लेडीज ओन्ली - 3 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 3

|| लेडीज ओन्ली ||

( भाग - तीन)

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}


|| लेडीज ओन्ली - 3 ||


'ट्रिरिंग... ट्रिरिंग.. ट्रिरिंग.. ' विजयाताईंचा मोबाईल बराच वेळ खणखणत होता. कानाला तो कर्कश्श आवाज अगदीच असह्य झाला तेव्हा त्यांनी डोळे उघडले. कॉटच्या बाजूच्या स्टुलावर पडल्या पडल्या भणभणणारा मोबाईल हातात घेताना 'इतक्या पहाटे कुणाला आठवण झाली?' असं मनाशीच पुटपुटल्या. उशीजवळ ठेवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला अन् मोबाईलच्या स्क्रीन वर नजर फिरवली. 'बछडी' असं नाव दिसलं अन् विजयाताईंचा सगळा आळस कुठल्या कुठे पळून गेला. 'माझ्या बछडुचा कॉल..' असं म्हणत रिसीव केला.
"हॅलो... बोल बछड्या.. "
" हॅलो.. हॅलो.. मी येतेय गं आई.. सुट्टी लागलीय.. "
" हो का.. कधी?.. हॅलो.. कधी येतेस पिल्लू? हॅलो.. " आणि त्या हॅलो हॅलो करत राहिल्या. पण काहीच आवाज येत नव्हता. फोन कट करून पुन्हा नंबर डायल करून बघितला पण छे.. कनेक्टच होईना... 'प्रवासात असेल बहुधा' असं स्वतःला समजावत त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला.
पहाटेचे साडेतीन चार वाजले असतील. दिवस उगवायला अजून बराच अवकाश होता. विजयाताई पुन्हा बिछान्यावर आडव्या झाल्या. खरं तर ही गोड साखरझोपेची वेळ. पण आता त्यांचा काही डोळ्याला डोळा लागेना. 'माझं लेकरू परत येतंय.. दोन वर्षांनंतर...' या विचारात त्यांचं मन गुंतून गेलं. छताला भिरभिरणाऱ्या पंख्यावर खिळलेली नजर कुठेतरी दूर मागे जाऊ लागली.. थेट दोन वर्ष मागे जाऊन थांबली. लेकीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्या दिवसावर जाऊन थांबली. कित्ती कित्ती आनंदाचा दिवस होता तो!
"आई मी फर्स्ट क्लास मिळवला..." डिग्रीची मार्कशीट घेऊन धावत आलेल्या अश्रवीने आईला कडकडून मिठी मारली.
"अगं हो हो.. जरा हळू... " आई स्वतःचा तोल सावरू लागली. पण लेकीला मिठी मारताना का कुणास ठाऊक तिच्या डोळ्यात पाणी दाटले. लेकीच्या नकळत तिने पापणीवरून बोट फिरवलं," चल साखर घालते तुझ्या हातावर.. तोंड गोड करते.. "
" अगं साखर काय.. मी पेढे आणलेत.. " खांद्यावर लटकवलेल्या पर्समधून अश्रवीने पेढ्यांचा बॉक्स काढला. त्यातून एक पेढा काढून आईच्या तोंडात घालू लागली. तोच आई बोलली," अंहं.. आधी तिथे.. " तिने भिंतीकडे अंगुलीनिर्देश केला. तिथे काही फोटो लावलेले होते. सिंहारूढ असलेली दुर्गामाता, राजमाता जिजाऊ, रझिया सुलताना, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, कल्पना चावला, इंदिरा गांधी अशा कर्तबगार स्त्रियांचे. अश्रवी लगेच तिकडे गेली. त्या फोटोंसमोर तिने पेढा ठेवला. हात जोडले. डोळे मिटले. मनाशीच काहितरी पुटपुटली. नंतर आईजवळ आली. आईला पेढा भरवला. तिच्या पायांवर डोकं ठेवलं. आईने लेकीला पुन्हा एकदा मिठी मारली. आईच्या गळ्यात पडल्या पडल्याच अश्रवी बोलली, " आई, आणखी एक ग्रेट न्युज आहे.."
"याहून..?? "
" हो गं... पण.. "
" पण काय..? " आई जराशी मागे सरली.
" तू बस ना इथे.. " आईच्या हाताला धरून अश्रवीने तिला कॉटवर बसवलं. स्वतः आईच्या पायाशी बसली," मागे एका स्कॉलरशिप साठी मी आॅनलाईन टेस्ट दिली होती ना... आठवतंय का तुला? "
" हो.. अगं ती पत्रकारितेच्या कोर्सची एंट्रन्स की काय.. "
" हं तीच... तिचाही रिझल्ट आलाय आज.. "
" हो का? झालीस का पास मग? "
" हो.. आणि माझं फ्री सीट मध्ये सिलेक्शन ही झालंय... " बातमी आनंदाची होती तरी अश्रवीचा सूर नाराजीचा होता.
" वाह.. अगं मग एवढ्या उदास चेहऱ्याने काय सांगतेस?? किती आनंदाची बातमी आहे ही... तुझं तर स्वप्नच होतं ना.. " लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आई बोलली. लेकीचा चेहरा मात्र अजूनच उदासला.
" लंडनला जावं लागणार आहे आई... "
" वाॅव.. दॅट्स ग्रेट.. माझी पोरगी फॉरेनर होणार.. "
" जोक वाटतोय का आई तुला हा? " आता अश्रवी जरा चिडलीच," अगं दोन वर्ष राहावं लागणार आहे तिकडे... "
" हो मग प्रॉब्लेम काय आहे? सगळा खर्च तर युनिव्हर्सिटीच करणार आहे ना...! "
" आई तू... तुला खरंच कळत नाहीये का माझ्या मनात काय चाललंय ते... " अश्रवीचा स्वर आता केविलवाणा अन् रडवेला झाला होता," मला दोन वर्षे राहावं लागणार आहे तिथे.. तुझ्याशिवाय.. आजवरच्या आयुष्यात एक दिवसही मी तुझ्यापासून दूर राहिलेली नाहीये आई.. तोंडावर तुझा पदर पांघरल्याशिवाय झोप येत नाही गं मला... " तिच्या डोळ्यांत दाटलेले सगळे भाव गालांवर ओघळू लागले.
" कळतंय गं बेटा.. सगळं कळतं मला. " आईने तिच्या गालावरून हात फिरवला," माझ्या जगण्याचा आधार आहेस तू.. तुझ्या भावना मला नाही कळायच्या तर कोणाला? तू आहेस म्हणून मी जिवंत आहे. तुझ्यामुळे, तुझ्यासाठी.. तुझ्याशिवाय माझ्याही जगण्याला कुठे अर्थ आहे रे पिल्ल्या... तू आसपास नसलीस की जीव गुदमरतो माझा... तू नजरेपुढे असलीस की दिवसभरासाठीची स्पंदने काळजात साठवून ठेवते मी.. अन् तू जर नसशील जवळ तर... "
" मी नाही जाणार आई " अश्रवीने आईच्या पायांना मिठीच मारली," तुला सोडून मी कुठेही जाणार नाही...! " ती असं म्हणाली. अन् आई शांत बसली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तीन चार मिनिटे कुणीच काही बोललं नाही. अश्रवी आईच्या पायांशी घट्ट बिलगलेली होती. अन् आईची नजर भिंतीवरच्या फोटोंमध्ये कुठेतरी घुटमळलेली. आणखी एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर आई बोलली," तरीही मला असं वाटतं की तू जावंस...! "
" आई..? " आश्चर्याने भारावलेल्या नजरेने अश्रवीने आईकडे बघितले.
" हो.. तू तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी पुढे जावंस, तुझं स्वप्न पूर्ण करावंस अशी माझी इच्छा आहे.. " आई शांतपणे बोलली.
" अगं पण तू कशी राहशील एकटी...? "
तिच्या या प्रश्नावर आई नुसतीच हसली. कदाचित लेकीलाही आईच्या या हसण्याचा अर्थ कळला असावा.
" मी कशी राहू गं तुझ्याशिवाय एकटी... "
" एकटी कुठे? मी.. माझ्या आशा आकांक्षा आणि तुझं स्वप्न असणार आहेच की तुझ्यासोबत.. " आईने समजावलं.
"तरीही.."
" हे बघ बाळा.. मी तुला आग्रह करणार नाही. तुला काय ठरवायचं तो सर्वस्वी तुझा प्रश्न आहे.. माझं मत विचारणार असशील तर तू जावंस अशीच माझी इच्छा आहे.. बाकी तुझं अन् माझं आयुष्य तुला दिशा दाखवायला समर्थ आहे.. " आईने लेकीच्या खांद्यावर हात ठेवला. कॉटवरून उठली. स्वयंपाकघरात जाताना विचारलं," चहा टाकतेय.. अर्धा कप घेशील! "
अश्रवी काहीही बोलली नाही. आईने निर्णय तिच्यावर सोपवला होता. एक खूप कठीण निर्णय. आयुष्याला निर्णायक वळण देऊ शकेल असा.
पण आईला सोडून जाण्यासाठी तिच्या मनाची तयारी काही केल्या होत नव्हती. तो संपूर्ण दिवस आणि अख्खी रात्र 'काय करावं' या एकाच विचारात सरली. दुसर्‍या दिवशी सकाळी आई झोपेतून उठल्याबरोबर अश्रवी पहिलं वाक्य बोलली, " आई मी जातेय..!"
अश्रवीच्या परदेशी शिक्षणासाठी जाण्याची तयारी सुरू झाली . शिक्षणाचा सगळा खर्च विद्यापीठाकडून केला जाणार असला तरी पासपोर्ट - प्रवास आणि इतर चिल्लर चाल्लर बाबी विजयाताईंनाच मॅनेज कराव्या लागणार होत्या. तशी त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. राहायला स्वतःचं दोन खोल्यांचं छोटंसं घर होतं. उदरनिर्वाहासाठीचं साधन म्हणून मार्केटमध्ये एक पुस्तकांचं दुकान होतं. दुकानाची जागा मात्र भाड्याची होती. मोबाईल टीव्हीच्या जमान्यात पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या तशी खूपच कमी. तरीही बऱ्याच वर्षांपासून विजयाताई याच व्यवसायात असल्यामुळे दुकान बरं चालायचं. बरं म्हणजे खाऊन पिऊन टामटूम राहता येईल इतकी कमाई व्हायची. त्यात आता मुलीच्या परदेश वाढीसाठी अतिरिक्त खर्च म्हणजे त्यांच्या बांधेसुद कारभाराला धक्काच होता. पण त्या डगमगल्या नाहीत. घराची कागदपत्रे बँकेकडे गहाण ठेवून चार लाख रुपये कर्ज घेतलं. त्यावर अश्रवीच्या जाण्याच्या खर्चाची तडजोड झाली.
जाताना लेकीसोबत लाडू, करंज्या, चकल्या असं खूप काही काही भरून दिलं. ती हे ओझं नको नको म्हणत होती. पण आई ऐकत असते थोडीच? सगळी तयारी झाली. निघण्याचा दिवस उजाडला. सकाळीच दोघीजणी त्यांच्या शहरातून मोठ्या शहरात जायला निघाल्या. तिथे पोचल्यावर थेट एअरपोर्टला. पुढचा प्रवास विमानाचा. अश्रवी विमानात बसली. विमान आकाशात झेपावलं अन् पापण्यांच्या भिंतीआड आईने दडपून ठेवलेल्या आसवांचा बांध फुटला. त्या क्षणापासून सतत दोन दिवस आईच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं. मुलगी समोर असताना दगडासारखी घट्ट उभी असणारी माय लेक दृष्टीआड होताच अगदी वितळून वितळून गेली होती. जणू तिने स्वतःच्याच काळजाचा लचका तोडून कुठेतरी दूर भिरकावला होता. अगदी निष्ठूरपणे. पण आता ती वेदना, ती कळ त्या आईला सोसवत नव्हती. पण इलाजही नव्हता.. ओल्या डोळ्यांनी अन् शिवलेल्या ओठांनी ती सारा दुरावा सहन करत राहिली. काळजावर दगड ठेवून.


© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®