ek patra nishthavant kaarykalyas books and stories free download online pdf in Marathi

एक पत्र निष्ठावंत कार्यकर्त्यास

एक पत्र निष्ठावंत कार्यकर्त्यास!
प्रति,
निष्ठावंत कार्यकर्ते,
(सर्व पक्ष आणि संघटनांमध्ये दडलेले.)
स.न.वि.वि.
काय म्हणता? कुठे आहात? काय करीत आहात? अज्ञातवासात तर गेला नाहीत ना? आजकाल फारशी भेट होत नाही म्हणून हा पत्रप्रपंच! कुठे तुम्ही दिसलात तरी तेवढ्या पुरते! कामापुरता मामा झालाय का तुमचा? असा कसा हो सोशीक स्वभाव तुमचा? आपण भले नि आपले काम भले याप्रमाणे वागताना पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा, सत्यवचनी, एकनिष्ठ अशा तुमच्या स्वभावाचा आणि वृत्तीचा क्षणोक्षणी फायदा घेतला गेला, घेतला जातोय. जीवाचे रान करून, प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही पक्ष,संघटना तळागाळापर्यंत नेऊन ठेवता, पक्षाचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचवता, रात्रंदिवस काम करून पक्षाच्या उमेदवाराला सत्तासुंदरीच्या कवेत नेऊन सोडता परंतु कधीही स्वतःसाठी कोणत्याही पदाची लालसा उघडपणे बोलून दाखवत नाहीत. 'कानामागून आले नि तिखट झाले' याप्रमाणे किंवा तुमचे बोट धरून राजकारणाची बाराखडी शिकलेले कितीतरी लोक केवळ पैशाच्या किंवा गुंडगिरीच्या जोरावर खूप दूर निघून गेले. तुम्ही मात्र दशकानुदशके आहात तिथेच आहात. कधी तुम्हाला बंड करावेसे वाटले नाही? पक्षनेत्यांना चार शब्द ऐकवून जाब विचारावा असे मनात आले नाही? इतरांप्रमाणे एखादे पद मिळावे असे वाटले नाही? का तुम्हाला कशाचीही अपेक्षा नाही? कुणी जंग जंग पछाडले तर 'पक्ष देईल त जबाबदारी पार पाडेन' असे ऐकवून चर्चांना का विराम देता? ही जबाबदारी पेलता पेलता तुमच्यापैकी अनेकांनी एकाच घरातील तीन तीन पिढ्यांना सत्तेची मधाळ, रसाळ फळे चाखायला लावली आहेत. तुमच्या तरुणपणी ज्या समवयस्क नेत्याला तुम्ही सत्तेचा सोपान चढायला मदत केली त्याच नेत्याच्या मुलाला आणि कालांतराने त्याच्या नातवाला तुम्ही सत्तेच्या सारीपाटात भरभरून यश मिळवून दिले पण तुम्ही काय मिळवले? शून्य! काहीच नाही!
निष्ठावान मित्रांनो, गेदा तो जमाना, एक काळ असा होता की, पक्षात पैशापेक्षा निष्ठा श्रेष्ठ होती. इमानदार, प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचे चीज झाले, मेहनतीला फळ मिळाले अशी वागणूक मिळत असे. न मागताही पक्षातील वरिष्ठ प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाला, हुशारीला, अनुभवाला, निष्ठेला आणि चारित्र्यालाही योग्य तो न्याय देत असत. परंतु निष्ठावानांनो, काळ बदलला आहे. 'ओरडेल त्याच्या पदरात, भांडेल त्याच्या दारात, पैसा कोंबेल त्याच्या हातात, गुंडगिरीच्या मोबदल्यात' हवे ते मिळविण्याचा हा काळ आहे. पूर्वीपासून असे म्हणतात की, रडल्याशिवाय आई लेकराला जेवायला देत नाही. तुम्ही असे काहीही करीत नाहीत. तुमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षाचे- संघटनांचे निर्णय मग ते चूक असोत वा बरोबर त्या निर्णयाची तळी उचलून पक्षाने घेतलेला निर्णय कसा जनहिताचा आहे, विकासात्मक, धोरणाभिमुख आहे हे घसा कोरडा पडेपर्यंत समजावून सांगण्याचे काम करतात. परंतु एखादे पद देण्याची वेळ आली की, मात्र तुम्हाला बाजूला केले जाते. एखाद्या उपऱ्या व्यक्तिला ती संधी बहाल केली जाते. अशावेळी एखादा-दुसरा अपवाद वगळता बहुतांश कार्यकर्ते स्वस्थ बसून पक्षाने घेतलेला निर्णयच चांगला आहे हे इतरांना पटवून सांगण्यात धन्यता मानतात. मात्र स्वतःवर झालेल्या अन्यायाला चकार शब्दानेही वाचा फोडत नाहीत.
पक्षात नव्याने येणाऱ्या, दुसऱ्या पक्षातून येणारांचे स्वागतही निष्ठावानांना स्वतः पायघड्या घालून करावे लागते, स्तुतीसुमने उधळून त्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय कसा योग्य आहे ते पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागतो. 'व्यापारी म्हणून आले नि राज्यकर्ते झाले' हे आपण इंग्रजांच्या बाबतीत म्हणत होतो. परंतु निष्ठावंतांनो, इतर पक्षातून आलेले नेते काय करतात तर 'कुठून तरी आले नि निष्ठावंतांची गोची करते झाले.' किंवा 'उपरे म्हणून आले नि खुर्चीला वरते झाले.' असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. महत्त्वाचा निर्णय घेताना, निवडणूक लढवताना निष्ठावानांच्या सल्ल्यापेक्षा आगंतुकांच्या मताला अधिक किंमत मिळते असे का? केवळ येणाऱ्या माणसांजवळ पैसा जास्त आहे म्हणून? त्यांनी पैशाच्या जोरावर वरिष्ठांना स्वतःच्या बाजूला वळवले म्हणून? काय असेल गुपित? प्रचंड काम केलेले असूनही, मेहनत करूनही तुम्ही का कच खाता? का निष्प्रभ ठरता? गेले ते तत्वाचे दिवस! अनेकांना तत्त्व काय आहे हेही माहिती नसावे अशी परिस्थिती आहे कारण तत्वाचा विषय निघाला की, अनेक जण साळसूदपणे विचारतात की, कुठे मिळते हो हे तत्व का सत्व? तत्वांचा उपयोग काय आणि कशासाठी? एक पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची कीड सर्वच पक्षांना लागलेली दिसून येते. प्रत्येक पक्षाला ही भीती कायम सतावत असते. कारण कोणत्याही पक्षनेतृत्वाचा आपल्या पक्षातील तथाकथित नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मुळात विश्वासच राहिलेला नाही. सकाळी आपल्याबरोबर नाष्टा करणारी समोरची व्यक्ती सायंकाळी आपल्या पक्षात असेल की नाही अशी एक अविश्वासी तलवार कायमची टांगलेली असते. दुसरीकडे एखादा नेता समोरचा विरोधी पक्ष आपल्या पक्षात येतोय हे समजताच त्याला स्वतःच्या पक्षात घ्यायला तुमची नेतेमंडळी उत्सुक का असतात? कालपर्यंत ज्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे हीच मंडळी वेशीवर टांगत होती त्याच व्यक्तिवर स्तुतीसुमने उधळून पक्षात का घेत असावीत? तुमच्या पक्षनेतृत्वाच्या लक्षात एक बाब का येत नाही की, कालपर्यंत ज्या पक्षाने त्याला मोठे केले आहे, नेतेपण दिले आहे, सन्मान दिला आहे ती व्यक्ती आज त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून आपल्या पक्षात येण्यासाठी का उतावीळ आहे? उद्या या नेत्याचे सूत आणि सूर आपल्या पक्षाशी, पक्षाच्या विचारधारेशी, पक्षातील नेत्यांशी जुळले नाहीत तर ही व्यक्ती आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ राहील का? स्वतःच्या निष्ठा गहाण टाकून त्याने त्या पक्षासोबत बेइमानी केली तो आपल्या पक्षात प्रामाणिक कसा राहील? परंतु 'शत्रुचा शत्रू तो आपला मित्र!' ही नीती राजकारणात अग्रेसर आहे. येणाऱ्या व्यक्तिमुळे पक्षाचा फायदा होईल की तोटा, आपल्या पक्षातील कुणी नाराज होईल का, जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातील का? हा विचार कुणी पक्षनेते करतात का? एखादा-दुसरा निर्णय सोडला तर आततायीपणा, अविचार आणि महत्त्वाचे म्हणजे 'समोरच्या पक्षाचे नुकसान हाच आपला विजय' या विचाराने पछाडलेल्या पक्षश्रेष्ठींबाबत तुम्ही निष्ठावंत कधी ब्र काढत नाहीत. तुमची पक्षनिष्ठा, आयुष्यभर जोपासलेली विचारसरणी, स्वतःभोवती निर्माण केलेले तत्वांचे वलय, अंगी ठासून भरलेला प्रामाणिकपणा या गोष्टी तुम्हाला स्वस्थ बसायला, अन्याय सहन करायला भाग पाडतात.
नाही! निष्ठावंतांनो, नाही! अन्याय सहन करणे सोडा. न मागता काही मिळेल ही आशा सोडा. ओरबाडून घेण्याची, हिसकावून घेण्याची तयारी ठेवा. यापुढेही तुम्ही हातावर हात ठेवून, मूग गिळून आणि ओठ शिवलेल्या अवस्थेत सारे काही मूकपणे बघत बसलात ना तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. एखादी संधी समोर दिसत असेल तर काहीही करून तिला 'कॅश' करण्याची तयारी ठेवा. 'दे रे हरी पलंगावरी' या भावनेने वाट पाहात राहिला तर दुसराच कुणीतरी त्या तुमच्या दारी येऊ पाहणाऱ्या संधीला 'कॅश' देऊन 'किस' करून तिला पळवून नेऊन संसार थाटेल.
बऱ्याचदा अशीही परिस्थिती निर्माण होते की, निवडणुकीच्या काळात समोर आलेल्या कार्यकर्त्यांसोबत वाद होतात, बाचाबाची होते, शिविगाळ होते प्रसंगी मारामारीही होते. परंतु निवडणुका झाल्या की, वरच्या पातळीवरील समीकरणे बदलतात. सत्तेला बाहुपाशात घेण्यासाठी विरोधी पक्षातील काही नेत्यांना कवटाळावे लागते परंतु यावेळी खरी गोची होते ती कार्यकर्त्यांची! ज्यांना मारले, ज्यांच्याकडून मार खाल्ला त्यांना आपले म्हणावे लागते, झालेली जखम कोरडी होत नाही तोच ती जखम करणारास गुलाल लावावा लागतो.
तेव्हा उठा. दाखवून द्या तुमची ताकद! अन्यायाविरुद्ध अशी डरकाळी फोडा की, आसमंत थरथरला पाहिजे. हवे ते मिळविल्याशिवाय स्वस्थ बसू नका. तुमच्या पक्षातला कार्यकर्ता असो की, दुसऱ्या पक्षातून आलेला उपटसुंभ असो, जो कुणी तुम्हाला डावलून पुढे जात असेल तर अडवा त्याला, प्रसंगी आडवा करा त्याला आणि स्वतःची यशोपताका उंचच उंच फडकावा! यापेक्षा अधिक काय बोलू?
तुमची हेळसांड बघू न शकणारा,
एक नागरिक.
००००
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED