parvad - 13 books and stories free download online pdf in Marathi

परवड भाग १३

भाग १३

सुनंदा आणि अरविंदाचा नवा संसार सुखासमाधानाने चालू झाला होता.संपूर्ण विचारांती दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.अशा लग्नांमध्ये ज्या तडजोडी कराव्या लागणार होत्या त्याची दोघांनीही आधीच मानसिक तयारी केलेली असल्यामुळे दोघांचेही छान टयूनिंग जमले होते.सुखाचा नवा अध्याय सुरू झालेला होता.

दिवस पुढे पुढे जात होते.

अरविंदा आता पूर्वीपेक्षा खूपच निवांत झाला होता.महिन्याच्या महिन्याला येणारी पगाराची रक्कम तो सुनंदाच्या हवाली करू लागला.घरातले सर्व दैनंदिन व्यवहार आता सुनंदाच्या हवाली केलेले होते आणि ती आपल्या नव्या संसारात मनापासून लक्ष देत होती.

सीतेची जागा घेवून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेणारी कामसू बायको आपल्याला मिळाली याचे अरविंदाला मनापासून समाधान होते.समाधानी आनंदी जीवनामुळे अरविंदाच्या वागण्याबोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता.
अरविंदाला सुनंदाबरोबर केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे आयुष्य सुरळीत झाले आहे असे जरी वाटत होते तरी नियती त्याच्यासमोर नवा गुंता उभा करणार आहे याचा त्याला अंदाज नव्हता.
हल्ली सुनंदाच्या मनात थोडे वेगळे विचार येऊ लागले होते ......

अरविंदा आता पूर्णपणे तिच्या कह्यात आला होता.त्याने कमावलेला सगळा पैसा आता तिच्या ताब्यात येत होता.घरातले सगळे व्यवहार आता तीच बघत होती.तिच्या लक्षात आले होते की अरविंदा आता वसंताच्या बाबतीत एकदम निर्धास्त झाला आहे.घरात सुनंदाला संपूर्ण स्वातंत्र्य होते. वसंता ठार आंधळा होता.त्याला घालायला जो कपडा देईल तो घालत होता.ताटात जे पडेल ते निमूटपणे तो खात होता.

आपल्या मादक सौदर्यावर अरविंदा फिदा झालेला आहे आणि आता आपण जे काही सागू ते तो ऐकणारच याचा आत्मविश्वास सुनंदाला आला होता.अचानक हातात आलेली घराची अनिर्बंध सत्ता आणि तिजोरीच्या चाव्या यांनी तिच्यातली खलनायिका जागृत केली होती.....
तिच्या डोक्यात आता वेगळे विचार घर करायला लागले होते...
वसंता शेवटी आपल्या सवतीचा मुलगा! या आंधळ्याची मी काय आयुष्यभर सेवा करायची? माझ्या राहुलकडे या वसंतामुळे दुर्लक्ष होते आहे.ते काही नाही, काहीतरी करून याला घराबाहेर काढायला पाहिजे!

तिला माहीत होते की वसंता घरात दबूनच रहातो.आपण त्याच्याशी कसेही वागलो तरी तो कुणाला काही सांगणार नाही,आणि तसाही हल्ली अरविंदा रात्रीच घरी येतो, आणि आला की तिच्याभोवतीच पिंगा घालत असतो!
सुनंदाच्या डोक्यात हळूहळू एक कट आकाराला येत होता...
राहूलसाठी घरात हल्ली गोडाधोडाचे वेगळे अन्न शिजू लागले.जेवणाबरोबरच कपडेलत्ते व लाडाकोडातही राहुलला झुकते माप मिळू लागले.

अरविंदा तर सुनंदाच्या प्रेमात जसा विरघळूनच गेला होता! त्याची प्रत्येक रात्र शृंगाराने न्हाऊन निघत होती. त्या धुंदीतच तो वावरत होता,त्यामुळे घराला झालेली सावत्रमत्सराची ही लागण त्याच्या लक्षात येणे अशक्यच होते!

दिवसेंदिवस सुनंदा वसंताकडे जास्तच दुर्लक्ष करू लागली.त्याला वेळेवर जेवण देणे.कपडे बदलणे अशा दैनंदिन गोष्टींची हेळसांड होवू लागली.वसंताला आपल्या सावत्र आईचे वागणे पूर्वीपेक्षा बदलले आहे हे समजत होते; पण तो काहीच करू शकत नव्हता.हल्ली तर पंधरा पंधरा दिवस अरविंदा त्याची विचारपूसही करत नव्हता.

त्याच्या दृष्टीने सगळे कसे आलबेल होते!
हळूहळू वसंताचा चांगलाच कोंडमारा व्हायला लागला.त्याच्याशी कुणीच धडपणे बोलत नव्हते.राहूलही पूर्वीसारखा त्याच्याकडे येत नव्हता.सकाळचा नाष्टा, आंघोळ,कपडे एवढेच काय तर मिळणाऱ्या जेवणातही फरक झाला होता.

त्याला आता मागितल्याशिवाय काहीच मिळत नव्हते.त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नव्हती.त्याच्या अंधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन त्याला कुणाच्याही संपर्कात येऊ दिले जात नव्हते!
वसंताची घालमेल आता वाढायला लागली होती,चिडचिड व्हायला लागली होती.आपल्या वडिलांचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून तो अंदाज घेवून हाका मारायचा;पण त्या हाका अरविंदापर्यंत पोहोचू नयेत याची पुरेपूर काळजी सुनंदा घेऊ लागली होती.वसंता आणि अरविंदा यांची गाठच पडू नये याची ती पुरेपूर दक्षता घेत होती.

अरविंदा घरात असला की ती वसंतासाठी किती राबते आहे,त्याची किती काळजी घेते आहे याचा उत्कृष्ट अभिनय करत रहायची त्यामुळे अरविंदाला घरात वेगळे काही घडते आहे याचा काहीच अंदाज नव्हता!
आणि एक दिवस व्हायचं तेच झालं....

(क्रमश:)

©प्रल्हाद दुधाळ पुणे, 9423012020.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED