डॉक्टरांना अनिलच्या त्रास लक्षात आला आणि अनिल ला सहानुभूतीच्या स्वरात विचारले
“हा तुमचा स्वभाव असा का आहे तुम्हाला माहित आहे का?
डॉक्टरच्या प्रश्नाला अनिलने मान हलवूनच नकार दिला.
“तुम्हाला इंजेक्शनची भीती वाटते?
“नाही अजिबात नाही, आहो लई इंजेक्शन मारून घेतलेत मी”
अनिलने अभिमानाने चटकन उत्तर दिले.
“पण मला किती तरी लहान मोठे असे लोक माहित आहे कि ज्यांना इंजेक्शनची खूप भीती वाटते, किंबहुना इंजेक्शनच्या नावानेच त्यांना रडू येते”
डॉक्टर आपले बोलणे संपवतच होत्या त्या आधीच अनिल मधेच बोलला
“त्यात काय घाबरायचं अन रडायचं इंजेक्शननि काय मरतंय व्हय कोण”
“एकदम बरोबर अशीच काही प्रतिक्रिया तुमच्या बद्दल हि कुणाची असू शकते, खोकला आल्यावर काय घाबरायचं आणि एक्सरे काढायचा”
डॉक्टर बोलत होत्या आणि अनिल शांतपणे सगळे लक्ष पूर्वक ऐकत होता.
“ तुम्हाला जो त्रास आहे त्याला वैद्यकीय भाषेत हायपोकॉन्ड्रिया किंवा आजरांचा भ्रम असे म्हणतात, तुम्हाला कुणी कितीही सांगितलं कि तुम्ही एकदम ठीक आहात तरी तुमचा मेंदू ते मानत नाही, तुमच्यात आणि इतरांमध्ये फरक फक्त सहन शक्तीचा आहे, तुमची इंजेक्शनची वेदना सहन करण्याची शक्ती खूप चांगली आहे म्हणून तुम्हाला त्याची भीती वाटत नाही पण तुमची काहीतरी मोठा आजार होण्याची, हार्ट अटॅक किंवा इतर काही घातक आजार होऊन म्रुत्यु येण्याची जी चिंता असते ती सहन करण्याची किंवा टाळण्याची जी सहनशक्ती असते ती फार कमकुवत आहे म्हणून तुम्हाला ती सहन होत नाही आणि तुमचा मेंदू भीतीच्या रूपाने ते वक्त करतो, मग तुमची हृदयाची गती वाढते आणि घाबरल्या सारखं होत आणि तुम्ही डॉक्टर कडे पळता, आणि ते देखील तात्पुरत्या समाधाना पुरतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादी पेनकिलर खाल्ल्यावर कस तात्पुरतं बर वाटत तस तुम्हाला काही झालं नाही असं डॉक्टरने सांगितलं कि तुम्हाला तात्पुरतं बर वाटत”
“हो डॉक्टर असंच होतं"
अनिलने डॉक्टरांच्या बोलण्याला प्रामाणिक प्रतिसाद दिला
“ हे बघा आपला जो मेंदू असतो तो जनावरां सारखाच असतो, फरक केवळ एवढाच आहे की आपण विचार करू शकतो, पण भीतीची भावना ही एकसारखीच असते, भीती वाटली की मेंदूला फक्त दोनच गोष्टी कळतात, लढा किंवा पळा, कुत्र्यांचे किंवा कुठल्या जनावरांचे भांडण पाहिलं आहे का, ते एकतर भांडतात नाही तर पळतात. तसच तुमचा मेंदू काय करतो, त्याला भीती वाटली कि तो त्या भीतीशी बघू काय होतंय ते बोलून लढत नाही तर त्या भीती पासून घाबरून जातो आणि तुम्हला काही तरी धोका आहे अशी भीती वाटून तुमच्या शरीराला पळण्यासाठी तयार करतो, मग तुमच्या हृदयाची गती वाढणे, घाम येणे, ब्लड प्रेशर वाढणे, इत्यादी क्रिया सुरु होतात आणि तुम्ही डॉक्टर कडे पळता.”
अनिल सगळं काही खूप लक्ष देऊन ऐकत होता, मान हलवून आणि चेहऱ्याच्या हाव भावाने डॉक्टरच्या बोलण्याला प्रामाणिक प्रतिसाद देत होता, त्याला ते सगळं पटत होत.
डॉक्टरने आपलं बोलणं सुरु ठेवत पुढे बोलल्या
“ म्हणून ह्या पुढे तुम्हाला जेव्हा जेव्हा असली काही भीती वाटेल, म्हणजे आमच्या भाषेत बोलायचे तर जेव्हा केव्हा असा पॅनिक अटॅक येईल तेव्हा तुम्हाला त्याला घाबरून न जाता त्याचा सामना करायचा, ह्या पुढे आजपासून एक महिना काही झालं तरी डॉक्टर कडे जायचे नाही, हो जर ताप आहे, कुठे जखम झाली, म्हणजे खरंच जाणवणारे किंवा दिसणारे अपवाद वगळता, उगाच मनाने तयार केलेल्या आजारांसाठी डॉक्टर कडे अजिबात म्हणजे अजिबात जायचं नाही, दुसरी गोष्ट गूगल वर जाऊन कुठल्याही आजाराची माहिती वाचायची नाही किंवा शोधायची नाही, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःच्या मनाने कुठलाही रक्ताचा तपास किंवा वैद्यकीय चाचणी करायची नाही आणि कुठलेही औषध खायचे नाही.
“मग डॉक्टर भीती वाटली तर काय करायचं?
“एखादी मोठी भीती वाटली की एक गोष्ट करायची, आपले पाचही इंद्रिय सक्रिय करायचे”
“म्हणजे”
अनिलने खुर्चीवर ताठ बसत आतुरतेने विचारलं.
“सांगते सांगते थांबा जरा”
डॉक्टर ने एक स्मित हास्य देत पेन आणि पेपर घेऊन अनिल ला समजवायला सुरवात केली.
“नजर, जीभ, त्वचा, कान आणि नाक ह्या पाच इंद्रियांचा जाणीव पूर्वक वापर करायचा, म्हणजे भीती वाटली कि आजू बाजूला दहा वेगवेगळे रंग शोधायचे, दहा रंग भेटले की लगेच तीन वेगवेगळ्या वस्तुंची चव चाखायची, उदारणार्थ पाणी, साखर, बडीशेप, इत्यादी. जे असेल ते, आणि मग लगेच, दहा वेगवेगळ्या गोष्टींचा स्पर्श अनुभवायचा, म्हणजे सोफ्या ला हात लावा, खुर्ची, टेबल, भिंत, असे काहीही दहा स्पर्श, मग पाच वेगवेगळे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आणि शेवटी चार वेगवेगळ्या वस्तूंचा वास घायचा, फुलाचा किंवा अगरबत्तीचा किंवा साबणाचा, वैगेरे वैगेरे.
हे सगळं करण्यात तुमचे १०-१५ मिनिटे जातील आणि तुमचा मेंदू ह्या कार्यात व्यस्त झाला की भीती आपोआप बऱ्याच प्रमाणात कमी होईल”
अनिलला डॉक्टरांचं बोलणं पटत होत आणि तो वेळो वेळी मान हलवून आणि चेहऱ्याच्या हावभावांनी ते करण्याची तयारी दर्शवत होता.