राखणदार
प्रकरण -- 2
तेव्हा तानाजीरावांच्या वडिलांची मोठी बहीण --- दुर्गाआत्या आडगावात रहात होती. थोड्याच दिवसांपूर्वी तिच्या पतींचे माधवरावांचे हृदयविकाराने अचानक निधन झालं होतं. मुलं - बाळं नसल्यामुळे मोठ्या वाड्यात तिला एकटीलाच रहावं लागत होतं. रात्री सोबतीला एक गावातली मैत्रीण येत असे. आत्याचं तालुक्याच्या गावी प्राॅपर्टीचं काम होतं. तिनं फोन करून भावाला सोबत येण्याची गळ घातली; कारण कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपसणं महत्वाचं होतं. नारायणरावांनी स्वतः न जाता तानाजीरावांना पाठवलं. तिकडे धावपळ करायला तरूण माणूस असणं गरजेचं आहे असं त्यांचं मत पडलं. वडिलांचं म्हणणं तानाजीराव डावलू शकले नाहीत.
सकाळी न्याहारीच्या वेळी ते आत्याकडे पोहोचले. ती त्यांची वाट पहातच होती. चहा- पोहे खाऊन दोघं तालुक्याला निघाले. बसने दोघं कचेरीत पोहोचली ; तोवर दुपार झाली होती. तिथल्या कर्मचा-यांचा लंच - टाइम सुरू झाला होता. त्यांचे काम सुरू व्हायला दोन तास गेले. या टेबलावरून त्या टेबलावर फाइलीच्या मागे पळताना संध्याकाळ कधी झाली; कळलं सुद्धा नाही. पण निघताना आत्याचं काम पूर्ण झालं; हा आनंद मोठा होता. आत्याला तिच्या घरी सोडल्याशिवाय तानाजीराव घरी जाऊ शकत नव्हते.
दुर्गा आत्याच्या घरी पोहोचेपर्यंत दिवस मावळला होता. तानाजीराव लगेच निघाले; पण आत्या त्यांना जेवल्याशिवाय निघू देईना. आत्याने घाईघाईत बनवलेली पिठलं - भाकरी खाऊन ते निघणार; तेवढ्यात शेजारचा श्रीपत त्यांना भेटायला आला. श्रीपतशी त्यांची चांगली मैत्री होती.
"सकाळी आलो होतो; पण तुम्ही तालुक्याला गेलात असं कळलं. म्हणून आता तुला भेटायला परत अालो. तू कुठे निघालास एवढ्या रात्री?" त्यानं चौकशी केली.
"घरी जायला निघालोय.बस किती वाजता आहे?" तानाजीरावांनी चौकशी केली.
"एवढ्या रात्री कशाला जातोयस? उद्या जा. आता इथेच थांब!" श्रीपत मित्राच्या काळजीपोटी बोलत होता.
"मी पण खूप आग्रह केला; हा ऐकतच नाही. काय करायचं?" आत्या आता रागावली होती.
"पण तू जाणार कसा? अनंतपूरला जाणारी शेवटची बस एका तासापूर्वीच गेली." श्रीपत हसत म्हणाला.
आता मात्र तानाजीरावांचा नाइलाज झाला. तिथे रात्र काढण्याशिवाय इलाज नव्हता.
काही वेळ श्रीपतशी गप्पा झाल्या. शेती-वाडीचे जिव्हाळ्याचे विषय झाले. घर- प्रपंचाविषयी- मुलांच्या विषयी बोलून झालं. श्रीपत जायला निघाला. घड्याळाकडे बघत तो म्हणाला,
"अरे! नऊ वाजले! आज देवळात कीर्तन आहे. आजचे कीर्तनकार गीतेवर खूप सुंदर भाष्य करतात. तू पण चल ऐकायला! तुझी आत्या नेहमी येते. तू पण चल ऐकायला!"
"थांब जरा! मी पण येतेय! तानाजीसुद्धा येईल आपल्याबरोबर! " आत्या निघायची तयारी करू लागली.
"मी खुप दमलोय! झोप येतेय! तुम्ही जा!" तानाजीराव जांभई देत म्हणाले. मनगटाच्या बळावर हवं ते सर्व मिळवण्याची हिंमत असलेल्या तानाजीरावांचा अध्यात्माकडे फारसा ओढा नव्हता. भरपूर मेहनत करणं आणि जमेल तशी दुस-यांना मदत करणं यातच त्यांचा आनंद सामावलेला होता.
"नको बाबा! तू एकटा नको राहू घरात!" आत्या घाईघाईत म्हणाली.
"त्यात कसली भीती? मी तर आता झोपून जाणार आहे." तानाजीराव म्हणाले.
"पण तू वर माडीवर झोप! काही झालं तरी खाली येऊ नकोस! माझ्याकडे चावी आहे. मी दार उघडून आत येईन! कोणीही आलं; तरी दरवाजा उघडू नको. आणि काही झालं ; तरी घाबरू नकोस! " आत्या म्हणाली. तिच्या आवाजात काळजी होती.
"तू तर एवढी घाबरलीयस की जणू दरोडेखोर येणार आहेत! काळजी करू नको! मी एकटा दहा जणांना भारी आहे." तानाजीराव मिशीला पीळ मारत म्हणाले.
"तू जा श्रीपत! मी नाही येत किर्तनाला!" दुर्गा आत्याचं मन परत बदललं. त्याला एकट्याला घरात ठेवायला एवढी का भीती वाटत होती कोण जाणे?
"तू गेली नाहीस तर मला वाईट वाटेल. तू दाखवत नाहीस; पण काकांच्या अचानक् जाण्यामुळे तू मनातून किती खचलीयस --- मला चांगलंच माहीत आहे. कीर्तन ऐकल्यामुळे तुझ्या मनाला शांती मिळत असेल; तर माझ्यासाठी कीर्तन चुकवू नकोस. तू नीघ आधी! माझी कसली काळजी करतेस?" तानाजीरावांनी तिला अल्टिमेटम् दिलं.
तानाजीरावाना माडीवर पाठवून त्याच्या झोपण्याची नीट व्यवस्था करून आत्या निघाली.
*********
दिवसभर थकलेल्या तानाजीरावांचा लगेच डोळा लागला. एखादा तास गेला असेल--- कोणीतरी दरवजावर टक् टक् करत होतं--- त्या आवाजाने तानाजीरावांना जाग आली. ते उठून बसले. पण त्यांना आत्याचे शब्द आठवले. "कोणी दरवाजा वाजवला; तर उघडू नकोस---" ती म्हणाली होती. कानोसा घेत तानाजीराव तिथेच बसून राहिले. "आत्या आताच तर गेली! इतक्यात परत कशी आली?" ते विचार करत होते. तोच परत दारावर टक् टक् झाली.आता मात्र ते उठून उभे राहिले; आणि खाली जायला जिना उतरू लागले. पण थिजल्यासारखे तिथेच उभे राहिले; कारण दरवाजाची करकर त्याने स्पष्टपणे ऐकली. त्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना ---- दरवाजा हळू हळू उघडत होता.
दरवाजातून एकामागून एक चार माणसं आत आली. त्यात दोन पुरूष. आणि दोन बायका होत्या. त्यांना " तुम्ही कोण?"-- विचारण्यासाठी तानाजीराव जिना उतरू लागले; पण दुस-याच क्षणी त्यांनी आत्याचा सल्ला ऐकायचा; असं ठरवलं आणि तिथेच थांबून निरीक्षण करू लागले. त्या लोकांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. ते सगळे आपल्याच नादात होते. बायकांनी चुलीत लाकडं घालून पेटवली आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली. दोन्ही पुरुष मात्र दिवाणखान्यात सोफ्यावर आरामात बसले होते.
"जेवण होईपर्यत कोणी आम्हाला चहा देईल का?" त्यांच्यापैकी एकजण म्हणाला.
"आणते हं! जग सोडून एवढी वर्ष झाली; पण जागेवरून हुकूम सोडायची संवय काही गेली नाही." एक स्त्री म्हणाली. हे ऐकलं -- आणि तानाजीरावाच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या -- पाय जमिनीला खिळून राहिले. समोर काय घडतंय हे पहाणं; एवढंच त्यांच्या हातात होतं; कारण त्यांना तसूभरही हालचाल करता येत नव्हती.
त्या स्त्रीने उठून कप दोघांच्या हातात दिला.
"बाबा! आई पण कंटाळते काम करून! रागावू नका!" दुसरा पुरूष म्हणाला. हा आवाज तानाजीरावांना ओळखीचा वाटला. "हे तर आत्याचे मिस्टर! आनंदराव--- हे इथे कसे?" तानाजीरावाचे पाय थरथरू लागले होते. हे सर्व बहुतेक दुर्गा आत्याला माहीत आहे. म्हणूनच ती एवढी घाबरत होती.
"जेवण तयार आहे. पानं वाढलीयत! जेवायला या! आनंदरावांची आई दरवाजात येऊन म्हणाली.
"शांताताई त्यांच्यासाठी पाणी घेता का?" बरोबरच्या दुस-या स्त्रीला उद्देशून तिने विनंती केली.
हे सर्व बहुतेक काल्पनिक असावं; कारण चहा - जेवण- सर्व क्षणार्धात तयार होत होतं.
"पण आज तीन ताटं घ्यावी लागतील! एक पाहुणा आहे आज! सावकाशपणे तानाजीरावांकडे नजर हलवत आनंदराव म्हणाले. त्यांच्या नजरेने जणू भुकंप होतोय असं तानाजीरावाना वाटू लागलं! ते नखशिखांत घामाने भिजून गेले होते. भुतांची पंगत? त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. दहा पैलवानांशी दोन हात करणं वेगळं आणि अतृप्त आत्म्यांच्या संगतीत रहाणं वेगळं. तरीही सगळं धैर्य एकवटून त्यांनी विचारलं,
"काका तुम्ही या अवस्थेत? कोणती इच्छा बाकी राहिली तुमची? " हे विचारतानाही तोंडातून शब्द कसेबसे फुटत होते. गळा भरून आला होता.कोणत्याही क्षणी तोल जाईल असं वाटत होतं.
" हे सगळं वैभव आमचं आहे. काहीही झालं तरी हा वाडा सोडून आम्ही जाणार नाही. इथेच रहाणार! तू खाली ये! जेवायला बस!"
तानाजीरावांनी न ऐकल्यासारखं केलं; आणि तिथेच उभे राहिले.
पानं वाढलेली दिसत होती. ते दोघे जेवायला बसणार; एवढ्यात दरवाजाची कडी वाजली. बहुतेक दुर्गा आत्या कीर्तनावरून आली होती.
"ती आली बहुतेक. आणि बरोबर ती तिची मैत्रीण असेलच . ती काशी आजूबाजूला असली तरी आपल्या अंगाला चटके बसतात. ती बरोबर आहे तोपर्यंत दुर्गेपर्यंत पोचणं मुष्किलीने आहे. नाहीतर एवढ्यात तिला कधीच आपल्या सामील करून घेतलं असतं. आणि तू तानाजी! चार पावलं खाली असतास तर आमच्याला एक झाला असतास. तुला एकटा बघूनच आलो होतो आम्ही! पण तू घाबरला नाहीस आणि नशीबानं वाचलास! चला रे! निघू या आता!"
क्षणात तिथलं सगळं दृष्य बदललं होतं. ना चुलीत विस्तव होता--- ना वाढलेल्या जेवणाचा कुठे अवशेष दिसत होता. सगळं काही आत्या जातांना होतं ; तसं व्यवस्थित दिसत होतं.
********
contd. --- part 3