Te three stars! books and stories free download online pdf in Marathi

ते तीन तारे !


तुम्ही ते तीन तारे पाहीलेत का?
रात्रीच्या काळ्याभोर आकाशात नेहमी लखलखताना दिसणारे! मी गावी गेल्यावर मला ते नेहमी तिथल्या आकाशात लखलखताना दिसतात! पण इकडच्या मुंबईतल्या आकाशात साधा एखादा तारा नावाला ही कुठे दिसत नाही!
असो,
मुंबईतल्या आकाशात तारे शोधणं म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासारखं आहे.
पण तरीही बहूधा आजकालच्या लाॅकडाऊनमुळे प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत तारे दिसण्याची संख्या बऱ्यापैकी वाढताना दिसतेय,
आणि आज तर चक्क मला ते तीन तारे दिसले आणि तेही इथे.......मुंबईत!
हुश्शऽ.....! खूप भारी वाटलं त्यांना पाहील्यावर, अगदी खूप दिवसांनी आपलं कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं!
मी लहान असताना माझे आजोबा मला नेहमी त्या तीन ताऱ्यांची गोष्ट सांगायचे!
ते म्हणायचे की....., हे तीन तारे म्हणजे राम, लक्ष्मण आणि भरत आहेत. नेहमी एकत्र असतात कधीही एकमेकांपासून दूर जात नाहीत आणि म्हणूनच ते अजरामर आहेत.
खरंतर हे तीन तारे राम, लक्ष्मण,भरत असतील ही किंवा नसतील ही!
ते काहीही असोत,
पण हे तीन तारे नेहमी एकत्रच असतात,साधारण रात्रीच्या मोकळ्या आकाशात पूर्व दिशेकडे एकाच समान अंतरावर लखलखताना दिसतात.
कुणास ठाऊक पण या तीनही ताऱ्यांच काहीतरी रहस्य असेलच ना? आपापसात काहीतरी ऋणानुबंध असतील, खूप प्रेम ही असेल.
म्हणून तर गेल्या कित्येक वर्षांपासून हे तीघे ही एकत्र आहेत.

पण या तिघांना कधी एकमेकांचा कंटाळा वगैरे तर येत नसेल ना ? किंवा यांच्यात भांडणं तर होत नसतील ना? यांच्यात आपल्याला सारखे हेवेदावे, रूसवे-फुगवे चालत असतील का?
कुणास ठाऊक..!
पण काहीही असो..,
ते तिघेही नेहमी एकत्र असतात हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे!
नाहीतर आपल्याकडे लोकांना नात्यांचा खूप लवकर कंटाळा येतो, मग ते नातं कुठलंही असो आई-मुलाचं , नवरा-बायकोचं, बहीण-भावाचं , मित्र-मैत्रिणींचं
अगदी कुठलंही!
ऋणानुबंध,प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे सगळं या नात्यांमध्ये काही मोजक्या दिवसांपूरतच मर्यादित असतं, बाकी उरतो फक्त स्वार्थ....हव्यासाचा,लोभाचा आणि मोहाचा!
एकमेकांच पटत नाही म्हणून एकमेकांपासून वेगळे होणारे हे लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नेहमी नात्यांचा नवा option च शोधत असतात,
पण काय उपयोग अश्या options चा?
हे असले options तर फक्त स्वत:चा स्वार्थ भागवण्यासाठी
निवडलेले असतात, यांमध्ये ती नात्यातली गोडी कधीच नसते.
असो..,
इथले "so called" लोक आणि त्यांचे "so called" विचार... याच्या बाबतीत आपण न बोललेलच बरं..!
बाकी उरतो प्रश्न त्या तीन ताऱ्यांचा... तर त्यांच्या कडे ही इथल्या लोकांसारखे option असतातच की!
आकाशात त्यांच्या सोबत एकाच वेळी असंख्य तारे झगमगत असतात,
ह्या तीन ताऱ्यांमध्ये कधी वादविवाद झाल्यावर, एकमेकांचे काही विचार पटले नाहीत म्हणून त्यांनी ही आकाशातल्या असंख्य ताऱ्यांपैकी एखादा option निवडला असता तरी चाललं असतं नाही का?
पण त्यांनी तसं कधी ही केलेलं नाही.
त्यांच्यातलं प्रेम आणि जिव्हाळा चिरंतर आहे.ते कधी संपूच शकत नाही, त्यांच्यातली ही त्रिकुट युती हीच त्यांची खरी ओळख आहे!
आणि म्हणूनच आकाशातल्या असंख्य ताऱ्यांमध्ये ते तिघेही नेहमीच उठून दिसतात.
मला तर वाटतं देवाला ही या तीन ताऱ्यांचा हेवा वाटत असावा!
हे तीन तारे म्हणजे निसर्गाने आकाशाला दिलेली खूप सुंदर भेट आहे..!
यांच्यातल्या निस्सिम प्रेमामुळे आणि अतूट युतीमुळे एक गोष्ट मात्र राहून राहून लक्षात येते ती म्हणजे माणसाच्या आयुष्यात कितीही मोठी संकटं आली, आपल्या जवळच्या लोकांबरोबर कितीही भांडणं झाली तरीही कुठलंही नातं असं तोडून देऊ नये,
नात्याला वेळ देऊन समजून घ्यावं, नातं असं एका क्षणात तोडून टाकणंं हे त्याचं औषध नाही !

आणि जेव्हा आपण सगळे वादविवाद विसरून, येणारी संकटं झुगारून नात्यांच्या सागरात घट्ट पाय रोवून उभे असतो,
तेव्हा आपण ही त्या आकाशगंगेतल्या लखलखणाऱ्या तीन ताऱ्यांसारखे अतूट आणि अजरामर होतो यात शंकाच नाही..!

.
.
✍️शिवानी पाटील.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED