राखणदार. - 3 Amita a. Salvi द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राखणदार. - 3

राखणदार

प्रकरण - ३

दरवाजा उघडून आत्या घरात आली." तू झोपला नाहीस? इथं का उभा राहिलायस?" तिनं आश्चर्यानं विचारलं. तिची मैत्रीण मात्र टक लावून त्यांच्याकडे बघत होती. जणू काही तिला काहीतरी जाणवलं होतं.

ती सर्वसाधारण स्त्री वाटत नव्हती. कपाळाला चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ मुखात हरीनाम---- तिला ते आत्मे एवढे का घाबरत होते ; हे तिला पहाताच तानाजीरावांच्या लक्षात आलं.

दुस-या दिवशी सकाळी निघताना कधी एकटी घरात रहाणार नाही; असं वचन त्यांनी आत्याकडून घेतलं होतं. "तू आमच्याकडे अनंतपूरला येऊन रहा! आताच चल माझ्याबरोबर! इथे एकटीने रहायची काय गरज आहे? " त्यांनी आग्रह करून पाहिला. त्यांना आत्याची काळजी वाटत होती, पण आत्या ऐकेना,

" इथे तुझ्या काकांच्या आठवणी माझ्या बरोबर आहेत. हा वाडा सोडून मी एक दिवसही कुठे रहाणार नाही!" ती निश्चयानं म्हणाली.

तानाजीरावांना रात्रीच्या मृतात्म्यांविषयी करुणा वाटत होती. " मृत्यूच्या वेळी इथलं वैभव इथेच ठेऊन निःसंग होऊन पुढचा प्रवास करायचा असतो; हे ज्ञान ते जिवंत असताना कोणी त्यांना दिलं असतं; तर त्या आत्म्यांना इतके कष्ट भोगावे लागले नसते. म्हणून तर श्रीकृष्णाने गीतेमध्ये कर्मयोगाइतकंच वैराग्याचंही महत्व सांगितलं आहे. कोण जाणे किती काळासाठी ते या योनीत भटकणार आहेत? ईश्वरकृपेने त्यांना लवकर मुक्ती मिळू दे!" ते मनोमन प्रार्थना करत होते.

काही वर्षांनी दुर्गा आत्याच्या मृत्यूनंतर तो वाडा तानाजीरावांकडे आला. आत्याने तशी व्यवस्था केली होती. पण तानाजीरावांनी एका समाजसेवी संस्थेला वाडा दान दिला. निदान ह्या पुण्याईने ते अतृप्त आत्मे मुक्त होतील अशी आशा त्यांना होती.

त्यांनी आत्याला या सर्व प्रकाराबद्दल दुस-या दिवशी सर्व काही सांगितलं होतं . तिलाही अनुभव आला होता ; पण यावर अनेकांना उपाय विचारूनही काही उपयोग झाला नाही; असं ती म्हणाली. तिच्याकडून अनंतपूरच्या लोकांना ही गोष्ट कळलं , मीठ मसाला लावून अतिरंजित करण्यात आली ; आणि तानाजीरावांना गावचा अनभिषिक्त हीरो बनवण्यात आलं.

ही गोष्ट आठवली, आणि तानाजीरावांच्या अंगावर शहारा आला. " त्यावेळी मी किती घाबरलो होतो, हे या लोकांना माहीत नाही हे बरं आहे!" ते मनाशी म्हणाले. शेतावर वेळेवर पोहोचणं आवश्यक होतं. ते आता झपाझप चालू लागले..

**********

गड्यांची जेवणं झाली होती. ते पुढच्या सूचनांसाठी तानाजीरावांची वाट पहात होते. ठरल्याप्रमाणे भाजणीचं काम संध्याकाळपर्यत झालं. घरी जाता जाता त्यांची पावलं अामराईकडे वळली. काही दिवसांतच मुंबईला पाठवण्यासाठी आंबा उतरवायचा होता. यंदा भाव चांगला मिळेल याची त्यांना खात्री होती. देखरेखीसाठी ठेवलेला पोरगा वामन घरी जायच्या तयारीत होता. गावापासून दूर असलेल्या त्या बागेत रात्री कोणी रहायला तयार होत नसे. आणि तशी कधी आवश्यकताही भासली नव्हती. अशा एकांताच्या ठिकाणी चोरी करायला किवा बागेची नासधूस करायला कोणी येण्याची शक्यता नव्हती.

पण आज वामनने तक्रार केली की; कोणीतरी रात्री आंब्याची चोरी करतोय. "नंतर जबाबदारी माझ्यावर येईल; म्हणून मी आधीच तुम्हाला सांगतोय. दिवसभर मी नीट लक्ष ठेवतो; पण सकाळी येतो; तेव्हा झाडांच्या काही फांद्या मोडलेल्या असतात; तर काही अगदी खाली वाकलेल्या असतात. असं वाटतं की रात्री झाडांवर चढून कोणीतरी फळं तोडत असावं . तुम्ही तपास केला तर बरं होईल. नाहीतर आंबा उतरवायची वेळ येईपर्यंत झाडांवर फळंच नसतील." चोरीचा आळ आपल्यावर येईल म्हणून वामन घाबरला होता.

"मी बघतो काय करायचं ते! तू वेळेवर सांगितलंस ते बरं झालं." त्याच्या खांद्यावर हात ठेवत तानाजीराव म्हणाले.

सर्व झाडांची काळजी ते जिवापाड घेत होते. कोणी येऊन बगीच्याची नासधूस करावी; हे त्यांना मानवण्यासारखं नव्हतं. घरी परतताना या प्रकरणाचा छडा कसा लावायचा; हा विचार करता करता घर कधी आलं हे त्यांना कळलंही नाही.

**********

सकाळी उठल्यावर तानाजीरावांनी प्रथम मुंबईच्या एजंटला फोन करून आंबा लवकरात लवकर उतरवून घेऊन जायची व्यवस्था करायला सांगितलं. पण अजून आठवडाभर तरी गोदामाची व्यवस्था होऊ शकणार नाही. आठ दिवस थांबावं लागेल असं त्याचं उत्तर आलं. आणखी आठ दिवस आमराई सांभाळायची होती. कसं जमणार? ते स्वतःला विचारत होते. मुलांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. त्यांचे रात्रीपर्यंत अभ्यास चालत होते. ती कोणी बरोबर येऊ शकत नव्हती.गडी माणसं दिवसभराच्या शेतीच्या कामांमध्ये एवढी दमून जात होती की ; रात्री पहारा देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करणं अवाजवी होतं. दोन्ही भाऊ कोर्टाच्या कामासाठी शहरात गेले होते.शेवटी आज रात्री स्वतः पहारा द्यायचा असं त्यांनी ठरवलं.

त्या दिवशी दुपारी जेवतानाच ते कांताला म्हणाले,आज संध्याकाळी मला रात्रीचं जेवण बांधून दे. रात्री आमराईत राखण करायला जायचंय. "

"तुम्ही एकटे रात्रभर रहाणार तिकडे? काही नको जीव धोक्यात घालायला!" ती घाबरून म्हणाली.

"मी वामनला थांबवून घेणार आहे सोबतीला! बहुतेक रात्री माकडं येऊन बागेची नासधूस करत असतील. तसं असेल तर पुढच्या आठवड्यात रोजच जावं लागेल.

आंबा उतरवून घेईपर्यंत काळजी घ्यावी लागेल. एकदा आंबा मुंबईला गेला, की काळजी मिटेल. " तानाजीरावांनी तिला समजावलं.

वामन सोबतीला आहे; हे कळल्यावर कांताची धास्ती मिटली. तिने संध्याकाळी भाजी भाकरी डब्यात भरून तानाजीकडे दिली. त्यांच्या हातात फक्त एक सोटा आहे; हे पाहून ती म्हणाली, " तुम्ही बंदूक नाही नेणार? हत्यार जवळ असलेलं बरं! रात्रीची वेळ आहे!" तिने बंदुकीची आठवण करून दिली.

"नको! रात्रीच्या वेळी समोर कोण आहे कळत नाही! विकतचं दुखणं मागे लागायचं! मला हा सोटाच पुरे आहे." तानाजीराव म्हणाले. त्यांना बंदुकीचा परवाना मिळाला होता; पण त्यांना ती वापरायची गरज अजूनपर्यंत कधी पडली नव्हती.

तानाजीराव आमराईत गेले खरे; पण वामनला रात्री थांबणं शक्य नव्हतं. त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती. तिच्यासाठी घरी जाणं त्याच्यासाठी आवश्यक होतं. तसा तानाजीराव निधड्या छातीचा गडी! एकटाच त्या आमराईत थांबला. दुपारच्या निवा-यासाठी एक खोपटवजा खोली बांधलेली होती; तिथे जाऊन बसला. आणलेली भाजी- भाकरी खाल्ली. वेळ जाता जात नव्हता. रातकिड्यांची किरकिर ऐकून एकांताचा अधिकच आभास होत होता. एकच गोष्ट चांगली होती; आज पौर्णिमेची रात्र असल्यामुळे बाहेर लख्ख प्रकाश पडला होता. चंदेरी किरणांनी ती आमराई उजळून निघाली होती. कोणी आलं तर पकडणं सोपं जाणार होतं.

बराच वेळ गेला. बहुतेक मध्यरात्र झाली असावी. अजूनपर्यंत कुणीही तिथं फिरकलं नव्हतं. तानाजीरावांवर निद्रादेवीचा अंमल सुरू झाला. पापण्या मिटू लागल्या. आणि त्याच वेळी त्यांना कर्र --- कर्र----कर्र --कुणाच्या तरी वहाणांची करकर ऐकू आली. बाहेर पाचोळ्यावर कुणाच्यातरी चालण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.

एवढ्या रात्री बगीचात कोण चालतंय? ते चोर तर आले नाहीत? तानाजीरावांची झोप कुठल्या कुठे उडून गेली. बाहेर येऊन ते इकडे तिकडे पाहू लागले. बाहेर एक उंच- धिप्पाड काळाकभिन्न माणूस फिरत होता. हातात मोठी काठी होती. तिला लावलेले घुंगुर काठी खाली टेकताच खुळखुळ वाजत होते. ते तिथेच थबकले ; तो काय करतोय हे निरखून पाहू लागले. जरी बागेत भरपूर चंद्रप्रकाश होता, तरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पाण्याच्या लाटांवर जसं प्रतिबिंब लहरींबरोबर हलताना दिसतं; तशाच त्या माणसाचा देह चंद्रकिरणांमध्ये लहरतोय असं वाटत होतं. जरी वहाणांचा आवाज येत होता तरी तो हवेत तरंगल्याप्रमाणे इथून तिथे जातोय असं वाटत होतं.

" कोण आहेस तू? एवढ्या रात्री इथे काय करतोयस? चोरी करायला आलायस की काय? तरीच मला संशय. आला होता. ब-या बोलाने इथून निघून जा!" तानाजीराव दरातूनच ओरडले. आवाज ऐकताच चोर पळून जाईल असं त्यांना वाटलं होतं; पण झालं उलटंच!

"मला इथून. जा सांगणारा तू कोण? " असं म्हणत त्या माणसानं काठी उगारली.

त्या अनोळखी माणसाचं धाडस पाहून तानाजीरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी हातातला सोटा त्या माणसावर उगारला. काठीवर सोटा बसला. त्यांना वाटलं होतं की काठीचे तुकडे होतील. पण झालं उलटंच! सोटा लांब कुठेतरी गवतात जाऊन पडला. तानाजीरावांचा हात बधीर होतोय असं त्यांना वाटलं; एवढा जोर त्या माणसाच्या काठीत होता. एवढ्या ताकतीचा माणूस त्यांना आजमितीस भेटला नव्हता. ते थोडे चरकले! पण मागे हटणं त्याच्या स्वभावात नव्हतं. आता द्वंद्ब अटळ होतं.

**********

contd. -- part -- 4