patra vithu mauliche! books and stories free download online pdf in Marathi

पत्र विठूमाऊलीचे !

एक पत्र... विठूमाऊलीचे!
माझ्या प्रिय भक्तांनो,
खूप खूप आशीर्वाद!
कसे आहात? मजेत तर निश्चितच नसणार कारण गेली अनेक महिने त्या कोरोना नावाच्या महाभयंकर आजाराचे विषाणू पृथ्वीवर थैमान घालत आहेत. लाखो लोकांना या विषाणूने बाधित केले आहे, अंकित केले आहे तर हजारो लोकांना यमसदनी पाठवले आहे. त्याच्या तांडवामुळे हजारो कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. पित्याचे छत्र हरवल्यामुळे अनेक बालकं अनाथ झाली आहेत.
कित्येक सधवा विधवा झाल्या आहेत. कैक वृद्धांची म्हातारपणीची काठी हिसकावून नेल्यामुळे त्यांचे हातपाय लटलट कापत आहेत त्यांनाही निराधार झाल्याची जाणीव बेचैन करीत आहे, अस्वस्थ करीत आहे.
छोटेमोठे उद्योग ठप्प झाल्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे कैक ठिकाणी उपासमार होत आहे. अनेक कंपन्यांच्या मालकांनी व्यवहार, उत्पादने बंद असल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना एक तर कामावरून कमी केले आहे किंवा त्यांच्या पगारात भली मोठी कपात केली आहे. नोकरी जाण्यापेक्षा पगार कमी केलेली चालेल या एका सकारात्मक विचारातून कर्मचारी समाधानी आहेत. शेवटी समाधान, सुख, आनंद हे मानण्यावर असते. ते म्हणतात ना, 'जान बची लाखों पाये।' या नुसार नोकरी टिकतेय ना हेच खूप आहे. छोटे दुकानदार, छोटे व्यावसायिक ह्यांची आणि यांच्याकडे काम करणारांची अवस्था दयनीय आहे. 'हाताला काम नाही, खिशात दाम नाही, पोटाला अन्न नाही' अशा अवस्थेत अनेक कुटुंब आला दिवस ढकलत आहेत.
अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक हे जीव धोक्यात घालून रयतेच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करीत आहेत. अशा अनेक देवदूतांना जनसेवा करीत असताना त्या कोरोनाने कवटाळल्यामुळे हजारोंच्या संख्येने कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, लोकांना समजावून सांगण्यासाठी नेतेमंडळीही प्रयत्न करताना दिसते आहे. काही नेत्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. सर्व विभागाचे कर्मचारी असतील, नेते असतील किंवा अनेक निष्पाप कोरोनाबाधित असतील यांचा काडीमात्र दोष नसताना त्यांना शिक्षा मिळाली आहे, मिळत आहे.
दुसरीकडे मानवप्राणी एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे या विषाणूला दंश करायची संधी मिळते म्हणून काही महिन्यांसाठी शासनाने घरकोंडी केली होती पण तुम्ही मानव जात मुळातच चंचल, हुशार, बुद्धिमान त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांनी घरकोंडीचे आदेश धाब्यावर बसवले आणि बाहेर जाणे सुरुच ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे घराबाहेर पडणारे कित्येक जण घरी परतताना सोबत कोरोना नामक महाभयंकर राक्षस पाहुणा म्हणून घेऊन आले आणि स्वतःच्या कुटुंबातील, शेजारच्या लोकांना या महामारीचा प्रसाद मुक्तपणे वाटत सुटले. मला एक समजत नाही, भक्तांनो ज्यामध्ये तुमचे हित आहे त्या गोष्टी तुम्ही का अंगिकारत नाहीत उलट ज्या बाबी आपल्या जीवावर बेततात त्यांनाच तुम्ही मानवप्राणी कवटाळत आहात हे कुठले बुद्धिमानतेचे लक्षण?
व्यसन हे कुठल्याही गोष्टीचे असो ते शरीरासाठी घातक आहे, वैकुंठाच्या प्रवासाला नेणारे आहे हे माहिती असूनही, ज्या संशोधनांवर तुमचा विश्वास आहे त्या संशोधनाने सिद्ध करुनही तुम्ही अनेक गोष्टींच्या आहारी जात आहात. खरेतर संकटातही एक संधी असते असे म्हणतात. अनेक व्यसनांपासून स्वतःची सुटका करून घेण्याची ही संधी होती पण तुम्ही कपाळकरंटी माणसं. दारी आलेली संधी ओळखता येत नाही, ओळखता आली तरीही तिचा योग्य उपभोग घेता येत नाही. होय, कोरोनाच्या कृपेने आणि सरकारच्या नियोजनातून घातकी व्यसनं सोडायची सुवर्ण संधी दारात होती. जर तुम्ही माणसं काही दिवस अशा अघोरी व्यसनांपासून राहू शकता तर मग पुन्हा त्याकडे का धाव घेता? मला तुमच्या शासनाचेही धोरण समजत नाही. केवळ महसूल मिळतो, कर मिळतो म्हणून काही दिवसातच 'ती' दुकाने सुरू करावीत? तिथे तर कोरोनाचे विषाणू अशा व्यसनप्रेमी मानवांचे दोन्ही हात पसरुन स्वागत करायला तयार होते. एकदा काही घोट पोटात गेले की, मग कशाचे आलेय सोशल डिस्टन्सिग अन् काय?
दुसरीकडे गर्दी वाढू नये, कोरोनाला पसरायला संधी मिळू नये म्हणून मंदिर आणि इतर प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. देवालयं बंद आणि मदिरालयं सुरू, मंदिर कुलुपबंद आणि मदिरा सुरू हा दुटप्पीपणा का? तुम्हा भक्तांच्या जीवाची काळजी असल्यामुळे आम्ही आमच्या निस्सिम, प्रामाणिक, चारित्र्यवान भक्तांचा तो दुरावाही सहन केला, करतोय. आम्हाला माहिती आहे ज्याप्रमाणे जत्रेत हौसे, गवसे, नवसे लोक येतात तशीच काही मंडळी मंदिरात गर्दी करते. पण आम्ही सारे डोळे उघडे ठेवून पाहतो, सहन करतो कारण त्या लाखो लोकांमध्ये बोटावर मोजता येतील अशा सच्च्या भक्तांची आम्हाला काळजी असते. अशा भक्तांना मंदिरात आलेले पाहून आम्हालाही आनंदाचे भरते येते.
अनेकांनी एक चर्चा सुरू केली आहे, ज्यातून त्यांचा आम्हा देवमंडळीवर असलेला अविश्वास, त्यांची नसलेली श्रद्धा प्रकट होते आहे. अनेक जण असेही म्हणत आहेत की, अशा संकट समयी देव मंदिरात बंद होऊन बसले आहेत. भक्तांनो, आम्ही कधीच कुठे बंदिस्त नसतो. आमची वसती कुण्या चार भिंतीत नसते. आमचे वास्तव्य मानव, पशूपक्षी, झाडंझुडूपं, लतावेली, पाणी इतकेच काय पण दगडधोंड्यातही असते. या संकटकाळात आजारी, वृद्ध, दिव्यांग माणसांच्या मदतीला धावून जाणारे वैद्यकीय क्षेत्रातील लोक, पोलीस, स्वच्छता कामगार ही कुणाची रुपे आहेत? देवदूत आहेत ती. आम्हा देवतांच्या कृपेने, स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत.
आम्ही चराचरात, ठायी ठायी वसलेलो आहोत. प्रत्यक्ष सीतामाईला स्वतःची छाती फाडून हनुमंताने श्रीरामाचे दर्शन घडविले. भक्त प्रल्हादाचा छळ करणाऱ्या बापाने ईश्वराचे वास्तव्य कुठे आहे असे विचारताच प्रल्हादाने सांगितले म्हणून समोरच्या खांबावर लाथ मारताच प्रत्यक्ष श्रीनृसिंह प्रकटले. जळी स्थळी काष्टी सर्वत्र आमचे वास्तव्य असते. पण आम्ही प्रत्येकाची वेळ येण्याची, त्याचा पापाचा घडा भरण्याची वाट पाहतो. दुसऱ्या शब्दात प्रत्येकाला वर्तन सुधारण्याची संधी देतो म्हणूनच शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होईपर्यंत भगवान श्रीकृष्ण सारे सहन करतात पण त्याचा एकशे एकवा अपराध घडताच त्याला दंड करतात. श्रीकृष्ण जन्म होताक्षणी साखळदंडाने आवळून बांधलेले असतानाही, कंसाच्या कडेकोट बंदोबस्तात बंद असतानाही नुकतेच जन्मलेले श्रीकृष्ण पित्याला ... वसुदेवाला तशा वातावरणातही तुरुंगातून बाहेर काढतात आणि निघतात. श्रीकृष्णाने मनात आणले असते तर कंसाला तेव्हाच यमसदनी पाठवले असते.
अरण्यात वास्तव्य करणारे श्रीराम कुटीच्या बाहेर पडताना 'ती' एक रेषा मारतात याचा अर्थ त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती. ते तिथे थांबून रावणाला धडा शिकवू शकले असते. जी व्यक्ती लंकेत जाऊन लंकाधिपतीला... प्रत्यक्ष महादेवाकडून वर मिळविणाऱ्या रावणाला लंकेत जाऊन मारतात तिथे त्यांना अरण्यात रावणाला मारता आले नसते? महिषासुराचा वध असेल, मणिमल्यांना मृत्यूदंडाचे शासन असेल हे सारे विधिलिखित होते ते त्या ठरल्यावेळीच पार पडले. तोपर्यंत वाट पाहावी लागते. देवांनाही सहन करावे लागते, अवतार घेतला तरी अवतार जन्मातले भोग भोगावे लागतात. ज्याला शासन करायचे आहे त्यासाठीची ती योग्य वेळ येऊ द्यावी लागते. आम्हा देवांचे सोडा पण संत महात्मेही हेच सांगतात. कितीतरी संतांनी नशिबी असलेले भोग भोगत ज्या कार्यासाठी जन्म घेतलाय ते कार्य तडीस नेले आहे हे तुम्हीही जाणता. इतकेच कशाला मानवनिर्मित ज्या न्यायालयावर तुम्हा लोकांचा विश्वास आहे ते न्यायालयही गुन्हेगारांना भरपूर संधी देते. अगदी शिक्षा ठोठावल्यानंतरही थेट राष्ट्रपतींकडे दाद मागता येते. राष्ट्रपतींनी विनंती अर्ज फेटाळल्यानंतरही पुन्हा दयेची भीक मागता येते तर मग माऊली, हे तर परमेश्वराचे न्यायालय आहे. त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीचा विध्वंस तो कसा पाहू शकणार? त्यानेच जन्म घातलेल्या जीवांवर तो कसा अन्याय होऊ देईल? कोणत्या ना कोणत्या रुपाने नशिबी आलेले भोग भोगावेच लागतात.
सध्याच्या वातावरणात तुम्हाला तुमचे अनेक सण घरात बसून साजरे करावे लागले. तुम्हाला तो आनंद सार्वजनिक स्वरूपात लुटता आला नाही. त्यावेळी तुम्ही दुःखी झालात, कष्टी झालात परंतु गर्दी करून त्या महाभयंकर विषाणूला संधी देण्यापेक्षा घरच्या घरी सण साजरा करुन जीव वाचत असेल तर त्यात फार मोठे समाधान, आनंद आहे. तुम्हाला आवडणाऱ्या अनेक सणांपैकी एक म्हणजे आषाढी एकादशी! होय ना? पण यावर्षी तुमच्या माझ्या भेटीचा योग दिसत नाही. त्यामुळे लाखो लोक पंढरपूरला येऊ शकत नसल्यामुळे नाराज आहेत, चैतन्यहिन झाले आहेत परंतु माऊली जशी तुम्हाला माझ्या दर्शनाची आस आहे तशीच मलाही तुमच्या भेटीची ओढ असते. तुमची भेट माझ्यासाठी आनंददायी असते. तुम्ही करत असलेला तो नामाचा गजर, त्याला असलेली टाळ मृदंगाची साथ, देहभान विसरून घेत असलेल्या गिरक्या, फुगड्यांची रंगत माझ्यासाठीही एक अनमोल ठेवा असतो. हे सारे ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले असतात. शेकडो कोस चालून येणारे हजारो वारकरी, तहानभूक विसरून, स्वतःचे आजार विसरून जो भक्तीचा मळा फुलवतात, बेधुंदपणे त्यात रात्रंदिवस विहार करतात ते सारे यावर्षी मला स्वतःला अनुभवता येणार नाही, त्या भक्तीत रंगून जाता येणार नाही. लाखो भक्तांची भेट होणार नाही याचे मलाही वाईट वाटते पण मी सावरलो म्हटलं ठीक आहे, यावर्षी आपण स्वतःच भक्तांच्या भेटीला जाऊया. काय दचकलात ना? माऊली, खरेच अंतःकरणापासून साद घालणाऱ्या भक्तांच्या भेटीला मी नक्कीच येत आहे. तशी साद मला कुठून कुठून ऐकू येत आहे. त्या हाकेत निस्वार्थ भक्ती आहे, माझ्या दर्शनासाठी तळमळणारे जीव आहेत. फक्त इतकेच आहे मी माझ्या नेहमीच्या रुपात नसेन. कोणत्या ना कोणत्या रुपात येईल. सच्च्या भक्ताला मला ओळखायला वेळ लागणार नाही. मी कोणत्याही रुपात गेलो तरी माझा भक्त मला ओळखल्याशिवाय राहणार नाही. दारात आलेल्या जीवमात्राचे माझा भक्त उत्साहाने, तन्मयतेने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने सहर्ष स्वागत करेल. जे खरेच माझे दर्शन होणार नाही म्हणून नाराज आहेत, उदास आहेत, चिंतेत आहेत त्यांना मी कळकळीने एकच सांगेन या कोरोनाचा सामना करण्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे, लाखो बाधितांचे प्राण वाचवले आहेत त्यांनाच यावर्षी तुमच्या लाडक्या विठ्ठलाचे प्रतिरुप समजा आणि नेहमीप्रमाणे आषाढी एकादशीचा मनसोक्त आनंद लुटा. ज्याप्रमाणे पंढरीला येता येत नाही त्याचप्रमाणे गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील मंदिरात माझ्या दर्शनासाठी जाऊन गर्दी करु नका. गर्दी टाळणे हा या विषाणूवरील एक उपाय असेल तर हा विनाखर्चाचा उपाय नक्की अंमलात आणा. मी का तुमच्यापासून वेगळा, दूर आहे का? मी प्रत्येकाच्या ह्रदयात आहे. फक्त शुद्ध अंतःकरणाने, प्रामाणिकपणे आवाहन करा मी नक्कीच भेटेन. हीच माझी खरी सेवा आहे, हीच माझी एकमेव भक्ती, हाच खरा गुरुमंत्र आहे! चला तर मग... 'गर्दी टाळूया, कोरोनाला पळवूया...' भेटूया.. कोणत्या ना कोणत्या रुपात..."
तुमचीच,
तुमच्या अंतःकरणात वसलेली,
विठूमाऊली.
००००
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED