परवड भाग १४ Pralhad K Dudhal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परवड भाग १४

भाग १४

आपला पद्धतशीरपणे छळ होतो आहे हे लक्षात येताच वसंताच्या खूप दिवस साठवलेल्या रागाचा प्रचंड स्फोट झाला! त्याचे कारणही तसेच होते,सलग दोन दिवस त्याला खायला काहीच मिळाले नव्हते! त्याने सुनंदाचा कानोसा घेत दोन तीन वेळा तिला खायला मागितले पण तिने सरळ दुर्लक्ष केले.आपल्याच घरात आपल्याला साधे जेवणही मिळू नये म्हणजे काय? अंदाज घेत तो स्वयंपाकघरात आला.अनेक दिवस त्याला हाताने काही घेऊन खायची वेळच आली नव्हती.पूर्वीच्या अंदाजाने जेथे स्वयंपाक करून ठेवलेला असायचा तेथे त्याने चाचपडत राहिला;पण त्याच्या हाताला काहीच लागले नाही.घरात सुनंदाने बरेच बदल केले होते,ते वसंताला माहीत असणे शक्यच नव्हते.अचानक तो भांडी ठेवण्याच्या फडताळावर जोरात आदळला.फडताळातली भांडी आवाज करून घरभर पसरली वसंताचे डोके कशावर तरी जोरात आदळले.

आधीच दोन दिवसापासून पोटात काही नाही, त्यात हा मार. त्याचा राग अनावार झाला.प्रचंड रागात ओरडत किंचाळत मिळेल ती वस्तू तो इकडे तिकडे फेकू लागला.इथे तिथे भिंतीवर डोके आदळून जोरजोराने ओरडू लागला.घरभर सगळ्या वस्तू पसरल्या होत्या.अडखळत वसंता जमिनीवर आडवा पडत होता.हातात जे येईल ते तो फेकत होता.जोराने रडत होता पण त्याचा हा आक्रोश ऐकायला घरात कुणीच नव्हते!रडत भेकत वसंता किंचाळत राहिला....
सुनंदा दुपारीच घराला बाहेरून कुलूप घालून राहुलच्या शाळेत गेली होती त्याला शाळेतून घेऊन परस्पर अरविंदाच्या ऑफिसला गेली आणि अरविंदाला बरोबर घेवून राहूलच्या दोन दिवसानंतर असलेल्या वाढदिवसाची खरेदी करायला हे तिघे गेले होते! राहूलबरोबरच तिने वसंतासाठीही चांगले दोन ड्रेस खरेदी केले! सुनंदा आपल्या वसंताची किती काळजी घेते,हे पाहून अरविंदाला अगदी भरून आले होते.त्याने नकळत आलेले डोळ्यातले पाणी पुसले.सुनंदाने हलकेच त्याच्या पाठीवर थोपटले!
सुनंदा आपले नाटक छान वठवत होती. अरविंदाला आपण कसे सहजासहजी फसवू शकतो नाही..?” स्वत:वर खुश झालेली सुनंदा मिश्किलपणे हसत अरविंदाच्या मागे एका हातात खरेदीच्या पिशव्या आणि दुसऱ्या हातात राहुलचा हात धरत दुकानातून बाहेर पडली...

अरविंदा त्या दोघांसह खरेदी उरकून दुकानातून बाहेर पडला.आता सुनंदाला सडकून भूक लागली होती.राहुलला आईस्क्रिमही खायचे होते.बऱ्यापैकी हॉटेल बघून तिघांनीही भरपूर खाउन घेतले.राहुलच्या आवडीचे आईसक्रिम त्याला मिळाले.
आपल्या वसंतासाठीसुध्दा आपण पार्सल घेउन जावू या ना!सुनंदाने प्रस्ताव ठेवला.
आपल्या सावत्र मुलाचीसुध्दा सुनंदा किती काळजी करते आहे हे पाहून अरविंदाला आपली दुसरी पत्नी म्हणून सुनंदाची निवड केल्याचा सार्थ अभिमान वाटला.नकळत त्याला भरून आले, सुनंदाचा हात हातात घेउन तो म्हणाला.....
तुझ्यासारखी बायको मला मिळाली हे माझे भाग्य समजतो, सुनंदा मी तुझ्यावर खूप खुश आहे...
सुनंदा गोड लाजली.
रिक्षा करून तिघेही घरी आले. सुनंदाने दाराचे कुलूप काढले, दरवाजा उघडला.....
घरातल्या सामानाची अवस्थ्या बघून अरविंदा आणि सुनंदा हादरले...

अरविंदा वसंताला हाक मारू लागला. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नाही हे पाहून अरविंदा घरभर त्याला शोधू लागला.एका कोपऱ्यात अंगाचे मुटकुळे करून वसंता पडलेला होता.

डोक्याला खोक पडून त्यातून रक्त आले होते.सगळ्या घरात सामान अस्ताव्यस्त पडले होते.अरविंदाला समजेना याला नक्की काय झालंय! तो हलकेच वसंताजवळ गेला.त्याला हाताने धरून सरळ केले...
आपल्या वडिलांचा तो स्पर्श आणि आवाज ऐकला आणि वसंता ओक्साबोक्शी रडायला लागला.सुनंदासाठी हे सगळ अनपेक्षित होते.आता वसंता आपल्याबद्दल अरविंदाला कागाळी करणार हा विचार करून सुनंदा हादरली.तिने स्वत:च आकांडतांडव करायला सुरुवात केली.
मी आजपर्यंत खूप सहन केलं;पण आता सहन नाही करणार. तुम्हाला शब्द दिला होता म्हणून आजपर्यंत निपूटपणे त्याची सेवा केली;पण हा आंधळा नको नको तसे वागतो.राहुलला मारतो.माझ्यावर ओरडतो.मला तो दुष्मन समजतो.घरात अशीच सामानाची फेकाफेक करतो.

आता तुम्हीच बघा आपल्या डोळ्यांनी.खूप मस्ती आलीय या आंधळ्याला! ते काही नाही या घरात एकतर हा वसंता राहील नाही तर आम्ही तरी राहू!. आंधळा म्हणून त्याचे खूप लाड केले, भोगा त्याची फळ! आता बस्स झालं,खुप झाले त्याचे लाड! आजपासून या आंधळ्याला मी बिलकूल सांभाळणार नाही. सोडून या कुठंही! यापुढे मला याच तोंडही बघायचं नाही! जोपर्यंत हा आंधळा घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही!”....

(क्रमश:)

©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020