सौभाग्य व ती! - 10 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 10

१०) सौभाग्य व ती !
त्या दिवशी सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. पाऊस पडण्याची लक्षणं नसली तरी सूर्यदर्शनही होत नव्हतं. वातावरण कोंदट झालं होतं. खोलीत बसलेल्या प्रभाच्या मनात विचारांच्या ढगांनी गर्दी केली होती. तो मोठ्ठा वाडा दोन दिवसांपासून तिला जणू खायला उठला होता. महत्त्वाच्या कामासाठी सदाला नागपूरला जावून दोन दिवस झाले होते. त्या दोन दिवसातील एक क्षणही असा नव्हता, की ज्या क्षणी प्रभाला सदाची आठवण झाली नाही.
'का...का.. माझ्या मनाची अवस्था का अशी व्हावी? आपलं मन का कावरं बावरं व्हाव? कोण लागतो सदा माझा? पुतण्या? भाचा? प्रियकर? पती? का मी त्याची रखेल? रखेलच!... अशा वेगळ्या संबंधात विवाहित पुरुषाजवळ राहणाऱ्या स्त्रीला हा समाज रखेलच मानतो. उद्या जर सदाचे मन परावर्तीत झाले, तो पुन्हा नयनच्या छायेखाली गेला तर? नाही... नाही. तशी कल्पनाच नको. रखेल म्हणून...' विचारा-विचाराने बेचैन झालेली, घायाळ झालेली प्रभा वाड्याच्या दारात आली. सदाच्या वाड्याला कुलूप होते. तिची सून... सवत की आणखी कोण? नयन तिच्या माहेरी लग्नाला गेली होती. बाजूच्या ओट्यावर तीन-चार बायका बसल्या होत्या. प्रभाला पाहताच त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली, तोंडाला पदर लावून हसणेही सुरू झाले. प्रभाला का ते नवीन होते?तितक्यात विठाबाई समोरून लगबगीने चाललेली पाहून वेळ जाण्याच्या दृष्टीने प्रभाने विचारले,
"काय चालले विठाबाई?"
"मला काय म्हन्ल्या का?" विठाने परतून विचारले.
"तुला नाही तर मग कुणाला? ये आत. म्हटलं हा वाडाही सदाशिवचाच आहे."
"हाय की. मला ठाव हाय, ह्यो वाडा धन्याचा हाय पर येथं राहाते ती त्यांची रखेल..."
"विऽठा...."
"आता ग बया. एवढे कामून वरडता? लगीन न लावता जी बाई राहाते तिला रखेलच म्हन्त्यात ना..."
"नाही. विठा नाही. असे कुणी म्हणत असेल तर मी ती जीभ हासडीन. ते जमलं नाही तर माझं जीवन संपवीन."
"संपून टाकशाल? बाई, बोलणं सोप हाय परीक वागणं लै आवगड. मरण मरावं आन जगावं बी आन् त्या मरणाला पुरून उरावं त्या नैनाबायनच."
"काय म्हणतीस?"
"हां तायसाब. अवो, तुमी बी येक बाईच. जरा तिचा बी ईच्चार करा. तुमी दोघं इकडं मस्तीत ऱ्हाता पर ती बिच्चारी दुकाच्या सरणावर रोज मरती व्हो..."
"विठा, मी तरी काय करू ग? मी पण अशीच पहिल्या रात्रीपासून..." असं बोलत प्रभा स्वतःच्याच नकळत गतकाळ विठासमोर उकलू लागली...
प्रभाचे लग्न शहरातल्या एका मोठ्या दुकानदाराशी झालं. तो कापडाचा मोठा व्यापारी आहे एवढेच प्रभाला सांगण्यात आले होते. लग्नापूर्वी, लग्नातही तिला त्याचा चेहरा दिसला नव्हता. कसा असेल तो? त्याला कशाचे व्यसन तर नसेल ना? अशा विचारात प्रभा त्याच्यासोबत मधुर मिलनाची वाट पाहत पलंगावर बसली होती. भला मोठ्ठा वाडा. त्या वाड्यात तिचा पती एकटाच राहात होता. राजाराणीच्या संसारात तिसरे कुणी नाही हे समजल्यापासून प्रभाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ती रात्र तिच्या मधुचंद्राची रात्र! एका वेगळ्याच हुरहुरीने, वेगळ्याच भीतीने ती पतीची वाट पाहत होती. तिला विशेष विचार करण्याची संधी न देता कुणीतरी... नक्कीच तिचा पती आत प्रवेश करून खोली बंद करीत होता. स्वप्नातल्या राजकुमाराचे दर्शन घ्यावे आणि म... म.. मग...या विचारात तिच्याकडे येणाऱ्या व्यक्तिकडे तिने पाहिले आणि ती दचकली. पलंगावरून
खाली उतरत तिने विचारले,
"क...क... कोण तुम्ही?"
"कोण म्हणजे? तुझा पती. असं काय करतेस? आजच आपल लग्न झालंय ना. हां.. हां.. आलं लक्षात, तुझ्या वडिलांनी तुला सांगितलेले दिसत नाही. तू पतीच्या रूपात एखादा तगडा जवान असेल अशा विचारात असशील... पण घाबरू नकोस. घोड्याला आणि माणसाला खायला मिळालं, की तो म्हातारा होत नाही. मी जरी पन्नाशीचा असलो तरी तुला पाहिजे ते द्यायला समर्थ आहे..."
"पण.... या...या वयात तुम्ही..."
"अग, एवढी मोठी जायदाद शिवाय वंशाला दिवा नको?"
"म्हणजे तुमच्या वंशाला दिवा मिळावा म्हणून तुम्ही माझ्या जीवनात अंधार करणार होय? माझं तारुण्य जळत असताना मी तुमच्या वंशाचा दिवा तेववावा असा विचार तुम्ही..."
"तू काळजी करू नकोस..." असे म्हणत म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं. त्याच्या स्पर्शाने प्रभाचे तारूण्य जागे झाले. सारे विसरून ती कणाकणाने पेटत होती. प...प पण ती शरीरसुखासाठी नुकतीच तयार होत असताना तो अचानक दूर झाला. ती पूर्णपणे पेटलेली नसताना, तिला जणू समुद्राच्या मध्यावर सोडून तिचा पती परतत होता. क्षणापूर्वी घोड्याचे उदाहरण देणारा, तिची इच्छा पूर्ण करेन असा टेंभा मिरविणारा, वंशाला दिवा हवा असणारा तिचा नवरा तिच्या जीवनातील अंधार अधोरेखित करून परतला होता. त्याच रात्री नाही तर नंतर रोजच तो तिच्या भावनांशी तसाच खेळू लागला. प्रभाला रात्र रात्र तळमळत ठेवू लागला. अनेक मध्यरात्री प्रभाने अंगावर थंड पाण्याचा हंडा रिता केला होता. त्या पाण्याने जळता निखारा थंड व्हावा तद्वत् तिचे बाह्यांग थंड होत असे परंतु अंतर्मनाचे काय? शरीरास आतून थंडावा कसा मिळावा. अशांत मनाने शरीरसुखासाठी तळमळत असताना भेटला..."
"भेटले आमचे धनी...सदाशिवराव..."
"हो विठा, हो. अग, शरीरसुख हा प्रत्येकाचा हक्क आहे. अग, शरीराची आग... आग...विठा, एक विचार कर, अग साधी जखम झाली तरी आपण..."
"पर त्याच्या नात्यागोत्याचा काही विचार..."
"नाती? विठा, अग जखम चिघळते ना तेव्हा तिला औषधच हवे असते. पायातला काटा जेंव्हा सलू लागतो ना तेंव्हा माणूस तो फक्त तो काटा येन-केन् प्रकारे कसा काढता येईल याचा विचार करतो. तसे शरीरसुखाचे आहे. अग, एकदा का त्या सुखाची चटक लागली ना... आणि त्यातल्या त्यात जिला शरीरसुख अर्धवट मिळते ना तेंव्हा ती घायाळ स्त्री ते सुख कसं मिळेल याचाच शोध घेते.
विठा, अग, विधवा स्त्री..."
"बया.. बया... आता काय बोलाव बाई...ईधवेला..."
"होय. विधवेलासुद्धा त्याची आवश्यकता असते. असं कुठं सांगितलय की त्या बायांना... म्हणजे विधवांना शारीरिक भूक नसते म्हणून? त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग भ्रष्ट असेल परंतु त्यापासून त्या विधवेस मिळणारे सुख, आनंद महत्त्वाचा असतो. समाजास तो मार्ग अमान्य असेल परंतु तिचे मन आनंदविभोर होते त्याचे काय? शेवटी प्रत्येकाची चालणारी धडपड कशासाठी असते? आनंद मिळण्यासाठीच ना? मग अतृप्त स्त्रीया, विधवा यांनी वेगळा मार्ग पत्करून आनंद मिळविला तर समाजाचे पोट का दुखते?..."
"बायजी, तुमी शिकल्याला हायेसा. मी तर आक्शी आडाणीच हाय पर मला येवढच घावते की तुमी जे करता ते लई वंगाळ हाय. भले तुमास्नी आणि धन्यास्नी आनंद मिळत आसल पर ती... ती... जिच्या कुक्काचा धनी तुमच्या मिठीत शिरतो ती नयनबाय, रात्रंदिस होरपळून निघतीय त्याचं काय? तुम्ही तुमच्या दुक्कावर मोप मलम लावून घेत असशाल पर जो मलम तुमासाठी संजीवनी ठरतोय तोच त्या बाईसाठी जखमेवर मीठ लावल्यावाणी जाळतो त्येच काय? तुमास्नी मोप सूक मिळत आसल पर ती नैनाताई तिकडे दुक्काच्या सागरात हेलकांडतीय त्येच काय? कोणाच्या दुकाच्या पायावर सोत्ताच्या सुकाचे ईमले बांधणं बर न्हाई. बर म्या चलते..." म्हणत विठा उठली आणि दरवाजाजवळ थांबून प्रभाकडे पाहत म्हणाली,
"मालकीनबाय, रागावू नका पर मला आपलं उगाच वाटत्ये ज्या सुकाचा तुमी आता डांगोरा पिटला आन जे सुक, आनंद तुमास्नी धन्यापासून मिळतो ना ते सुक तुमी लगीनाच्या पैले बी मिळवलं हाय तवाच तुम्ही एवढी डेरींग केली बगा..."
"विऽठाऽ..." प्रभा जोरात ओरडली परंतु तोपर्यंत विठाबाई वाड्याच्या बाहेर पडली होती मात्र जाताना प्रभाच्या जखमेवरची खपली काढून गेली होती. त्या जखमेतून भळाभळा वाहू लागलं आठवणींचं रक्त...
महाविद्यालयात शिकणारी प्रभा इतर मुलींप्रमाणे नसली तरी निश्चितच दहा जणींमध्ये उठून दिसणारी होती. रंग थोडासा सावळा, निमगोरा असला तरी मुख्य आकर्षण होते तिचे नाक, भरगच्च बांधा! तिच्या तशा आकर्षक सौंदर्यामुळेच कॉलेजातले अनेक युवक तिच्या भोवती भ्रमरागत पिंगा घालत असत परंतु प्रभाने कधीच कुणाची डाळ शिजू दिली नाही. कुणालाच थारा दिला नाही. मात्र वर्गातला विनय समोर येताच प्रभा कासावीस होत असे. तिचे सारे बांध तुटत असत. त्या दिवशी कॉलेजमधून बाहेर पडताच नेहमीप्रमाणे ती भराभरा चालू लागली. कारण सिटी बसची वेळ झाली होती. परंतु स्टेशनमध्ये शिरताच रेल्वेचा वेग मंद होतो त्याप्रमाणे अचानक प्रभाचा वेग कमी झाला कारण समोर मोटारसायकलवर विनय होता. तिला पाहताच तो हर्षोल्लासात म्हणाला, 'हाय प्रभा!'
'ह... ह..हाय!'
'बस. मस्तपैकी कॉफी घेवू.'
'प....पण माझी बस...' ती बोलत असताना तिची सिटी बस तिला 'टाटा' करत निघून गेली. शेवटी ती विनयसोबत त्या मोठ्या हॉटेलमध्ये गेली. त्याने प्रभाला हॉटेलातील एका सुंदर खोलीत नेले. का कोण जाणे पण प्रभा एखाद्या कठपुतळीप्रमाणे त्याच्या मागोमाग गेली. त्या खोलीतल्या एकांत वातावरणात आपण काय करतोय ते तिलाच कळत नव्हते. कळाले तेव्हा फार उशीर झाला होता. तेंव्हा प्रभाला रडताना पाहून विनय म्हणाला,
'प्रभा, झालं ते झालं आपण लग्न करू ना.' त्याच्या तशा शब्दामुळे प्रभा बरीच सावरली. दोघे खोलीबाहेर आले. दार काढताच समोर त्या दोघांची वर्गमैत्रीण शैला उभी होती. विनय-शैलाच्या चेहऱ्यावरील भावावरून आपण फसवल्या गेलो हे प्रभाने ओळखले. थकलेल्या मनाने आणि शरीराने प्रभा घरी परतली...
त्या प्रसंगानतर अनेकवेळा लगट करू पाहणाऱ्या विनयला जरी तिने झिडकारले असले तरी त्याच्यासोबत घालविलेले ते क्षण तिला रात्री झोपू देत नसत. ती रात्रभर तळमळत पडून राहायची. तशातच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. प्रभाचा अजय नावाचा मावसभाऊ त्यांच्याकडे राहायला आला होता. प्रभा, तिचा छोटा भाऊ आणि अजय बाहेरच्या खोलीमध्ये झोपत असत. आतल्या खोलीत झोपणाऱ्या प्रभाच्या आई-बापाची धुसफूस, कपड्यांची सळसळ तिला कासावीस करत असे. कॉलेजकुमार अजयने प्रभाची मन स्थिती ओळखली. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजायला कितीसा वेळ लागणार? गरजेपोटी, वेगळ्याच भुकेपोटी अजय -प्रभा नाते विसरून एक झाले. त्या रात्री ते प्रेमलीलेमध्ये दंग असताना प्रभाच्या बाबांनी पाहिलं. तो प्रकार त्यांनी प्रभाच्या आईलाही दाखविला. दोघांनी संताप आवरला, मनावर प्रचंड ताबा ठेवून रात्र काढली. सकाळ होताच अजयची रवानगी करण्यात त्याच्या गावी आली. प्रभाच्या वडिलांनी सुरू केले वर संशोधन!
"आई, तुम्ही हे काय चालवलंत?" प्रभाने विचारले.
"काय?" आईने कमालीच्या तुसड्या स्वरात विचारले.
"माझ्या लग्नाचं..."
"काय वाईट करतो आहोत? हे विचारायला लाज नाही वाटत? तुला काय वाटलं, तुझी थेर आम्हाला माहिती नाहीत? अग, अशी आग होती तर मला सांगायचं होतं, दिली असती उजवून. अग, तू नाते विसरून मावसभावालाच..." आई तसे म्हणत असताना प्रभाची खाली गेलेली मान वर झाली ती मधुचंद्राच्या रात्री. परंतु नवऱ्याच्या रूपात भेटलेल्या म्हाताऱ्याने तिला त्या रात्रीपासून कायम तळमळत ठेवलं. शरीरसुखाला लग्नापूर्वीच चटावलेली प्रभा लग्नानंतर त्या सुखासाठी कासावीस होवू लागली. शरीरसुख ही साऱ्यांचीच गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे शरीरसुखही आवश्यकच ही विचारसरणी दृढ झालेल्या प्रभाला भेटला-सदाशिव! तिचा भाचा दूरच्या नात्यातला! नात्यातला असला तरी तो तिच्या दृष्टीने एक पुरूष होता. अजय, विनयप्रमाणे सदाशिव दिसताच तिची अवस्था घायाळ हरिणीप्रमाणे होत असे. पाण्याबाहेर काढलेल्या माश्याप्रमाणे ती तडफडत असे. शरीरसुख तिची गरज बनली. त्या भावनांना वाट मिळाली, त्याचा स्फोट झाला. नात्यापेक्षा सुुख... शरीरसुख श्रेष्ठ ठरले. भोगाचा... विकृतीचा विजय झाला. जाळ्यामध्ये मासा अलगद सापडावा तसा सदाशिव तिला गवसला. दोघेही एकमेकांचे झाले. नातेगोते गौण ठरले...
००००