ek patra palputyana books and stories free download online pdf in Marathi

एक पत्र पळपुट्यांना

एक पत्र पळपुट्यांना!
प्रति,
देश सोडून गेलेले पळपुटे,
तुम्हाला कोणतेही अभिवादन लिहायचे तर सोडा परंतु पत्र लिहून संवाद साधायलाही मला लाज वाटते. पण तुम्हाला लाज तर सोडा साधा पश्चाताप तरी होतोय का? कुठल्या बिळामध्ये लपून बसला आहात दळभद्री चोरट्यांनो? काय नशीब असते एकेकाचे? भारत देश हा आमच्यासाठी स्वर्ग आहे. या स्वर्गात राहिलात, चैन केली, मजा केली, धमाल रोमान्स करताना नको-नको ते धंदे केले. मनमानेल तसे जगलात,खोऱ्याने पैसे ओढताना अब्जावधींची संपत्ती जमवली. परंतु शेवटी नशिबात काय तर चोरासारखे लपून राहणे. जिथे कुठे लपून बसलात त्या देशाच्या सरकारकडे दीनवाणे, लाचार होऊन भीक मागितल्याप्रमाणे शरणच गेलात ना? अरे, अशीच भीक आपल्या सरकारकडे, देशातील जनतेकडे मागितली असती तर कदाचित तुम्हाला आपल्याच देशामध्ये अभय मिळाला असता, राजरोसपणे फिरता आले असते. तिथे तरी तोंड लपवूनच फिरत असणार. कुणी पाहते की काय? कुणी पकडते की काय? निर्दोष सुटू किंवा नाही? मरण तर येणार नाही? माझा देश मला माफ करेल का? माझ्या देशात मला परत जाता येईल का? माझ्या देशात स्वागत होईल की अपमान? गळ्यात फुलांचा हार पडेल की चपलांच्या माळा? टाळ्या पडतील की तेच हात थोबाडावर बरसतील? अशा प्रश्नांच्या वादळात तुम्ही गरगरत असणार पण तुम्ही सांगणार कुणाला? तुमचे ऐकणार कोण? मला सांगा देशद्रोह्यांनो, जे कुणी आज तुम्हाला लपवत आहेत, शरण देत आहेत, पाठीशी घालत आहेत त्यांनी किती लुटलेय तुम्हाला? भविष्यातही लुटतीलच की. तुमच्या तिथल्या वास्तव्याच्या एक एक क्षणाचा पैसा हजार पटीने वसूल करतीलच. बरे, तिथे बाहेर मोकळेपणाने फिरता येतं का? जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तिथे भारतीय लोक मोठ्या संख्येने भेटणार. त्यांच्या नजरेचा सामना करू शकाल? त्यांनी केलेली छीःथू सहन होईल ? एव्हाना तुम्हाला असे अनुभव आलेच असतील. कारण जे परदेशस्थ भारतीय आहेत ते तुमच्याप्रमाणे या देशाला लुटून पळून गेलेले नाहीत. 'गर्व से कहो हम भारतीय है।' या बाण्याने स्वत्व जपून, कष्ट करून खाणारे आहेत. त्या प्रामाणिक भारतीय लोकांच्या मनात काय किंमत असेल तुमची? तुमची टिंगल-टवाळणी, हेटाळणी करत असतील तुमची. जाऊ देत काही दिवस चैन करा, इश्क करा, लग्न करा पण हे सारे किती दिवस चालणार? एक दिवस तुम्हाला आपली मायभूमी चांगली आहे हे लक्षात येईल. मातृभूमीने दिलेले सारे काही आठवेल. आठवतील आपली माणसं, कासावीस व्हाल त्यांच्या आठवणीने. इथे रक्ताची माणसं आहेत. शेवटी ती माणसं परकीयच आहेत. जोवर तुमच्याजवळ लुटलेला पैसा आहे, तोवर गुळाच्या ढेपे भोवती घोंघावणाऱ्या माशांप्रमाणे तुमचे गुणगाण करीत फिरत राहतील. सर्वात महत्वाचे म्हणजे लक्ष्मी (संपत्ती) चचंल असते. तिने जर कृपादृष्टी कमी केली ना तर अरबोपतींचे भीकपती होऊन रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. त्यावेळी तुमच्या आश्रयदात्यांची भूमिका काय असेल? ज्यावेळी त्यांच्या हे लक्षात येईल की, स्वतःच्या देशाला लुटून ही माणसं आपल्या आश्रयाला आली आहेत, ज्यांनी स्वतःच्या देशाला, रक्ताच्या माणसांना फसवलय, सहकारी-हितचिंतकांना सोडलं नाही. ज्यांच्या रक्तामध्येच भ्रष्टाचार, फसवणूक आहे ती माणसं या देशाशी, इथल्या नागरिकांशी प्रामाणिक जगातील? ज्यावेळी तुमच्याकडून छोटी, साधी नकळत चूक होईल ना तेव्हा ते लोक तुमच्या मुसक्या आवळतील. तेव्हा या देशाची प्रकर्षाने आठवण येईल. तुमच्या माय-बापांना, नातेवाईकांना, मित्रांना तुमच्याशी असलेले नाते सांगताना लाज वाटत असेल रे. काय चूक केली त्यांनी? तुम्हाला जन्म दिला ही चूक? समाजाचे नाही-नाही ते बोल ऐकण्याची शिक्षा त्यांना का? लुटारुचे नातेवाईक आहेत समजताच समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली असेल, नाही-नाही ते टोमणे, अपशब्द ऐकावे लागले असतील त्याचे काय? तुमच्या अनेक नातेवाईकांच्या घरांवर पोलीसांच्या धाडी पडल्या असतील त्याचे काय? त्यांचा ससेमिरा चुकवताना त्यांच्या नाकीनऊ आले असतील, या सर्वांचा त्यांना झालेल्या मनस्तापाचे काय? अर्थात् तुम्हा निर्लज्जांना त्याचे काय सोयरसुतक असणार? लाज विकण्यासाठी लाच देऊन दाम मिळवता त्यामुळे लाज काय असते हे तुम्हाला काय ठाऊक? बलात्कार झालेला नसतानाही त्यांना तुमच्याशी संबंधित असणारांना तसे जीवन जगावे लागत असणार.
समाजाचे काय? नागरिकांची काय चूक होती? दिवस रात्र मेहनत करून, काबाडकष्ट करून, पाई न पाई जमवताना पोटाला चिमटा घेऊन, अर्धपोटी राहून काही विशिष्ट कारणासाठी जमवलेल्या पैशावरच तुम्ही अप्रत्यक्षपणे दरोड टाकलात. एवढी मोठी लूट झाल्यानंतर झालेल्या महाप्रचंड चोरीनंतर अर्थव्यवस्थेला नवी मजबुती देण्यासाठी सरकारजवळ सामान्यांच्या खिशाला कात्री लावल्याशिवाय दुसरा पर्याय नसणार. अरे, गिधाडांनो, प्रेताच्या टाळूवरील लोणी चाटणाऱ्या नराधमांनो, हे का विसरलात की , हा देश शेतीप्रधान आहे. शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे, आत्मा आहे. परंतु परिस्थिती कशी आहे ते तुम्हा स्वार्थाने आंधळे झालेल्यांना काय माहिती? शेतकरी नागवला जातोय, लुटल्या जातोय, कर्जाच्या चक्रामध्ये गरगरतोय. दुसरीकडे तुमच्यासारखे राक्षस, हैवान, बँकेला हातोहात अब्जावधी रुपयांचा चुना लावून रफुचक्कर होत असताना शेतीच्या कर्जासाठी घेतलेल्या रकमेचा एखादा हप्ता चुकला म्हणताच बँकेचे अधिकारी, शेतकऱ्यांच्या दारात जातात. ऋण देणारा दारात येणे ही गोष्ट प्रचंड वेदनामयी, दुःखदायक असते कारण त्याचं मन, त्यांची भावना जिवंत असते, कर्जबुडव्याप्रमाणे निर्लज्ज, मेलेली नसते. विविध कारणांमुळे झालेली नापिकी, उत्पादित मालाची हातात आलेली तुटपुंजी रक्कम अणि त्यामुळे फेडता आले नाही म्हणून त्रस्त असणारा शेतकरी हा विचार कधी केलात का? उलट तुमच्यासारखे लुटारु मस्त आहेत, चैन करताना नशा अणि वासना यामध्ये धुंद आहेत.
शेतमजुरी करणारी जनता दिवसभर रक्ताचे पाणी करते आहे. घामाने वारंवार आंघोळ करते आहे. तरीही सायंकाळी चुल पेटेल, पोरांची-कुटुंबाची भूक भागवता येईल असे दाम त्याच्या हातात पडत नसताना तुमच्यासारख्या संधीसाधू लोकांच्या शरीरावर कष्ट न केल्यामुळे चरबी वाढते, अंग सुजत आहे. किती कमाल आहे ना, कष्टकऱ्यांच्या शरीरातील रक्त थेंबाथेंबाने आटत असताना तुमच्यासारख्या बोक्यांच्या शरीरात रक्त मावत नाही. या देशामध्ये कोट्यावधी लोकांकडे सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन नाही. त्याचवेळी तुमच्यासारख्या रक्तपिपासुंच्या नावावर कुठे-कुठे, कोणती आणि किती मालमत्ता आहे ते छापेमारी मारूनही सापडत नाही. तुमच्या कुटूंबातील सदस्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असताना त्यांच्या दिमतीला दहा-दहा बंगले? प्रत्येक बंगल्यात शेकडो खोल्या? एवढा थाटमाट-दिमाखदारी कशाला? सरकारी वाहनाने प्रवास करायला पैशाची कमी असणारांची संख्या या देशात असताना तुमच्या दिमतीला वाहनेच वाहने! विमान, हेलिकॉप्टरचा सोस वेगळाच...
तिकडे माझा जवान सीमेवर स्वतःचं रक्त सांडून शहीद होतोय, बलिदान देतोय. हजारे कोटींची अफरातफर करणाऱ्यांना सैनिकांची आठवण येऊ नये? एवढ्या का तुमच्या भावना मृत झाल्या आहेत? नसेल तुम्हाला देशप्रेम, नसेल तुम्हाला लाज, नसेल तुम्हाला कशाची चाड पण आमच्या सच्च्या देशभक्तांच्या जाणिवा जिवंत आहेत. त्यामुळे आमच्या पैशावर फडा काढून, पक्की मांड ठोकून बसणारांबद्दल आम्हाला प्रचंड संताप आहे, चिड आहे. या देशातील गरीब जनतेच्या, माय-बहिणींच्या हृदयातून निघालेला शाप तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही, झोप लागू देणार नाही. आजही तुम्हाला झोपेच्या गोळ्या किंवा नशा केल्याशिवाय झोप लागतच नसेल. पळपुट्यांनो, एवढी मालमत्ता असताना, मावत नसेल एवढा पैसा असताना तुम्हाला शांत झोप लागत नाही हे तुमचे केवढे दुर्देव! पैसा सर्व काही नसतो. पैशाने मालमत्ताच काय अधिकारी-पदाधिकारी विकत घेता येतात हे तुम्ही दाखवून दिले असले तरी ते पूर्ण सत्य नाही, प्रत्येक दिवस सारखा नसतो. ज्यावेळी तुमचा दिवस बदलेल, तुमचे आश्रयदाते तुम्हाला हाकलून लावतील त्यावेळी तुम्हाला आठवण येईल या भारतमातेची, या देशातील जनतेची! त्यावेळी कुणी तुमची गाढवावरून धिंड काढावी असे म्हटले तरी गाढव तुम्हाला स्वतःच्या पाठीवर बसवून घ्यायला तयार होणार नाही. थोडी जरी लाज, माणुसकी शिल्लक असेल, जिवंत असेल तर भरा आम्हा भारतीयांचा लुटलेला पैसा आणि या भारतमातेची सेवा करायला...
तुमचा,
कुणीही नसलेला,
एक सच्चा भारतीय...
०००
(नागेश सू. शेवाळकर)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED