आजारांचं फॅशन - 16 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 16

“तुम्हाला असं का वाटतं मनोचिकित्सक डॉक्टर हे वेड्यांचे डॉक्टर असतात, आपण ज्या जगात जगतो आणि आपली सध्याची जी जीवन शैली आहे त्या मुळे स्ट्रेस, डिप्रेशन, निद्रानाश, वैगेरे, वैगेरे असे खूप मानसिक आजार होणे स्वाभाविकच आहे, म्हणून आपण वेडे झालो असा समजच मुळात चुकीचा आहे, माझे ऐक मी तुला एक चांगल्या डॉक्टरांची चिट्ठी देतो त्यांना जाऊन भेट, डॉक्टर खूप चांगल्या आहेत, तुझा त्रास पूर्णपणे ठीक करतील”

डॉक्टरांनी बोलता बोलता एका प्रिस्क्रिप्शन पेपर वर डॉक्टर सिंधू माधव यांचे नाव आणि नंबर लिहून अनिलकडे दिले आणि त्यांना उद्याच भेट असे त्याला बजावून सांगितले.

आधीच सविताच सोडून जाण अनिलला आतून पोखरत होतं आणि त्यात असलेलं आजारपण किंबहुना वाटणारं आजारपण त्याचं जगणं अवघड, खूप अवघड करत होतं, त्याला पण त्याच्या बाकीच्या मित्रां सारखं किंवा इतर कुठल्याही माणसासारखं सामान्य आणि भय मुक्त जगायचं होतं, त्यालाही हसायचं होतं, बागडायचं होतं, बेभान वाऱ्या सारखं धावायचं होतं, बायको मुलानं सोबत मन खोलून जगायचं होतं.

दवाखान्याच्या बाहेर येऊन अनिलने पाच मिनिटे बाईक जवळ उभे राहून विचार केला आणि काय जाणे त्याच्या मनात काय आलं, त्याने डॉक्टरची चिट्ठी काढली, खिशातून मोबाईल फोन काढला आणि डॉक्टर माधवयांच्या क्लीनिकला फोन लावला आणि त्याच दिवशी संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली.

अनिल डॉक्टर आणि आजाराच्या बाबतीत वेळेचा खूप पक्का, अपॉइंटमेंटच्या वेळेच्या दहा मिनिटे आधीच क्लिनिक मध्ये हजर झाला, रिसेप्शनवर वर बसलेल्या मुलीला आपले नाव आणि अपॉइंटमेंट बद्दल सांगितलं, रिसेप्शनिस्ट ने त्याला आतमध्ये पेशंट आहे, ते बाहेर येई पर्यंतर बसायला सांगितलं.

अनिल सोफ्यावर बसून नेहमी प्रमाणे क्लिनिक न्याहाळायला लागला, अनिलची आणखी एक खास सवय होती, तो प्रत्येक दवाखान्यात डॉक्टरची डिग्री कुठे लटकवलेले दिसतेय का ते शोधणे, आणि जर दिसलीच तर त्याचा एक अन एक शब्द वाचून काढणे आणि जर डिग्री नाही भेटली तर औषधोपचार पेपर वर डॉक्टर चा मेडिकल रजिस्ट्रेशन नंबर तपासणे, असा हा संशय करणे त्याच्या स्वभावातील आनखी एक पैल्लू.

एक सात ते आठ मिनटात आतला पेशंट बाहेर आला, अनिलने त्याच्या कडे बघून याला काय आजार असावा ह्याचे अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा ह्या आधीच आतून बेल वाजली आणि रिसेप्शनिस्टने अनिलला आत जाण्याचा इशारा दिला.

अनिल आत गेला डॉक्टरांनी एक स्मित हास्य करून अनिलला बसायला सांगितले, डॉक्टर साधारणतः चाळीस बेचाळीस वर्षाच्या परिपक्व्व आणि अनुभवी सायकियाट्रिस्ट होत्या, डोळ्यावर चष्मा, टेबलं वर पेन, पेपर, बी पी चेक करण्याची मशीन, मानवी मेंदूचा एक छोटाशा शो पीस सारखा पुतळा, अशी त्यांची नीट नेटकी केबिन.

अनिलने अडवाणी डॉक्टरची चिट्ठी काढून डॉक्टर माधव कडे दिली, डॉक्टरने त्यावर नजर फिरवत चिट्ठी बाजूला ठेवली आणि अनिलला विचारलं,

“बोला काय त्रास आहे तुम्हाला?

“डॉक्टर मला भीती वाटल्यासारखं होत, धडधड होते, बी पी वाढल्यासारखं होतं, हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येईल आणि मी मरेल असं वाटत असतं नेहमी”

अनिल ने एका श्वासात सांगितलं.

“आणखी काही त्रास?

डॉक्टरांनी पुन्हा एकदा विचारले

“हो मला डोकं दुखलं की वाटतं ब्रेन ट्युमर झाला असेल, खोकला आला की वाटतं टी बी तर नसेल ना झाला, पोटात दुखलं तर की वाटतं कॅन्सर किंवा किडनी तर खराब नसेल ना झाली, एक झालं का दुसरा आजार उभाच असतो, मी थुंकलो तर बघतो कि रक्त तर नाही येत ना थुंकीतून, रात्री झोपायला जाताना भीती वाटते कि झोपेतच मरेल कि काय, कधी कधी टॉयलेट मध्ये किंवा अंघोळ करताना देखील मरून जाईल अशी भीती वाटते, खूप घाबरट स्वभाव आहे माझा”

अनिल खूप प्रामाणिक पणे बोलत होता.

डॉक्टरांनी सगळे नीट ऐकून विचारले

“घरी कोण कोण असतं?

“बायको आणि दोन मुल आहेत, पण सध्या मी एकटाच आहे, बायको मुलांना घेऊन माहेरी निघून

गेलीय”

“का?

“मी कधी कधी पितो कारण पिल्यावर मला भीती वाटत नाही आणि झोप चांगली येते, माझ्या ह्या पिण्याच्या सवयी आणि आजारांच्या वागणुकीला चिडून गेली”

अनिलने केविलवाण्या स्वरात सांगितले.