Ladies Only - 8 books and stories free download online pdf in Marathi

लेडीज ओन्ली - 8

|| लेडीज ओन्ली ||

(भाग - 8)


संध्याकाळची जेवणं आटोपली. जेवणानंतर शतपावली करायची म्हणून अश्रवी, जेनी अन् विजयाताई घरापुढच्या मोकळ्या रस्त्यावर फेऱ्या घालू लागल्या.
"आज शतपावली नाही तर सहस्त्र पावली घालावी लागणार बहुधा... " अश्रवी हसत बोलली.
" येस्स.. इतकं मनसोक्त आणि चविष्ट जेवण.. आफ्टर अ लाँग लाँग टाईम... मला तर पायच उचलता येत नाहीयेत.. " जेनीनंही अगदी पोट फुगेपर्यंत खाल्लं होतं," थँक्यू आई... फॉर ग्रेट टेस्टी फूड... "
" अगं थँक्यू काय... आमच्याकडे नाही चालत बरं हे थँक्स बिक्स... " विजयाताई बोलल्या.
" येस जेनी... एखादे दिवशी जेवू घालणाऱ्याला 'अन्नदाता सुखी भवः' म्हणतील... पण रोज जेवण बनवणाऱ्या आईचे आभार मानण्याची पद्धत नाही बरं आमच्या देशात... " अश्रवीने टोला लगावला.
" कारण त्यातून मायलेकरांत दुरावा होतो... उगाच देशाला टोमणे बिमणे मारू नकोस.. " विजयाताईंना तिचं बोलणं पटलं नाही.
" टोमणा वगैरे नाही गं हा... " अश्रवी बोलली," अनादीकालापासून मातेनं कुरबूर न करता लेकरांचं, कुटूंबाचं पालनपोषण केलं पाहिजे, ते तिचं कर्तव्यच असतं... असेच विचार बिंबवण्यात आलेत आमच्या मनावर. त्यामुळे मायीने आमच्यासाठी काहीही केलं तरी आम्हाला त्याची किंमतच वाटत नाही. ती करते ते 'तिचं कामच असतं' असं म्हणून तिच्या कामाची अवहेलनाच करत आलोय आम्ही. अन् माय बिचारी कसलीही अपेक्षा न ठेवता राबत राहते... तिला ना कधी कुणी तिच्या कामात मदत करतो ना कधी तिचे आभार मानतो. उलट स्वैपाकातल्या तेलामिठाच्या किरकोळ कमी अधिक पणावरून शिव्याच ऐकून घ्याव्या लागतात तिला... "
" हं... आहे काही ठिकाणी अशी परिस्थिती... पण मातृत्वाचं दायित्व म्हणून सहन करत राहते ती सगळं... " विजयाताईंनीही मान्य केलं.
" कित्ती छान डिस्कशन करता तुम्ही दोघी.. " जेनीला त्यांचं बोलणं ऐकून त्या दोघींचेही कौतुक वाटत होतं.
" अगं ही तर आमच्या घराची स्पेशालिटी आहे. " अश्रवी तिला उत्साहाने सांगू लागली," विषय कोणताही असो... आमच्या दोघींत साधकबाधक चर्चा होणार... नुसता वादविवाद... ऐकणाऱ्याला वाटेल या भांडताहेत की काय... या चर्चेतून कधी काही निष्कर्ष निघो की न निघो... पण प्रत्येक मुद्द्याचा सर्व बाजूंनी विचार करण्याची सवय लागत गेली. त्यातून योग्य तो निर्णय घ्यायचा अन् त्या निर्णयावर ठाम राहण्याचा संस्कारही रुजत गेला... अँड इट्स आॅल बिकॉज आॅफ माय डिअर मदर.. " चालता चालताच अश्रवी आईच्या गळ्यात पडली.
" बरं बरं... बस झालं लाडात येणं... चला आता घरी... " विजयाताईंनी लेकीच्या गालावर हात ठेवला. तिघीही घरात आल्या.
रात्र झाली होती. सर्वत्र अंधार पसरला होता. विजयाताईंनी झोपण्यासाठीची अंथरूणं टाकली. विजयाताई, अश्रवी, जेनी
त्यावर बसल्या. अश्रवी तर लगेच आईच्या मांडीवर डोकं ठेवून आडवी झाली.
" किती दिवस झाले ना आई... तुझ्या कुशीत येऊन.. "
" हं... " त्या अश्रवीच्या केसांतून हात फिरवू लागल्या," दोन वर्षे झाली... पण बघ ना.. असं वाटतंय की तू कालच गेली होतीस कुठेतरी गावाला. अन् आज परत आलीयस तुझ्या अंगणात... "
" आज तसं वाटतंय गं... पण तिथला एक एक क्षण मला युगांसारखा वाटत होता... जेनीसारखी मैत्रीण भेटली नसती तर कदाचित मी नैराश्याच्या गर्तेत स्वतःला कुठेतरी गमावून बसले असते... "
" खरंय.. तुझ्यापासून दुराव्याचा एकेक क्षण मलाही अगदी खायला उठायचा... "
" किथी जीव लावथा थुमी एकमेकींना.. " त्या मायलेकीतलं प्रेम बघून जेनीचे डोळे भरून आले," मला हे प्रेम कधी मिलालंच नाय.. मीच कशाला.. माझ्यासारखे कितीथरी मुलं अनाथांचं जीवन जगथात थिकडे... " जेनीने आपली व्यथा व्यक्त केली.
" का? तुझे आईबाबा...? " विजयाताईंच्या या प्रश्नावर जेनी मौन झाली. तिचे डोळे वाहू लागले. मांडीवरच्या उशीत चेहरा झाकून वेदना दडपण्याचा प्रयत्न ती करू लागली.
" ती आईबाबांसोबत राहत नाही आई... " अश्रवी सांगू लागली," जेनीच्या आईबाबांचा डिवोर्स झालाय. तिच्या बाबांनी तिच्या आईला सोडलं. दुसरं लग्न केलं. ती आईकडे राहू लागली. नंतर आईनेही दुसरं लग्न केलं. जेनीला ना हक्काचं घर उरलं ना आईबाबा! ती होस्टेलला राहू लागली. तिचे आईबाबा तिला भेटायला येत नसत पण पैसे मात्र दोघेही वेळच्या वेळी पाठवत. दोघांचेही स्वतंत्र संसार झाले. दोघांनाही आपापली मुलं झाली. जेनी कुणाचीच राहिली नाही. आईबाप असूनही अनाथ..! जबाबदारी म्हणून ते दोघे आजही हवे तितके पैसे जेनीला पाठवत राहतात.. पण कर्तव्य म्हणून दोन प्रेमाचे क्षण देऊ शकत नाहीत. जेनीचा त्यांच्या पैशांवरचा अधिकार तिथल्या कोर्टाला मान्य असतो... त्यांच्या प्रेमावरचा मात्र नाही.! प्रेमाचा ओलावा न मिळालेली रोपटी कोमेजून जातात. जेनीचंही तेच झालं. तिला नको असलेल्या शेकडो गोष्टी तिला मिळत गेल्या... हवी असलेली एक प्रेमाची हाक मात्र मिळाली नाही... "
" इट्स ट्रू... कदाचित अश्रू सारखी फ्रेंड माझ्या लाईफमध्ये आली नसथी तर... थर मी कधीच ड्रग्स अल्कोहोल एडिक्ट झाले असथे... अश्रूने मला जगवलं..तिच्या प्रेमाने मी पुन्हा जिवंत झाले... लाईफ किती सुंदर आहे ते अश्रूने मला दाखवून दिलं... " जेनीने तिच्या आयुष्यात अश्रवी अन् तिची मैत्री किती महत्वाची आहे ते सांगितलं.
" भारतीय संस्कृती संस्कार जगभरात का वंदनीय ठरतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे, " विजयाताई म्हणाल्या," आपल्या वासना लालसांच्या पूर्ततेसाठी पोटच्या पोरीला वाऱ्यावर सोडणारे मायबाप ही विकृत पाश्चात्य संस्कृतीचीच देणगी...! "
" आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी पोटच्या पोरीला वाऱ्यावर सोडणारे मायबाप... ही कोणत्या संस्कृतीची देणगी असते आई? " अश्रवीचा हा प्रश्न एखाद्या विषारी खंजीरासारखा विजयाताईंच्या काळजात आरपार घुसला. त्या प्रश्नाने रक्तबंबाळ आठवणींच्या चिळकांड्या उडवल्या. त्या प्रश्नावर विजयाताई गप्प झाल्या. तो प्रश्न आईला खोलवर रूतलाय हे अश्रवीच्याही लक्षात आलं. तीही गप्प झाली. पण त्या दोघींच्या मौनाचा अर्थ जेनीला कळत नव्हता..
"आई.. एक विचारू? म्हणजे थुमाला राग येणार नसेल तर... याबाबथीत मी अश्रूशी खुपदा बोलले.. पण थिने काहीच सांगिथले नाही कधीच... " ती बोलली.
" हं... " विजयाताईंनी इतकीच प्रतिक्रिया दिली." आय सॉ दॅट... देअर इज नो सिंगल फोटो आॅफ एनी मॅन आॅन दी वॉल... व्हाय? सगळे लेडीजचे फोटो... एकही जेन्टसचा नाही.. अश्रूच्या फादरचा तरी? का नाही? कुठे असतात ते...? " जेनीच्या प्रश्नानंतर वातावरण जास्तच गंभीर झालं. अश्रवी आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली. सदा हसतमुख असणारा तिच्या आईचा चेहरा आठवणींनी जणू काळवंडून गेला होता. विजयाताई कुठेतरी दूर बघत होत्या. कदाचित त्यांच्या भूतकाळात..! " कुणाचा फोटो लावायचा? अश्रवीचे वडील कोण हे मलाच माहीत नाही... मग मी कुणाचं नाव लावायचं तिच्या नावापुढे? वडील म्हणून कोणाचा चेहरा दाखवायचा तिला?"
"म्हणजे..? "
" सांगते... आज सगळ्या जखमांवरच्या खपल्या उकरून काढते... सगळ्या व्रणांची पुस्तकं उलगडते....."
" आई राहू दे... बोलू नकोस तू.... त्रास करून घेऊ नकोस... " अश्रवी म्हणाली.
" त्रास? त्रास वगैरे होत नाही गं आता... काळजाच्या जखमा सगळ्या जशाच्या तशा आहेत. पण त्यातली आग - जळजळ पार विझून गेलीय.. खूप मोठा वणवा पेटला होता तेव्हा... देहात - मनात.. मन अगदी खाक झालं होतं जळून.. त्या ज्वलनातूनच ऊर्जा घेतली मी जगण्यासाठी. लढण्यासाठी. वेदना कधी दुर्बल बनवते माणसाला तर कधी बलवान... मी वेदनेकडूनच घेतली शक्ती... जगण्याची..!
खूप छान कुटुंब होतं माझं. आई- वडील, आजी - आजोबा, भाऊ - बहीण... सगळ्या नात्यांनी गजबजलेलं अन् सजलेलं एक घर होतं. त्या छोट्याशा गावात. गाव खूप मोठं नव्हतं म्हणून शहर म्हणता येत नाही. खूप छोटं नव्हतं म्हणून खेडंही म्हणता येत नाही. खेड्याइतकं मागासलेपण नव्हतं अन् शहराइतकं पुढारलेपणही नव्हतं. आम्ही सारे अतिशय आनंदात तिथे राहायचो. आजोबा शेती बघायचे. बाबा शाळेत शिपाई म्हणून नोकरीला होते. आई - आजी घरी असायच्या अन् आम्ही भावंडं शाळेत शिकायला. मी बहीण- भावंडांत सर्वात मोठी. माझ्या पाठची आणखी एक बहीण अन् भाऊ सगळ्यात धाकला. खाऊन पिऊन टामटूम असणारं असं आमचं एक सुखी कुटुंब होतं.
मी बारावीत होते. बहीण दहावीला, भाऊ आठवीला. बाबा ज्या शाळेत शिपाई होते तिथेच आम्ही शिकलो. पण ती शाळा दहावीपर्यंतच होती. पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजात प्रवेश घ्यावा लागायचा. आमच्या गावच्या शिवारातच पण गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील उंच टेकडीवर कॉलेज होतं. मी तिथेच शिकायला होते. माझ्यासोबत गावातील बहूतेक सर्वच मुलं मुली याच कॉलेजात शिकायला होते. आमच्याच नाही तर आजूबाजूच्या दहा बारा गावांमधून विद्यार्थी इथं शिकायला यायचे. काहीजण मोटारसायकलवर. काहीजण सायकलवर. अनेकजण पायी. माझी खूप इच्छा होती सायकलवरून कॉलेजात यायची. पण आमच्याकडे एकच सायकल होती. ती भाऊ वापरायचा. आणखी एक सायकल विकत घेणे बाबांना झेपत नव्हते. मग मीही हट्ट सोडला. पायीच कॉलेजात येऊ लागले. मैत्रीणी सोबत असायच्याच.
यंदा बारावीचं वर्ष. मी खूप अभ्यास करायचे. मला डी एड ला नंबर लावायचा होता. शिक्षिका व्हायचं होतं. शिक्षकी पेशाचं खूप आप्रुप वाटायचं. स्वच्छ, चारित्र्यसंपन्न आणि संवेदनशील व्यवसाय. अक्षरओळखही नसणाऱ्या लेकरांना लिहायला वाचायला शिकवून ज्ञानी बनवण्याइतकं पवित्र पावन कार्य दुसरं कोणतं? मी अभ्यास करायला बसायचे अन् वाचता वाचताच मला मी शिक्षिका झाल्याचा भास व्हायचा. मग मी आणखीच जोमाने अभ्यासाला लागायचे. अभ्यासात तशी बरी होते. वाचलेलं लक्षात राहायचं. आजूबाजूचे शेजारी पाजारी म्हणायचे ही मुलगी नक्की डॉक्टर इंजिनिअर होणार. पण माझं ध्येय छोटंच पण माझ्या आवडीचं अन् निवडीचं होतं. मला शिक्षिकाच व्हायचं होतं. अन् त्यासाठी आईबाबांचा पाठिंबाही होता. बाबांचा तर माझ्यावर खूप जीव. मी रात्री अभ्यास करत असले की तेही माझ्यासोबत जागायचे. ज्ञानेश्वरी वाचत बसायचे. जोपर्यंत मी झोपत नसे तोपर्यंत तेही जागेच राहायचे. मध्ये मध्ये मला पाणी देऊ का, चहा करून देऊ का असंही विचारायचे. बाबांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. ते ज्याला त्याला म्हणायचे, ' माझी विजू घराण्याचं नाव उजळवणार..!' मीही त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीच वागत नव्हते. बाबांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण असायचा.
हिवाळ्याचे दिवस होते. कॉलेजची वेळ दहा ते चार अशी होती. परिक्षा जवळ आली म्हणून काही शिक्षक काही विषयांचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचे. चार पासून साडेपाच - सहा पर्यंत. त्यानंतर आम्हाला सुट्टी व्हायची. चालत घरी पोचायला अर्धा पाऊण तास लागायचा. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आतातर घरी पोचेपर्यंत चांगलाच अंधार पडायचा.
त्या दिवशीचा क्लास सहापर्यंत चालला. त्यानंतर सुट्टी झाली. दिवस मावळला होता. आमचा दहा बारा मुलींचा ग्रुप असल्यामुळे अंधार पडला तरी घरी येण्याची भीती वगैरे वाटत नव्हती. सगळ्याजणी सोबत सोबत जायचो अन् एकमेकींच्या सोबतीनेच परत यायचो. त्या दिवशीही सगळ्या जणी सोबतच होतो. अर्धं अंतर कापलं असेल. रस्ता रहदारीचा होता. एकामागोमाग एक वाहनं येत जात असायची. आणि अचानक रस्त्याच्या कडेला सिगारेटी फुंकत उभी असलेली काही मुलं आम्हाला बघून शिट्ट्या वाजवायला लागली. सिनेमातली गाणी म्हणायला लागली. आमच्यासाठी हे नवीन नव्हतं. कोणत्याच तरूण मुलीसाठी ही छेडछाड नवीन नसते. आम्ही हातातली पुस्तक छातीशी घट्ट कवटाळली. चालण्याचा वेग वाढवला. झपाझप पावलं टाकू लागलो.
तोच अचानक तीन चार मुलं आमच्यासमोर येऊन उभी राहिली. वाट आडवू लागली. आम्ही त्यांना टाळून रस्त्याला वळसा घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ती पुन्हा पुन्हा पुढे येऊ लागले. सिगारेटचा धूर आमच्या तोंडावर उडवू लागले. ते दारूही पिलेले होते. त्यांची घाणेरडा वास सोडणारी तोंडं ते आमच्या चेहऱ्याजवळ आणू लागले. आम्हा मुलींना किळस येऊ लागली. आम्ही आमच्या ओढण्या नाकातोंडाला बांधल्या. यावर ती टूकार पोरं आणखीच बिथरली. आमच्या आणखी जवळ येऊन वाट अडविण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडू लागलो. पण ते आम्हाला कुठूनच निसटू देत नव्हते. शेवटी आम्ही चिडलो. जागेवरच थांबलो.
"वाट सोडा आमची... " आमच्यापैकी एक मुलगी ओरडली.
" नाय सोडणार " त्यांच्यापैकी एकजण गुरकला.
" तुम्हाला आयाबहिणी नाहीत का? " दुसरी एक मुलगी.
" आयाभयणी हायेत... बायका न्हाईत... व्हतीस का येक दिसाची बायकू? " आणि ते राक्षस आक्राळविक्राळ हसू लागले. आम्ही आता चांगल्याच घाबरून गेलो होतो. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवाल्यांना आवाज देऊ लागलो. पण कुणीही थांबत नव्हतं. ते राक्षस मग आणखीच चवताळायला लागले. आणि त्यातल्या एकाने माझ्या बाजूला उभ्या असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या ओढणीत हात घातला. ती किंचाळली. मला प्रचंड राग आला.कानशीलं तापली. मी नखशिखांत थरथरू लागले. आणि नकळतच पुढे होवून मी त्या मुलाच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली. ते बघताच सगळी मुलं माझ्या अंगावर धावून आली. मी त्यांना ढकलू लागले, मारू लागले. ते सगळे जण मिळून मला पकडण्याचा प्रयत्न करू लागले पण मी जोरजोरात हातपाय झाडत होते. कुणाच्याही हाती लागत नव्हते. आमची ही झटापट चालू असताना माझ्या सोबतच्या मैत्रिणींना तिथून निसटण्याची संधी मिळाली. सगळ्या जणी धावत सुटल्या, वाट मिळेल त्या दिशेने! आता ती हिंस्र श्वापदं आणखीच चवताळली. माझ्यामुळे शिकार त्यांच्या हातातून निसटली होती. ते सगळे जण माझ्याकडे रागाने बघू लागले. त्यांच्या डोळ्यांत वासनेचा धगधगता अंगार होता. मी पुरती घाबरून गेली होते. त्या सगळ्यांनी मला घेरलं होतं. सहा लांडग्यांच्या तावडीत एक शेळी सापडली होती. ते आता माझ्यावर हल्ला करणार याचा मला अंदाज आला होता. मी हात जोडले. रडू लागले. ओरडू लागले. गयावया करू लागले. येणार्‍या जाणाऱ्यांना 'वाचवा मला वाचवा' असा आवाज देण्याचा प्रयत्न करू लागले. पण कुणापर्यंतच माझा आवाज पोचत नव्हता. कुणालाही माझी दया येत नव्हती. त्यांच्यापैकी एकाने माझे दोन्ही हात धरून पिळले. दुसऱ्याने माझ्याच ओढणीने माझे तोंड गच्च बांधले. आता माझा आवाजही निघू शकत नव्हता. श्वास कोंडायला लागला होता. आणखी दोघांनी माझे हात पाय धरून मला उचलले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या दाट झाडीत नेले. आसपास कुणीही नव्हते. अंधार आणि झाडीमुळे मी कुणालाही दिसू शकत नव्हते. बांधलेल्या तोंडामुळे माझा आवाजही बाहेर पडत नव्हता. आणि...
आणि त्यांनी माझ्या अंगावरचे कपडे फाडायला सुरूवात केली. सहा बाजूंनी सहा लांडगे माझ्या देहाला ओरबाडत होते. कुणी गालांना. कुणी ओठांना. कुणी छातीला. कुणी पोटाला. कुणी दंडांना. कुणी मांड्यांना. कुणी...... मी विव्हळत होते. कण्हत होते. अन् ते त्यांच्या क्रूर पंज्यांनी माझ्या शरीराशी खेळत होते . त्यांच्या तीक्ष्ण नखांनी मला ओरबाडून काढलं होतं. त्यांच्या दातांनी मला जागोजागी तोडलं होतं. माझ्या अंगावर एकही कपडा राहिला नव्हता. मी विवस्त्र झाले होते. आणि त्यांच्यापैकी एकजण उठला. त्याने इतरांना काहीतरी खुणावले. दोघांनी माझे दोन्ही हात धरले. एकाने डोकं दाबून ठेवलं. दोघांनी पाय फाकवले आणि......!!
एका पाठोपाठ एक... त्या सहा नराधमांनी माझ्यावर बलात्कार केला..!! माझ्या आरोळ्या, माझ्या किंकाळ्या आतल्या आत गुदमरून गेल्या. त्या असह्य वेदना माझा जीव घेत राहिल्या. अन् तरीही मी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी डोळे वाहत राहिले..! पण मी जिवंत आहे की मेलेय हे माझं मलाच कळत नव्हतं. शरीराच्या सगळ्या जाणिवा, सगळ्या संवेदना मरून गेल्या होत्या. शुद्धीवर आले तेव्हा मी दवाखान्यात होते..डॉक्टरांनी सांगितल्यानुसार एक महिन्यापासून कोमात होते. सलाईन लावलेलं होतं... ओठांवर गालांवर वीस बावीस स्टिचेस दिलेले होते. छातीवरच्या ओरबाडल्याच्या जखमा अजून भरलेल्या नव्हत्या. तलवारीचे वार केल्यानंतर जशा जखमा होतात तसे त्यांच्या नखांनी मला जागोजागी चिरले ओरबाडले होते. दोन्ही पायांच्या मध्येही पंधरा टाके....! वहीच्या पानांना चुरगाळून त्याचे बारीक बारीक तुकडे केल्यासारखं माझं शरीर मला भासत होतं...! मी शुद्धीवर आले होते... तरीही जणू निष्प्राण..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -
©शिरीष पद्माकर देशमुख ®

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

©शिरीष पद्माकर देशमुख ®

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED