लेडीज ओन्ली - 10 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 10

|| लेडीज ओन्ली ||

{ भाग - १० }


अन् आयुष्यानं मला या शहरात आणून सोडलं.
विजयाताईंच्या जीवनाची कहाणी ऐकून जेनीचे डोळे चिंब भिजले होते. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते तरीही गहिवरल्या शब्दात तिने विचारले.. "आणि मग पुढे..?"
' पुढे काय..! रोज एक नवा वणवा सज्ज असायचा पेटवून द्यायला. आपणही पेटून घ्यायचं त्याच्याबरोबरीनं. होऊ द्यायची राख सर्वस्वाची. अन् पुन्हा झेपावायचं राखेतून आकाशाच्या दिशेने फिनिक्सागत..! सुरूवातीच्या काळात भीक मागितली. शहराची घाण काढली. लोकांची भांडी घासली. आयुष्य फरफटत नेत होतं. पण मीही थांबले नाही. ते नेईल तिकडे जात राहिली. आयुष्य दाखवील ते दुःखाचे दशावतार पाहत राहिले. खूपदा वाटायचं या नरकयातना सहन करण्यापेक्षा संपवावं स्वतःला. करावा शेवट सगळ्या दुःखांचा, सगळ्या वेदनांचा ; पण पोटातला तो जीव मला जगवत राहिला. तो निष्पाप अंकूर माझ्या जगण्याचं कारण बनला होता.
मी एका झोपडपट्टीत आश्रय घेतला होता. आजूबाजूला मोलमजुरी करणाऱ्या नवऱ्यानं सोडून दिलेल्या बाया , वेश्याव्यवसाय करणाऱ्या बाया राहायच्या. त्यांना माझ्या पोटूशी असण्यात काही पाप वाटत नव्हतं. त्यांच्यासाठी 'जगणे ' हा एकच सर्वात मोठा प्रश्न होता. जिवंत राहून आजचा दिवस काढणे हे त्यांच्यासाठी खूप मोठं यश असायचं. आपल्या जिवंतपणाचे असे विजयोत्सव ते दररोज साजरे करायचे. तिथे खायला अन्न नव्हतं. प्यायला पाणी नव्हतं. यातली एकेक गोष्ट मिळवणं हेच तिथल्या जगण्याचं ध्येय असायचं. त्यामुळे प्रतिष्ठा जपणे, तिचा अभिमान बाळगणे, पैशांची लालसा ठेवणे या गोष्टींसाठी वेळच नसायचा. मी तिथे जगत होते. आई म्हणाली होती, जिवंत राहा... मी अजून तरी जिवंत होते..!
आणि तो दिवस उगवला. माझ्या पोटात असह्य कळा निघू लागल्या. मी विव्हळू लागले. आजूबाजूच्या चार दोन म्हाताऱ्या बायका माझा आवाज ऐकून माझ्या जवळ आल्या. त्यांनी त्या मोडक्या खोपटीचा तुटलेला दरवाजा बंद केला. अन्.. अन्..
मी एका बाळाला जन्म दिला. इवलंसं, गोंडस बाळ. एका म्हातारीने त्याला माझ्यासमोर ठेवलं अन् झाडांच्या पानांवर साचलेली धूळ पहिला पाऊस बरसताच धुवून जावी तशा माझ्या मनावर साचलेले वेदनांचे थर त्या लेकराला बघताच धुवून निघाले. ती माझी मुलगी होती. माझी अश्रवी. माझं पिल्लू. मी तिला छातीशी लावलं अन् आजूबाजूला पेटलेले सगळे वणवे जणू क्षणात विझून गेले. तिच्या इवल्या ओठात मी काळीज रिचवू लागले. आजवरच्या सगळ्या जखमांचे भार जणू क्षणात हलके झाले. या एका क्षणासाठी आयुष्याने मांडलेला सगळा छळ मी सहन करीत राहिले होते काय? ठाऊक नाही.. पण एवढं मात्र नक्की होतं की या एका क्षणाच्या बळावर मी येणाऱ्या पुढच्या कित्येक वादळांना मोठ्या सामर्थ्याने तोंड द्यायला सज्ज झाले होते. ते वीतभर बाळ हातात घेतलं तेव्हा असं वाटलं की माझे पाय जरी जीवनाच्या नरकात रूतलेले असले तरी स्वर्ग मात्र माझ्या हातावर आहे..!!
तिसऱ्या दिवशी अश्रवीला ओढणीच्या झोळीत पोटाशी बांधून मी कामासाठी घराबाहेर पडले. आता प्रश्न माझ्या एकटीच्या उदरनिर्वाहाचा नव्हता. माझ्या लेकीच्या भविष्याचाही होता. मी स्वतःला कामात झोकून द्यायचे. सोबतीला माझं बाळ होतंच. ती रडायची तेव्हा हातातलं काम कितीही महत्वाचं असो मी ते तसंच सोडून द्यायचे. अश्रवीला जवळ घ्यायचे. छातीशी लावायचे. काम बुडतं म्हणून मालकीणबाई रागवायच्या ओरडायच्या.. पण मी त्यांना जुमानत नसे. मी माझ्या साठी अन् लेकरासाठी दिलेल्या वेळेच्या बदल्यात दोन कामं शिल्लक करायचे.
अश्रवी मोठी होत गेली. शाळेत जाऊ लागली. मला अजून आठवतं. ती दुसरीत असताना काही मुली तिला चिडवत होत्या.. 'अश्रवीची आई धुणी भांडी करते' असं काहीतरी. माझं इवलंस लेकरू रडत बसलं. मी तिला समजावलं, 'काम हे काम असतं. ते छोटं किंवा मोठं नसतं.' तिनेही ते समजून घेतलं. पण माझ्या लक्षात आलं, आपली आई करत असलेलं काम तिच्या आयुष्यावर परिणाम करू शकतं. मग मी ठरवलं. व्यवसाय बदलायचा. माझ्या गरजा कमी होत्या. अन् मी काम खूप जास्त करायचे. त्यामुळे पैसा जमा होत गेला. त्यातूनच पेपरची एजन्सी चालवायला घेतली. रस्त्यावर बसून पेपर विकू लागले. हळूहळू पुस्तकंही विक्रीसाठी ठेवू लागले. बऱ्यापैकी विक्री होऊ लागली. त्यातूनच पुस्तकांचं दुकान उभं राहिलं. आज आमच्याजवळ जे काही आहे ते या सगळ्या प्रवासातूनच मिळवलेलं आहे. '
विजयाताईंनी बोलणं थांबवलं. जेनी आणि अश्रवी स्तब्ध होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होत्या. त्यांच्या संघर्षाची रोमहर्षक कथा ऐकून जेनी तर अक्षरशः भारावून गेली होती. हाताशी शून्यही नसताना या बाईनं विश्व निर्माण केलं होतं. जेनीच्या काहीतरी लक्षात आलं. अन् तिने अचानक विजयाताईंच्या पायांवर डोकं ठेवलं.
"अगं अगं... काय करतीयेस हे... " विजयाताईंना तिची कृती बघून हसायला आलं. " यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही.. त्यासाठी सॉरी फील करतेय..." जेनी म्हणाली, " किती डिफरन्स आहे बघा ना... आपल्या मुलीला वाऱ्यावर सोडून देऊन स्वतःचं सुखसमाधान शोधणारे माझे मॉम डॅड.. आणि.. जन्मालाही न आलेल्या बेबीसाठी लाईफ पणाला लावणाऱ्या तुम्ही... आय सॅल्युट यू.." जेनीने पुन्हा एकदा विजयाताईंच्या पायांवर डोकं ठेवलं.
" येस.. आहेच ग्रेट माझी माय.. " अश्रवीने आईला मीठी मारली," अगदी शीर कापून तिच्या पायांवर वाहिलं तरी तिच्या उपकारातून उतराई होता येणार नाही..! "
" उपकार कसले गं... काहीतरीच बोलतेस..एक बाई म्हणून आयुष्य जसं जगणं पुढे मांडीत राहिलं तसं जगत गेले... अन् एक आई म्हणून जसं वागायला पाहिजे होते तसे वागत गेले.. " विजयाताईंनी जणू आयुष्यानं दिलेलं सगळं विष प्राशन करून पचवलंही होतं. त्यांची ना जीवनाबद्दल काही तक्रार होती ना अन्य कुणाबद्दल काही नाराजी. त्या जणू स्थितप्रज्ञ झाल्या होत्या.
" अँड अश्रू यू... " जेनीचा पुढचा प्रश्न अश्रवीसाठी होता," तुला कधीच आपल्या फादरचा शोध घ्यावा नाही वाटला? "
" कशाला वाटेल? " क्षणाचाही विचार न करता अश्रवी उत्तरली," माझी माय, माझा बाप, माझा देव... सगळं काही आईच होती. तिने मला कधीच बापाची उणीव भासू दिली नाही. माझ्या स्कूल मस्टरवर वडिलांच्या नावाच्या रकान्यात आईचं नाव लिहिलेलं. यू नो.. आय वॉज इन सेवन्थ स्टँडर्ड. टीचरने पॅरेन्ट्स मिटींग बोलावली. सगळ्यांचे फादर आले होते. टीचरने माझ्या आईने विचारले, 'तुम्ही अश्रवीच्या कोण?'
'तुम्हाला कोण हवंय? 'आईने विचारले.
टीचर म्हणाले,' तिचे वडील. '
' मीच आहे तिचा बाप... बोला.. ' आईच्या या उत्तरानंतर टीचरचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. बरेचदा' आपल्याला वडील का नाहीत' असा प्रश्न पडायचा. पण लगेच दुसरा विचार मनात यायचा,' आपल्याला वडिलांची गरजच कुठे आहे. '
माझ्या जन्माला कारणीभूत ठरलेला तो पशू समोर यावा असं कधीच वाटलं नाही पण जरी कधी तो राक्षस समोर आला तर त्याचा मी मर्डर करणार आहे एवढं मात्र नक्की..!! " अश्रवीच्या मनात त्या नराधमांबद्दल राग ठासून भरलेला होता.
दुःखांचे डोंगर कोसळतात तेव्हा माणसाला धीरोदात्तपणे उभं राहावं लागतं हे खरंच. पण वाट अडवणाऱ्या या डोंगरांना तुडवून पुढं जाण्यासाठी मन असावं लागतं खूप सशक्त . जगण्याचे घाव कण्हत कुंथत पचवता येतातही पण त्या भळभळत्या जखमा घेऊन वाटचाल करत राहणं सोपं नसतं. त्यासाठी लागते हिंमत. फुगलेल्या दंडाच्या बळावर धाक दडप करणं शक्य असतं कुणालाही पण मरणपंथाला लागलेला देह साथीला घेऊन आयुष्याचा लढा जिंकायला लागते ती खरी ताकद. समाजाच्या यमुनेत स्वतःला झोकून देऊन आयुष्याच्या कालीयाला पायाखाली तुडवून समर्थपणे उभ्या राहिल्या होत्या विजयाताई. जेनी त्यांना पुन्हा पुन्हा सलाम करत होती.
" ए झोपा गं पोरींनो... मध्यरात्र उलटून गेलीय.." विजयाताई घड्याळाकडे बघून बोलल्या. खरं तर आजच्या रात्री झोप कुणालाच लागणार नव्हती. तरीही डोळे मिटून पडायचे होते, " मला उद्या सकाळी लवकरच जावं लागणार आहे..."
" कसलं दगदगीचं काम लावून घेतलंस गं आई? " अंगावर शॉल ओढत अश्रवीने विचारले.
" अगं हो.. तुला सांगायचं राहिलंच... मी राजकारणात उतरतेय... " त्यांनी सांगितलं.
" ओ माय गॉड, " अश्रवीचा विश्वासच बसत नव्हता," माझी आई आणि राजकारण? "
" का? मला जमणार नाही असं वाटतंय का? अगं मुक्त विद्यापीठातून बीए केलंय मी राज्यशास्त्र विषयात... " विजयाताई हसल्या.
" तसं नाही गं.. तुला जगातली सगळी कामं जमू शकतात. पण आपल्या व्यवस्थेतला भ्रष्टाचार, नीतिभ्रष्टता... राजकारणाचं ते गलिच्छ घाणेरडं स्वरूप.... तुला अॅडजस्ट करता येईल त्या वातावरणात? " अश्रवीने अगदी योग्य प्रश्न विचारला होता.
" हं... म्हणून तर जायचंय... राजकारणातली घाण झाडायला. तिथली साफसफाई करायला... बघूया काय काय जमतंय ते... " विजयाताई विचार करू लागल्या.
" जमेल गं... आणि आता आम्ही आहोत की तुझ्यासोबत... तुझ्या प्रचाराला... " अश्रवीच्या या वाक्यावर तिघीही खळखळून हसल्या. विजयाताईंनी दिवा विझवला. आज खूप वर्षांनी त्यांना मन खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. कधी झोप लागली त्यांची त्यांनाच कळली नाही.

© सर्वाधिकार सुरक्षित -
©शिरीष पद्माकर देशमुख ®

{ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®