सौभाग्य व ती! - 6 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 6

६) सौभाग्य व ती !
त्यानंतर सदाशिवने ते रूप, तो अवतार कायमच धारण केला. नयन त्यामुळे भयभीत, आतंकित राहू लागली. तिने तोंड उघडण्याचा अवकाश हातात येईल त्याने तिला मारायला धावे. कुत्रासमोर दिसताच मांजराने बाजूला जावे तसं ती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. प्रत्येक रात्र तिच्यासाठी नरकानुभव असे. रोज रात्री ती स्वतःच स्वतःच्या मरणावर अश्रू ढाळत असे...
एक प्रसन्न पहाट. कुणी सडासंमार्जनात दंग, कुणी सकाळचे कार्यक्रम आटोपण्यात दंग तर कुणाची दिवसभर करावयाच्या कामांची आखणी सुरू. ओसरीवर बसलेली नयन समोर ठेवलेल्या टोपलीतून एक-एक फूल वेचून दोऱ्यात माळत होती. सोबतच तिच्या आयुष्यात घडलेल्या एकेका प्रसंगाची उजळणीही होत होती...
अंगणात विठाबाई भांडे घासत असताना खोलीतून संजूच्या रडण्याचा आवाज आला म्हणून हात धुऊन विठा खोलीत गेली. संजीवनीला व्यवस्थित घेऊन ती बाहेर येत म्हणाली,
"काय धन्याचं काम बाई? अव्हो,धनी जागेच हाईत पर घेयाच तर सोडा परीक झोका तं लोटावा का न्हाई?"
"जावू दे ग, विठा..." नयन बोलत असताना पिंजऱ्यात नव्याने आलेल्या पोपटाने गोड आवाज दिला. सदाचे मामा वारले त्याच सकाळी जुन्या राघूने 'राम' म्हटले होते. काही दिवसांपूर्वी सदाने नवीन पोपट आणला होता. पोपटांस पिंजऱ्यात अडकावयाची त्याला खूपच आवड होती. फूलं माळायचे सोडून नयनने क्षणभर त्या पोपटाकडे पाहिले. नयनला त्या अवस्थेत पाहून विठाबाईने विचारले,
"तायसाब, एवढं काय फाता वो मन लावून? पोपटालं कव्हा फायल न्हाई का?"
"विठा, या पोपटाला पाहिलं आणि मलाच माझी आठवण आली."
"आता ग बया. सोत्ताची सय सोत्ताच करता? काय येडबीड तर लागलं न्हाई की?"
"तसं नाही गं विठा पण हा पोपट पिंजऱ्यात बंद आहे आणि मी या वाड्यात. रात्री माझी होणारी फडफड आणि दोन-तीन दिवसांपासून पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी या पोपटाची चाललेली फडफड एकच नाही का?"
"बाऽय, बाऽय. तायसाब, तुमी शिकल्याला. पुस्तकातल्यावानी ग्वाड बोलता, मह्या टकुऱ्यावरून गेलं. तायसाब, येक ईच्चारू का, आपली ही छकुली परीक दिसते कोन्हा वाणी?"
"आत्ताच काय समजणार? माहेरी होते तेव्हा तिथे सारे म्हणत, की संजू म्हणजे लहानपणीचा बाळू."
"आक्शी मामावर गेली म्हणा की."
"हां. अगदी. आत्ताही हिचे डोळे म्हणजे बघ कसे पाणीदार दिसतात अगदी बाळूसारखे. पहातच बसावे असे..."
"बरेच बाळूच्या डोळ्यात पाहिलेलं दिसतंय..." असे म्हणत संजीवनीला ओलांडून तिच्याकडे न पाहता सदाशिव न्हाणीमध्ये गेला...

"आता या माणसाला काय म्हणावं बाप्पा? आक्शी सोन्यावाणी पोरगी. दिसली की उचलून घेवाव वाटत्ये. पर ह्यो माणूस एक नदर बी टाकाय राजी न्हाई."
"ते बघातत ना माझ्याकडे... रात्री..."
"बायसाब, आत्ता कोण पेत न्हाई व्हो? मझा दादला बी पेते पर आस्सा तर्रास कव्हाच देत न्हाय."
"काऽय? तुझा नवरासुद्धा पितो?" असे विचारत नयन खोलीत आली. तिच्या पाठोपाठ आलेली विठा म्हणाली,
"तर्र मंग, दिसभर लई कस्ट उपसत्यात. कुंटलं-कुंटलच पोतं एका दमात नेत्यात. आत्ता मला येक सांगा, आश्शी आंगफोड म्हेनत केल्यावर थोडुशी पेवावं लागलं का न्हाई? तरतरी न्हाई आली तर राती कसं व्हावं? पर येक हाय, पेलं तर बी मह्या सद्बाबाहीर न्हाय जाणार. म्या जसं म्हन्ल तसच. म्या हाई म्हन्ल तर हात बी लावत न्हाय."
"भारी नशीबवान आहेस ग बाई."
"ताईसाहेब नवरा मुठीत ठिवाचाच.आता तुमी बी धन्यालं मुठीत ठिवा..."
"मुठीत? तुझ्या धन्याला? मी ठेवू?"
"का-का-काय झालं? त्यो बी मरद हाय.त्येला बी भूक हाय. धा बायकात उठून दिसणार रुपडं हाय तुमचं. अव्हो,जरा दमानं, नखऱ्यानं घ्या. पाय चाटतील तुमचं..."
"धीर आणि यांच्यासोबत?"
"ताईसाहेब,लै शिकले न्हाय.पर येक सांगत्ये,तुमी त्येंच्या कलानं घ्या,त्येस्नी मनाजोगत करु द्या. तुम्ही,तुमच्या रुपाचं त्येंना येड लागल आस्स वागा मंग फा त्यो तिला दूर करुन तुमच्या मांघ मांघ गोंडा घोळतो का न्हाई त्ये?"
"मी काहीच प्रयत्न केले नाहीत असं तुला वाटते?"
"राग मानू नका तायसाब,पर येक सांगत्ये तुमी लै बिगीन गरम व्हता. बाईच्या जातीनं आस्स गरम व्हणं बर न्हाई. नवरा बाहीरबुणग्या आसताना तर न्हाईच न्हाई..." विठा बोलत असताना सुस्नान सदाशिव आत आला तशी विठा बाई बाहेर गेली. सदाशिव कपडे घालत असताना विठाच्या बोलण्याने विचारात पडलेली नयन संजीवनीस उचलून घेत म्हणाली,
"बघ,संजूबाळे बघ. तुझे पप्पा आले. पप्पा म्हण बल. म्हण ना ग पप्पा.अहो,बघा ना,कित्ती गोड बाळ आहे. घ्या की थोड..."
"बाजुला सरक. मला वेळ नाही."
"बघा तर,तुमच्याकडे कशी बघतेय डोळे कसे फिरवतेय?"
"हो.माहिती आहे. तिचे डोळे आहेत बाळूसारखे... तुझ्या बाळूसारखे!" शेवटच्या शब्दावर जोर देत सदाशिव खोलीबाहेर गेला.
'हे असं का म्हणाले? बाळू या शब्दावर त्यांनी जोर का दिला त्या-त्यांना काय...' क्षणात सावरत ती पुन्हा मनाशीच म्हणाली,
'छे! छे! विठा म्हणाली तेच खरे आहे. मीच लवकर गरम होते.त्यांच्या मनामध्ये तसं काहीही नसेलही... 'तशा विचारात तिला बाळंपणातील तो प्रसंग आठवला...
त्या दिवशी दुपारी काकी नेहमीप्रमाणे धुणे धुवायला गेल्या होत्या.घरामध्ये नयन आणि आई दोघीच होत्या.जेवण झाल्यावर नयन बाजेवर पडली होती. तिच्याशेजारी संजूला घेवून बसलेली आई अचानक म्हणाली,
"नैने, बारशाला आलेली जावाईबापुंची मामी... ती तीच का?"
"हो. तीच ती सटवी, माझ्या संसारावर उठलीय."
"हे बघ, तुला एक सांगते, आता हे असं शब्दा-शब्दांवर चिडणं सोडून दे. साध्या साध्या गोष्टींवर..."
"आई, मग मी काय करू? स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या नवऱ्यास त्या भवानीच्या मिठीत शिरताना..." "चूऽप! जीभेला काही हाड?..."
"मग काय माझा संसार मोडला जात असताना शांत राहू?"
"नयन, हे बघ. आता तू आई झालीस. पावसाळ्यात झाड जसं बहरून येतं आणि त्याचं ते रूप सर्वांना भावते, तसं बाळंतपणानंतर स्त्री अंगापिंडाने रसरशीत होते. या गोष्टीचा फायदा घे. जावईबापूला स्वतःत गुंतवून ठेव. त्यांचं लक्ष त्या अंगवस्त्राकडे जाणार नाही. याची काळजी घे. ही गोडुली तुझ्यासोबत आहे. हिला त्यांच्या सहवासात जास्तीत जास्त ठेवा. एकदा का हिच्या बाललीलांमध्ये जर का ते गुंतले ना तर त्यांचे पाऊल कधीच घराबाहेर पडणार नाही. अग, या बाललीला दगडांना पाझर फोडण्यास समर्थ ठरतात. ते तर एक पुरुष आहेत, हाडामांसाचा गोळा आहेत. नंतर मग ते आपोआप तुझ्याकडे वळतील तेंव्हा सारं कसब पणाला..."
"पण आई, त्यांचं तिच्याकडे जाणं-येणं..."
"अग, अनेक पुरुषांना इकडे-तिकडे तोंड घालण्याची..."
"आई, अशी सवय भ...भ...भाऊंना..."
"भाऊ? नयन, तुला वाटते का भाऊ अगदीच 'पवित्र' आहेत?"
"आई, त...त...तू काय बोलतेस?"
"खरं तेच बोलतेय. तुझ्या भाऊंना माझ्याशिवाय कोण ओळखते? आता तू आई झालीस एका अर्थाने बरोबरीची झालीस. भाऊ काय नि अण्णा काय? सारे पुरुष एकाच माळेचे मणी."
"आई, आज तू..."
"बोलू दे. कदाचित तुला मदतच होईल. तुला काय किंवा अनेकांना काय, भाऊंची एकच बाजू माहिती आहे. परंतु दुसरी बाजू चुलीवर ठेवलेल्या भांड्याच्या बुडासारखी काळीकुट्ट आहे. शेतातले गडी वर्षभर कधीच टिकत नाहीत. कुठेही जा, पळसाला पाने तीनच! मोठमोठ्या शेतवाल्यांच्या घरी नोकरी करणाऱ्या गड्यांच्या बायकांना हा त्रास ठरलेलाच. परिस्थितीने गांजलेल्या नोकरांच्या परिस्थितीचा फायदा उचलण्यात सारे तरबेज असतात. जेव्हा गड्यांच्या लक्षात तो प्रकार येतो तेव्हा एक तर ते मुकाट सहन करतात किंवा वर्षाच्या आत नोकरी सोडून मूठ झाकलीच ठेवतात."
"हे...हे सारे काकीला माहिती आहे?"
"काकी काय आणि मी काय? दोघीही सारख्याच. एकीला काढावं आणि दुसरीला झाकावं. चूल, मूल आणि संसार हेच आमचं विश्व! नवऱ्यास मुठीत ठेवणं आम्हाला कधी जमलेच नाही. बालपणीच संसार अंगावर पडला त्याचा हा परिणाम असेल परंतु सारे समजूनही आम्ही कधीच 'ब्र' काढला नाही. वाट्याला येणाऱ्या सुखातच आम्ही खुश असतो. नवऱ्याच्या पायाच्या अंगठ्यावरच डोळे ठेवायचे असतात आणि एकांतातच ते त्यांच्या डोळ्यात मिसळायचे असतात या संस्कारात वाढल्याचा परिणाम असेल. आम्ही केलेले प्रयत्न वांझोटे ठरतील, त्याचे वेगळेच फळ मिळेल या भीतीनेही आम्ही मूग गिळले असतील."
"प...पण माझे वेगळे आहे..."
"तुझे वेगळे आहे. पण आता काळ बदललाय. तुझी मोठी आत्या कधी तरी मामाला चकार शब्द बोलते का? तीही आमच्याप्रमाणे मूग गिळून बसते. तिथे तुझी लहानी आत्या बघ... नवऱ्याला बोटावर खेळवतेय. नवऱ्याला निव्वळ घालून पाडून बोलणेही जमत नसते आणि आमच्याप्रमाणे अति मर्यादाही चांगली नाही. तू मोठी आत्या आणि लहानी आत्या यांच्यामधला मार्ग शोध..." "म्हणजे?"
"अगोदर स्वतःचा राग आवरून पतीवर प्रेम कर. त्यांच्या शब्दाला मान दे. त्यांच्या प्रत्येक कृतीस समजून घे. सुरुवातीला अनेक घावही तुला बसतील. परंतु जेव्हा तुझं प्रेम त्यांच्या लक्षात येईल, तू बदललीस ही खात्री पटेल शिवाय पहिल्याप्रमाणे वाद घालायचं सोडून दिलेस हे जेंव्हा त्यांच्या लक्षात येईल तेंव्हा तेही बदलतील. अर्थात हे एक-दोन दिवसात घडणार नाही कदाचित त्यास महिनेही लागतील. ते म्हणतात ना जे पेराल तेच उगवेल. बाळे, पोरी तू त्यांच्यावर भरभरून प्रेम कर, स्वतः बदल त्यात तुला प्रेमच मिळेल. प्रत्येकवेळी जर आकांडतांडव करू लागलीस तर तो पुरूष आहे, भ्रमर आहे. ज्या फुलाजवळ सुगंध असेल, मधुरस असेल त्याच फुलाकडे त्याचं प्रेम जाईल. आता तूही फुलासारखी टवटवीत झाली आहेस त्याचा फायदा घे. मला आता जास्त बोलताही येत नाही. ते म्हणतात ना, अवघड जागचे दुखणे आणि जावई डॉक्टर! तू शिकलेली आहेस, तुला जास्त सांगणे न लागे... संसारात जो तडा जातोय त्याला वेळीच सांध. पुन्हा मोठी भेग पडल्यावर काहीच फायदा नाही..."
खोलीच्या खिडकीवर बसून कावळा जोरजोराने कावकावत होता. त्याने स्वप्नामध्ये गेलेली नयन सासरी परतली. तिथे होते प्रश्नांचं कोंडाळ, प्रश्नांचा सागर. त्या सागरातून तिला हरवलेला खडीसाखर रूपी संसाराचा खडा शोधावयाचा होता. त्याची गोडी चाखावयाची होती. किती अवघड आणि जिकरीचे काम होते. कावळा पुन्हा कावकावला...
'अरे, कोणास आणणार बाबा? तुझी कावकाव म्हणजे कुणाच्या तरी आगमनाची चाहूल. कोण येईल? एखादा दूत माझं हरवलेलं सुख परत घेवून येईल? का येईल माझा सदाशिव? परंतु सदाने येताना नवेच रूप धारण केले तर? नवाच छळ सोबत आणला तर? कुठे तरी, काही तरी वेगळेच वाटतेय. आजची रात्र... नवीन काय घडेल? आगळं वेगळं काही पहायला मिळेल...'
"सूनबाई, जेवायला चल..."सासूचा आवाज आला. तशी नयन संजीवनीला कडेवर घेवून बाहेर आली. तिच्या पायात त्राण, वेग, चैतन्य नव्हतं. बळी जाणाऱ्या बकऱ्याची ती चाल होती. तिचं लक्ष पिंजऱ्यामध्ये बंद असलेला पोपट बाहेर पडण्यासाठी करीत असलेल्या आकांडतांडवाकडे गेलं. इवल्या पंखांची जीवघेणी फडफड करीत होता...
००००