लेडीज ओन्ली - 11 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 11

लेडीज ओन्ली - ११


( वाचकांसाठी माहितीस्तव -
आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)

© शिरीष पद्माकर देशमुख ®


" लेडीज ओन्ली "

|| अकरा ||

राजकारण म्हटलं की धावपळ आलीच. विजयाताईंच्या संथ आयुष्याला त्यांच्या राजकारण प्रवेशाने अचानकच वेग आला. रोजच्या ठरलेल्या कामांचा प्राधान्यक्रमच बदलून गेला. तरीही त्यांच्यासाठी दुकान सर्वाधिक महत्वाचं होतं. म्हणूनच तर सकाळी लवकर उठून राजकीय भेटीगाठी आटोपून आपण आपल्या दुकानात जाऊन बसायचं अशा नियोजनाची आखणी त्या करत होत्या. अन् त्याची सुरुवात आजपासूनच करायची होती. त्यांची वैयक्तिक कामं आवरली होती. राधाबाई येऊन आपल्या कामाला लागल्या होत्या. पोरीही उठल्या होत्या.
"आई आम्ही वॉकला जाऊन येतो गं.. " अश्रवी म्हणाली.
" मारनिंग कव्हाच टळून गेली अन् आता 'गो'ताय व्हय? " राधाबाई आतल्या घरातून ओरडल्या. त्यावर पोरी खळखळून हसल्या.
" बारा वाजेपर्यंत मारनिंग असतीया मावशीबाई.. " अश्रवी हसतच बोलली. अन् दोघीही घराबाहेर पडल्या.
" राधाबाई मलाही निघायचंय... तुम्हाला किती वेळ लागेल अजून... " विजयाताईंनी पर्स खांद्यावर अडकवत विचारले.
" ट्वेंटी मिंटं वन्ली.. " राधाबाई उत्तरल्या.
" ठीक आहे.. मग मी निघते... तुमचं आवरल्यावर कुलूप लावून चावी चौकटीवर ठेवून जा... "
" व्हय व्हय... "
विजयाताई घराबाहेर पडणार तोच शारदाबाई दारासमोर येऊन उभ्या ठाकल्या.
" आम्ही यावं का? " घरात पाऊल टाकत त्या बोलल्या.
" हे काय विचारणं झालं का... या ना.. तुमचंच घर आहे.. निवडणुकीच्या रणधुमाळीत इकडे कसे काय पाय वळले तुमचे? " विजयाताईंना घाई होती. तरीही आता थोडा वेळ द्यावाच लागणार होता.
" पायच ते.... सोयीची पायवाट दिसली की वळणारच... आणि आमचं हक्काचं घर तुम्ही आम्हाला राहू दिलं नाहीत... अन् तुमच्या घराला आमचं सांगून भुलवताय होय? " शारदाबाई हसल्या,"असो.. मला वाटतं तुम्ही घाईत आहात... तसा मीही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला शुभेच्छा देईन, कपभर चहा घेईन अन् जाईन.."
" शुभेच्छांसाठी खूप आभार... राधाबाई चहा करा कपभर... दोन कप करा.. एक तुमच्यासाठी..! " विजयाताईंनी आवाज देऊन सांगितले.
" वक्के वक्के... येवढे पॉटं वाशायचे झाले की टाकते च्या... तवरक टॉका तुमी.. " राधाबाईंचा प्रतिसाद.
" हे तुम्ही चांगलं केलं नाहीत विजयाताई... " शारदाबाई नाराजी व्यक्त करू लागल्या,"माझ्याजवळ एक बोललात.. हायकमांड जवळ वेगळंच... असा धोका द्यायला नको होता तुम्ही मला.."
" अहो धोका कसला त्यात? मी तुमच्यापाशी जे बोलले तेच मत तुमच्या हायकमांडकडेही व्यक्त केलं. तरीही त्यांचा आग्रहच होता मी उमेदवारी स्वीकारावी म्हणून... "
" अच्छा... अहो पण आग्रह तर मीही केला होता तेव्हा तुम्ही स्पष्ट शब्दात नकार दिला होता. मग हायकमांडने असं कोणतं चॉकलेट दिलं ज्यामुळे तुमचं मतपरिवर्तन घडून आलं..?? " शारदाबाईंनी खोचक प्रश्न विचारला.
" चॉकलेट? " विजयाताईंना हसू आलं," चॉकलेट बिस्कीटांची भूरळ पडायला आम्ही का मातब्बर राजकारणी आहोत? आम्ही सामान्य माणसं.. आम्हाला ना चॉकलेटचा मोह ना बिस्कीटांची लालसा... "
" असं? मग खुर्चीचा मोह का टाळता आला नाही सामान्य माणसाला? " विजयाताईंची उमेदवारी शारदाबाईंच्या जिव्हारी लागली होती.
" खुर्ची? अहो अजून खूप लांबचा विषय आहे तो... सध्या फक्त तुमच्या पक्षाने मला उमेदवारी दिलीय आणि तुम्हाला तो तुमचा पराभव वाटायला लागलाय... " विजयाताईंनी वर्मावर बोट ठेवलं.
" होय... कारण त्या जागेवर माझा अधिकार होता. तुम्ही माझं इतक्या वर्षांचं स्वप्नं धुळीला मिळवलंत... मला निवडून यायचंय... महापौर व्हायचंय या शहराची... "
" मग व्हा की कुणी अडवलंय तुम्हाला? "
" तुम्हीच... माझ्या राजकारणाचा अश्वमेध तुम्हीच रोखलाय. आणि हा पराभव मी कधीही विसरू शकणार नाही... तुम्हाला माहितीये.. मी इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलंय... काय काय गमावलंय...
वीस वर्षांपूर्वी या शहरात आले मी. माझा नवरा लोकविकास पार्टीचा एक किरकोळ कार्यकर्ता होता. शहरात पक्षाच्या सभा संमेलनांचे पोस्टर लावणारा. त्याच्याशी लग्न करून मी इथं आले तेव्हा मला राजकारण हा शब्दही लिहिता येत नव्हता. पण नवऱ्याला तर राजकारणाचं वेड. त्याची कमाई शून्य होती. घरात अण्णाचा दाणा नसायचा. पक्षाच्या नेत्याने कधीमधी अंगावर फेकलेले शे पन्नास रूपये त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांच्या इस्त्रीवरच खर्च व्हायचे. माझे आईवडील खेड्यात राहायचे. गरीब होते. मोलमजुरी करायचे. त्यांच्या हिश्श्याला येणाऱ्या तूर ज्वारीतला अर्धा भाग ते मला आणून द्यायचे. त्यांचा माझ्यावर खूप जीव. लेकीवर उपासमारीची वेळ येतेय हे पाहून त्यांचा जीव तीळ तीळ तुटायचा. म्हणून मग दर आठवड्याला ते बिचारे तेल मीठ मिरची पुरवायचे. मला लाज वाटायची. पण माझ्या नवऱ्याचं निर्लज्ज वागणं संपत नव्हतं. पायात घालायला चप्पल नव्हती पण त्याला स्वप्न आमदार झाल्याचं पडायचं. सकाळी घातलेला ड्रेस संध्याकाळी धुवून पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी घालावा लागायचा पण तरीही अंगातलं राजकारणाचं भूत उतरत नव्हतं. या खुर्चीच्या नादानं तो तर भीकेला लागलाच होता पण त्यानं माझं आयुष्य ही बरबाद करून टाकलं होतं.
मला अजूनही चांगलं आठवतं नगरपालिकेच्या निवडणूका लागल्या होत्या. माझ्या नवऱ्याच्या अंगात नगरसेवक व्हायचं भूत संचारलं होतं. तिकिटासाठी रोज या नेत्याच्या मागे त्या नेत्याच्या मागे लागत होता. मी पक्षाचा किती निष्ठावंत कार्यकर्ता आहे ते सांगत होता. प्रत्येक नेता त्याला तोंडापुरतं आश्वासन द्यायचा. तेवढ्यावरच त्याच्या आशा पल्लवित व्हायच्या. पण पुढे काहीच होत नव्हतं. तोंडी दिलेलं आश्वासन हवेत विरून जायचं. तरीही त्याची आशा सुटत नव्हती. तो आणखी दुसऱ्या नेत्याच्या हातापाया पडायचा. आणि गप्पा तर असा मारायचा की, 'आपल्याला तिकीट भेटलंय, आपून निवडून येणार. नगरसेवक व्हणार.. काय काय नि काय काय...' सुरूवातीला मीही त्याच्या भूलथापांना बळी पडत गेले. मलाही वाटायचं हा राजकारणात यशस्वी होईल. आपलं नशीब बदलून जाईल. पण नंतर लक्षात आलं. याची साखरपत्ती आणण्याइतपतही लायकी नाही. हा आपल्याला जगवू शकत नाही. वाटायचं सोडून जावं याला. पण नवरा होता. मंगळसूत्रानं जीवाशी बांधलेला. सोडावा तर लोक काय म्हणतील याची भीती होती. मी विचार केला तो आपल्याला जगवू शकत नाही ना... चला.. आपणच त्याला जगवू. अन् मी दोन पैसे मिळवून देईल अशा कामाचा शोध घेऊ लागले. आमच्या घराच्या मागे कुरडया पापड्या करणाऱ्या महिलांचा एक गट होता. मी त्यांच्यात सहभागी झाले. घरी बसून पापड तयार करून देऊ लागले. दोन पैसे मिळायला लागले. संसार कसाबसा चालायला लागला. पण त्याला हे ही जमत नव्हतं. 'अगं एका मोठ्या लीडरची बायको आहेस तू. अन् असली फडतूस कामं करतेस... बंद कर.. नुसती बसून राहत जा..' तो म्हणायचा. अन् बसून राहून खाणार काय होते? आमच्याकडं रोजच भांडणं किरकीरी होऊ लागल्या. कोणत्याही कारणावरून. तो कधीही यायचा मी पै पै जमवून डब्यात ठेवलेले पैसे चोरून न्यायचा. दारू पिऊन यायचा. मला शिव्या द्यायचा. मारहाण करायच. अन् मी पतिव्रता असल्यागत पतीला परमेश्वर मानून सगळं सहन करत राहायचे.
त्या दिवशीही तो खूप दारू पिऊन आला होता. त्याला धड चालताही येत नव्हते. त्याच्यासोबत आणखी एक माणूस होता. पक्षाचाच कुणीतरी लीडर असावा. त्यानेच इतकी दारू पाजली असेल. तो लीडर माझ्या नवऱ्याला नीट धरून घरात आणत होता. मध्येच त्याचा तोल जात होता. त्यानं माझ्या नवऱ्याला कसंबसं घरापर्यंत आणून सोडलं. मला बघताच नवरा बडबडू लागला, " शारदे बग कोण आलंय... आपले सायब... मला तिकीट देणारेत ते.. तू जरा.. तू... सायबाची शेवा कर.." आणि त्या साहेबाला घरात बसवून माझा नवरा घराबाहेर पडला. त्यानं दार बंद करून घेतलं. बाहेरून कडी लावली. मी ओरडत राहिले. दार ठोठावत राहिले. पण बाहेरून दाराशी बसलेला माझा नवरा दार उघडत नव्हता. मी घाबरून गेले. रडू लागले. तो माणूस शांत बसलेला होता. मी आतल्या घरात गेले. भाज्या कापण्याची विळी घेऊन बाहेर आले, " खबरदार जर माझ्या अंगाला हात लावाल तर... कांद्यासारखी कापून काढीन.." मी चांगलीच चवताळली होते, " माझा नवरा कसाही असला तरी मी तसली बाई नाही. तुम्ही चालते व्हा इथून..."
" हो.. जातो जातो... " त्या माणसाला दारू चढलेलीच नव्हती," फक्त एकदा.. मी काय सांगतोय ते ऐकून घ्या... पक्षाचं तिकीट देण्याच्या बोलीवर तुमच्या नवऱ्यानं मला इथं आणलंय. म्हणजे असं समजा की तिकिटाच्या बदल्यात त्यानं एका रात्रीसाठी तुमचा माझ्याशी सौदा केलाय... अर्थात हे तुमच्या इच्छेविरुद्ध आहे हे मला इथं आल्यावर कळलं. त्यामुळे मी तुमच्या अंगाला हातही लावणार नाही. काळजी करू नका. मी काही रेपिस्ट नाही. राजकारणी आहे अन् थोडासा सौदेबाजही.. " तो मला समजावू लागला. माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. पण माझ्या नवऱ्यानं मला विकलंय, हे ऐकून मी आतल्या आत उद्ध्वस्त झाले. हा माणूस काम करत नव्हता, दारुड्या होता, मला मारहाण करत होता तरीही माझा नवरा म्हणून मी स्वीकारलेला होता. पण आज.." हे बघा.. मी परत जातोय पण तुमचा नवरा राजकारणाच्या वेडापायी, पैशांच्या लोभापायी तुम्हाला कधीही कुणाच्याही हाती सोपवू शकतो. तेव्हा सावध रहा. सगळीच माणसं माझ्याइतकी चांगली नसतात. " आणि तो उठून जायला लागला. त्याच्या बोलण्याने माझ्या काळजात चर्र झालं. त्याचं म्हणणं खरं होतं. आज माझ्या नवऱ्यानं माझा सौदा या माणसाशी केला होता. उद्या आणखी कुणाशी, परवा आणखी तिसऱ्या कुणाशी करायचा. आपली बायको ही जगातली एकमेव अशी वस्तू आहे जी विकल्यानंतरही पुन्हा आपल्या पाशीच राहते , हे लक्षात आल्यावर तो रोजच माझ्यासाठी नवं गिऱ्हाईक आणायचा... नाही नाही... मी असं होऊ देणार नाही. मी हातातली विळी बाजूला टाकली.
" एक मिनिट थांबा..." दरवाजा उघडण्यासाठी कडीला हात लावू पाहणाऱ्या त्या माणसाला मी थांबवले, " एका रात्रीच्या बदल्यात माझ्या नवऱ्याला तिकीट द्यायचं कबूल केलंय ना तुम्ही?"
"होय " तो वळून उत्तरला.
" आणि जर मला स्वतःला तिकीट हवे असेल तर काय करावे लागेल...? " मी जवळ जाऊन त्या माणसाच्या गळ्यात हात टाकला. तो हसला. त्यानं मला मिठीत आवळलं. तो माझ्या देहाशी खेळत राहिला अन् मी स्वतःला पणाला लावून बर्फागत थंड पडून राहिले.
मला नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली. अर्थातच मी निवडणूक हरले. पण पक्षात माझं नाव नोंदवलं गेलं. निवडणूक हरूनही साहेबांच्या कृपेनं पक्षात महत्वाची पदं मिळत गेली. मी मोठी होत गेले. पण त्यानंतर मला पक्षाने निवडणुकीत उतरण्याची संधी दिली नाही. त्या पराभवाचा शिक्का नावावर नोंदला गेला तो कायमचाच. पण त्या एका रात्रीने मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर बरंच काही गमवावं लागतं आणि मिळवण्यासाठी आपण काय गमावतोय याचा हिशेब ठेवायचा नसतो याची शिकवण दिली. नवऱ्याच्या आधाराशिवाय मीही काहीतरी करून दाखवू शकते हा विश्वास दिला. तुम्हाला माहितीये, त्या रात्री मला घरात कोंडून दाराशी बसणारा माझा नवरा आजही माझ्या बंगल्याच्या दाराशी बांधून ठेवलाय मी कुत्र्यासारखा... त्याला घरात प्रवेश नाही..!
दाराशी बांधलेल्या कुत्र्याच्या नावानं कपाळी कुंकू लावून त्या नेत्याची रखेल म्हणून जगतेय मी विजयाताई... माझं स्वत्व.. स्वाभिमान.. सगळं गमावून या राजकारणात उतरलेय मी... आणि तुम्ही माझा हक्क.. माझी संधी हिरावून घेताय...? " विजयाताईंनी शारदाबाईंच्या आयुष्याची सगळी चित्तरकथा शांतपणे ऐकून घेतली. त्या बोलायच्या थांबल्यानंतर विजयाताई त्यांच्या जवळ गेल्या. त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन बोलल्या," एक लढवय्यी स्त्री म्हणून मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे शारदाताई... मी आजिबात तुमचा हक्क हिरावून घेत नाहीये. माझी ती लायकीही नाही. आणि मी तुम्हाला धोकाबिकाही दिलेला नाही. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. " विजयाताई समजावू लागल्या," मी उमेदवारीसाठी स्पष्ट नकार देऊनही पक्षाध्यक्षांनी मी होकार द्यावा असा आग्रह धरला. या सगळ्यातून सुटका व्हावी म्हणून मी म्हणाले की माझ्या दोन अटी आहेत. मला विश्वास होता की ते माझ्या अटी मान्यच करू शकणार नाहीत. पण त्यांनी त्या मान्य केल्या. मग मात्र माझ्याकडे नकार देण्यासाठी कारणच उरले नाही... "
" असं? आम्हालातरी कळू द्या तुम्ही घातलेल्या अटी.. "
" मी दोन अटी मांडल्या होत्या.. पहिली अट. निवडणूकीत एकही पैसा दिला किंवा घेतला जाणार नाही आणि दुसरी अट.. निवडणूक प्रचारात माझ्या पूर्वायुष्याचं भांडवल करून सहानुभूतीची लाट निर्माण करून मत मिळवण्याचा प्रयत्न कुणीही करणार नाही.. या त्या दोन अटी होत्या... "
" आणि तुमच्या दोन्ही अटी मान्य झाल्या? "
" होय... एका पैशाचाही भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे निवडणूक लढवण्याच्या माझ्या विचाराला पक्षानेही स्विकारलंय... "
" आणि तुम्हाला असं वाटतं की.. प्रामाणिकपणावर निवडणूका जिंकल्या जाऊ शकतात? "
" माहीत नाही... प्रामाणिकपणे निवडणूका जिंकल्या जाऊ शकतात की नाही ते मला माहीत नाही. पण प्रामाणिकपणाने निवडणूका लढवल्या जाऊ शकतात इतकंच मला जगाला दाखवून द्यायचंय... व्यवस्थेची अन् जनसामान्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गैरसमजांची साफसफाई व्हावी एवढ्यासाठीच माझी धडपड आहे... "
" बघूयात... "
नक्कीच बघूयात... तुमच्यासाठी दुसरा वॉर्ड मोकळा करताहेत हायकमांड... तिथेही आपण भ्रष्टाचार मुक्तीचा हा प्रयोग राबवूया.."
" तुमचे प्रयोग तुम्हालाच लखलाभ... आणि तिकिटासाठी मला ना तुमच्या शिफारसीची गरज आहे... ना तुमच्या पक्षाची...! खरंतर पार्टीने तुमच्यासारखा चांगला, प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार दिल्यानंतर तुमच्या विरोधात कुणीही उमेदवार देणार नाही असं सगळ्या विरोधी पक्षांनी ठरवलंय... " शारदाबाईंनी सांगितलं.
" हो का? पण खरं सांगू का निवडणूक बिनविरोध होणं म्हणजे राजकारण्यांनी संगनमत करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार वाटतो मला.... " विजयाताईंचं मत.
" म्हणूनच तर लोकशाही वाचवण्यासाठी मी मैदानात उतरायचं ठरवलंय... मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. अपक्ष म्हणून. तोही तुमच्या विरोधात.! " विजयाताईंच्या खांद्यावर हात टाकून शारदाबाई बोलल्या.
" अरे व्वा.. अभिनंदन.. आणि खूप खूप शुभेच्छा..! म्हणजे तुम्ही स्वतःच्याच पक्षाविरूद्ध लढणार आहात तर? "
" पक्षाविरोधात नाही... पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात.... निकाल काहीही आला निवडणुकांनंतर पुन्हा पक्षात परतणार आहेच मी... निवडून आले तरीही अन् पडले तरीही... "
" तुमचा वैचारिक किंवा ठराविक भुमिका घेण्यासंदर्भात काही गोंधळ होतोय असं नाही वाटत का तुम्हाला? "
" गोंधळ? " शारदाबाई जोरात हसल्या," तुम्ही फारच विचार करता बाई... आम्ही लोक विचार- भुमिका असल्या फडतूस बाबींचा वापर पेपरवेट सारखा करत असतो. म्हणजे ह्या दुटप्पीपणाच्या वैचारिक गोंधळाची कागदपत्रे फडफडू किंवा उडू नयेत म्हणून त्यांच्यावर भुमिकांचा पेपरवेट ठेवायचा. छान, रंगीत, गुळगुळीत... दुरून पाहणाऱ्यांना तो आकर्षक काचेचा गोल दिसतो. त्याखाली दाबलेल्या राजकीय भंपकपणाचे कागद मात्र दिसत नाहीत. तसे आम्ही दिसूही देत नाहीत... "
" तुम्ही अगदी मातब्बर राजकारणी झालायत शारदाबाई... रिअली ग्रेट... मला अभिमान वाटतो तुमचा.... पुरूषांच्या या प्रभावक्षेत्रात स्वतःचं इतकं ठळक स्थान निर्माण करणारी एक पावरबाज स्त्री म्हणून मला तुमचं नेहमीच कौतुक वाटत आलंय... उद्याच्या निवडणुकीत तुम्ही विजयी झालात तर तुम्हाला पहिला विजयी गुलाल लावण्यासाठी मी हजर असेन याची खात्री बाळगा... " विजयाताईंनी खाली ठेवलेली पर्स पुन्हा खांद्यावर घेतली," बरं मी निघू का.. मला उशीर होतोय... तुम्ही मात्र चहा घेतल्याशिवाय जाऊ नका... राधाबाई चहा आणा लवकर.. "
" आजिबात नाही... शत्रूचा चहा तर आम्ही टाळतच नाहीत... तुम्ही या बिनधास्त.. आणि निवडणूक जरा जोर लावून लढवा... कारण गाठ माझ्याशी असणार आहे.. " शारदाबाईंनी जणू गर्भित इशारा दिला. त्यावर विजयाताई नुसत्याच हसल्या. अन् घराबाहेर पडल्या..! शारदाबाईंच्या डोक्यात मात्र बरंच काही शिजायला लागलं होतं.

© सर्वाधिकार सुरक्षित -

( आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)

© शिरीष पद्माकर देशमुख ®

{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®