एक पत्र शेतकरी दादास Nagesh S Shewalkar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक पत्र शेतकरी दादास

एक पत्र शेतकरी दादास!
प्रति,
प्रिय शेतकरीदादा,
रामराम!
तसे पाहिले तर तुला अनेक नावांनी संबोधले जाते. जगाचा पोशिंदा, अन्नदाता,मायबाप, दादा, मामा, काका, आजोबा अशी अनेक कितीतरी तुझी उपनामे आहेत. जवळची माणसे, मित्रपरिवार यांच्या शिवाय इतर सारे तुझा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्यासाठी गोड गोड शब्दांची बरसात करतात. खरे सांगू का दादा, तू की नाही अत्यंत भोळा आहेस कुणी साखरशब्दांची पेरणी केली, मनधरणी केली, खोटेनाटे वास्तव तुझ्यासमोर उभे केले की, तू त्या चक्रव्यूहात सापडून जवळचे सारे काही एक तर कुणाला तरी दान करतोस किंवा मग तू रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या मालाला त्यांनी दिलेला भाव, किंमत घेऊन मोकळा होतोस. स्वतःच्या शेतात कष्टाने पिकवलेला माल, घाम गाळून फुलवलेल्या शेतीतील माल विकताना तू फार आग्रही दिसत नाहीस. घामाचे दाम वसूल करताना तू मालकाप्रमाणे वागत नाहीस. बाजारपेठ आणि तिथले भाव हा एक संशोधनाचा विषय आहे. ज्यांच्या श्रमाने बाजारपेठ फुलते ,फळते, भरभराटीला येते त्या कष्टकरी शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतमालाचा, भाजी-फळांचा भाव ठरवण्याचा अधिकार, हक्क नसतो तर लुबाडू म्हणून ख्यातीप्राप्त असलेले दलाल, व्यापारी हे भाव ठरवतात. 'हमीभाव' हा गुळगुळीत शब्द वापरून तुझ्या हातावर तुरी ठेवल्या जातात. 'खर्चावर आधारित' भाव हे गाजर फक्त निवडणुकीच्यावेळी भरभरून पिकते. हमीभावाचे नाटकही संबंधित लोक किती बेमालूमपणे वठवतात. तुझ्या शेतात जोपर्यंत पिके डोलत असतात तोवर बाजारभाव चढलेले असतात. ज्यादिवशी शेतातील सोने तुझ्या घरात यायला सुरुवात होते, दलालामार्फत व्यापाऱ्यांच्या घशात, गोदामात जायची वेळ येते तेव्हा नसतो हमीभाव, तेव्हा नसतो झालेल्या खर्चाचा हिशोब, तेव्हा असते तुझी गरज, तुझी नड. तेव्हा असते लुट, तेंव्हा असते घासाघीस. तेव्हा शेतीशी दूरान्वयाने संबंध नसलेले लोक फार मोठे शेतीतज्ज्ञ असल्याचा आव आणून शेतीमालाचा भाव ठरवून माल खरेदी करतात. प्रत्येक हंगामात चार-सहा महिने अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला आणि त्याच्या शब्दाला काडीचीही किंमत नसते. त्याचा हक्क, अधिकार सारे काही जाणीवपूर्वक हिरावून घेतले जातात. असहाय्य, कर्जाच्या चक्रात बुडालेल्या शेतकऱ्यांना त्रयस्थ जी किंमत ठरवतील तिला दीनवाणे हो म्हणावेच लागते . मान्य न करावे तर दारात देणेकरी ठाण मांडून बसलेले असतात.
बाजारपेठेचे, त्यातील न कळणारे अर्थशास्त्र काही निराळेच असते. जसजसा लहान, गरीब, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या घरातील माल संपतो, पडत्या दराने विकल्या जातो, त्याचवेळी बाजारभाव शेअर्सच्या भावाप्रमाणे चढायला सुरुवात होते. याच संधीचा फायदा मोठे, कर्जबाजारी नसलेले लोक घेतात. भाव कमी असतात तोपर्यंत साठवून ठेवलेला माल हे धनाढ्य शेतकरी बाहेर काढतात. ह्यामध्ये त्यांची काहीही चूक नसते. शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व स्तरावर जी नीती वापरली जाते, अंमलात आणली जाते त्या अनुषंगाने त्यांची ही कृती असते. ही लुट नसते, हा अधाशीपणा नसतो तर आपण घेतलेल्या मेहनतीचे योग्य, वाजवी फळ पदरात पाडून घेण्याची ती धडपड असते. परंतु शेतकरी राजा, हा मार्ग अवलंबणारे असे किती शेतकरी असतात? बहुतेक शेतकऱ्यांना या ना त्या कारणाने स्वतःच्या शेतातला माल मिळेल त्या किमतीत विकावाच लागतो, हातात पडेल त्यात धन्यता मानावीच लागते. त्यातून झालेले कर्ज फिटले नाही तर नाइलाजाने शेतीचा तुकडा विकावाच लागतो. पिढ्यानपिढ्या हेच अर्थशास्त्र चालू आहे, हिच शेतनीती अवलंबवल्या जात आहे. शेतीत मोती, सोने पिकवणारा कास्तकार दिवसेंदिवस गरिबीच्या, कर्जाच्या खाईत गरगरत असतानाच त्याच्या शेतमालाचा सौदा करणारे दलाल, व्यापारी हे डोळे दिपवणाऱ्या इमारती बांधून, अनेकजण चारचाकी वाहने दिमतीला घेऊन एखाद्या राजाप्रमाणे जीवन जगत असतात.
सरकारे येतात- जातात, शेतकऱ्यांचा नसलेला कळवळा दाखवून, खर्चावर आधारित हमीभावाचे गाजर दाखवून सत्तासुंदरी कवेत घेतात आणि मग सारे काही विसरून जातात. पुन्हा ये रे माझ्या मागल्या! शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, जनतेची भूक भागवणारा एक प्रमुख घटक आहे हे सारे विसरून जातात. प्रत्येक जण शेतकऱ्यांना गृहित धरतात. कुटुंबातील आई ही जशी कुटुंबाचा आत्मा असते, प्रत्येकाची काळजी वाहणारी, इतरांना सुख देताना दु:ख स्वतःकडे घेणारी असते परंतु कुटुंबात तिला सर्वांनी गृहीत धरलेले असते. तसाच प्रकार शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतो. शेतकऱ्यांना 'अन्नदाता' असे म्हणायचे, मात्र वेळ आली की , त्याला लुबाडायचे, त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घ्यायचा हिच नीती सर्वत्र आढळून येते. आपण उपाशीपोटी, अर्धपोटी राहून जगाचे पोट भरतो ह्याच आनंदात शेतकरी जीवन जगत असतो. हे सारे करताना स्वतः मात्र कर्जाच्या खाईत गरगरत राहतो. हे चित्र बदलायला हवे. सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढायला हवे. मोठ्या शेतकऱ्यांनी किमान आपल्या गावातील छोट्या, कर्जाच्या डोंगराखाली छटपटणाऱ्या शेतकऱ्यांना निस्वार्थपणे मदत केली पाहिजे. त्याला उभारी दिली पाहिजे. नापिकी, निसर्गाची वक्रदृष्टी यावेळी छोट्या शेतकऱ्यांना भक्कम आधाराची गरज असते. हा आधार केवळ आणि केवळ गावातील मोठे शेतकरीच देऊ शकतात. सरकारी मदत हा वेगळा विषय आहे. त्याची वाट पाहणे आणि ती मदत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे हा एक संशोधनाचा विषय आहे, ती प्रामाणिक कास्तकारांची क्रुर थट्टा आहे. या साऱ्या परिस्थितीमुळे गांजलेला, कंटाळलेला, पिचलेला, हताश झालेला, आत्मविश्वास हरवलेला छोटा शेतकरी हा स्वतःचा मार्ग निवडतो. खरे तर त्या पर्यायाचा विचार ही कोण्या शेतकऱ्याच्या डोक्यात येणे हा आमच्या सामाजिक संरचनेचा, राजकीय पक्षांचा , देशातील शेतीतज्ज्ञांचा, शेतकऱ्यांचे तारणहार म्हणवणाऱ्यांचा, आमच्या आर्थिक नीती-धोरणांचा प्रचंड मोठा पराभव आहे, लाजीरवाणी गोष्ट आहे. शेतकरीदादा तुलाही विनंती आहे, नाहक जीव गमाऊ नकोस. संकटांना घाबरून स्वत:च्या म्हाताऱ्या, थकलेल्या आईबाबांना,तरुण पत्नीला, लहान मुलांना एका वेगळ्याच संकटात, जाचात ढकलू नकोस. तू या जगातून निघून गेलास याचा अर्थ संकट निवारण झाले असे होत नाही. हां तुुझ्यापुरता प्रश्न मिटत असेल. परंतु तुझ्या पश्चात नवीन संकटाची मालिका तुझ्या कुटुंबासमोर उभी राहते याचा विचार कोण करणार? स्वतःच स्वतःला संपवणे हा एकमेव, अंतिम उपाय नाही. महत्त्वाचे म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना, कुटुंबाला दु:खाच्या महासागरात ढकलण्याचा तुला काय अधिकार आहे? संकटं, दु:ख कोणाच्या वाट्याला येत नाहीत? प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतात म्हणून काय प्रत्येक जण आत्महत्या करण्याचा विचार करत नाही. संकटाचा सामना करून स्वतःसह कुटुंबाची त्यापासून सुटका करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत पार पाडायलाच हवे.
शेतकरी मित्रा, जेव्हा जेव्हा, जिथे कुठे शेतकऱ्यांच्या कर्जाचा, आत्महत्येचा विषय निघतो ना त्यावेळी काही लोक शेतकऱ्यांच्या ऋण काढून सण साजरा करण्याच्या सवयीकडे बोट दाखवतात. काही जण शेतकऱ्यांना असलेल्या व्यसनांचा उल्लेख करतात. त्यात फार सत्यांश आहे असे वाटत नसले तरी थोड्या फार प्रमाणात, दबलेल्या आवाजात होणाऱ्या अशा चर्चा दुर्लक्षून चालणार नाही.
जागा हो, शेतकरी मित्रा, जागा हो. आपले हक्क, अधिकार मिळवायला शिक. सहजासहजी मिळत नसतील तर वसूल करण्याचे शिक. रडल्याशिवाय लेकराला आई जेवायला देत नाही, तिथे लुटारू, स्वार्थी लोकांकडून तुला न्याय मिळेल, मदत मिळेल, त्यांच्या सहकार्याने तुझे सारे प्रश्न सुटतील या विश्वासावर राहू नकोस. त्यासाठी जागा हो, गरज नसताना कर्जाच्या मार्गावर जाऊ नकोस, कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून अडचणी वाढवून घेऊ नकोस. तुला अधिक काय सांगावे. शांतपणे विचार करून निर्णय घे. घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा.डगमगू नकोस. कुटुंबाचे हित समोर ठेव. तू आहेस तर जग आहे. हे लक्षात घे....
००००
तुझाच हितचिंतक,
नागेश सू. शेवाळकर,