लेडीज ओन्ली - 2 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 2

{ लेडीज ओन्ली - या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
कॉपीराईट कायद्यानुसार 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}



|| लेडीज ओन्ली (भाग - दोन) ||


" टेन.. नाईन.. एट.. सेवन... " प्राईम टाईमचं काऊंटडाऊन सुरू झालं. होस्ट, गेस्ट सगळेच लाईव्ह टेलिकास्ट साठी सज्ज झाले," थ्री.. टू.. वन... गो.. "

" नमऽऽस्कार... महाराष्ट्र..!! मी निकिता - घेऊन आली आहे आपल्या नंबर वन मराठी न्युज चॅनेल 'प्रो महाराष्ट्र' चा नंबर वन प्राईम टाईम शो.. "सवाल महाराष्ट्राचा..! ", निकिताच्या निवेदनाला सुरूवात झाली, "मराठी न्यूज चॅनेलच्या इतिहासातला एकमेव शो जो थेट परिणाम करतो महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या विचारांवर आणि मतांवर देखील. एक असा शो जो बघणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, इतकी की आपल्या शोची लोकप्रियता हिंदीवाल्यांच्या काळजातही धडकी भरवत आहे. आणि हे सगळं होतंय तुमच्या प्रेमामुळे अन् आमच्या धाडसामुळे.
तर मंडळी आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवा विषय, नवी चर्चा. आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत एक धाडसी विषय. एक अशी घटना जी पुरोगामी महाराष्ट्राला मुळापासून हादरवून सोडेल. एक अशी चर्चा जी मांडणी करेल काही ज्वलंत जळजळीत प्रश्नांची. त्याची उत्तरे कदाचित या मंचावर सापडणारही नाहीत. पण ती उत्तरं शोधायची आहेत सबंध महाराष्ट्राने... आम्ही फक्त तुमच्या मनातील प्रश्न इथे उपस्थित करणार आहोत.
चर्चेसाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत खूप मोठी मोठी माणसं... आपण त्यांची ओळख करून घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पहात राहा. प्रो महाराष्ट्र न्यूज.. "
निकिता थांबली. गळ्याजवळचे माईक बंद झाले. स्टुडिओतून जाहिराती प्रसारित केल्या जाऊ लागल्या. तेवढ्या वेळात निकिताने शन्नोला बोलावून घेतले. ती जवळ आली. निकिता तिच्या कानात फुसफुसू लागली," कसं होतंय टेलिकास्ट? "
" जबरदस्त... तुझ्यासाठी दोन कॅमेराज् एक्स्ट्रा लावलेत.. पुरे स्क्रीन पे तेरा ही जलवा... " शन्नो निकिताच्या हातावर हात मारत बोलली.
" बॉस क्या बोला? " निकिताचा प्रश्न.
" मिटिंग फिक्स... शो संपल्यावर बारापर्यंत ये म्हणालाय... "
"थँक्यू डिअर... अँड वन मोअर थिंग.."
"हं बोल ना.. "
" थोडा जास्त वेळ लागला तरी शो कंटीन्यू करायचाय.. मोअर दॅन अवर.. तरी.. "
" आणि चीफ? "
"आज माझ्याकडे चार्ज आहे.. विसरलीस? चीफ एडिटर रजेवर आहे पंधरा दिवस... या पंधरा दिवसात जी खुर्ची टेंपररिली माझ्याकडे आलीय तिच्यावर मला पर्मनंट व्हायचंय ...अँड आय हॅव टू डू इट... तू सिर्फ देखती जा..." निकिताच्या डोक्यात बरंच काही शिजत होतं, "एनी प्रॉब्लेम शन्नोबेब ? "
" नो.. नथिंग.. चीफ..!! " शन्नोही मैत्रिणीच्या इच्छेखातर तयार झाली.मागे फिरून सहकाऱ्यांना खुणावलं," कॅमेरा रेडी... "
पुन्हा थेट प्रक्षेपण सुरू झालं. "ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे, महाराष्ट्राच्या नंबर वन डिबेट शो मध्ये ज्याचं नाव आहे, 'सवाल महाराष्ट्राचा..!' " निकिताने बोलायला सुरुवात केली, "मंडळी, जसे की ब्रेकवर जाण्यापूर्वी मी बोलली होते. आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयावर जो आजवर कधीही, कोणत्याही नॅशनल प्लॅटफॉर्मवरून हाताळला गेलेला नाही. एक असा विषय.. ज्याबद्दल उघडपणे बोलणं जणू आपल्या देशात वर्ज्यच आहे. अशा एका विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि मला खात्री आहे, आपल्या या चर्चेनंतर केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं समाजमन ढवळून निघणार आहे. चला तर मग सुरूवात करूया या धगधगत्या विषयावरील चर्चेला. लक्षात घ्या, मी अजूनही आजच्या चर्चेचा विषय काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं नाही. तो तुम्हाला कळेलच.. तत्पूर्वी आपण ओळख करून घेऊया आपल्या आजच्या पाहुण्यांची.
तर माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे.माझ्यासोबत आहेत लोकविकास पक्षाच्या शहर आघाडीच्या प्रमुख शारदाताई थोरात. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, पुरोगामी विचारसरणीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून शारदाताईंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तसेच आपल्या शहराच्या भावी महापौर म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. अशा शारदाताई थोरात आपल्यासोबत आहेत. "
कॅमेरा शारदाताईंवर जाऊन थांबला. त्यांनी कॅमेऱ्यात बघत, छानसं स्मितहास्य करत दोन्ही हात जोडले. जणू त्या सगळ्या महाराष्ट्राला नमस्कार करत होत्या.
" माझ्या पुढच्या पाहुण्या आहेत अनुजाताई वर्तक. या संस्कृती रक्षण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. भारतीय संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि पाश्चात्य संस्कृतीचं आपल्या देशावर होत असलेलं आक्रमण मोडून काढण्यासाठी झुंजणाऱ्या एका लढाऊ संघटनेच्या त्या प्रमुख आहेत. त्यांच्या आक्रमकपणामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल झालेले आहेत. तरीही त्यांच्या संघटनेचं अन् त्यांचं कार्य नेटाने चालू आहे. अशा अनुजाताई वर्तक आज आपल्या सोबत आहेत. " निकिताने ओळख करून दिली. कॅमेरा वर्तक बाईंवर गेला. त्यांनी अगदी धीरगंभीर चेहऱ्याने नमस्कार केला.
" माझ्या पुढच्या पाहुण्या आहेत, शहरातील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. इरा खिरे. " कॅमेरा खिरे मॅडमचा चेहरा दाखवू लागला. त्यांनी प्रसन्न आणि हसऱ्या मुद्रेने दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
" डॉक्टर खिरे मॅडम आपल्याला आपल्या आजच्या विषयाची मानसशास्त्रीय बाजू उलगडून दाखविणार आहेत. आपण चर्चा करणार असलेल्या प्रकरणाचे मानसशास्त्रीय कंगोरे आपल्याला समजावून सांगण्यासाठी डॉक्टर खिरे मॅडम आज स्टुडिओ मध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्या समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ करणाऱ्या 'हमराज' या संघटनेच्या प्रमुख आहेत. त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठे आहे. आपले स्वागत आहे मॅडम.! "
पॅनेलवर उपस्थित असलेल्या तीन पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर निकिता क्षणभर थांबली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आणि पुन्हा पुढे बोलू लागली," प्रेक्षकहो, एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचा हा डिबेट शो आपल्या रोजच्या शो पेक्षा खूप वेगळा असणार आहे. कारण आज डिबेट पॅनेल मध्ये एकही पुरूष नाही. आजच्या कार्यक्रमाचा अँकर पुरूष नाही. इतकेच काय तर कॅमेरा क्रू मध्येही कुणी पुरूष नाही. थोडक्यात काय तर प्रो महाराष्ट्रच्या इतिहासातला हा पहिला शो आहे जो पूर्णपणे स्त्रियांकडून कंडक्ट होणार आहे. आगामी जागतिक महिला दिनाची नांदी सादर करणारं नारी शक्तीचं हे रूप जगासाठी नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद असणार आहे नक्कीच.
आता मी वळतेय माझ्या पुढच्या पाहुण्यांकडे. ज्यांच्यामुळे आजचा हा विषय आपल्यासमोर चर्चेला आला आहे. ज्यांच्या खासगी आयुष्यामुळे महाराष्ट्राचं समाजमन गढूळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा आपल्या पुढच्या पाहुण्या आहेत- श्रीमती विजयाताई. त्यांचं आडनाव मलाही माहित नाही. कदाचित त्यांना ते उघड करायचं नसेल. हरकत नाही. आपण स्वागत करूया विजयाताईंचे...! "
कॅमेरा विजयाताईंवर जाऊन थांबला. शांत धीरगंभीर चेहऱ्याची एक चाळीशीतील स्त्री. लांबसडक काळेभोर केस. डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चष्मा. अंगावर पांढरी शुभ्र साडी. मनगटापर्यंत बाह्या असलेले ब्लाऊज. अंगावर एकही दागिना नाही. उजव्या मनगटावरचं घड्याळ तेवढा एकच काय तो अलंकार. असं अतिशय साधं राहणीमान असलेल्या विजयाताई. कॅमेरा त्यांच्यावर येऊन थांबला तेव्हा त्या जरा गांगरल्याच. नेमकं काय करावं लक्षात आलं नाही. मग जशा बसलेल्या होत्या तशाच त्या बसून राहिल्या.
"प्रेक्षकहो, आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आजच्या चर्चेच्या विषयाबद्दल..." निकिताने पुढे बोलायला सुरुवात केली, "हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला बघावा लागेल आमचा हा स्पेशल रिपोर्ट... बघूया तर मग..."
आणि चर्चेसाठी बसलेल्या पॅनेलच्या मागच्या भिंतीवर असलेल्या टीव्हीच्या पडद्यावर एक रिपोर्ट दाखवला जाऊ लागला. कॅमेरा आता न्युजरूममधल्या टीव्हीवर स्थिरावला होता.
काही दृश्य - काही फोटो आणि त्यांच्या बरोबरीनं एक निवेदन टीव्हीच्या पडद्यावर दिसू- ऐकू येऊ लागलं...
" समलैंगिक संबंध हा आपल्या देशात नेहमीच आडपडद्याचा विषय राहिलेला आहे.एका पुरूषाला दुसऱ्या पुरूषाबद्दल किंवा एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटणे हे नैसर्गिक असू शकते हे जरी समाज मान्य करायला लागला असला तरी थेट समलिंगी संबंधांना अजूनही आपल्या देशात समाजमान्यता मिळत नाहीये. सप्टेंबर 2018 मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील कलम 377 हटवताना समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली आहे. समलिंगी व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार असून तो हिरावून घेण्याचा हक्क कुणालाही नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले.
असं जरी असलं तरी समलिंगी संबंध कुणामध्ये असावेत? या संदर्भात कायदा काहीही सांगत नाही. मुळात समलिंगी संबंध नाकारणाऱ्या आपल्या समाजात समलैंगिकता स्विकारली जाणेच पाप मानले जाते तिथे जर कुणा एका बापलेकामध्ये समलिंगी संबंध असतील तर?
आज जे प्रकरण उघडकीस आले आहे. ते एका पवित्र नात्याला काळिमा फासणारे आहे. कायद्याने समलैंगिकता मान्य केली असली तरी कुणामधली....? आई आणि मुलीमध्ये समलैंगिक संबंध असतील तर...??? "
रिपोर्ट संपला आणि निकीताने शोची सुत्रं हातात घेतली. समोरच्या टेबलावर दोन्ही हात आदळून, मोठ्या आवाजात ती ओरडली,
" विजयाताई.... खरं तर तुम्हाला ताई म्हणायची देखील लाज वाटतेय... पोटच्या पोरीशी लैंगिक संबंध ठेवता तुम्ही? मायलेकीच्या नात्याचा एवढा मोठा अपमान आजवर कुणीही केला नसेल. खरं तर गाढवावर बसवून धिंड काढायला पाहिजे तुमची... सगळ्या स्त्री जातीसाठी कलंक आहात तुम्ही कलंक... काय गरज होती तुम्हाला आपल्याच मुलीशी असले घाणेरडे संबंध ठेवण्याची? कुठून निर्माण झाली ही विकृती तुमच्या मनात? 'आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' असे शिकवणारी आपली संस्कृती... तुम्ही केवळ आपल्या परमपावन संस्कृतीलाच नव्हे तर 'आई ' या पवित्र शब्दालाही लांच्छन लावले आहे. का केलेत असे तुम्ही? बोला विजयाताई बोला... बोला... बोला... "
निकिता टेबलावर हात आपटत बराच वेळ किंचाळत राहिली. विजयाताई मात्र शांत स्थिर बसून होत्या. त्यांना जणू काही ऐकूच येत नव्हतं. जणू काही त्या तिथं हजरच नव्हत्या. त्या घरी होत्या.. त्यांच्या स्वतःच्या...


©सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®