P T Nisha books and stories free download online pdf in Marathi

पी टी निशा

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम आलेल्या पी टी निशाचे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही ठळक बातमी वाचून ठाकूर सरांना खूप आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे दोन अश्रू नकळत टपकले. या बातमीने त्यांना सहा सात वर्षांपूर्वीचा काळ आठवला. ज्यावेळी ते एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निशा त्यावेळी चौथ्या वर्गात होती. काळी सावळी, वर्गाच्या मानाने जराशी उंच आणि सडपातळ शरीरयष्टी असलेली मुलगी म्हणजे निशा. घरची परिस्थिती खूपच बेताची. आई-वडील दोघे ही शेतात मजुरी करायचे आणि घरातील चार लेकरांची पोटे भरायची. त्यात निशा दुसऱ्या क्रमांकावरची मुलगी. पायात चप्पल नको ना अंगावर चांगले कपडे अशी तिची विदारक स्थिती होती. ती अभ्यासात जेमतेमच होती कारण बहुतांशवेळा काही ना काही कारणाने ती शाळेला डुम्मा मारत होती. एके दिवशी ठाकूर सरांनी दुपारच्या वेळी खेळ घ्यावे म्हणून सर्व मुलांना मैदानात घेऊन गेले. रनिंग या खेळाने सुरुवात झाली. निशाची रनिंग पाहून ठाकूर सर अचंबित झाले. कारण ती वाऱ्याच्या वेगाने धावत होती. तिच्या पायात चप्पल नव्हते ना बूट, जमिनीत दगड,गोटे, काटे चुभतील याची तिला अजिबात पर्वा नव्हती. सरांनी तिला रोज रनिंग करण्यासाठी मैदानात घेऊन जाऊ लागले. अश्यातच तालुकास्तरावर काही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची सूचना त्यांना मिळाली. तसे त्यांनी तेथे भाग घेण्याचे निश्चित केले. शाळेचा एक पत्र घेऊन ते तालुक्याला गेले, तेथे नावनोंदणी केली. पण निशाचे वय जास्त असल्याने ती त्या वर्गाच्या वयोगटात बसत नव्हती. सर खूप नाराज झाले. निशाला तर रनिंगच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावायचे होते. तेथील अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी पुढच्या वर्गातील गटात सहभागी होऊ देण्याची विनंती केली. अनेक विनंत्या केल्यावर ते तयार झाले अन निशाला संधी मिळाली. अर्थातच निशाने मिळालेल्या संधीचे सोने केले. सर्व प्रकारच्या रनिंग मध्ये ती प्रथम आली. अधिकाऱ्यांचे सुद्धा तिने लक्ष वेधून घेतले. ती वाऱ्याच्या वेगाने पळत होती व साऱ्यांना अचंबित करत होती. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दुसऱ्या दिवशी शाळेत ठाकूर सरांनी निशाचे सर्वांसमोर अभिनंदन केले आणि तिला पी टी निशा असे नवीन नाव दिले. ज्याप्रकारे पी टी उषा हिने धावण्याच्या स्पर्धेत भारताचे नाव जगात पोहोचविले तसे ही निशा आपल्या गावाचे नाव सर्वदूर प्रसिद्ध करेल असे गौरवोद्गार देखील काढले. जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील ती सर्व प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले आणि तेथील लोकांचे ही मने जिंकली. शाळेला, गावाला आणि ठाकूर सरांना तिचा अभिमान वाटत होता. पण तिचे आईवडील मात्र पळून पळून काय नोकरी मिळते काय ? असा प्रश्न विचारून तिला पळण्यापासून परावृत्त करीत मात्र ठाकूर सर त्यांना समजावून सांगत. निशामध्ये जी क्षमता आहे ते तुम्हांला ओळखता येणार नाही. तिला हवी ती मदत मी करतो तुम्ही फक्त तिला शाळा शिकू द्या आणि तिला पळत राहू द्या. सातवी पर्यंत ठाकूर सरांनी तिला पळण्याचे खूप काही तंत्र शिकविले व मदतपण केली. तुझे भविष्य पळण्यात आहे हे तू लक्षात ठेव आणि सदैव डोळ्यासमोर सुवर्णकन्या पी टी उषा हिचे चरित्र ठेव अशी सूचना देखील त्यांनी दिली. त्याच सूचनेचे पालन करीत ती पुढील शिक्षण घेत घेत पळणे काही सोडले नाही. कॉलेजमध्ये सुद्धा तिने आपल्या नावाचा डंका पुढे चालूच ठेवला. तिच्या आईवडिलांनी जो प्रश्न नेहमी ठाकूर सरांना विचारत होते की पळून पळून काय नोकरी मिळते काय ? त्याचे उत्तर निशाने आपल्या जिद्द, सातत्य आणि सरावाने करून दाखविले. तसेच सरांनी दिलेले पी टी निशा हे टोपणनाव देखील प्रसिद्ध केले. हे सर्व आठवून सरांना खूप बरे वाटले.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED