळयांच्या नजरेत बदनाम व्हावं लागलंय.’’

‘‘उलट माझ्या पोरीवर आळ घालतोस मुर्खा, तू काय शाण खात हुतास व्हय रे? तुझी मस्ती अशी जिरणार नाही. सदा-सखा, घाला याच्या पेटकात लाथा.’’

जसा आदेश आला तश्या पेटकात लाथा बसायला लागल्या होत्या.

‘‘मारा आणखीन मारा, साल्याची हाडं शिल्लक ठेवू नका.’’

जसा त्यांचा आदेश यायचा तसा आणखीन मार वरून पडायचा. मी ओरडत होतो, पण सोडवायला कोणीच मध्ये पडत नव्हतं. इतक्यात सुमैया धावत आली.

‘‘बाबा, मारू नका याला. याचा काही दोष नाही, सोडून द्या त्याला.’’

‘‘गप्प बस कार्टे, तुझ्यावर केलेल्या या लाडामुळेच तू आमच्या डोक्यावर बसलीस. काय चाललंय तु च्या दोघांचं. किती दिवस अंधारात ठेवणार होतीस आम्हाला. ए बास करा रे मरेल कार्ट.’’

तसं त्यांनी मला मारायचं बंद केलं. मी तसाच विव्हळत, तडफडत राहिलो.

‘‘काय गं कार्टे ह्योच तुला पाहिजे झाला व्हयं भिकारडा. मला सांगितली असतीस तर पोरांची लाईन लावली असती तुझ्यासमोर. जो स्वत:चं पोट भरू शकत नाही, त्यो तुला काय देणार हाय, का त्याला एवढं भाळलीस, आईबापाच्या पाठीमागे तू ह्यो उद्योग करीत होतीस, थोडीदेखील तुला लाज वाटली नाही. तुझ्या आईला समजलं म्हणजे नरडीचा घोट घेईल. तुला जिवंत ठेवणार नाही ती.’’

तिच्या आईचं नाव काढायला तिची आई तिथं हजर झाली.

‘‘अहो, काय झालं? हे पोरगं आसे का पडलंय आणि किती लागलंय हो याला उचलून दवाखान्याला घेऊन जायला हवं. काहीतरी बरं वाईट होईल याचं.’’

‘‘बस्स कर आता तुझं शहाणपण. मरू दे पोरगं तुला काय काळजी लागली त्याची. तुझ्या पोरीची काळजी हाय काय तुला? गावाची काळजी करायला निघालीस.’’

‘‘अहो, म्हणजे काय बोलताय तुम्ही?’’

‘‘आपण दोघेही नोकरीला गेल्यावर पाठीमागे पोरगी काय दिवे लावायला लागली आहे, माहीत आहे तुला? कधी पोरगी बाहेर काय करते? कुठं जाते? कुठल्या मित्रमैत्रिणींच्यात मिसळते? चौकशी केलीस डोळसपणे? कधी बघितलीस? वर म्हणायचं, सगळं करावं लागतं घरातलं, नोकरीतलं दिखाऊपणं, उद्या पोरगी बेपत्ता झालेली पण आणि मेलेली पण कळायचं नाही.’’

‘‘अहो, असं काय बोलताय मनाला येईल तसं!’’

‘‘मनाला येईल तसं नाही जे खरं आहे तेच बोलतोय.’’

‘‘म्हणजे असं घडलं तरी काय?’’

‘‘विचार तुझ्या कार्टीलाच.’’

‘‘काय गं सुमैय्या काय केलंस तू सांग? लवकर सांग काय केलीस चूक अशी?’’

‘‘ती नाही सांगायची. सांगायला तोंड नको काय तिला त्या पोराचं आणि हीचं वर्ष होत आलं. नको नको ते उद्योग चालू हायत.’’तसं सुमैयाची आई तुटून पडली.

‘‘व्हयं गं सुमैय्या काय ऐकतेय मी हे. जीव घेऊ काय तुझा? सगळं गाव नाव ठेवायला लागलं. तुझ्या या मस्तीच्या वागण्यानं तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस. तू आमचं एवढं प्रतिष्ठित शिक्षित घराणं या घराण्याची अब्रु वेशीला नेऊन टांगलीस. फुकटचं खाऊन तुला नको ते उद्योग सुचलं व्हयं.’’

जशी माणसं माझ्यावर मारायला तुटून पडली होती तशी तिची आई तिच्यावर तुटून पडली. नंतर तिने माझ्याकडे मोर्चा वळविला.

‘‘तुला चांगलं पोरगं समजत होतो की रे आम्ही. तू तर हरामखोर, नालायक निघालास. या शहराच्या ठिकाणी नीट रहा. नाहीतर घरातल्यासनी तुझी हाडंसुद्धा मिळायची नाहीत. जितं ठेवणार नाही. आम्ही चांगलं तितकंच वाईट हाय लक्षात ठेव. पुन्हा पोरीचा नाद करशील आमच्या?’’

जशी सुमैयाची आई बोलायची थांबली, तसं तिच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली.

‘‘साला म्हणतोय, तु च्याच पोरीनं नादी लावलं. आरं, ते कॉलेज मधले सर काय खोटं सांगतात मला? आज घरी आले होते ते माझ्या! म्हणत होते, मुलगीचा प्रथम क्रमांक आलेला आहे पूर्वपरीक्षेत. फायनल परीक्षेतसुद्धा येईल पण तुम्हाला एक दक्षता घेतली पाहिजे. मी म्हटलं, कोणती? तु ची मुलगी वाईट मार्गाला लागलेली आहे. तिला वेळीच आवरा अन्यथा चांगल्या हुशार मुलगीचे नुकसान होईल. मी म्हणालो, आहो, सर एवढी माझी मुलगी प्रथम क्रमांक मिळविते परीक्षेत. मग अभ्यासात प्रगती आहेच की अधोगती कुठे आहे? मग कसला वाईट मार्ग म्हणायचा?’’

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED