लेडीज ओन्ली - 4 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 4

|| लेडीज ओन्ली ||

{ भाग - ४}

[ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.]

" लेडीज ओन्ली - ( 4 ) "



'टिंगटाँग..' दारावरची बेल वाजली.
"आलं माझं बछडू", असं म्हणत विजयाताई ताडकन उठून दरवाजाच्या दिशेने झेपावल्या. घाईनेच कडी सरकवली. दार उघडलं. समोर एक पन्नाशीतली दांडग्या शरीरयष्टीची बाई उभी होती.
"राधाबाई.. तुम्ही आहात होय.. " अपेक्षाभंग झाल्यागत विजयाताई बोलल्या.
" म्हंजी.. दुसरं कोण येणार व्हतं या टायमाला? मार्निंगचे सात मंजी माझाच ड्युटी टायम न वं?" राधाबाई. या घरात धुणी भांडी करणारी मोलकरीण. पण विजयाताई त्यांना कधीच परक्या समजत नसत. आज विजयाताईंच्या मनात काय चाललंय ते राधाबाईंना अजूनतरी ठाऊक नव्हतं.
" हं.. तुमचाच टाईम...या..!! " दाराला लागून असलेल्या छोट्या रॅकवर ठेवलेला ब्रश आणि पेस्ट हातात घेत विजयाताई बोलल्या.
" आनदर कोणी येनार व्हतं क्काय? " असं पुटपुटत राधाबाई आतल्या घरात गेल्या. स्वयंपाकाच्या ओट्यावर पसरलेली भांडी एकत्र करू लागल्या.
" हं.. माझं पिल्लू येणार आहे राधाबाई.. " दातांवर ब्रश फिरवत विजयाताईंनी सांगितलं. ते ऐकताच राधाबाईंनाही खूप आनंद झाला.
" आवो काय सांगता... व्हेन कमनार हाईत आसरूताई? " सगळी भांडी एका मोठ्या टोपल्यात भरून मोरीवर नेऊन ठेवत त्यांनी विचारले.
" तेच तर बोलणं झालं नाही ना... मध्येच फोन कट झाला... पण बोलण्यावरून असं वाटलं की आज उद्याच येईल... " आतल्या घरातील मोरीजवळ जात त्यांनी सांगितलं. चुळ भरली. चेहरा धुतला. राधाबाई भांडी घासायला लागल्या होत्या.
" आणि राधाबाई कितीदा सांगितलंय तुम्हाला... आसरूताई म्हणत जाऊ नका म्हणून... "
" मंग व्हाट म्हणू... इतकं हारडं नेम ठिवायचंच कशाला तुम्ही? "
" अहो किती सोपंय... अश्रवी... अश्रवी.. माझ्या अश्रुंचं सिंचन करून जिला जोपासलंय.. वाढवलंय अशी ती अश्रवी.. " कुठे तरी हरवून जात त्या बोलल्या.
" म्हंजी? मी आंडरस्ट्यांडीन आसं बोला की वो बाईसायब... " राधाबाईला काहीच कळले नव्हते.
"जाऊद्या... तुम्हाला चहा?"
"हाप क्वोप.. कडक... "
" बरं बरं.. " विजयाताईंनी गॅस पेटवला. चहा टाकला. चहा खळखळा उकळला. दोघींसाठी दोन कपात ओतला . तेवढ्या वेळात पेपरवाला दाराच्या फटीतून पेपर सरकवून गेला. विजयाताई एका हातात चहाचा कप आणि दुसर्‍या हातात पेपर घेऊन कोचावर येऊन बसल्या.
" टिंगटाँग " दारावरची बेल पुन्हा एकदा वाजली. विजयाताईंनी हातातला पेपर अक्षरशः भिरकावला. ताडकन उठल्या. घाईने दरवाज्यापाशी गेल्या. दार उघडलं.
"कमल्या का आसरूताई?" राधाबाईंनी आतूनच विचारलं.
"नाही. दुसरंच कुणीतरी..." विजयाताई उत्तरल्या. समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत विचारलं, "नमस्कार... कोण हवंय आपल्याला?"
"आपणच... " समोरची स्त्री हलकंसं स्मित करीत बोलली.
" ओह... या ना आत... " ती स्त्री घरात आली. विजयाताईंनी तिला बसण्यासाठी खुर्ची दिली. स्वतः तिच्यासमोर बसून हलकंसं स्मित करत बोलल्या," माफ करा हं... पण मी तुम्हाला ओळखलं नाही. "
" अहो साहजिकच आहे. पहिल्यांदाच भेटतोय आपण. मी शारदा थोरात. कदाचित नाव ऐकलं असेल.. " त्या स्त्रीने स्वतःची ओळख करून दिल्यानंतर विजयाताईंच्या लगेच काहीतरी लक्षात आले.
" हो हो हो... आपण लोकविकास पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहात ना? माफ करा हं... कधी समोरासमोर भेट न झाल्यामुळे ओळखू शकले नाही... " विजयाताईंनी हात जोडले.
" अहो स्वाभाविकच आहे. " त्यांचे हात हातात घेत शारदाताई बोलल्या," आणि मी म्हणजे काही आमदार खासदार नाही, सगळ्यांनीच मला ओळखायला. चळवळीतली एक सामान्य कार्यकर्ती आहे. "
" हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. " विजयाताईंनी शारदाताईंच्या हातातून आपले हात सोडवून घेतले. आतल्या घराकडे वळून पाहत आवाज दिला," राधाबाई, चहा करा पुन्हा एकदा छानपैकी.. "
" वक्के वक्के... " राधाबाईंचा आतूनच खणखणीत प्रतिसाद.
" अहो चहा कशाला उगीच..? "
" असं कसं? आपल्यासारख्या कर्तबगार व्यक्तीचे पाय पहिल्यांदाच लागलेत माझ्या झोपडीला.. "
" काय हो हे झोपडी वगैरे... खूप छान घर आहे तुमचं.. मला खूप आवडलंय... विशेषतः नारीशक्तीचा गजर करणाऱ्या या भिंती..." भिंतीवरील फोटोंकडे त्यांनी निर्देश केला," आणि तुमच्या घरावर लावलेली नावाची पाटी.. फक्त स्त्रियांचं आणि स्त्रियांसाठी असलेलं घर.. 'लेडीज ओन्ली'... खरंतर आज आमचे पक्षनेतेच येणार होते इथं. पण मीच म्हटलं जमणार नाही... तिथे ओन्ली लेडीजनाच प्रवेश आहे.. " शारदाबाई स्वतः केलेल्या विनोदावर स्वतःच हसल्या. इतर कुणी हसत नाहीये हे बघून पुढे बोलल्या," आणि मी कसली कर्तबगार हो ... स्त्रियांच्या हक्कांसाठी जे काही करता येईल ते आपलं कर्तव्य म्हणून मी करत राहते. कधी यश मिळतं. कधी मिळत नाही. खऱ्या कर्तबगार तुम्ही.. परिस्थितीशी झुंज देत इथपर्यंत पोचलात... स्वतःचं वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख निर्माण केलीय.. मुलीला फॉरेनला सुद्धा... खरं तर त्या गोष्टीचं मला विशेष कौतुक वाटतं... बघा ना एकट्या मुलीला सहलीला पाठवायचं म्हटलं तरी भीती वाटते... तुम्ही थेट परदेशात पाठवलं... आपली कुणी माणसं नसताना...काळ हा असा असताना..आणि तुम्ही सगळं अनुभवलेलं असूनही..... "
"भोगणं म्हणतात त्याला..." विजयाताई त्यांना थांबवून बोलल्या, "अनुभवण्यात अन् भोगण्यात खूप फरक असतो.. मी सगळं भोगलंय.. तेही माझ्या स्वतःच्या देशात, स्वतःच्या गावात.. माझ्याच माणसांसमक्ष... माझ्यावर अत्याचार करणारी माणसं परदेशातून आली नव्हती... माझ्याच माणसांत असूनही मी उद्ध्वस्त झालेच..."
" सॉरी पण मला तुमच्या जखमा उघड्या करायच्या नव्हत्या... " शारदाबाई बोलल्या.
" त्या बंदच कधी झाल्या होत्या शारदाबाई? " विजयाताई शांतपणे बोलल्या," मी माझ्या जखमांना खपली धरू देत नाही कधीच. जखमा जिवंत असल्या की वेदना जिवंत राहतात. अन् ज्याच्या वेदना जित्या असतात त्याच्या संवेदनाही जाग्या असतात. "
" खरंय तुमचं... तुम्ही इतक्या संवेदनशील आहात म्हणूनच पक्षानं मला तुमच्याकडे पाठवलंय... "
" म्हणजे? "
" म्हणजे असं बघा विजयाताई, मी आपल्यासाठी एक आॅफर घेऊन आलीय.. "
" आॅफर? "
" हं.. तुमचं आयुष्य बदलून टाकणारी आॅफर.. " शारदाताई प्रचंड ठामपणाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. इतक्यात चहाच्या कपांचा ट्रे घेऊन राधाबाई समोर आल्या," ल्यो टी... पेशल टी.. "
" अरे व्वा थँक्यू हं... " चहाचा कप उचलत शारदाताई बोलल्या.
" येलकम येलकम... बाईसायब तुम्ही... "
" मला नको राधाबाई... आताच घेतलाय ना आपण... तुम्ही घ्या... "
" आय अॅम तर घ्यायलेच... बट यू पण घ्या... टाकलाय समद्यांसाठीच... " राधाबाईंचा आग्रह म्हणजे ब्रिटीशांचा आदेश जणू. विजयाताईंनी गुपचूप चहाचा कप उचलला. रिकामा ट्रे घेऊन राधाबाई आपल्या कामाला गेल्या. चहाचे घोट घेत शारदाताई पुढे बोलू लागल्या...
" विजयाताई, मी आता मुद्द्याचंच बोलते. "
" बरं होईल... मलाही कळेल... "
" हं... तर विषय असा आहे की पुढच्या दोन अडीच महिन्यात आपल्या शहरातील महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत.. " शारदाताई सांगू लागल्या," आपल्या या वॉर्डासाठी आमचा पक्ष एका नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. आणि आमच्या पक्षश्रेष्ठींचा असा आग्रह आहे की तुम्ही या वॉर्डातून आमच्या पक्षातर्फे निवडणूक लढवावी... " शारदाताई दोन्ही हात जोडून बोलल्या. त्यांचं बोलणं ऐकून विजयाताईंना ठसकाच लागला.
" राजकारण आणि मी? अहो काहीतरीच काय... मी एक सामान्य बुकसेलर.. दहा बाय दहाच्या छोट्याश्या जागेत पुस्तकांचं छोटंसं दुकान चालवते. मी चुकूनही कधीही कोणत्याही पक्षाच्या मोर्चा उपोषणात देखील सहभागी झालेली नाही. मला राजकारणातलं ओ की ठो कळत नाही. आणि तुम्ही थेट उमेदवारी देऊ करताय मला... " विजयाताईंच्या बोलण्यात राजकारणासाठी स्पष्ट नकार होता.
"अहो तुम्हाला कळायची काय गरज.. आम्ही आहोत की सोबत... तुम्ही फक्त हो म्हणा.. बाकी सगळं सांभाळायला आपल्या पक्षाची तगडी टीम आहेच की.. " शारदाताईंनी चहा संपवला. कप खाली ठेवला.
" आपले आणि आपल्या पक्षाचे खूप खूप धन्यवाद.. पण मला राजकारणात आजिबात इंटरेस्ट नाही. मला माफ करा.. मी अतिशय विनम्रपणे आपला उमेदवारीचा प्रस्ताव नाकारत आहे.. माझी ती क्षमता नाही.. लायकी तर नाहीच नाही... " विजयाताईंनी दोन्ही हात जोडून शारदाताईंना आपल्या मनातला निर्णय बोलून दाखवला. शारदाताई काही वेळ शांत बसून राहिल्या. कशाचा तरी विचार करून त्या बोलल्या," मी हा तुमचा अंतिम निर्णय समजू का? "
" हो.. अगदी अंतिम..! " विजयाताईंचे हात जोडलेलेच होते. आणि चेहऱ्यावर नेहमीचं स्मित.
" ठीक आहे... निघते मग मी...आमच्या हायकमांडचा फोन वगैरे आला तर.. "
" तुम्हाला जे सांगितलंय... तेच त्यांना सांगणार.. " विजयाताईंनी पुन्हा एकदा हसत हात जोडले. शारदाबाई उठल्या. त्यांनी विजयाताईंचा निरोप घेतला. जायला निघाल्या. इतक्यात विजयाताईंच्या काहीतरी लक्षात आलं.
" मी एक विचारू का? " त्यांनी परवानगी मागितली. शारदाबाई थांबल्या. मागे वळून बघितलं.
" हो.. विचारा की.. अगदी कसलाही संकोच न बाळगता... "
" नाही म्हणजे अगदी सहजच विचारतेय... "
" विचारा हो... "
" तुमच्या पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते धडपडत असतात. म्हणजे राजकारणात आपल्याला काहीतरी संधी मिळेल या एकाच अपेक्षेने राजकीय पक्षांच्या कार्यालयात सतरंज्या उचलण्यात आयुष्य खर्ची घालणारी मंडळी जशी इतरांकडे तशी तुमच्याही पक्षात आहेतच की. मग अशा निष्ठावंतांना डावलून मला उमेदवारी द्यावी असं का वाटलं असेल तुमच्या हायकमांडला? बरं निष्ठेचं सोडा... मी तर असंही ऐकलंय की, पेट्या आणि खोकी घेऊन रांगेत उभ्या असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. तरीही मीच का? " हा प्रश्न बऱ्याच वेळेपासून विजयाताईंच्या डोक्यात घोंघावत होता. त्यांनी तो रोखून धरला होता. पण आता शारदाबाई जायला निघाल्यावर त्यांना स्वतःला थांबवता आले नाही. त्यांना असं वाटलं की कदाचित शारदाबाईंना हा प्रश्न आवडणार नाही. पण उलट त्या या प्रश्नावर खळखळून हसल्या, "बघा बरं विजयाताई, तुम्ही म्हणालात राजकारणाचा आणि तुमचा काही संबंध नाही. पण सगळ्याच राजकीय खबरा आहेत की तुमच्याकडे.."
"तसं नाही हो... " विजयाताई समजावू लागल्या," माझं पुस्तकाचं दुकान आहे. तिथं मासिकं, दैनिकंही ठेवते मी विक्रीसाठी. गिऱ्हाईक नसलं की वाचत बसते काहीबाही. रोज पाच पंचवीस पेपरं डोळ्याखालून गेल्यावर इतक्या खबरा कळणं तर साहजिकच आहे ना... "
" हो तर... तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे... तुम्हीच का? " परत जाण्यासाठी दारापर्यंत पोचलेल्या शारदाबाई मागे फिरल्या. विजयाताईंच्या जवळ जाऊन त्यांना राजकारण समजावू लागल्या," तर त्याचं असं आहे विजयाताई.. आपला समाज मुळातच व्यक्तीपूजक आहे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक हिरो हवा असतो. सिनेमा असेल तर एकाच वेळी दहा वीस गुंडांना लोळवणारा, क्रिकेट असेल तर एकटाच शे दीडशे रन काढून सामना जिंकून देणारा आणि राजकारण असेल तर परिस्थितीशी लढून झगडून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे आलेला नेता हवा असतो आम्हाला. मग त्याला देवत्व बहाल करता येतं. त्याचे अनुयायी, त्याचे भक्त घडवता येतात. तसे ते घडवले जातात. पण म्हणतात ना दगडापासून देवाची मुर्ती घडवायची असेल तर त्या दगडातही देव होण्याचे काहीतरी गुण असावे लागतात. एकदा असा दगड सापडला की मग त्याला शेंदूर फासणं, नारळ फोडणं, प्राणप्रतिष्ठा करणं, मंदिर बांधणं वगैरे गोष्टी करण्यासाठी आम्ही असतोच... त्याही भक्तांकडून आलेल्या देणगीतून...!! "
" माफ करा शारदाबाई.... पण खरं सांगू का.. तुम्ही काय म्हणताय ते मला काहीच कळत नाहीये..म्हणजे तसे बी ए ला राज्यशास्त्र शिकले आहे मी.. प्लेटो - अॅरिस्टॉटल वगैरेंचं.. पण हे तुम्ही जे सांगताय ते वेगळेच... " मध्येच विजयाताईंनी आपली अडचण बोलून दाखवली.
" समजावतेय... राजकारणच समजावतेय तुम्हाला... " शारदाबाई विजयाताईंकडे रोखून बघत हसत बोलल्या," राजकारण कधीच कोणत्याच पुस्तकातून शिकवलं जात नाही. तसं ते शिकवता येतंही नाही. तसं असतं तर सगळेच राज्यशास्त्राचे प्राध्यापक आज आमदार खासदार असले असते. राज्यशास्त्र वेगळं... राजकारण वेगळं. राज्यशास्त्रात सिद्धांत असतात फक्त... राजकारणात सिद्धता असते! आणि सिद्धतेतून सिद्ध झालेला एक अनुभवजन्य पण अलिखित राजकीय सिद्धांत असे सांगतो की निवडणूका या मुद्द्यांवर नाही तर लाटांवर जिंकल्या जातात. "
" लाट? म्हणजे? " विजयाताईंना काहीच कळत नव्हतं.
" हो... लाटच.... आपले मतदार पाच पाच वर्षे एखाद्याच्या विरोधात बोलत राहतील. पण ऐन निवडणुकीच्या काळात एखादी लाट निर्माण झाली किंवा जाणीवपूर्वक निर्माण केली गेली तर मतदार राजा त्या लाटेसोबत वाहून जाऊन मतदान करतो अगदी त्याचं स्वतःचं मत काहीही असलं तरीही. आपलं मत आणि मती या लाटेकडे त्याने गहाण टाकलेली असते... " शारदाबाई समजावून सांगू लागल्या," आणि विजयाताई... अशी लाट निर्माण करण्यासाठीच आम्हाला तुमची गरज आहे. म्हणून आम्ही तुमच्या दारापर्यंत आलोय... "
विजयाताई शारदाबाईंचा शब्द न शब्द नीट लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना पटतही नव्हत्या तरीही,"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की.. मी तुमच्या राजकारणात एखादी लाट निर्माण करू शकते... व्हॉट नॉनसेन्स..!" विजयाताईंना खरं तर हसू येत होतं. पण त्या टाळत होत्या.
" वाटत नाही... आम्हाला माहीत आहे.. " शारदाबाई मात्र त्यांच्या मतांवर आणि विचारांवर ठाम होत्या," हे अगदी अनआॅफिशिअल बोलतेय... खरं तर पक्षाची धोरणं अशी उघड करायची नसतात.. पण एक मैत्रीण म्हणून.. राजकारण काय असतं हे तुम्हाला सांगतेय... तुमचा चेहरा दाखवून आम्ही लाट निर्माण करू शकतो याची आम्हाला खात्री आहे... तुम्ही आमच्या पक्षात आलात तर सध्याच्या न्यूट्रल पॉलिटिक्सची दिशाच आम्ही बदलून टाकू शकतो...! "
" मला नाही शक्य वाटत... " विजयाताईंना पटत नव्हते," माझ्याकडे असं काय आहे ज्याचं राजकीय भांडवल होऊ शकतं....? "
" तुमचा इतिहास..! " शारदाबाई बोलल्या अन् विजयाताईंच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. त्या मटकन कॉटवर बसल्या.
'इतिहास... म्हणजे माझं पूर्वायुष्य?.. त्या जखमा.. त्या वेदना.. त्या रक्तबंबाळ जीवनाचं पुरून टाकलेलं मढं.. पुन्हा उकरायचं? राजकारणासाठी...? ' विजयाताईंचं डोकं बधीर झालं. दातखीळ बसल्यागत त्या तोंड मिटून गप्प झाल्या. शारदाबाईंनी त्यांचा चेहरा बघून त्यांच्या मनाची अवस्था ओळखली. त्यांच्या मनस्थितीचा अंदाज पाहून त्यांनी विजयाताईंच्या खांद्यावर हात ठेवला अन् त्या एक जळजळीत वास्तव सांगू लागल्या, " उद्या जेव्हा आमच्या पक्षाकडून तुमची उमेदवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल. विजयाताई - समाजातली एक दबलेली पिचलेली पिडीत स्त्री. जी स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांचं मुर्तीमंत प्रतिक आहे. त्या स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करतोय. मग प्रचार होऊ लागेल. 'विजयाची कथा' सुपरहिट डेली सोपसारखी चॅनेलवरून वारंवार दाखवली जाईल. मग या बिझी शहरातला संवेदनशील नागरिक आपल्या अफाट आणि अविरत सहानुभूतीची छत्रछाया विजयाच्या मस्तकावर धरेल. सहानुभुतीचा मायामंडप एवढा मोठा होईल की सत्तेला त्यात हातपाय पसरून प्रस्थापित होता येईल. विजयाताई, तुमच्या एकेका प्रचारसभेत हजारो लोकांपुढे तुमच्या एकेका जखमेवरचं झाकण काढून दाखवलं जाईल. कोणती जखम किती खोल आहे... कोणती जखम अजूनही भळभळतेय... कोणती जखम खपली धरू लागलीय.. कोणत्या जखमेचं मांस अजूनही लोंबतंय... सगळं लोकांपुढे मांडलं जाईल. लोक कळवळतील. हळहळतील. तुमच्या जखमांची वर्णनं ऐकून काहींच्या डोळ्यांत पाणी येईल. काही जण टाळ्या वाजवतील. अन् त्या भारावलेल्या विजयामय वातावरणात आमचा नेता आमच्या पार्टीला मतदान करण्याचं आर्त आवाहन करेल... यालाच भावनेचं राजकारण म्हणतात विजयाताई.... आपल्या देशाची लोकशाही याच राजकारणावर टिकून आहे..! "
" लोक वेडे नसतात... " विजयाताईंना शारदाबाईंचं विश्लेषण पटत नव्हतं.
"लोक वेडेच असतात..." शारदाबाई त्यांच्या मतांवर ठाम होत्या, " या समाजात एकेकटा मोजला जाणारा प्रत्येक माणूस हुशार असतो.अन् विचारीसुद्धा. पण जेव्हा तो समाज-समूहात येतो तेव्हा त्यानं आपला मेंदू मनाकडे गहाण ठेवलेला असतो. फडतूस मुद्द्यांवरून निर्माण होणारे राजकीय पक्ष अन् त्यांचं यश हे अशा समूहाला शरण जाणाऱ्या बुद्धीवंतांच्या भावनिकतेतून येणाऱ्या नालायकपणाचं जिवंत उदाहरण आहे....
तुम्हाला नाही कळायचं... पण राजकारण हे असंच असतं विजयाताई... गलिच्छ... घाणेरडं.. शुद्ध विचारांच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसांनी चुकूनही राजकारणात येऊ नये...! कारण एखादा संत महात्मा जरी यात आला तरी त्याला भ्रष्ट बनवून सोडण्याची ताकद या राजकारणात असते... "
" म्हणजे तुमचं चारित्र्य? तुम्हाला या घाणीतून बाहेर पडावं असं नाही वाटलं कधी? " विजयाताईंनी शारदाबाईंच्या वाक्याच्या आधारे त्यांच्याच मुद्द्यावर बोट ठेवलं.
" हं... खरंय... आमचं चारित्रही मळलंय.... या गटारात पडून आम्ही गढूळ झालोय...पण समुद्राचं पाणी खारट असतं म्हणून माशाला त्यातून बाहेर पडता येईल का? जगावं लागतं त्यातच कसंतरी... मग लागत जाते सवय.. सवयीचं होतं पुढे व्यसन... अन् व्यसनी माणसाला खूप चांगलं कळत असतं की व्यसन वाईट असतं म्हणून... पण त्याला ते सोडता येत नाही. आम्हालाही कळतं... राजकारण वाईट असतं. पण बाहेर पडता येत नाही. म्हणूनच तर जे बाहेर आहेत त्या चांगल्या लोकांनी तरी यात येऊ नये अशी विनवणी करतोय आम्ही... " शारदाबाईंनी डोळ्यावरचा चष्मा काढला. पदराने पुसला आणि पुन्हा डोळ्यांवर ठेवला," आमच्या हायकमांडचा आग्रह होता म्हणून मी तुमच्यापर्यंत आले. माझं स्वतःचं मत विचाराल तर एक स्त्री म्हणून, मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून.. 'तुम्ही राजकारणात येऊच नका' असाच सल्ला मी तुम्हाला देईल...! "
" का? खरंच राजकारण इतकं वाईट असतं? " विजयाताईंचा प्रश्न.
" मी दररोज अनुभवतेय राजकारण... आणि माणसाने सगळे अनुभव स्वतःच घेऊन शहाणं व्हायचं नसतं. सगळ्या ठेचा स्वतःच लावून घ्यायच्या नसतात. दुसरा अडखळत असेल तर त्याला बघूनही आपण आपला रस्ता बदलण्यातच शहाणपण असतं. "
" माझा तो रस्ता नाही हे मला ठाऊक आहेच... तरीही तुमच्या रस्त्याने मी आल्याने तुमचा काय फायदा होणार आहे ते जाणून घ्यायचे होते... "
" आमचा फायदा असल्याशिवाय आम्ही राजकारणी मंडळी काहीच करत नसतो विजयाताई.... तुम्ही विचारताच आहात म्हणून सांगते, " शारदाबाई राजकारणातलं गुपीत उलगडत होत्या," तुमच्या पूर्वायुष्यात तुमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचं भांडवल करण्याचा प्लॅन होता आमच्या पक्षाचा. शहरातल्या प्रत्येक वॉर्डावॉर्डातून प्रचाराच्या निमित्ताने तुम्हाला फिरवायचं. तुमची करूण कहाणी पुन्हा पुन्हा लोकांपुढे मांडायची. तुमच्या जुन्या झालेल्या जखमांवरच्या खपल्या उकरून काढायच्या. मग त्या पुन्हा वाहू लागतील. तुम्ही वेदनेने कण्हू लागाल, विव्हळू लागाल.. तुमच्या दुःखाच्या कथा ऐकून ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावतील. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल अपार कणव निर्माण होईल आणि अशा भारावलेल्या वातावरणात आमचा नेता पब्लिकपुढे तुमचा पदर पसरेल. मतांची भीक मागेल. आणि मग... आम्ही निर्माण केलेल्या तुमच्यासाठीच्या सहानुभूतीच्या लाटेवर आमचे उमेदवार निवडून येतील. आणि आम्ही सत्तेत येऊ....!! " राजकारण्यांचा हा काळाकुट्ट प्लॅन शारदाबाईंनी उघड केला. तो ऐकून विजयाताईंना प्रचंड धक्का बसला. त्या सुन्न झाल्या.," असं... इतकं घाणेरडं असतं राजकारण विजयाताई...!! " शारदाबाईंनी विजयाताईंचे खांदे थोपटले. कॉटवरून उठल्या. जायला निघाल्या.
" शारदाबाई, लहान मुलांना आपल्या सोबत न्यायचं नसलं की आपण बागुलबुवाची भीती दाखवतो त्याला.. तशी तुम्ही राजकारणाची इतकी भीती दाखवलीय मला की मी तो विचार करणंही शक्य नाही... तरीही एक शेवटचा प्रश्न विचारू का? " विजयाताई भानावर येऊन बोलल्या.
" अवश्य.. "
" तुमच्या पक्षाच्या अंतर्गत चालणाऱ्या या गोष्टी... हे निर्णय... हे काळंकभिन्न वास्तव... मला सांगण्यामागे कोणतं राजकारण समजायचं मी? " विजयाताईंच्या या प्रश्नावर शारदाबाई पुन्हा एकदा हसल्या," खूप हुशार आहात तुम्ही.... राजकारणात असत्या तर खूप पुढे गेल्या असता... "
" थँक्यू.. पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही..!! "
" बऱ्याच गोपनीय गोष्टी तुमच्यापुढे बोलून दाखवल्यात.. या प्रश्नाचं उत्तर लपवणार नाही. " शारदाबाईंनी दीर्घ श्वास घेतला," आपण झाड लावायचं. जपायचं. त्याचं संगोपन करायचं पण फळं लागण्याची वेळ आली की दुसऱ्याच कुणीतरी उठायचं आणि झाडाचा वारसदार म्हणून उभं राहायचं. किंवा कुणीतरी अशा वारसदाराला उभं करायचं. राजकारणात हे असं नेहमीच होत असतं. मागच्या पाच वर्षांत हा वॉर्ड अक्षरशः पिंजून काढलाय मी... कशासाठी तर मला या वॉर्डातून उभं राहायचं होतं म्हणून ... पण ऐनवेळी हायकमांडने तुमचं नाव पुढं केलं... मला राग आला. मी रूसलेही.. पण संसारात आणि राजकारणात रुसवा फार काळ ठेवायचा नसतो. काळवेळ पाहून कधी रूसायचं तर कधी हसायचं... औपचारिकपणे तुमच्यासाठी उमेदवारीची आॅफर घेऊन आले खरी मी.. पण तुम्ही ती नाकारावी अशीच अपेक्षा होती माझी. तुम्ही ती नाकारलीत.. खूप बरं वाटलं... पण तुम्ही नकार दिला नसता तर? मी असं काही घडू देणार नव्हतेच..! कारण या वॉर्डातून मला उभं राहायचंय.. आणि मीच उभी राहणार..! "
" राजकीय क्षेत्रात राहूनही तुम्ही जपलेल्या तुमच्यातल्या या प्रामाणिक स्पष्टवक्तेपणाचं कौतुक वाटतंय मला... अगदी डावपेचही मोकळेपणाने सांगता तुम्ही... " विजयाताई बोलल्या.
" डाव? अहो आमचे कसले डाव अन् कसले पेच विजयाताई? आम्ही तर शेवटच्या बाकावर बसणारे कार्यकर्ते.. डावपेच चालतात समोर.. टेबलापलीकडच्या खुर्च्यांमध्ये... ते कित्येकदा आम्हालाही कळत नाहीत. आणि तुमचा तर अजून राजकारणाच्या शाळेतला प्रवेशही निश्चित झालेला नाही... मग तुम्हाला कसे कळायचे? येतो आम्ही.. नमस्कार! " शारदाबाई हसल्या आणि घराबाहेर पडल्या.
शारदाबाई निघून गेल्या. विजयाताई बराचवेळ त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होत्या. आणि प्रयत्न करत होत्या, समजून घेण्याचा.. शारदाबाईंना अन् राजकारणालाही..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -
© शिरीष पद्माकर देशमुख ®