डॉक्टर खूप उत्स्फुर्त पणे अनिलला प्रोत्साहन देत होत्या, अनिलला देखील ही एक सोनेरी संधी वाटली, त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक वेगळा रंग दिसत होता आणि तोच आनंद आणि रंग घेऊन अनिल क्लीनिक मधून निघाला आणि ह्या वेळेस पहिल्यांदा मेडिकल शॉप मध्ये नाही तर स्टेशनरीच्या दुकानात कलर आणि पेपर घेण्या साठी गेला.
अनिल एक वेगळी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन घरी आला, औषधे आणि चित्रकलेचे सामान घरी ठेवले आणि गॅरेज कडे निघाला, त्याला काम, उपचार आणि छंद ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालायची होती आणि प्रत्येक गोष्टीला आवश्यक तो वेळ द्यायचा होता. एक वेळ अशी होती कि अनिलकडे खूप रिकामा वेळ आणि रिकामे विचार असायचे पण आज अशी वेळ होती की वेळच पुरत नव्हता, खूप चांगली गोष्ट होती हि अनिलसाठी, नको ते विचार डोक्यात येण्यासाठी जागाच उरली नव्हती आणि विशेष म्हणजे आता त्याला कुठलीही दुःखद निधनाची पाटी किंवा कुणाच्या कुठल्याही आजाराची खबर लागली तरी पहिल्या एवढी भीती वाटत नव्हती, क्षणभर थोडासा दबाव जाणवायचा पण लगेच डोक्यात कामाचे किंवा दुसऱ्या विचारांची गर्दी होऊन त्या घबराट विचारांची तो डोक्यातून हकालपट्टी करायला शिकला होता.
अनिलने खूप दिवसानंतर हातात ब्रश घेतला होता, लहान लहानपणापासूनच अनिलला सर्जनशील कामात खूप रस होता आणि तो त्यात बऱ्यापैकी निपूनही होता.
एक दोन तीन असे कागदा मागोमाग कागदे तो रंगवायला लागला, डोक्यातले विचार रंगाच्या रूपाने कागदांवर उमटत होते, वेगवेगळे आकार उकार घेत होते, सुरवातीला त्याने मन वळवण्यासाठी किंवा रमवण्यासाठी चित्र काढण्यास सुरवात केली पण दिवसा गणिक त्याच्या मनात आणि डोक्यात फक्त आणि फक्त जिंकण्याची भावना निर्माण झाली, आणि आता तो स्पर्धेत फक्त भाग नव्हता घेत तर स्वतःला जिंकायला भाग पाडत होता.
दिवस भर गॅरेज वर मेहनत आणि रात्री उशिरा पर्यंतर चित्रकला ह्यात अनिल पूर्ण डुबून गेला होता, हा एक नवीन अनिल होता एक नवीन चैतन्य होत.
अनिलचा फोन वाजला, डॉक्टर माधव होत्या.
"हॅलो हो डॉक्टर बोला"
"कसे आहात गोरे?
"ठीक हे मॅडम, गॅरेज वरती हे सध्या"
अनिलने कापडाच्या चिंधीला हात पुसत पुसत उत्तर दिले.
"आणि कशी सुरु आहे पेंटिंगची प्रॅक्टिस, उद्या कॉम्पिटिशन आहे लक्षात आहे ना?
डॉक्टर माधवने अनिलला आठवण करून दिली, खर तर त्याची गरज नव्हती, कारण अनिल स्वतःच ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता.
"हो हो डॉक्टर लक्षात आहे माझ्या, मी उद्या वेळेवर पोहचेल, खरंतर मी स्वतः तुम्हाला फोन करणारच होतो आज"
"का काही काम होत का"
डॉक्टरांनी कुतूहलाने विचारले.
"तसं काही खास नाही पण हेच विचारायचे होते की पेंटिंगची सामग्री म्हणजे ब्रश, कलर्स, पेपर, वैगेरे घेऊन यावे लागेल की तिकडे सगळे मिळेल?
अनिलने आपल्या मनातला प्रश्न विचारला.
"नाही नाही काही घेऊन येण्याची गरज नाही आहे, इकडे सगळी व्यवस्था आहे, तुम्ही फक्त वेळेवर या आणि पूर्ण आत्मविश्वासाने जिंकण्याच्या तयारीने या, एक गोष्ट लक्षात ठेवा ६५ लोकांनी भाग घेतला आहे आणि तुम्ही माझे आणि सायकॅट्रिक फील्डचे प्रतिनिधित्व करत आहात आणि आपल्याला हि प्रतियोगिता जिंकायचीच आहे"
"हो डॉक्टर मी पूर्ण प्रयत्न करेल"
अनिलच्या बोलण्यात आत्मविश्वास ठळक दिसत होता.
"ठीक आहे मग भेटू उद्या, ऑल द बेस्ट”
डॉक्टरांनी अनिलला सदिच्छा दिल्या आणि फोन ठेवला.
अखेर तो दिवस आला ज्याची अनिल आतुरतेने वाट पाहत होता, तो सकाळी लवकर उठला, तयारी केली, देवाचे दर्शन घेतले, त्याची देवाचे दर्शन घेण्याची पध्दतही वेळे नुसार बदली होती, आता तो फक्त देवाचे हात जोडायचा, पुजारी अनिल आता साधा भोळा श्रध्दाळु झाला होता.