जुना घाट Shivani Anil Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुना घाट

नुकताच पावसाळा सुरू झाला.राजेश आणि त्याच्या मित्रांनी कोकणात फिरायला जायचं असा प्लान केला.रविवारी दुपारी निघू असं सांगून राजेशने बॅग पॅक करायला सुरुवात केली.

त्यात एकीकडून राजेशच्या आईच्या सुचना सुरू झाल्या.
"राजेश नीट जा हा बाळा आणि कोकणात पाऊसही खूप असतो त्यामुळे गाडी सांभाळून चालव आणि मी असं एैकलय की कोकणात भुताटकी ही फार असते."

यावर राजेश हसून म्हणाला..., काय भुताटकी , अगं आई असं काही नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहेत बाकी काही नाही. आणि तु काळजी नको करू मी जाईन नीट ओके.

तेवढ्यात राजेशचे मित्र त्याला घराखालून आवाज देऊ लागले.
"राजेश..ऽऽ राजेश...ऽऽ झालं का...?
राजेशने ही आवाज देऊन सांगितले...हो..ऽ हो...ऽ आलोच.
"चल येतो गं आई... असं म्हणून राजेश घराबाहेर पडला.

राजेशने पार्किंग मधली 4 व्हीलर काढली आणि मित्रांबरोबर तो मुंबईहून कोकणाकडे रवाना झाला.

बाहेर मस्त पाऊस पडत होता. त्यात हे मित्र गाडीत मोठमोठ्याने गाणी म्हणत चालली होती.

कधी त्यांनी मुंबईचा रस्ता पार केला हे त्यांना ही कळले नाही.
रात्रीचे ८ वाजले होते बाहेर मुसळधार पाऊस ही सुरू झाला.

राजेश गाडी चालवत होता.
अचानक गणेशने राजेशला गाडी थांबवायला सांगितली.
अरे.. "राजेश जरा गाडी थांबव, मला इथे रस्त्याच्या कडेला एक हाॅटेल दिसतंय आपण इथे जेवण करू आणि पाऊस जरा कमी झाला की निघू"
"हा हा ठीक आहे चल असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला.
मग राजेश आणि गणेश बरोबर सुधीर आणि आनंद ही गाडीच्या बाहेर उतरले.
चौघांनी मस्त गप्पा मारत जेवण केले.
"आज पाऊस काही कमी व्हायचं नावं घेत नाही" ,असं गणेश म्हणाला.
"हो ना यार....चला आपण गाडीत जाऊन बसू" असं म्हणून सुधीर गाडीत जाऊन बसला.

तेवढ्यात हाॅटेलच्या एका वेटर ने राजेशला हाक मारली.
"ओऽ..ओऽ.. साहेब कुठं निघालाय तुम्ही एवढ्या पावसापाण्याचं"
"अरे.. कोकणात निघालोय फिरायला" असं म्हणून राजेश गाडीच्या दिशेने निघाला.

"बरं.. बरं नीट जावा पण त्या वरच्या नव्या रस्त्यानं जावा, चुकून बी खालच्या जुन्या रस्त्यानं जाऊ नका"असं तो वेटर राजेशला सांगू लागला.

"हम्मऽ.. ते बघतो आम्ही कुठून जायचं ते" असं म्हणून राजेश गाडीत जाऊन बसला.

"काय रे राजेश किती उशीर एवढं काय...?बोलत होतास त्या वेटरशी" असं सुधीर तोंड वाकडं करून विचारू लागला.

"काही नाही रे सोड , तो वेटर जरा वेडा वाटतोय मला काहीतरी बरळत होता.चलं निघू आपण" असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली.

रात्रीचे १० वाजले होते.राजेश अगदीच गाडी चालवून वैतागला होता.गणेश, सुधीर आणि आनंद यांपैकी कोणाला तरी सांगाव गाडी चालवायला.
पण कसलं काय..! हे तीन ही महाशय मस्त झोपले होते.
"हे तिघेही असलेच झोपाळू , ह्ह्ह ऽऽ...."अस म्हणून राजेश गाडी चालवत राहीला.

आता पावसानेही चांगलाच जोर धरला होता.रस्त्यावर ही बर्याच गाड्यांची वर्दळ चालू होती.पावसामुळे थोडेफार ट्राॅफिक ही जाणवत होते.त्यामुळे राजेश पुरता वैतागला,
त्याने गाडी जरा रस्त्याच्या कडेला उभी केली.

त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटी टपरी दिसली.त्याने टपरी वाल्याला आवाज दिला.
"ओऽ...ओऽ....काका तो समोरचा रस्ता रत्नागिरीलाच जातो ना"
"हो..हो.. साहेब तिकडं च जातो" असं त्या टपरीवाल्याने सांगितले.

"बरं... बरं... आणि तो त्याच्या बाजूला आहे तो रस्ता कुठे जातो..?"असं राजेशने विचारले.

"कुठला त्यो रस्ता...! त्यो पण रत्नागिरीलाच जातो, पण त्या रस्त्यानं रात्रीच कुणीबी जात न्हाय, जुना रस्ता हाय त्यो आणि कायतरी वंगाळ हाय तिकडं, तुमी नका जाऊ तिकडंन, या नव्या रस्त्यानं जावा" असं त्या टपरी वाल्याने सांगितले.

"ठीक आहे" असं म्हणून राजेशने गाडी सुरू केली.
तेवढ्यात सुधीर जागा झाला. "काय रे कोणाशी बोलत होतास मगाशी" असं सुधीरने विचारले.

राजेश म्हणाला..‌‌,"अरे त्या टपरी वाल्याशी बोलत होतो , तो त्या जुन्या रस्त्याने जाऊ नको असं म्हणत होता."

सुधीर मुळचा भित्रा तो राजेशला भीतभीत म्हणाला....." बरं मग आपण नकोच जायला त्या जुन्या रस्त्याने."

"तू जरा गप्प बस रे , ते बघ त्या नव्या हायवेला किती ट्राफिक आहे.त्या रस्त्याने जर आपण गेलो ना तर सकाळ होईल इथेच" असं राजेश सुधीरला रागारागाने बोलत होता.

असं म्हणून राजेशने गाडी जुन्या रस्त्याकडे वळवली.
तेवढ्यात गणेश आणि आनंद ही जागे झाले.

आनंदने विचारले...."काय रे राजेश अजून किती वेळ लागेल
रत्नागिरीला पोहोचायला."

"अरे हा १ किलोमीटरचा छोटा घाट पार केला की पोहचू आपण"असं राजेश सांगत होता.

मग चौघेही मस्त गप्पा मारत चालले होते.तेवढ्यात अचानक राजेशचे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले.आणि त्याने अचानक गाडीचा ब्रेक दाबला.
"काय रे राजेश गाडी का थांबवलीस" असं गणेशने विचारलं.

"अरे ते बघ ना तिकडे त्या रस्त्याच्या कडेला कोणीतरी बसलयं" असं म्हणून राजेशने गाडीची काच खाली केली.
आणि पाहतो तर काय..!

एक ३४-३५ वर्षाची बाई हिरवा शालू नेसून, हातात हिरवा चुडा, विस्कटलेले केस त्या केसात सुकलेला गजरा एखादी नवी नवरी जशी तयार होते अगदी तशीच दिसत होती ती.

"अरे ही बाई ऐवढ्या रात्री इथे काय करतेय...?"असं राजेशने मित्रांना विचारलं.

"काय माहित पण सोड ना आपल्याला काय करायचंय, तु गाडी सुरू कर" असं गणेश म्हणाला.

"जरा वेडा आहेस का तु गणेश , ती बाई कोणत्यातरी प्रॅब्लेम मधे असेल. थांब आपण विचारू" असं म्हणून राजेशने लगेच त्या बाईला आवाज दिला.

"ओऽ...ओऽ....बाई काय करताय तुम्ही इथे एवढ्या रात्री..!
आणि एकट्याच आहात का...?
ती काहीच न बोलता त्याला हाताने जा.. जा...असं खुनवते.

तरी तो गाडीतून खाली उतरून तिच्या जवळ जातो. आणि पुन्हा तिला विचारतो.
"ओऽ...ओऽ....बाई काय करताय तुम्ही इथे एवढ्या रात्री..!
तशी ती त्याच्याकडे बघते आणि रडायला लागते.

"आता काय सांगू तुम्हाला माझा होणारा नवरा मला इथंच सोडून गेला आणि परत आलाच नाही.मी त्यालाच शोधतेय."
असं ती बाई राजेशला रडत-रडत सांगू लागली.

"बरं.. बरं..चला तुम्ही गाडीत बसा आम्ही मदत करतो तुम्हाला, तुमच्या नवर्याला शोधायला."असं म्हणून राजेश त्या बाईला गाडीत बसायला सांगतो.

"नाय...नाय...मी नाय येणार तुमच्याबर जा तुम्ही माझा नवरा आला की मी जाईन त्याच्याबर" असं म्हणून त्या बाईने गाडीत बसायला नकार दिला.

"ओऽ... बाई एवढ्या रात्रीच या आडमार्गाला असं बाईमाणसाने थांबलेल बरं दिसत नाही. म्हणून गाडीत बसायला सांगतोय."
बाकी तुमची मर्जी येणार असाल तर चला..! असं म्हणून राजेश गाडीत बसला‌.

"थांबा-थांबा येते मी" असं म्हणून ती बाई गाडीत येऊन बसली.

इकडे गणेश, सुधीर आणि आनंद आपापसात राजेश बद्दल बोलू लागले.
"या राजेशला काय कळतं की नाही कशाला नसती ब्याद गाडीत घेतले. असं गणेश तोंड वाकडं करून बोलू लागला.

"हो ना यार आधीच आपल्याला उशीर झालाय आणि त्यात हे" असं म्हणून सुधीर मागे जाऊन गणेश आणि आनंदच्या बाजूला बसला.

राजेशने गाडी सुरू केली.

"काय हो...? तुम्हाला कुणीकडं जायचयं" असं त्या बाईने राजेशला विचारलं‌.

"आम्ही इकडेच कोकणात फिरायला आलोय." राजेश हसून उत्तर देत म्हणाला‌. "By the way तुमचा नवरा तुम्हाला असं कसं या घाटात सोडून गेला."

"माहित नाही..?"असं म्हणून ती बाई गप्प झाली.

आता पाऊस जरा वेळ थांबला होता आणि बाहेर मस्त मोकळी हवा सुध्दा होती. त्यात सगळीकडे भयाण शांतता, पुर्ण रस्त्यावर एकही गाडी किंवा एखादे पाखरू असल्याचे ही जाणवत नव्हते.
रात्रीचा १ वाजून गेला.

"वाऽ... किती छान वातावरण आहे बाहेर" असं म्हणून आनंदने खिडकीची काच खाली केली.

"हो ना ,अरे राजेश जरा वेळ गाडी थांबव ना..! जरा फ्रेश वाटेल तुला ही" असं गणेश म्हणाला.

"हो म्हणून राजेशने गाडी थांबवली."

चौघेही जरावेळ बाहेर गप्पा मारत उभे राहिले.

"अरे यार आपण एवढं फिरायला आलोय आणि साधा
१ selfi सुध्दा नाही काढला." असं म्हणून सुधीर selfi काढू लागला.आणि विडिओ शुटिंग ही करू लागला.

ती बाई एकटीच गाडीत बसली होती.

"तुम्हाला काय हवं आहे का..? पाणी वगैरे काही"
असं राजेशने त्या बाईला गाडीजवळ येऊन विचारले.

"नाय काय नको मला" असं ती म्हणाली.

"बरं मग जर तुम्हाला आराम करायचा असेल तर करा, आम्ही इथेच आहोत." असं म्हणून राजेश पुन्हा मित्रांकडे गेला.

ते चौघेही पुन्हा गप्पा मारण्यात मग्न झाले.

"guys आपण येताना वेफर्स आणलेत ना थांबा मी ते गाडीतून घेऊन येतो‌." असं म्हणून सुधीर गाडीजवळ गेला.
आणि पाहतोतर काय गाडीमध्ये बाई नव्हती.

"अरे राजेश ती बाई कुठे गेली."असं सुधीर विचारू लागला.

"काय..? असेल ना तिथेच" असं म्हणून ते तिघे ही गाडीजवळ आले.

"अरे खरंच की कुठे गेली ही बाई" असं गणेश भीतभीत बोलू लागला.

मग ते चौघेही गाडीच्या अवतीभवती तिला शोधू लागले.

"अरे यार कुठे गेली असेल अशी अचानक" असं राजेश वैतागून बोलू लागला.

तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

"सोड ना राजेश चल निघू आपण बघ आता पाऊस पण सुरू झालाय." असं म्हणून ते तिघे ही गाडीत जाऊन बसले.

"होय..!" असं म्हणून राजेशही गाडीत येऊन बसला.

रात्रीचे २ वाजून गेले.
राजेश गाडी चालवत होता.पण त्याचे मन मात्र ती बाई अचानक कुठे गेली असेल....?याचाच विचार करत होत.

अचानक त्याच लक्ष समोर रस्त्यावर गेले आणि त्याने जोरात ब्रेक दाबला.

"अरे काय झालं राजेश गाडी का थांबवलीस" असं गणेशने विचारलं.

"अरे ते बघा ना.. कोणीतरी रस्त्याच्या मधेच बसलंय."
असं म्हणून राजेशने गाडीचा दरवाजा उघडला.

"चल आनंद आपण बघू कोण आहे ते" असं म्हणून राजेश गाडीच्या बाहेर उतरला.

मग आनंद आणि राजेश त्या व्याक्तिला बघायला पुढे गेले.त्या रस्त्यावर पुर्ण अंधार पसरला होता.त्यामुळे त्यांनी मोबाईलचा टॅर्च चालू केला.

"अरे आनंद कोणीतरी पुढच्या बाजूला तोंड करून बसलं आहे, असं दिसतंय."असं म्हणून राजेश पटापट पावलं टाकत पुढे आला.
आणि त्याने जे पाहिल ते पाहून अचानक त्याच्या काळजाचा ठोकाचं चुकला.
ती गाडीतून गायब झालेली बाई तिथे बसली होती.

"ओऽ....ओऽ......बाई तुम्हाला काय कळतं की नाही..! असं अचानक न सांगता गाडीतून निघून कसं गेला. असं बोलत बोलत राजेश तिच्या समोर येऊन उभा राहिला.

तिने अचानक रागारागाने राजेशकडे बघितलं. ती बाई काहीतरी खात होती. तिचं तोंड आणि हात रक्ताने भरलेले होते ‌कोणत्यातरी जनावराला मारून ती त्याचे लचके तोडत होती.

हे सर्व दृश्य पाहून राजेश आणि आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली.त्यांना काय बोलावे आणि काय करावे काहीच सुचेना.

तेवढ्यात त्यांच्या मागोमाग गणेश आणि सुधीर ही आले.ते दोघंही हा प्रकार पाहून थक्क झाले.

"राजेशऽऽ..... राजेशऽऽ..... चल लवकर इथून" असं म्हणत ते तिघे ही राजेशला घेऊन गाडीजवळ गेले.

तेवढ्यात ती बाई मोठमोठ्याने हसू लागली‌. "हाऽऽ.....हाऽऽ....कुठं पळून चालला आऽ.... मी सोडणार नाय कोणालाच, बघून घेईन एकेकाला कुठं पाळायचय तिकडं पळा"
आता निघा इथून लवकर मी येतेच हे खाऊन असं ती त्या मारलेल्या प्राण्याचे लचके तोडत तोडत म्हणू लागली,
आणि कुठं थांबला की मेलाच म्हणून समजा.

"अरे चला ना लवकर यार" असं गणेश भीतभीत बोलू लागला. ते चौघेही पटापट गाडीत बसले.गाडीच्या सगळ्या खिडक्या बंद केल्या. गाडी अगदी सुसाट वेगाने पळवत होते.

"आता काही झालं तरी कुठेही थांबायचे नाही." असं सुधीर बोलू लागला.

रात्रीचे ३ वाजले होते. राजेश गाडी पुर्ण स्पीडने पळवत होता.
तेवढ्यात अचानक गाडीसमोर एक ५-६ वर्षांचा लहान मुलगा आला.

"अरे हा मुलगा कोण आणि इथे काय करत असेल." असं राजेश मित्रांशी बोलू लागला.

"तो कोणीही असो तू गाडी अजिबात थांबवू नको" असं आनंद म्हणाला.

त्यांनी गाडी न थांबवता तशीच सरळ नेली.
गाडी पुढे आल्यावर गणेशने गाडीच्या मागच्या खिडकीतून पाहिले तर तो मुलगा ही दिसेनासा झाला.

नक्कीच हा मुलगा ही भूत असणार याची त्या चौघांची खात्री झाली.

राजेश अगदी वेगाने गाडी पळवत होता तरी तो फक्त १ किलोमीटरचा घाट गेला २-३ तास संपतच नव्हता‌.

तेवढ्यात ती बाई पुन्हा रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली दिसली, ते चौघेही तिला पाहून एकदम दचकले‌.

"आता काही झालं तरी मी गाडी नाही थांबवणार" असं म्हणून राजेशने सरळ तिच्या अंगावरुन गाडी नेली‌, तशी ती पुन्हा गायब झाली.

थोडावेळ पुढे आल्यावर अचानक त्यांची गाडीच बंद पडली.

"अरे यार दुष्काळात तेरावा महिना आता काय करायचं" असं गणेश म्हणू लागला.

"हो ना, आता आपण एक काम करू या घाटात कुठेतरी लपून बसू" असं राजेश म्हणाला.

"हो तसं पण २ तासांची बात आहे, एकदा पहाट झाली की हा धोका टळेल." असं म्हणून ते चौघेही घाटात असलेल्या घनदाट झाडीत जाऊन लपून बसले.

त्या घनदाट झाडीतून त्यांना त्यांची रस्त्यावर उभी असलेली गाडी सहज दिसत होती.
ते अगदी डोळ्यात तेल घालून पाहत होते आता गाडी थांबलेली पाहून ती बाई कधीही गाडीजवळ येईल.

रात्रीचे ४ वाजले ते चौघेही खूप थकले होते अगदी झोपेलाच आले होते.तेवढ्यात अचानक त्यांना त्या बाईच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला.

"कुठं लपून बसला आऽ......., सापडला ना तर सोडणार नाय कोणालाच बघून घेईन एकेकाला" असं म्हणून ती मोठमोठ्याने हसू लागली‌.
आणि त्यांना शोधू लागली.

"अरे राजेश ही जर आपल्याला इथपर्यंत शोधत आली तर आपल काही खरं नाही" असं म्हणत आनंद बाजूच्या एका दगडाला टेकून उभा राहिला,आणि अचानक तो दगड गडगडत मागे एका लहानग्या भुयारात गेला.

"अरे हे काय आता" असं म्हणत ते चौघेही त्या भुयारात शिरले. त्या भुयारात एक खूप मोठ्ठी देवीची मुर्ती होती.
ती मुर्ती पाहून त्या चौघांच्या मनातली भिती अगदीच कमी झाली.आपण इथे सुरक्षित आहे अशा आशेने,सकाळ होईपर्यंत आपण इथून बाहेर जायचं नाही असं ठरवून ते तिथेच थांबले.

पण इकडे मात्र ती अतृप्तशक्ति त्या चार जीवांच्या भुकेने अकालतांडव करत होती. "मला माहित हाय तुम्ही कुठं लपून बसलाय ते पण मला तिथं यायची आज्ञा नाय , नशीब चांगल रे पोरा नशीब चांगल." असं म्हणत ती अदृश्य झाली.

खरं तर नकळत त्या चौघांनी त्या अतृप्तशक्ति ची अतृप्त सीमा ओलांडली होती.त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

काही वेळाने बाहेर जरा उजेड पडलेला पाहून ते चौघेही पुन्हा आपल्या प्रवासाला निघाले.


समाप्त.🙏



✍️@शिवानी_पाटील.