असहिष्णुता बाईला पत्र ! Nagesh S Shewalkar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

असहिष्णुता बाईला पत्र !

असहिष्णुता बाईला पत्र!
प्रति,
असहिष्णुताबाई,
तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अभिवादन करण्याच्या भानगडीत मी पडत नाही पण एक मात्र विचारतो,
'कशा आहात असहिष्णुताबाई? नाही म्हटलं फारा दिवसात कुठे दर्शन झाले नाही. कुठे तुमच्या नावाने जयजयकार झाला नाही म्हणून काळजीपोटी पत्र लिहितोय हो. कसे आहे एखाद्या वस्तुची, गोष्टीची सवय झाली ना की मग ती कुठे दिसली नाही, चर्चेत आली नाही, तिचा कौतुक सोहळा म्हणा अगदी तिच्यावर टीकायणही झाले नाही तर करमत नाही. बरे, सध्याचा काळ हा कोरोनाचा! म्हणून जरा जास्तच काळजी वाटली हो. नाही. तसे काही नसावे, पण तुम्हाला या कोरोनाने तर कवेत घेतले नाही ना? तुमच्या अनेक भक्तांना कोरोनाने स्वतःच्या प्रेमात ओढले आहे त्यामुळे एखाद्या भक्ताने कोरोनाचा प्रसाद तर तुमच्यापर्यंत पोहोचवला नाही ना? तुमच्या भक्तांसाठी तुमची पूजाअर्चा, जप, तप, व्रत सारे काही करण्यासाठी खरे तर हा सुवर्णकाळ होता परंतु त्यांनी ही नामी संधी गमावली. अच्छा! आले लक्षात सारी भक्तमंडळी घरकोंडीचे जीवन जगत आहेत नाही का? हे लक्षातच आले नाही माझ्या! बहुतेक साठी लागल्यामुळे बुद्धी नाठी झाली असावी माझी. महत्त्वाचे म्हणजे सध्या भक्तांनी तुमचे कितीही गौरवगान गायिले तरी त्याची दखल घेण्याच्या मनःस्थितीत कुणी नाही. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे लागले आहे त्यामुळे मग तुमचे भक्त कशाला कंठघोश करून स्वतःचा घसा खराब करून घेतील नाही का?
एक बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया आणि वाहिन्यांवर भरपूर उड्या मारत होती. म्हणे एका मंत्र्यांने एका इंजिनिअरला बंगल्यावर बोलावून त्याची म्हणे भरपूर धुलाई केली. त्या इंजिनिअरने स्वतःला झालेल्या मारहाणीची चित्रफीतही सर्वत्र धुमाकूळ घालीत होती. त्यावेळी तू प्रकटशील, आपल्या भक्तांना दृष्टान्त देशील असे मला विचार वाटत होते पण तुझ्या एकाही परमभक्ताने तुला आळवले नाही की, त्या मंत्र्याच्या विरोधात गळा काढला नाही. कुठे होतीस ग तू आणि तुझे सारे भक्त?
एक तरुण मुलगा म्हणे अनेक दिव्यांग आणि काही भिकारी लोकांची सेवा करत आहे. त्यांना व्यवस्थित सांभाळताना दोन वेळचे जेवण देतोय, त्यांची शारीरिक स्वच्छता ठेवतोय. किती छान काम करतोय ना हा तरुण? पण त्याचे ही सामाजिक सेवा कुण्या तरी एका नेत्याला मानवली नाही, पाहवली नाही म्हणून त्याने म्हणे त्या तरुणाला बंगल्यावर बोलावले आणि त्याची यथेच्छ पिटाई केली. त्याही तरुणाने म्हणे स्वतःच्या शरीराला झालेल्या इजा चित्रफितीच्या माध्यमातून जगापुढे आणल्या आहेत. पण कदाचित तुझ्यापर्यंत किंवा तुझ्या भक्तांपर्यंत ते पोहोचला नसावा. पोहोचला असता तर नक्कीच तुझ्या भक्तांनी तुझा जागर घातला असता. काही लोकांची डोकी फोडून तुला रक्ताभिषेक केला असता.
बरे, सध्याच्या कोरोनाच्या काळात पोलीस, डॉक्टर आणि त्यांचे सारे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नव्हे तर अनेक स्वतःचा जीव देऊन लोकांची सेवा करीत आहेत. यापैकी अनेक जण तर अनेक दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत, सेवा देत आहेत. पण काही ठिकाणी समाजकंटक अशा देवमाणसांवरही हल्ला करीत आहेत. हे तर तुला आणि तुझ्या तथाकथित भक्तांना दिसत असेल ना, की जाणूनबुजून तिकडे कानाडोळा करीत आहात? जाणूनबुजून करीत असतील तर हा अन्याय नाही का? अरे, असे तर नाही ना की, सध्या तुझी तथाकथित भक्त मंडळी सत्तेचा सारीपाट मांडून बसली आहेत म्हणून तर तुझे इतर भक्त आणि तू तिकडे दुर्लक्ष करीत आहात? असेच असते, आपल्या माणसाविरूद्ध गोंधळ घालायचा म्हणजे खूप विचार करावा लागतो. कोणतीही कृती करताना आपला कोण, परका कोण हा विचार करावा लागतो.
असहिष्णुताबाई, जरा तुझ्या बहिणीचा सहिष्णुतेचा विचार करायला शिक. ती आहे, म्हणून तुला किंमत आहे, तुझी ओळख आहे. ती शांत आहे. लोकसंख्येच्या मानाने तुझ्यापेक्षा तिचे अनुयायी फार मोठ्या प्रमाणावर आहेत. ते जर रागावले, बिथरले, संतापले, चिडले, पेटून उठले ना तर तुझ्या शिष्यांची काय अवस्था हे कुणालाही समजणार नाही. शांत, विचारी, इमानदार माणूस कुठे लुडबूड करीत नाही पण एकदा का संतापला ना तर सत्ता उलथवून टाकायलाही मागेपुढे पाहात नाही. तशा वेळी तो परिणामाची चिंता करीत नाही.
त्यामुळे असहिष्णुताबाई, स्वतःमध्ये थोडा बदल करा. अन्यायाविरुद्ध लढताना कुणाला झुकते माप द्यायचे, कुणाविरूद्ध राईचा पर्वत करायचा हे तुमचे परिमाण बदला. एकांगी, पूर्वग्रहदूषित नजरेने अवलोकन, मूल्यांकन आणि राजकारण करण्याचे सोडून द्या. अन्याय कुणावरही होवो तिथे पेटून उठा असा संदेश भक्तांच्या ह्रदयात खोलवर रुजवा. त्यावेळी सत्ताधारी कोण आहे, विरोधात कोण आहे हा विचार शिवता कामा नये. अशावेळी तुमचे झालेले दर्शन, तुमचा झालेला जयजयकार करताना सामान्यांनाही आनंदच होईल.
विदेशी कपड्यांची होळी करणे, वेगवेगळ्या नेत्यांनी परत केलेल्या पदव्या, पुरस्कार म्हणजे विदेशी असहिष्णुतेला भारतीय सहिष्णुतेने दिलेले उत्तर होते. आता तुझी जे मनधरणी करताहेत ना ते सहिष्णुतेसाठी लढत नाहीत तर असहिष्णुता तू प्रसन्न व्हावी ही तळमळ त्यामागे आहे. खांदा तुझा वापरून ह्यांना स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे आहे, पोळी भाजून घ्यायची आहे.
बरे, तुझे शिष्य काही अडाणी अशिक्षित असतात असे नाही तर उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित, विचारवंत, नट-नट्या, खेळाडू यासारखे असतात. एक साधारण उदाहरण घेऊया... सरकार ज्या लोकांना पारितोषिक देते, सन्मानित करते ते सरकारचे असते न की सत्तेत असणाऱ्या पक्षाचे असते. अर्थात हे सरकार जनतेचे प्रतिनिधी असते. तरीही अशा गणमान्य लोकांना तू काय गुरुमंत्र देतेस तर मिळालेली बक्षिसे, सन्मान सरकारला परत करा. तुझी शिष्यमंडळी कोणताही विचार न करता तुझ्या आदेशाचे तंतोतंत पालन करतात. त्यावेळी ते हा विचार करीत नाहीत की, पुरस्कार परत करताना आपण सरकारसोबतच जनतेचा अपमान करीत आहोत.
तेव्हा आवर बाई, आवर तुझ्या शिष्यांना आवर!
०००
नागेश सू. शेवाळकर.